नि का ल प त्र :- (मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या) (दि . 29-03-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. विमा कंपनी फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स् कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
वि.प. कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत कृष्णत ज्ञानू उत्तरेकर हे शेतकरी होते. त्यांचा महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला असून त्यांच्या दाव्याचा क्र. A-0015667 असा आहे. सदर पॉलिसीच्या कालावधीतच दि. 01-12-2011 रोजी तक्रारदाराचे पती कृष्णात ज्ञानू उत्तरेकर यांनी पहाटे 05-00 वाजण्याच्या सुमारास खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने घरामध्ये असणा-या मधल्या जाप्त्यामधील देवळीत ठेवलेले खोकल्याचे औषध त्यांनी सेवन केले. परंतु घरामध्ये मधल्या जाप्त्यामध्ये बिनदरवाज्याचे कपाटात ठेवलेले खोकल्याचे औषध समजून अपघाताने त्यांचकडून ग्रामोझोन तणनाशक औषधाचे बाटलीतील द्रव्य सेवन केले गेले. त्यानंतर छातीत जोरात जळजळून उलटया व्हायला चालू झाल्याने त्यांनी लगेच आपल्या पत्नीला म्हणजेच तक्रारदारास सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने सी.पी. आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे आणले असता उपचारादरम्यान सायकांळी 05-00 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदारांनी क्लेम करिता लागणा-या आवश्यक त्या सर्व कागदपत्रे मयताचा 7/12 व 8-अ, वयाचा पुरावा 6-क ची डायरी, 6 –ड डायरी, प्रथम माहिती अहवाल (F.I.R.) , घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांची पुर्तता तक्रारदारांनी वि.प. कडे न्याययोग्य क्लेमची मागणी केली असता दि. 31-12-2012 रोजी वि.प. यांनी “अपघातग्रस्तजाचा मृत्यू हा स्वत:हून तणनाशक (कीटकनाशक) पिऊन झाला आहे. जे शासन निर्णयानुसार येाजनेअंतर्गत येत नाही “ असे चुकीचे उत्तर देऊन तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेने सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब, तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 3,000/- मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र. 1 ला वि.प. यांनी दि. 31-12-2012 रोजी क्लेम नाकारलेचे पत्र, अ.क्र. 2 ला तक्रारीदारांचे पतीचे नावचा 8 अ चा उतारा, अ.क्र. 3 ला तक्रारदाराचे पतीचा नावाचा 7/12 उतारा, अ.क्र. 4 ला दि. 7-12-2011 रोजीचा मयताचा अपघाताबाबत पंचनामा, अ.क्र. 5 ला दि. 1-12-2011 Inquest Panchanama, अ.क्र. 6 ला दि. 19-12-2011 रोजी मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, दि. 4-03-2014 रोजी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(4) वि.प. यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 08-07-2013 रोजी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदारांचे पती कृष्णात ज्ञानू उत्तरेकर यांनी स्वत:हून ग्रामोझोन हे विषारी औषध घेतलेने त्यांचा मृत्यू झाला असून सदरचा मृत्यू हा अपघात नसलेने शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचे तरतुदीप्रमाणे व पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे देय होत नाही. त्याकारणाने वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प. यांनी दि. 24-03-2014 रोजी दि. 1-12-2011 रोजीचे तक्रारदारांचे मयत पती कृष्णात उत्तरेकर यांची रुग्णपत्रिका/Medical Case Record दाखल केलेले आहे.
(5) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, दि. 04-03-2014 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार हे विमा पॉलिसी रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदाराचे पती मयत कृष्णात ज्ञानू उत्तरेकर यांचा शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि. प. विमा कंपनीकडे विमा उतरविलेला होता. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तक्रारदाराचे पतींना दि. 1-12-2011 रोजी पहाटे 5 वाजणेचे सुमारास खोकल्याचा त्रास होऊ लागल्यावर घराचे मधल्या जाप्त्यामधील देवळीत ठेवलेले खोकल्याचे औषध समजून अपघाताने ग्रामोझोन नावाचे तण औषधाचे द्रव्याचे सेवन केले असता उपचारादरम्यान मयत झाले.
