तक्रार दाखल तारीख – 22/05/17 तक्रार निकाली तारीख –20/01/18 |
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे कासारपुतळे, ता.राधानगरी, जि. कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदाराचा शासनामार्फत शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत वि.प. कंपनीकिडे विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता शासनामार्फत वि.प. कंपनीकडे अदा केलेला होता. तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ग्राहक आहेत.
यातील तक्रारदार यांचा दि.23/09/2011 रोजी त्यांचे स्वतःचे घरात शेताकडे बैल घेवून जात असताना, बैलाचे शिंग त्यांचे उजव्या डोळयास अपघाताने व अनावधानाने लागलेने त्यांचे उजव्या डोळयास गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी तक्रारदाराचे डोळयास झाले दुखापतीबाबत डॉ मंदार पाटील (नेत्ररोगतज्ञ) तसेच सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे बराच औषधोपचार करुनही सदर डोळा निकामी झाला आहे व सदर उजवा डोळा निकामी झालबाबतचा दाखला सी.पी.आर हॉस्पीटल, कोल्हापूर यांनी दिलेला आहे. तक्रारदाराने त्यांचे उजवे डोळयास कायमचे अपंगत्व अपघाताने आले असलेने विमा क्लेम रक्कम मिळावी म्हणून वि.प. विमा कंपनीकडे विमा क्लेम तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचेमार्फत रजि. पोस्टाने दि.5/6/2012 रोजी पाठविला. सदरचा विमा प्रस्ताव वि.प. कंपनीस मिळून देखील वि.प. कंपनीने तक्रारदार यांना विमा क्लेम बाबत काहीही कळविलेले नाही. तथापि, तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजूरीस पात्र आहे म्हणून वि.प. कंपनी कडून विमा क्लेमची रक्कम तसेच नुकसान भरपाई वसूल होवून मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वि.प. कंपनी कडून विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे.15 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळावी, मानसिक शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- वि.प. कडून वसुल होवून मिळावी, अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, तसेच कागदयादीसोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे विमा प्रस्तावासोबत दिलेले पत्र, विमा क्लेम फॉर्म भाग-1, गट नं.705 चा 7/12 उतारा, जमीन खाते नं.154 चा 8 अ उतारा, डायरी नं. 785 चा उतारा, विमा क्लेम फॉर्म-2, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे ओळखपत्र, सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दिलेले अपंगत्वाचे सर्टीफिकेट/दाखला, गावकामगार तलाठी, मौजे कासारवाडा, ता.राधानगरी यांनी केलेला घटनास्थळाचा पंचनामा, गाव कामगार पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला, डॉ मंदार पाटील यांचेकडील केसपेपर्स, डॉ मंदार पाटील यांनी दिलेली औषधाची चिठ्ठी, डॉ मंदार पाटील यांनी दिलेला दाखला, सी.पी.आर.हॉस्पीटल कडील केसपेपर्स, वि.प. कंपनीला रजि.पोस्टाने विमा प्रस्ताव मिळालेची पोस्टाची पोहोच पावती, कबाल इन्शुरन्स ब्रोकर यांना विमा प्रस्ताव मिळालेची पोहोच पावती, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना विमा प्रस्ताव मिळालेची पोस्टाची पोहोच पावती, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्तिवाद, मे. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे वगैरे कागदपत्रे याकामी दाखल केली आहेत.
4. वि.प. यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस व जिल्हा ग्राहक मंच, सेंट्रल मुंबई यांनी दिलेला न्यायनिवाडा अशी कागदपत्रे याकामी दाखल केली आहेत.
वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील प्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
i) तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने चुकीची असून मान्य व कबूल नाहीत.
ii) तक्रारदाराची तक्रार कायदेशीरित्या चालणेस पात्र नाही.
iii) तक्रारदाराने तक्रारीसोबत किंवा कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे अथवा वि.प. कंपनीकडे दाखल केले कागदपत्रांमध्ये तक्रारदारांना झाले अपघाताबाबत प्रथम वर्दी रिपोर्ट, पोलीस पंचनामा, साक्षीदारांचा जबाब, अगर अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सबब, तक्रारदार कथन करतात, त्याप्रमाणे तक्रारदारांना अपघातातील जखमांमुळे अपंगत्व आले अगर कसे ? याबाबत पोलीस पेपर्स दाखल करणे जरुर आहे. तसे कोणतेही कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केले नसलेने याही कारणास्तव तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदाराने दाखल केले डॉक्टरांनी दिले अपंगत्वाचे दाखल्याप्रमाणे तक्रारदारास फक्त 40 टक्के अपंगत्व आले असलेने शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलसीचे अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराचा विमा क्लेम देय होत नाही.
