निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार लक्ष्मीबाई विठठलराव झोडपे ही मयत शेतकरी विठठलराव बाबुराव झोडपे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे व तीचे पती विठठलराव बाबुराव झोडपे हे दिनांक 23.11.2011 रोजी अर्जदाराच्या पोटात दुखत असल्याने उदगीर येथील दवाखाना आटोपून परत मुक्रमाबादकडे येत असतांना मुक्रमाबादकडून येत असलेली एक काळी पिवळी जीपच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयी व निष्काळजीपणे चालवुन अर्जदाराच्या पतीच्या गाडीस जोराची धडक दिल्याने त्यांना गंभीर दुःखापत होऊन जागेवरच अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाला. पोलीस स्टेशन वडवणा बु.तालुका लातूर जिल्हा नांदेड यांनी गुन्हा क्र. 75/2011 कलम 279,337,304(अ) भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते,त्यांचे नावाने मौजे तग्याळ तालुका मुखेड,जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 49 मध्ये क्षेत्रफळ 2 हेक्टर 0 आर एवढी शेतजमीन आहे. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 17.01.2012 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी आवश्यक त्या विमा कंपनीकडे पाठविला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना विमा रक्कम मिळणेसाठी अनेकवेळा तोंडी विनंती केली असता गैरअर्जदार यांनी नुसते आश्वासन दिलेले आहे. परंतु प्रस्तावाबाबत काय निर्णय घेण्यात आला याचे विषयी तीला काही एक कळविण्यात आले नाही. अर्जदार यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असता वेळीच अर्जदाराचे विमा प्रस्तावावर गैरअर्जदार यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही व अर्जदाराचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेऊन अर्जदारास आजपर्यंत विम्यची रक्कम गैरअर्जदार यांनी दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे त्यामुळे अर्जदार यांनी विमा रक्कम मिळणेसाठी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते तक्रारीत हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा तक्रार अर्ज विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या विसंगत आहे. अर्जदारास नुकसान भरपाई मागणेचा दावा अपरिपक्व आहे. तेव्हा अर्जदारास त्रुटीची सेवा दिली हे म्हणणे निराधार आहे. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यु झालेला आहे. घटनेच्या वेळी अर्जदाराचे पती मोटार सायकल चालवित होते. परंतु अर्जदाराचे मयत पतीने वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स दिनांक 21.11.2011 रोजी काढलेले होते. सदरील लायसन्स दिनांक 21.11.2011 ते 20.12.2012 या कालावधीत वैध आहे. अर्जदाराचे पतीस मोटार वाहन चालविण्याचा अनुभव नसतांनासुध्दा अर्जदारास पाठीमागे बसवून वाहन चालविले व मोटार वाहन कायदा व विमा पॉलिसीच्या करारातील तरतुदींचा भंग केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. अर्जदाराचे पती मृत्यु समयी शेतकरी होते हे म्हणणे खोटे आहे कारण शेतक-याने त्यांचे शेतात कास्त करणे आवश्यक आहे. अशा कास्तकारावर नैसर्गिक आपत्ती ओढवली तरच लाभ घेता येतो. उलटपक्षी अर्जदाराचे मयत पती विठठलराव हे स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय येथे 12 वर्षापासून सेवक म्हणून नोकरी करुन उपजिविका भागवित होते. अर्जदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे दाव्यासोबत जोडलेली नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्याच कागदपत्रांची पुर्तता करण्याची अर्जदारास मागणी केली. अर्जदार यांनी काही अंशी पुर्तता केली परंतु प्रस्तावावर निर्णय घेण्यापुर्वीच मा.न्याय मंचात तक्रार दाखल करणेची घाई केली. त्यामुळे अर्जदाराचा दावा अपरिपक्व आहे. अर्जदारास गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 4 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. अर्जदाराचे प्रस्तावावर कारवाई करुन दि.न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि.या विमा कंपनीने दिनांक 29.04.2013 रोजीचे पत्राव्दारे दावेदाराकडे गावनमुना 6क, अपघातग्रस्ताचा 7/12 उतारा पुर्तता करणेसाठीची मागणी केलेली होती. त्यानंतर दावेदाराने दिनांक 29.04.2013 रोजीच अपघातग्रस्ताचा गावनमुना 6क व 7/12 ची पुर्तता विमा कंपनीला केली. पुन्हा एकदा दिनांक 28.10.2013 रोजी दावेदाराने अपघातग्रस्ताचा 7/12 उतारा ,गावनमुना 6ड व 6क, वयाचा पुरावा मृत्यु प्रमाणपत्र या कागदपत्रांची पुर्तता विमा कंपनीला केली होती व विमा कंपनीला विनंती केली की, त्यांनी सदर दावा निकालात काढावा. विमा कंपनीने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुन देखील विमा कंपनीने सदर दाव्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे दावेदाराने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दाव्यापासून मिळणारी अथवा न मिळणा-या आर्थिक लाभासाठी गैरअर्जदार क्र. 4 डेक्कन इंशुरन्स कंपनीस जबाबदार धरण्यात येऊ नये.