श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. सदर तक्रारीतील वि.प. विमा कंपनी आहे व ते वेगवेगळया पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना गुंतवणुक करावयास लावून त्यावर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देतात. तक्रारकर्तीने सदर तक्रार वि.प.ने आश्वासित केल्याप्रमाणे रक्कम न दिल्याने ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिने वि.प.क्र. 1 चे एजंट वि.प.क्र. 2 च्या सांगण्यावरुन पेंशन प्लॅनमध्ये पैसे गुंतविले. तक्रारकर्तीने वि.प.कडे रु.1,25,000/- इतकी रक्कम वि.प.कडे गुंतविली होती. काही महिन्यानंतर तिला वि.प.ने जिवन विमा पॉलिसी दिली. तक्रारकर्तीला फ्युचर जनरल इंडिया लाईफ इंशूरंस कंपनीची जिवन विमा पॉलिसी दिली. तसेच तक्रारकर्तीला एच डी एफ सी स्टँडर्ड लाईफ इंशुरंस पॉलिसी क्र.16427149 व 16427136 दिली. त्याचीही रक्कम परत केली नाही. तक्रारकर्तीने मुलीचे शिक्षण व कुटुंबाचे उदर निर्वाहाकरीता सदर रक्कम गुंतविली होती. वि.प.क्र. 2 हा वि.प.क्र. 1 चा एजंट होता. वि.प.चे आश्वासन इतके आकर्षक होते की, वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या को-या फॉर्मवर सह्या घेतल्या आणि योजनेची अंतिम तारीख आहे आणि दुपारी एक वाजेपर्यंत फॉर्म भरावयाचा आहे असेही सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तीला फॉर्मसुध्दा वाचता आला नाही. तक्रारकर्तीने भविष्याची तरतूद म्हणून रु.1,25,000/- वि.प.क्र. 2 ला दिले आणि तिला रु. 20,000/- पेंशन मिळणार होती. परंतू तसे न झाल्याने तक्रारकर्तीच्या सदर बाब लक्षात आल्यावर तिने गुंतविलेली रक्कम परत मागितली असता वि.प.क्र. 2 च्या कर्मचा-यांनी ते रक्कम परत करण्याच्या तयारीत असून तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यास ठेवलेली आहे असे सांगितले. तसेच वि.प.ने तक्रारकर्तीच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार केले असल्याचेही लक्षात आले. सदर बाबीची तक्रार तक्रारकर्तीने आय डी आर आणि आंम्बुडसम यांचेकडे करण्यात आली व त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच वारंवार मागणी केली असता वि.प.ने असे सांगितले 15 दिवसांच्या फ्री लुक पीरीयडमध्ये पॉलिसी रद्द करता येते अन्यथा नाही. सदर बाब वि.प.ने कधीही तक्रारकर्तीला कळविली नाही. म्हणून तक्रारकर्तीने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन तिने गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळावी, रु.50,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर प्रकरणात वि.प.क्र. 1 व 2 ला नोटीस बजावल्यानंतर वि.प.क्र. 1 मंचासमोर हजर झाले. वि.प.क्र. 1 ने सदर प्रकरणी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्र. 2 ला नोटीस प्राप्त झाल्याचा अहवाल प्राप्त. वि.प.क्र. 2 मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
4. वि.प.क्र. 1 ने तक्रारीस प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. आपल्या प्राथमिक आक्षेपामध्ये वि.प.क्र. 2 ने असे नमूद केले आहे की, तक्रारीतील सर्व आक्षेप हे वि.प.क्र. 2 वर घेण्यात आलेले आहेत आणि तो इशुरंस ब्रोकर आहे. वि.प.क्र. 1 च्या मते वि.प.क्र. 2 त्यांचा एजेंट नाही. वि.प.क्र. 1 हे वेगळे आणि स्वतंत्र वैध अस्तीत्व असणारे पंजीकृत असून ते वि.प.क्र. 2 ला संलग्न नाही. तक्रारकर्ता आणि वि.प.क्र. 2 च्या मधील दुवा वि.प.क्र. 1 नाही. तसेच वि.प.क्र. 2 हे स्वतंत्र असून त्यांच्यावर वि.प.क्र. 1 चे नियंत्रण नाही. वि.प.क्र. 2 त्यांच्या स्वतःच्या सल्याने आणि ग्राहकांच्या आवडीने विविध कंपनीच्या विमा पॉलिसी ग्राहकांना घेण्याचा सल्ला देतात. वि.