नि का ल प त्र :- (मा. श्री. दिनेश एस. गवळी, सदस्य) (दि . 09-07-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. विमा कंपनी फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स् कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हिचे मयत पती शेती व्यवसाय करीत होते. तक्रारदार यांचे पतीचा वि.प. कडे “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” अंतर्गत विमा पॉलिसी उतरविली होती. व पॉलिसीचा विमा हप्ता वि.प. कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला होता. तक्रारदार यांचे पती कै. भिमराव आनंदा कापसे हे दि. 01-08-2012 रोजी बर्की येथे धबधबा पाहणेसाठी गेले असता, सदरचे धबधब्यातून तक्रारदार यांचे पती हे वाहून गेलेने ते पाण्यात बुडून मयत झाले. यातील तक्रारदार यांचे पतीचे प्रेत काटे गावचे नदी पात्रात मिळून आले. त्यानंतर तक्रारदार यांचे पतीचे विच्छेदन हे ग्रामीण रुग्णालय, मलकापूर , ता. शाहूवाडी येथे झाले असून ते पाण्यात बुडून मयत झालेबाबतचा दाखला ग्रामीण रुग्णालय मलकापूर यांनी दिलेला आहे व सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे यांचेकडे असून ते सदर अपघाताचा पूर्ण तपास शाहूवाडी पोलीसांनी केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार हिने “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून वि.प. कंपनीकडे मुदतीत योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दिलेला आहे. परंतु वि.प. कंपनीने दि. 13-03-2013 रोजीचे पत्राने क्लेम फॉर्म भाग 3 व 4 तसेच 6 क या कागदांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सदरचे कागद यातील वि.प. कंपनीस दि. 10-05-2013 रोजी सदरचे कागदपत्र वि.प. कडे रजि. पोस्टाने पाठवून दिलेले होते. त्थापि, वि.प. यांनी दि. 30-04-2013 रोजीचे पत्राने तक्रारदार यांचा प्रस्ताव बंद करणेत आला असलेबद्दल कळविले आहे. सदरचे पत्र तक्रारदार हीस दि. 10-05-2013 रोजी प्राप्त झाले आहे. सबब, तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे 15 टक्के व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रार खर्च रु. 3,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 22 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 ला तक्रारदार हिचे पतीचे नावाचा 8 –अ चा उतारा दि. 24-08-2012, अ.क्र. 2 ला तक्रारदार हिचे पतीचे 7-12 चा उतारा दि. 22-08-2012, अ.क्र. 3 ला डायरी नं. 1738 चा उतारा(जुनी डायरी) दि. 24-08-2014, अ.क्र. 4 ला अपघाताबाबतची वर्दी दि. 1-08-2012,अ.क्र. 5 ला घटना स्थळाचा पंचनामा दि. 1-08-2012, अ.क्र. 6 - मरणोत्तर पंचनामा दि. 1-08-2012, अ.क्र.7 कडे तक्रारदार हिचे पतीचे मयताबाबतचे अॅडव्हान्स सर्टीफिकेट दि. 1-08-2012, अ.क्र. 8 कडे पी.एम. रिपोर्ट दि. 1-08-2012, अ.क्र. 9 कडे दिनकर तुकाराम कांबळे यांचा जबाब दि. 2-08-2012, अ.क्र. 10 कडे हंबीरराव कापसे यांचा जबाब दि. 2-08-2012, अ.क्र. 11 मानसिंग सर्जेराव पाटील यांचा जबाब, दि. 2-08-2012, अ.क्र. 12 कडे महेश विठठल भोसले यांचा जबाब दि. 2-08-2012, अ.क्र. 13 कडे संभाजी साळवी यांचा जबाब दि. 2-08-2012, अ.क्र. 14 कडे नितीन धनाजी कांबळे यांचा जबाब दि. 2-08-2012, अ.क्र. 15 कडे तक्रारदार हिने वि.प. कंपनीस दिलेले पत्र दि. 10-05-2013, अ.क्र. 16 कडे वि.प. कंपनीचे पत्र दि. 31-12-2012, अ.क्र. 17 कडे वि.प. कंपनीचे पत्र दि. 13-03-2013, अ.क्र. 18 कडे क्लेम फॉर्म भाग 2 दि. 17-09-2012, अ.क्र. 19 कडे जुनी डायरी नं. 1738 ची डायरी दि. 24-08-2012, अ.क्र. 20 क्लेम फॉर्म भाग -3, दि. 6-11-2012, अ.क्र. 21 कडे क्लेम फॉर्म भाग नं. 4 दि. 6-11-2012, अ.क्र. 22 कडे वि.प. कंपनीने विमा प्रस्ताव नाकारलेचे पत्र दि. 30-04-2013 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि. 19-04-2014 रोजी गावकामगार तलाठी, दाणेवाडी, ता. पन्हाळा यांचा दि. 9-12-2013 रोजीचा गा.न.नं. 6 चा उतारा दाखल केला आहे. दि. 26-02-2014 रोजी तक्रारदाराचे शपथपत्र दाखल केलेली आहे.