तक्रारदारांनी शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून वि.प. यांचेकडे क्लेम मागणी केला असता यातील वि.प. यांन अपघातग्रस्ताचा मृत्यू हा स्वत:हून तणनाशक (किटकनाशक) पिऊन झाला आहे. जे शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत येत नाही. या कारणास्तव तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे. सबब, प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचे मयत पतीचा मृत्यू स्वत:हून तणनाशक पिऊन झाला का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेला अ.क्र. 4 कडील दि. 7-12-2011 रोजीच्या पंचनाम्यामध्ये मयत कृष्णात उत्तरेकर यांना सर्दी खोकल्याचा 8 दिवसांपासून त्रास असलेने दि. 1-12-2011 रोजी खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने दिवळीतील तणनाशक ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केले असे नमूद असून सदरचे पंचनाम्यावर समक्ष स.म. कोळी, फौजदार पन्हाळा व इतर पंचाच्या सहया आहेत. तसेच अ.क्र. 5 कडील मरणोत्तर पंचनामामध्ये अ.क्र. 12 कडील पोलिस व पंच यांचे मरणाबाबतचे मत- मयत इसम खोकल्याचे ओषध समजून विषारी औषध पिल्याने उपचार चालू असताना मयत झाला आहे असे नमूद आहे. सदर बाबीचा विचार करता तक्रारदारांचे मयत पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे हे शाबीत होते. तथापि वि.प. यांनी तक्रारदारांचे मयत पतीचा मृत्यू हा स्वत:हून तणनाशक किटकनाशन पिऊन झाला असलेचे लेखी म्हणणेमध्ये नमूद केले आहे. त्या अनुषंगाने वि.प. यांनी दि. 24-03-2014 रोजी मयताची रुग्ण पत्रिका/Medical Case Record दाखल केलेली आहे. सदर रुग्ण पत्रिकेचे या मंचाने अवलोकन केले असता त्यामधील Clinic Note या रकान्यामध्ये Date- 1/12/2011 9 a.m. consumption of poison at around 5.00 a.m. today after drinking of alcohol, वरील दोन व्यक्ती (भाऊ) यांच्या सांगण्यावरुन पेशंटने दारु व ग्रामोझोन औषध घेतलेले आहे. या व्यतिरिक्त दुसरे औषध घेतलेले नाही असे नमूद असून त्यावर मारुती उत्तरेकर व रंगराव उत्तरेकर यांच्या सहया आहेत. तथापि, वि.प. त्यांचे यांनी लेखी म्हणणेमध्ये सदरची बाब स्पष्ट केलेली नाही अथवा त्या अनुषंगाने सदर कामी पुराव्याचे शपथपत्र अथवा Investigator रिपोर्ट देखील दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दाखल केलेले शवविच्छेदन अहवालानुसार व्हिसेरा राखून ठेवलेचे नमूद आहे. त्या अनुषंगाने तक्रारदाराने दाखल केलेल्या मृत्यूचे अंतिम कारणांच्या प्रमाणपत्रावर diffuse pulmonary edema with ceretral edema नमूद असून सदर प्रमाणपत्रावर वैद्यकीय अधिकारी सी.पी.आर. हॉस्पीटल यांची सही आहे. वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पतीचा मृत्यू हा अपघाती नसून स्वत:हून औषध घेतलेने झाला आहे हे शाबीत होत नाही. तसेच वि.प. यांनी त्याअनुषंगाने दाखल केलेले वर नमूद कागदपत्र हे या कामी निर्णायक पुरावा होऊ शकत नाही असे या मंचाचे मत आहे. तथापि तक्रारदारांनी दाखल केलेल्या पंचनामा, Inquest Panchanama, Final cause of death इत्यादी कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, वि.प. यांनी विमा पॉलिसीचा मुळ हेतू विचारात न घेता सदरचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :-
वर मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर तक्रार स्विकृत दि. 22-04-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी विमा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र. 3 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,000,00/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 22-04-2013 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोने हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.