प.क्र. 1 ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे विमा सुरक्षा पुरवितात. त्यामुळे वि.प.क्र. 1 ने कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही. वि.प.क्र. 1 कुणालाही पॉलिसीच्या अटी आणि शर्तीच्या बाहेर कुठलेही आश्वासन किंवा वचन देण्याकरीता अधिकृत करीत नाही. वि.प.क्र. 1 ने प्रस्ताव अर्जामध्ये तक्रारकर्तीने आवश्यक माहिती दिल्याप्रमाणे आणि विमा प्रस्तावाप्रमाणे विमा पॉलिसी निर्गमित करतात. तक्रारकर्ती सुशिक्षीत व्यक्ती असून तिला प्रस्ताव अर्जामध्ये स्वाक्ष-या करतांना वाचून आणि समजून केलेल्या आहेत. त्यामुळे तिचे याबाबतचे कथन मान्य करण्यायोग्य नाही. तक्रारकर्तीला पॉलिसी प्राप्त झाल्यावर, त्यातील अटी व शर्ती मान्य नसत्या तर तक्रारकर्तीला 15 दिवसांचा फ्री लुक पीरीयड हा पॉलिसी परत करण्याकरीता देण्यात आला होता आणि तिने पॉलिसी परत करण्याबाबत कळविले तर तिचे पहिले प्रीमीयम परत करण्यात आले असते. परंतू तक्रारकर्तीने तसे केले नाही. वि.प.क्र. 1 चे मते सदर प्रकरण हे प्रीमीयम भरुन जिवन सुरक्षा मिळाली नाही याबाबत नाही. कारण प्रीमीयम भरलेल्या कालावधीमध्ये तक्रारकर्तीला सुरक्षा देण्यात आली होती. सदर प्रकरण दि.13.03.2015 ला तिने घेतलेली विमा पॉलिसी व्यपगत झाल्याबाबतचे आहे. त्यामुळे प्रीमीयम परत करण्याबाबतचा आदेश कुठलेही मंच देऊ शकत नाही. तक्रारकर्त्याची त्यामध्ये कुठलीही सेवेमध्ये उणिव नाही. तक्रारकर्तीने स्वतः सदर पॉलिसी या बोनस आणि लाभ मिळण्याकरीता घेतल्याचे नमूद केल्याने ती वाणिज्यीक कारणाने घेतलेली आहे, म्हणून तक्रारकर्ती ग्राहक या परीभाषेत बसत नाही. वि.प.क्र. 1 ने पॉलिसीचा तपशील दाखल करुन तक्रारकर्तीला रु.50,000/- वार्षिक प्रीमीयम 12 वर्षापर्यंत द्यावयाचे होते व रु.5,64,625/- विमा मुल्य होते. तक्रारकर्तीने फ्री लुक कालावधी उलटून गेल्यावर पॉलिसी रद्द करण्याची विनंती केली असल्याने ती वि.प.क्र. 1 ने नाकारली आहे. तक्रारकर्तीला पुढचे प्रीमीयम देण्याकरीता स्मरणपत्र देण्यात आले होते, परंतू तिने प्रीमीयम न भरल्याने तिला तिची पॉलिसी व्यपगत झाल्याचे कळविण्यात आले. तक्रारकर्तीने एच डी एफ सी स्टँडर्ड लाईफ इंशूरंस कंपनीच्या पॉलिसीचे जे क्रमांक दिले आहे त्याच्याशी वि.प.क्र. 1 चा संबंध नाही. तक्रारकर्तीने स्वतः गोष्ट तयार करुन वि.प.क्र. 1 कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून त्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
5. प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्तीचा आणि वि.प.क्र. 1 चा तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
6. वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीने विमा पॉलिसीची रक्कम आणि त्यापासून मिळणा-या फायद्याकरीता विमा पॉलिसी घेतल्यामुळे त्या वाणिज्यीक उपयोगात मोडतात, म्हणून तक्रारकर्ती ग्राहक या परीभाषेत येत नाही ठरत नाही असे नमूद केले आहे. विमा पॉलिसी ही ग्राहक त्याचे जिवन सुरक्षित करण्याकरीता आणि जिवित असतांना किंवा त्यानंतर मिळणा-या लाभाकरीता विमा कंपनीला प्रीमीयम तसेच अन्य कर देऊन ती स्विकारतो. विमा कंपनी त्याबाबत योग्य तो मोबदला प्रीमीयम आणि इतर शुल्काची आकारणी करुन ग्राहकांना विमा पॉलिसी निर्गमित करते. त्यामुळे सदर विमा पॉलिसीचे लाभ हे वाणिज्यीक स्वरुपात मोडत नसल्याने वि.प.क्र. 1 चा उपरोक्त आक्षेप हा निरर्थक असल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ती विमा कंपनीची ग्राहक असल्याने तीची तक्रार मंचासमोर चालविण्यायोग्य आहे.
