नि का ल प त्र
(द्वारा- (मा. सदस्या, सौ. रुपाली डी. घाटगे) (दि .07-11-2013)
(1) वि.प फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांनी, तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे विमा क्लेम रक्कम मिळणेसाठी सदरची तक्रार तक्रारदार यांनी या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-
तक्रारदार यांचे तक्रारीनुसार, तक्रारदार यांचे मयत पती यांचा व्यवसाय शेती होता व त्यांचे पतीचे नांवे म्हासुर्ली ता. राधानगरी, जि. कोल्हापूर या गावी शेती आहे. तक्रारदार यांचे पतीचे नावे त्यांचे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा आहे. तक्रारदार यांचे पतीचा शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे “शेतकरी अपघात विमा योजने” अंतर्गत विमा उतरविलेला होता. सदरच्या पॉलिसीचा हप्ता वि.प. कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला आहे. तक्रारदार यांचे पती कै. लक्ष्मण भाऊ कांबळे हे दि. 11-07-2011 रोजी मोटर सायकल क्र. एम.एच. 09 बी.क्यु. 3473 वरुन नंदवाळहून देवदर्शन करुन त्यांचे गावी जात असताना कोल्हापूर-राधानगरी रोडवर देवाळे गावचे हद्दीत सदर गाडीस मिनी बस क्र. एम.एच. 07 सी- 7716 मध्ये समोरासमोर अपघात होऊन अपघात झाला त्यावेळी त्यांना उपचाराकरिता वालावलकर ट्रस्ट कोल्हापूर यांचे दवाखान्यात दाखल केले होते. तथापि, उपचार चालू असताना त्याच दिवशी मयत झाले आहेत. तक्रारदार यांचे पतीचे शवविच्देदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झाले आहे. तक्रारदार हिने पती अपघातात मयत झालेनंतर त्यांचा शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मिळाणारा विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी तालुका कृषि अधिकारी, राधानगरी यांचेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन दि. 15-08-2011 रोजी दाखल केला असता वि.प. यांनी आजअखेर काहीही कळविलेले नाही. सबब, तक्रारदाराच्या विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा. द.शे. 18 टक्के व्याजाने क्लेम दाखल तारखेपासून मिळावेत व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावी अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारानी तक्रारीसोबत अ.क्र. 1 कडे दि. 15-08-2011 रोजी क्लेम फॉर्म भाग नं. 1, 2, 3 दाखल केले असून अ.क्र. 2 कडे तक्रारदारांचे मयत पती लक्ष्मण कांबळे यांचे नावचा मौजे म्हासुर्ली येथील खाते नं. 549 चा 8 अ चा उतारा व अ.क्र. 3 कडे भुमापन गट क्र. 536 चा 7/12 उतारा, अ.क्र. 4 कडे दि. 22-07-2011 रोजी तक्रारदारांचे अॅफीडव्हेट, अ.क्र. 5 कडे दि. 11-07-2011 रोजीचा खबरी जबाब, अ.क्र.6 कडे मयताचा पी.एम. रिपोर्ट, अ.क्र.7 कडे घटनास्थळाचा पंचनामा, अ.क्र. 8 ला पंचनामा, अ.क्र. 9 ला वाहन चालकाचा परवाना, अ.क्र. 10 ला दि. 7-01-2012 रोजीचे विमा कंपनी पत्र, अ.क्र. 11 ला दि. 18-04-2012 रोजी तक्रारदार यांनी विमा कंपनी ने दिलेला पत्राचा खुलासा, अ.क्र.12 ला विमा कंपनीने दि. 7-01-2012 रोजी पत्राने मागणी केलेला 6 “क” चा उतारा इत्यादी कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले आहेत.