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांचे पती मयत विठठलराव झोडपे हा व्यवसायाने शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. तसेच अर्जदाराचे पतीचा मृत्यु अपघाती झाला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट होते. अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे दिनांक 17.01.2012 रोजी विमा प्रस्ताव दाखल केला होता. अर्जदार यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 व 3 विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 03.10.2013 व दिनांक 31.07.2014 रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची पुर्तता करणेविषयी सांगितले होते. सदरील पत्राचे अवलोकन केले असता विमा कंपनीने अर्जदारास म्युटेशन एंट्री,फेरफार एक्ट्रॅक्ट,6ड(मयताचा), 2010 सालापासूनचा 7/12 उतारा दाखल करणेविषयी सहायक प्रबंधक यांनी पत्र दिले होते त्यानुसार अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 4 डेक्कन इंशुरन्स यांनीही आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराने दिनांक 29.04.2013 व दिनांक 28.10.2013 रोजी गैरअर्जदार क्र. 2 व 3 विमा कंपनीने मागणी केलेली सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली असल्याचे लेखी जबाबामध्ये नमुद केलेले आहे. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली आहे. कागदपत्रांवरुन अर्जदाराने विमा कंपनीकडे मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केलेली असल्याचे दिसते. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे मागणीनुसार कागदपत्रांची पुर्तता करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांनी तक्रार दाखल करेपर्यंत म्हणजेच दिनांक 29.12.2014 पर्यंत अर्जदाराचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवलेला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा अपघाताचे वेळी वाहन चालवितांना झालेला असल्याने त्यावेळेस अर्जदाराचे मयत पतीकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता तसेच अर्जदाराचे पती हे शेतात कास्त करुन उपजिविका भागवित नव्हते या योग्य कारणावरुन तक्रार नामंजूर करावी असे नमुद केलेले आहे. तसेच लेखी जबाबामधील परिच्छेद क्रमांक 12 मध्ये अर्जदाराचा दावा अपरिपक्व आहे कारण अर्जदाराने सदर प्रस्तावावर विमा कंपनीने निर्णय घेण्यापुर्वी मा.न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे असे नमुद केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने केलेल्या त्रिपक्षीय करारामध्ये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेचे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढावेत अशा सुचना दिलेल्या असतांनाही विमा कंपनीने अर्जदार यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही म्हणजेच दिनांक 03.10.2013 पासून डिसेंबर,2014 पर्यंत अर्जदाराचे पस्तावावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. उलट तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदार यांचे पतीकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता व अर्जदाराचे पती हे नोकरी करुन उपजिविका भागवित होते हा नव्याने मुद्दा उपस्थित केलेला आहे. वास्तविक पाहता विमा कंपनीने सदरील प्रश्नाची शहानिशा यापुर्वीच अर्जदाराकडून करुन घेणे आवश्यक होते. परंतु कुठलेही संयुक्तीक कारण न देता अर्जदाराचा प्रस्ताव प्रलंबित ठेवलेला आहे व लेखी जबाबामध्ये नमुद केलेल्या मुद्यांमध्येही काही तथ्य नाही कारण अर्जदाराचे पतीकडे वाहन चालविण्याचा लर्निंग लायसन्स होते व अर्जदाराचे पती हे अपघाताचे वेळी 7/12 धारक होते हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यामुळे अर्जदार हा सदरील योजनेचा लाभार्थी आहे. अर्जदाराचा प्रस्ताव कुठलेही संयुक्तीक कारणाशिवाय प्रलंबित ठेवून गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- कागदपत्रे दाखल केल्याचे तारखेपासून म्हणजे दिनांक 29.04.2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार यास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.
>