7. तक्रारकर्तीने सदर प्रकरणी असा आक्षेप घेतला आहे की, तिला चुकीची माहिती देऊन वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र.1 ची पॉलिसी त्याला दिली. तक्रारकर्तीला पेंशन पॉलिसी योजना सांगून नंतर जिवन विमा पॉलिसी दिल्याचे नमूद केले आहे. सदर प्रकरणी पॉलिसीचे अवलोकन केले असता ती एक ट्रॅडीशनल नॉन पार्टीसिपिेटींग मनी बँक प्लॅन पॉलिसी असून त्याकरीता तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 ला प्रस्ताव अर्ज दि.15.01.2014 रोजी दिला व पॉलिसी दि.10.02.2014 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे. सदर पॉलिसीसोबत असलेल्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता त्यामध्ये पॉलिसीधारकाला पॉलिसीतील अटी व शर्ती समाधानकारक नाही वाटल्या तर तो पॉलिसी प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाचे आत ती रद्द करु शकतो. तक्रारकर्तीला पॉलिसी प्राप्त झाल्यावर ती स्विकारल्यापासून 15 दिवसांचा कालावधी रद्द करण्याकरीता उपलब्ध होता. परंतू तिने तसे न करुन स्वतः ती पॉलिसी स्विकारलेली आहे. त्यामुळे पॉलिसी दोन तीन महिन्यानंतर उपलब्ध झाली आणि त्याला त्याची माहिती नव्हती ही बाब पटण्यायोग्य नाही. तक्रारकर्तीला जेव्हा केव्हा पॉलिसी प्राप्त झाली तेव्हापासून 15 दिवसांच्या कालावधीमध्ये ती रद्द करु शकत होती. परंतू तिने तसे केलेले दिसून येत नाही. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत तिने वि.प.क्र. 1 कडे फ्री लुक पीरीयडमध्ये तक्रार केल्याबाबत कुठलाही दस्तऐवज दाखल केलेला नाही.
8. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे सदर पॉलिसी या जिवन विमा पॉलिसी होत्या, जेव्हा की तिने मुदत ठेव पेंशन पॉलिसीमध्ये रक्कम गुंतविण्याकरीता सांगितली होती. सदर पॉलिसींचे अवलोकन केले असता त्या वार्षिक प्रीमीयम असलेल्या काही निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये रक्कम भरण्याच्या मनी बॅक पॉलिसी असून त्यामध्ये जिवन विमा समाविष्ट करण्यात आल्याचे पॉलिसीच्या तपशिलावरुन दिसून येते. त्या काही कालावधीनंतर नमूद आश्वासित मुल्याचे टक्केवारीने रक्कम परतावा करण्यात येणार असल्याचे सदर तपशिलावरुन दिसून येते. पॉलिसी प्रत प्राप्त झाल्यावर तक्रारकर्ती सदर माहिती वाचून त्याबाबत आकलन करुन पॉलिसी निर्धारित कालावधीत रद्द करु शकत होती.
9. मंचाचे मते तक्रारकर्तीने पॉलिसीच्या प्रती आणि त्याचा तपशिल प्राप्त झाल्यावर 15 दिवसाचे आत पॉलिसी रद्द न केल्याने आता ती सदर पॉलिसीबाबत वाद मंचासमोर उत्पन्न करु शकत नाही. कारण तिने भरुन दिलेल्या प्रस्ताव फॉर्ममध्ये किंवा इतर कुठल्याही दस्तऐवजावरुन हे सिध्द होत नाही की, तक्रारकर्तीने काही विशिष्ट योजनेत पैसे गुंतविले होते. विमा सरंक्षण गुंतवणूक आणि इतर आर्थिक गुंतवणूक मुळातच वेगळ्या उद्देशासाठी व वेगळ्या परताव्यासाठी असलेले गुंतवणुकीचे भिन्न प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या जोखीमेमुळे विमा सरंक्षण गुंतवणूकीतील परतावा हा इतर आर्थिक गुंतवणूकीतील परताव्यापेक्षा शक्यतो कमी असतो. प्रस्तुत प्रकरणात विमा पॉलिसी संबंधी असलेल्या गैरसमजातुन केलेल्या गुंतवणुकीमुळे तक्रारकर्तीचा परताव्यासंबंधी अपेक्षा भंग झाल्याचे दिसते. वास्तविक, असे प्रकार टाळण्यासाठी तक्रारकर्तीने विमा पॉलिसी घेण्यापूर्वी जागरुकपणे विचार करणे अथवा अनुभवी तज्ञ व्यक्तीची/ग्राहक संस्थांची मदत घेणे आवश्यक होते पण तसे झाल्याचे दिसत नाही. सर्व बाबींचा विचार करता तक्रारकर्तीची तक्रार पुराव्याअभावी मान्य करण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
10. सदर प्रकरणी वि.प.क्र. 1 ची सेवेतील त्रुटी दिसून येत नसल्यामुळे प्रकरण खारिज करण्यायायोग्य आहे. तसेच तक्रारकर्तीने वि.प.क्र. 2 चा सदर पॉलिसीतील अटी व शर्तीसोबत कुठला संबंध असल्याचे दिसून येत नाही. वि.प.क्र. 2 केवळ एक पॉलिसी विकत घेण्याबाबत विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीकडून प्रस्ताव अर्ज दुस-या पॉलिसीबाबत भरुन घेतला आणि देतांना वेगळी पॉलिसी दिली किंवा प्रस्ताव अर्जातील माहिती चुकीची दिली असे तक्रारकर्ती सिध्द करु शकली नाही. तक्रारकर्ती तिची तक्रार सिध्द न केल्यामुळे ती मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र नाही.
11. उपरोक्त निष्कर्षावरुन आणि दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
3) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.