(4) वि. प. कंपनी यांनी दि. 24-06-2013 रोजी तक्रारदार यांचे तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांनी तक्रारदारांची तक्रार नामंजूर केली असून वि.प. यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये 6 “क” ची साक्षांकित प्रत दाखल केलेली नव्हती. त्याबाबत वि.प. यांनी तक्रारदारांना वेळोवेळी कळवून सदर कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. तक्रारदारांनी त्यांचे मयत पतीचे क्लेमबाबतची योग्य ती सर्व कागदपत्रे वि.प. कडे दाखल केली नसलेने वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांचे क्लेमबाबत कोणतीही कारवाई करता आलेली नाही. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) तक्रार अर्ज, म्हणणे व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषंगिक कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र, उभय पक्षकारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. मुद्देनिहाय विवेचन खालीलप्रमाणे:-
मुद्दे निष्कर्ष
1 वि.पक्षकार विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र.1:
तक्रारदाराचे मयत पती लक्ष्मण कांबळे यांचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि.प. विमा कंपनीने शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदरचा विमा पॉलिसी नं. A0040187 असा आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये विमा पॉलिसबाबत व कालावधीबाबत वाद नाही. तक्रारदार यांचे पती लक्ष्मण भाऊ कांबळे यांचा ता. 11-07-2011 रोजी अपघात झाला व उपचाराकरिता त्यांना वालावलकर ट्रस्ट दवाखान्यात दाखल केले असताना त्याचदिवशी मयत झाले. त्यानंतर वि.प. विमा कंपनीकडे तक्रारदार यांनी रक्कमेची मागणी केली असता वि.प. कंपनीने दि. 7-01-2012 रोजी तक्रारदार हिने दाव्याकरिता आवश्यक कागदपत्रे 10 दिवसात पाठवावी अन्यथा दावा बंद करण्यात येईल असे पत्र पाठवून दावा बंद करण्यात आला. वरील बाबीचा विचार करता तक्रारदारांनी विमा क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वि.प. विमा कंपनीकडे केली होती का ? हा वादाचा मुद्दा निघतो. त्या अनुषंगाने या मंचाने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र. 1 कडे दि. 15-08-2011 रोजी तक्रारदार यांचे नावचा क्लेम दाखल केलेला असून त्यावर वि.प. विमा कंपनीचा सही व शिक्का आहे. अ.क्र. 2 कडे 8 अ चा उतारा, अ.क्र. 3 कडे 7/12 उतारा पाहता त्यामध्ये देखील तक्रारदारांचे मयत पतीचे नाव आहे. यावरुन तक्रारदारांचे पती शेतकरी होते हे शाबीत होते. अ.क्र. 4 कडे दि. 22-07-2011 रोजीचे तक्रारदारांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचेसमोर केलेले अॅफीडव्हेट तसेच अ.क्र. 5 कडील खबरी जबाब, अ.क्र. 6 कडील पोस्ट मार्टेम रिपोर्ट, अ.क्र. 7 कडील पंचनामा यावरुन तक्रारदारांचे पतीचा मुत्यू अपघात झालेला निष्पन्न होतो. वरील सर्व कागदपत्राचे अवलोकन करता सदर कामी तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन दि. 15-08-2011 रोजी वि.प. विमा कंपनीकडे क्लेम फार्म भरुन दि. 9-09-2011 रोजी सदरचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे वर्ग केलेचे दिसून येते. तथापि, वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही या तांत्रिक कारणास्तव दावा बंद केला हे वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते आहे म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2: तक्रारदार यांचे मयत पती शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि.प. यांचेकडे विमा उतरविला असलेने व वर नमूद मुद्दा क्र. 1 मध्ये विवेचनानुसार तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता वि.प. यांचेकडे केली असलेने विमा पॉलिसीप्रमाणे असणारी विमा रक्कम रु. 1,00,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर रक्कमेवर क्लेम दाखल ता. 4-05-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेर्पंत द.सा.द.शे. 7 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी तक्रारदारांचा विमा क्लेम संदर्भात कोणतीही कारवाई केली नसलेमुळे दाखल करावी लागली. त्यामुळे मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहे. आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते आहे म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 4 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त ) व त्यावर दि. 04/05/2013 पासून द.सा.द. शे. 7 टक्के प्रमाणे व्याज 30 दिवसांत अदा करावेत.
3 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त ) अदा करावेत.
4. उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पाठविण्यात याव्यात.