निकालपत्र (दि.22/05/2014)व्दाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी,
1) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा अपघात विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हिचे पती के. आनंदा बंडू व्हरांबळे हे शेतकरी असून त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे ‘शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेली होती. दि.30/11/2010 रोजी तक्रारदार तक्रारदार हिचे पती कै.आनंदा बंडू व्हरांबळे हे पुणे-बेंगलोर हायवे रोडने जात असताना कासारवाडी फाटा येथे त्यांची मोटरसायकल क्र.MH-08-L-0327 या गाडीस टेंम्पो क्र.MWF-4620 ने जोराची धडक दिलेमुळे तक्रारदार यांचे पती जागेवरच मयत झाले. त्यानंतर त्यांचे पतीचे सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन झाले. तक्रारदाराचे पतीस अपघाताने डोक्यास झालेल्या जखमामुळे मृत्यू आलेचा मृत्यू दाखला तेथील डॉक्टरांनी दिलेला आहे. सदर अपघाताच्या घटनेची नोंद एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांचेकडे नोंद झालेली आहे. सदर टेम्पों ड्रायव्हरचे विरुध्द इ.पी.को.क.279, 304(अ) नुसार गुन्हा नोंद आहे. तद्नंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन कृषी अधिकारी करवीर यांचेमाध्यमातून दि.17/8/11 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून सामनेवाला विमा कंपनीकडे विमा रक्क्मेची मागणी केली असता सामनेवाला यांनी आजअखेर तक्रारदारास काहीही कळविलेले नाही. यातील तक्रारदार हया अशिक्षीत विधवा व अबला नारी असून ती निराधार आहे. तिचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असून प्रस्तुत क्लेमची रक्कम तक्रारदारास तात्काळ मिळणे न्यायाचे व जरुरीचे असलेने सदरची तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर होऊन सामनेवाला विमा कंपनीकडून अपघात विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.15% व्याजासहित मिळावेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
3) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्र यादीमधील अनु.क्र.1 वर विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग-1, अ.क्र.2 ला गट नं.328 या 7/12 चा उतारा, अ.क्र.3 वर गाव नमुना 8 अ चा उतारा, अ.क्र.4 वर डायरी नं.3015 चा उतारा(वारसा डायरी), अ.क्र.5 वर जुनी डायरी931 चा उतारा, अ.क्र.6 वर वारसा ठराव उतारा, अ.क्र.7 वर 6 क उतारा, अ.क्र.8 वर तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, अ.क्र.9 वर अपघाताची एफ.आय.आर., अ.क्र.10 वर घटनास्थळाचा पंचनामा, अ.क्र.11 वर मयताचा मृत्यू दाखला, अ.क्र.12 वर पी. एम.रिपोर्ट, अ.क्र.13 वर इन्क्वेस्ट पंचनामा व अ.क्र.14 वर क्लेम फॉर्म भाग-3 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि.13/03/2014 रोजीचे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
4) सामनेवाला यांनी दि.25/06/12 रोजी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये पुढे नमुद करतात की, महाराष्ट्र शासनाचे व्यक्तिगत शेतकरी अपघात योजनेचे परिपत्रकाप्रमाणे मयत शेतकरी हा वाहन चालवत असेल तर त्याचा योग्य व कायदेशीर वाहन परवाना असलेखेरीज मयताची क्लेमची कार्यवाही करता येत नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे क्लेम दाखल करतेवेळी मयत श्री आनंदा बंडू व्हरांबळे यांचा वाहन चालविणेचा परवाना हजर केला होता. परंतु सदर परवाना हा हेवी गुडस व्हेईकलसाठी वैध आहे. तथापि, मयत श्री आनंदा व्हरांबळे हे अपघाताचेवेळी मोटार सायकल चालवत होते व त्यांचे मोटार सायकल चालवणेचा परवाना असलेबाबतचे कागदपत्र तक्रारदारांनी दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांनी दि.14/10/11 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केलेचे कळविले आहे. सदर सामनेवाला यांची कृती पूर्ण्पणे कायदेशीर असून सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
5) तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून विमा रक्क्म, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1 - प्रस्तुत कामी यातील तक्रारदार यांचे पती मयत श्री आनंदा बंडू व्हरांबळे यांचा विमा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांचे पतीचे वाहन अपघातात जखमी होऊन निधन झाले. तदनंतर त्रूांनी सामनेवाला यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला कंपनीने त्यांचा क्लेम हा ‘’मयत इसम दुचाकी वाहन चालवित होता व त्यांचा सादर केलेला वाहन चालवणेचा परवाना/ ड्रायव्हींग लायसन्सची प्रत ही दुचाकी वाहनाची नाही ‘’ या कारणास्तव नाकारला. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराने मयत श्री आनंदा बंडू व्हरांबळे यांचे दाखल केलेले वाहन परवाना हा हेवी गुडस व्हेईकल(HGV)साठी वैध आहे. तथापि ते अपघाताचेवेळी मोटसायकल चालवित होते.त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करणेत यावा असे म्हणणे दाखल केले आहे. त्याचप्रमाणे युक्तीवादाचे वेळी सामनेवाला यांनी महाराष्ट्र शासन (शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना) दि.29, मे 2009 चा शासन निर्णय दाखल केला असून सदरचा शासननिर्णयामध्ये शासन शुध्दीपत्र अ.क्र;23(इ)(8) मध्ये पुढील स्वरुपाचा मजकूर नमुद आहे.’’ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघापग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवित असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License) सादर करणे आवश्यक राहील.’’ अशी सुधारणा नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे असे नमुद केलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराचे मयत पती यांचे वाहन चालविणेचा परवाना License हे वैध होते का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता त्यामध्ये अ.क.5 कडील दि.2/12/10 रोजीचा खबरी जबाब पाहता तक्रारदाराचे पती हे दि.30/11/05 रोजी आपल्या मोटरसायकलवरुन पुणे ते बेंगलोर रोडने जात असताना कासारवाडी फाटा येथे त्यांचे पाठीमागून टेम्पो नं.MWF 4620 ने जोरात धडक दिल्याने सदर अपघातात जखमी होऊन मयत झाल्याने टेम्पो चालक शिवाजी ज्ञानदेव चोरगे यांचेविरुध्द भा.द.वि.स.क.304(अ), 279,338, 427 प्रमाणे गुन्हा नोंद केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी दाखल केलेला पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इन्क्वेस्ट रिपोर्ट इ. कागदपत्रावरुन तक्रारदारांचे पतीचा मृत्यू हा अपघातातील जखमामुळे झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यावरुन प्रस्तुत अपघातप्रकरणी यातील तक्रारदार यांचे पतीचा झालेला मृत्यू हा टेम्पो चालक यांचे चुकीमुळे झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारांचे पतीचा मृत्यू व त्यांचा सदर अपघातामध्ये वैध परवाना असणे यांचा प्रत्यक्षात कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे सामनेवाला म्हणतात त्याप्रमाणे प्रस्तुत कामी तक्रारदाराचे पतीकडे अपघाताचेवेळी वैध परवाना नव्हता व त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र नाहीत हे सामनेवाला यांचे म्हणणे हे मंच मान्य करीत नाही. कारण तक्रारदाराचे पतीची सदर अपघातामध्ये कोणतीही चुक नाही.केवळ तांत्रिक कारण देऊन तक्रारदाराचा खरा व न्याययोग् क्लेम नाकारणे उचित होणार नाही.
तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ पुढील न्यायनिवाडा दाखल केला आहे.
III (2009) CPJ 254 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION , NEW DELHI – United India Insurance Co.Ltd. Vs. Gaj Pal Singh Rawat Decided on 9.4.2009- Consumer Protection Act, 1986-Section 21(b) –Insurance – Motor Accident Claim – Repuidated –Driver not holding valid and effective lincence at time of accident-Complaint allowed by Forum- Stae Commission in appeal held that in absence of nexus between licence of driver and accident, insurer would be liable to allow claim on non-standard basis- Hence revision-Accident took place due to sudden fall of stones proved by Surveyor’s report-No fault of driving on part of driver proved-Orders of lower Fora based on material on record- No interference required in revision.
“ In each case, on evidence led before the Claims Tribunal, a decision has to be taken whether the fact of the driver possessing licence for one type of vehicle but found driving another type of vehicle, was the main or contributory cause of accident. If on facts, it is found that accident was caused solely because of some other unforeseen or intervening cause like mechanical failures and similar other causes having no nexus with driver not possessing requisite type of licence, the insurer will not be allowed to avoid its liability merely for technical breach of conditions concerning driving licence.”
प्रस्तुतची तक्रार व तक्रारदाराने दाखल केलेला न्यायनिवाडा यातील विवेचनाचा विचार करता सदर न्यायनिवाडा प्रस्तुत तक्रारीत नमुद मुद्दयांशी साम्य दर्शवितो. त्यामुळे सदरचे तक्रारीतील वस्तुस्थिती व शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा मूळ हेतू विचारात न घेता केवळ तांत्रिक कारण देऊन तक्रारदारांचा विमा क्लेम सामनेवाला विमा कंपनीने नाकारुन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र. 1चे उत्तर हे मच होकारार्थी देत आहे.
शेतकरी अपघात योजनेचा मूळ हेतू हा –शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात उदा.रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात तसेच अन्य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अशा अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने अशा अपघातग्रस्त शेतक-यांस/ त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसलेमुळे सदरची योजना शासनाने शासन निर्णयाव्दारे कार्यान्वित केलेली आहे.
मुद्दा क्र.2 :- वर मुद्दा क्र;1 मध्ये नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून विमा रक्कम रु.1,00,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारीख म्हणजे दि.22/04/13 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9%व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेमुळे तकारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 - सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.22/04/13 पासून संपूर्ण रक्क्म अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- (रु.तीन हजार फक्त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.