निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार कमलबाई भ्र. दिगांबर राठोड ही मयत शेतकरी दिगांबर राठोड यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती दिगांबर राठोड हे दिनांक 15.01.2013 रोजी 12 वाजेच्याा सुमारास एम.आय.डी.सी. कृष्णुर कडून नांदेड ते नर्सी हायवे रस्ता ओलांडून ते घराकडे येत असतांना नायगांव कडून नांदेडकडे जाणा-या अल्टो कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही हयगयी व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून अर्जदाराचे पतीस पाठीमागुन धडक दिल्याने अर्जदाराचे पती यांना गंभीर जखमा झाल्याने उपचाराकामी लोटस हॉस्पीटल,नांदेड येथे शरीक केले. उपचारा दरम्याना दिनांक 13.02.2013 रोजी त्यांचा अपघाती मृत्यु झाला. पोलीस स्टेशन नायगांव,तालुका नायगांव,जिल्हा नांदेड यांनी गुन्हा क्र. 01/2013 कलम 279,337,304(अ) भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते,त्यांचे नावाने मौजे कृष्णुर तालुका नायगांव,जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 449मध्ये क्षेत्रफळ 30 आर एवढी शेतजमीन आहे. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 12.08.2014 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला असता गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदाराचे पतीचे वय हे अपघाताच्या वेळी 75 वर्षापेक्षा जास्त होते या कारणावरुन अर्जदाराचा विमा प्रस्ताव बेकायदेशीररीत्या नाकारलेला आहे. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते तक्रारीत हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 2 यांचे सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास गैरअर्जदार ,महाराष्ट्र शासन व सल्लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांनी दिनांक 12.08.2013 रोजी अर्जदाराचे पतीचे वय मतदार ओळखपत्रानुसार अपघात दिवशी अंदाजे 79 वर्षे होते. विमा योजनेप्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तीचे वय 10 ते 75 असणे आवश्यक असल्याने अर्जदाराचा विमा प्रस्ताव योग्यरीत्या फेटाळलेला आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. गैरअर्जदार यांनी सदर पस्तावावर कारवाई करुन फ्युचर जनरल इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांनी दिनांक 12.08.2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला आहे. सदर प्रस्तावात कंपनीने अपघातग्रस्ताचे वय योजनेंतर्गत नमुद केलेल्या वयोमर्यादेत बसत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांचे पती मयत दिगांबर राठोड हा व्यवसायाने शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झालेला आहे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव मयत शेतक-याचे वय योजनेतील विहित मर्यादेत बसत नसल्याने प्रस्ताव नाकारलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने अर्जदाराचे पतीचे वय ग्राह्य धरणेसाठी मतदार ओळखपत्राचा आधार घेतलेला आहे. मतदार ओळखपत्राचे अवलोकन केले असता दिनांक 01.01.1994 रोजी मयताचे वय 60 वर्ष असे नमुद केलेले आहे. परंतु अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या शविविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता अपघाताचे वेळी मयताचे वय 45 वर्ष असल्याचा उल्लेख मरणोत्तर पंचनाम्यात केलेला आहे. तसेच शविविच्छेदन अहवालामध्ये मृत्युसमयी अर्जदाराचे पतीचे वय हे 45 वर्ष दर्शविलेले आहे. शविविच्छेदन अहवाल करणारे वैद्यकीय अधिकारी हे व्यक्तीचे वय सांगणारे सक्षम व्यक्ती आहेत. तसेच अर्जदार यांनी तक्रारीसोबत अर्जदाराचे पतीने दिनांक 23 मार्च,1999 रोजी खरेदी केलेल्या शेतीचे नोंदणीकृत खरेदीखत दाखल केलेले आहे. त्यावर अर्जदाराचे पतीचे वय 30 वर्षे असे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदाराच्या पतीचे वय हे मृत्युसमयी 79 वर्षे नव्हते ही बाब सिध्द होते. मतदार ओळखपत्र हा वयाचा अधिकृत पुरावा होऊ शकत नाही. गैरअर्जदार यांनी मयत शेतक-याचे वयाबद्दल शंका होती तर अर्जदारास वयाच्या पुराव्याबद्दल कागदपत्रांची मागणी करणे आवश्यक होते. परंतु कसलीही तसदी न घेता गैरअर्जदार यांनी बेकायदेशीररीत्या अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला असल्याचे दिसून येते. असे करुन गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- विमा प्रस्ताव नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजे दिनांक 12.08.2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.