iv) महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर व वि.प. विमा कंपनी यांचे दरम्यान झाले कराराप्रमाणे व महाराष्ट्र शासनाचे अध्यादेशाप्रमाणे मयत व्यक्तीचे वारसांनी अगर जखमी विमाधारकांनी सादर केलेले क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत छाननी करुन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर मार्फत वि.प. विमा कंपनीकडे पाठवले जातात. शासनाने शेतक-याचे क्लेम मिळण्यास विलंब होवू नये म्हणून सदरील विशिष्ट पध्दतीप्रमाणे क्लेम दाखल करणे बंधनकारक केले आहे. तथापि यातील तक्रारदारांनी जिल्हा कृषी अधिकारी यांचेमार्फत व कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करणे जरुरीचे होते, परंतु यातील तक्रारदाराने सदर विशिष्ट पध्दती डावलून वि.प. विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला व चुकीच्या पध्दतीचा अवलंब करुन ते क्लेम घेवू पहात आहेत. वि.प. ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही अगर तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारलेला नाही. तक्रारअर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना दाद मागणेचा कायदेशीर अधिकार नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता, तो अपघात काळात चालू होता. सदर विमा हप्ता शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेला आहे या बाबी वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण यातील तक्रारदार हे ता.23/9/2011 रोजी त्यांचे स्वतःचे घरात शेताकडे बैल घेवून जाणेसाठी बैल सोडत असताना बैलाचे शिंग तक्रारदाराचे उजव्या डोळयास अपघाताने व अनावधानाने लागून दुखापत झालेली होती. त्यावेळी तक्रारदार यांना नेत्ररोगतज्ञ डॉ मंदार पाटील व सी.पी.आर हॉस्पीटल कोल्हापूर यांचेकडे औषधोपचाराकरिता दाखल केले होते. सदर ठिकाणी तक्रारदाराचे उजव्या डोळयावर बराच औषधोपचार करुन देखील तक्रारदार यांचा उजवा डोळा बरा न होता तो पूर्णपणे निकामी झालेला आहे. त्याबाबतचा दाखला सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दि. 28/12/11 रोजी दिलेला असून सदर दाखल्याचे अवलोकन केलेस तक्रारदाराचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झालेचे स्पष्ट होते. तसेच गावकामगार तलाठी यांनी केलेला पंचनामा व गावकामगार पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला यांचे अवलोकन करता तक्रारदार यांचे उजव्या डोळयास बैलाचे शिंग लागून दुखापत झालेचे स्पष्ट होते.
यातील तक्रारदाराने दाखल केले शेतजमीनीचे 7/12 उतारा, खातेउतारा, डायरी उतारा, वगैरेचे अवलोकन करता तक्रारदार हे शेतकरी होते व आहेत हे सिध्द होते.
तक्रारदाराने त्यांचे उजव्या डोळयास अपघाताने झाले जखमांमुळे आलेल्या अपंगत्वाबाबत त्यांनी शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्यमातून विमाक्लेम फॉर्मची मागणी करुन वि.प. कंपनीकडे योग्य त्या सर्व कागदपत्रांसह विमाक्लेम सादर केलेला होता. वि.प. कंपनीने सदरचा विमा प्रस्ताव मिळालेचे मान्य केले आहे. परंतु वि.प. कंपनीने तक्रारदार यांना, विमा प्रस्ताव मंजूर झाला की नामंजूर, याबाबत काहीही कळविलेले नाही ही सेवेतील त्रुटीच आहे. तसेच तक्रारदाराचे तक्रारअर्जावर घेतले आक्षेपांमध्ये वि.प. ने म्हटले आहे की, तक्रारदाराने तक्रारीसोबत अथवा कृषी अधिकारी राधानगरी यांचेकडे अथवा वि.प. कंपनीकडे दाखल केले कागदपत्रांमध्ये तक्रारदाराला झाले अपघाताबाबत प्रथम वर्दी रिपोर्ट, पोलीस पंचनामा, साक्षीदारांचे जबाब अगर अन्य कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच तक्रारदाराला अपघातातील जखमांमुळे अपंगत्व आले अगर कसे ? याबाबत पोलीस पेपर्स दाखल करणे जरुरीचे असतानाही तक्रारदाराने सदरचे कागद दाखल केले नसलेने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर होण्यास पात्र आहे असा आक्षेप वि.प. ने तक्रारअर्जावर घेतला आहे. परंतु याकामी तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन करता गावकामगार तलाठी यांनी केलेला पंचनामा, गावकामगार पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला, तसेच तक्रारदाराने मे. कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी यांचेसमोर केलेल प्रतिज्ञापत्र तसेच सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र, डॉ मंदार पाटील यांचे सर्टिफिकेट, सी.पी.आर. हॉस्पीटलमधील एम.एल.सी. दाखला, वगैरे कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराचे उजव्या डोळयास बैलाने शिंग मारल्याने गंभीर दुखापत होवून उजवा डोळा पूर्णपणे निकामी होवून 40 टक्के अपंगत्व आलेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. त्यामुळे याकामी तक्रारदाराने प्रथम वर्दी जबाब, पोलीस पंचनामा, साक्षीदारांचे जबाब दाखल केले नाहीत म्हणून तक्रारअर्ज नामंजूर करणे न्यायोचित होणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील सर्व कागदपत्रांचा ऊहापोह करता, तक्रारदार यांचे उजव्या डोळयास बैलाचे शिंग लागून अपघाताने व अनावधानाने तक्रारदाराचा डोळा गंभीर जखमांमुळे पूर्णपणे निकामी झालेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे.
याकामी आम्ही पुढीलप्रमाणे मे.वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा व त्यातील दंडकाचा आधार घेतला आहे.
2011 (3) CPR 107
New India Assurance Co.Ltd. Vs. Chanda Sunil Sawant
Head note – Consumer Protection Act, 1986 – Sec.2(1)(g) - deficiency in service – Repudiation of Insurance claim on ground that complainant did not file any evidence to prove that deceased died by accident and no FIR, Police Panchanama or hospital certificate has been filed – Death certificate issued by local authority available on record shows death due to accident - such death covered by insurance policy – interference with the order passed by the Forum declined.
सबब वरील नमूद मे. वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा व त्यातील दंडकाचा तसेच तक्रारदाराने दाखल केले वर नमूद सर्व कागदपत्रांचा ऊहापोह करता तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडू विमाक्लेमची रक्कम रु.50,000/- व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- वि.प. विमा कंपनीकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना शेतकरी जनता वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- अदा करावी.
3) प्रस्तुत विमा रकमेवर तक्रारअर्ज दाखल केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज वि.प. कंपनीने तक्रारदाराला अदा करावे.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.