(4) वि.प. 1 यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 12-02-2014 रोजी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदार यांचे क्लेमबाबतची योग्य ती सर्व कागदपत्रे वि.प. कडे वेळेत दाखल झालेली नाहीत. तक्रारदारांनी वि.प. कडे दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये 6 क ची सांक्षांकित प्रत दाखल केलेली नव्हती. त्याबाबत तक्रारदारांना तसेच कृषी अधिकारी व कबाल इन्शुरन्स कन्सल्टंट यांना वेळोवेळी कळवूनही तक्रारदारांनी सदर कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. वि.प. यांनी दि. 31-12-2012, 2-03-2013 व 13-03-2013 रोजी तक्रारदारांना व कृषी अधिकारी यांना पत्राने कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत कळविले. त्यानंतर तक्रारदारांकडून क्लेमबाबत योग्य ती सर्व कागदपत्रे वि.प. कडे दाखल केली नसलेने वि.प. कंपनीला तक्रारदारांचे क्लेमबाबत कोणतीही कारवाई करता आलेली नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांचे तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. जे कारण घडले असे तक्रारदार कथन करतात ते साफ खोटे, लबाडीचे व चुकीचे आहे. तक्रारदारांना कोणतीही दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यात केली आहे.
5) प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांचे पती कै. भिमराव आनंदा कापसे हे दि. 1-08-2012 रोजी बर्की येथे धबधबा पाहणेसाठी गेले असता, सदरचे धबधब्यातुन त्याचे पती हे वाहुन गेलेने ते पाण्यात बुडून मयत झाले. तदनंतर तक्रारदार यांनी शेतकरी अपघात योजना अंतर्गत नुकसानभरपाई मिळावी यासाठी वि.प. कंपनीकडे अर्ज केला असता वि.प. यांनी दि. 30-04-2013 रोजीचे पत्राने कागदपत्रे/खुलासा आम्हास अजून प्राप्त झालेले नाहीत हे कारण देऊन विमा नाकारला आहे.
सदर प्रकरणात विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही तथापि यातील वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजुरीबाबत आवश्यक ती कागदपत्रे पाठविली नाहीत म्हणून विमा नाकारला आहे. सबब, सदर कामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता कागद यादी सोबत अ.क्र. 17 कडील विमा कंपनीने तक्रारदारास पाठविलेले पत्र पाहिले असता त्यामधील अ.क्र. 1 कडे क्लेम फॉर्म भाग-3, भाग-4, ओरिजनल व अ.क्र. 3 कडील 6 क दाखल ओरीजनल या कागदपत्रांची मागणी तक्रारदारांकडे केल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने तक्रारदाराने अ.क्र. 20 कडे क्लेम फॉर्म भाग 3 व अ.क्र. 21 कडे क्लेम फॉर्म भाग-4 तालुका कृषी अधिका-याने दि. 6-11-2012 रोजी मे. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांना पाठविलेचे दिसून येते. तथापि अ.क्र. 19 कडील दाखल केलेला हक्काचे पत्रक (गा.न.नं. 6) पाहिले असता सदरचे उता-यावर तक्रारदाराचे वारस म्हणून नोंद दिसून येत नाहीत. या सर्व बाबीचा विचार करता तक्रारदार यांनी वारसा दाखला न दिल्याने विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा कागदपत्र न मिळाल्यामुळे नाकारल्याचे दिसते. तथापि तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्जाचे चौकशीवेळी दि. 19-04-2014 रोजी गावकामगार तलाठी, दाणेवाडी, ता. पन्हाळा यांचा दि. 9-12-2013 रोजीचा हक्काचे पत्रक (गा.न.नं. 6) चा उतारा दाखल केला असून सदर उता-यामध्ये खातेदार भिमराव आनंदराव कापसे हे मयत झाले असून त्यांना वारस म्हणून सुनिता भिमराव कापसे यांचे नावाचे नोंद दिसून येते यावरुन प्रस्तुत तक्रार अर्जातील तक्रारदार हे मयत भिमराव आनंदराव यांच्या पत्नी वारस या नात्याने आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रार अर्जातील तक्रार अर्जात नमूद विमा रक्कम रु.1,00,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे आवश्यक ती कागदपत्रे वेळेत न दिल्याने वि. प. यांनी त्यांचा क्लेम नाकारला आहे याचा विचार करता, विमा क्लेमच्या रक्कमेवरील व्याज तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे. सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष ने तक्रारदारांना विमा क्लेमची असलेली रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी.
3. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 60 दिवसांचे आत पूर्तता करावी.
4. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.