नि का ल प त्र :- (मा. श्री. दिनेश एस. गवळी, सदस्य) (दि . 28-10-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. विमा कंपनी फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार यांचे मुलगा शेती व्यवसाय करीत होता. तक्रारदार यांचे मुलग्याचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ” या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. कंपनीकडे विमा उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा शासनामार्फत वि.प. कंपनीकडे अदा केला आहे. यातील तक्रारदार यांचा मुलगा सागर सखाराम मिटके हा दि. 20-07-2012 रोजी सकाळी 8 वाजणेचे सुमारास जनावरांना वैरण आणणेकरिता बिबीचा माळ या नावाने ओळखणा-या शेताकडे गेला असता तो वैरणीचा भारा घेऊन येत असताना सावरधन गावचे हद्दीत मारुती भाऊ चौगले यांचे शेतजमिनीत तुटून पडलेल्या इलेक्ट्रीक तारेचा शॉक लागलेने ते जागीच मयत झाले. यातील तक्रारदार यांचे मुलग्याचे शवविच्छेदन हे ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर येथे झालेले असून विजेचे शॉकने मयत झालेचा दाखला दिलेला आहे. व सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये झाली असून सदर घटनेचा तपास राधानगरी पोलिसांनी केलेला आहे. यातील तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे योग्य त्या सर्व कागदपत्रांसह विमा रक्कम मिळावी म्हणून दि. 31-12-2012 रोजी कृषी अधिकारी, राधानगरी यांचेमार्फत क्लेम फॉर्म भरुन विमा रक्कमेची मागणी केली असता वि.प. विमा कंपनी यांनी सदरचा प्रस्ताव वेळेत दाखल केला नाही या कारणावरुन तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला. त्यानंतर तक्रारदार हिने प्रस्तावाची माहिती मिळाल्यानंतर प्रस्ताव पाठविला होता. तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन वि.प. कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदारांनी विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटीची रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 14 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग 1 दि. 31-12-2012, अ.क्र. गट नं. 28 व 43 चा सात-बारा चा उतारा दि. 2-08-2012, अ.क्र. 4 कडे जमिन खाते नं. 964 चा 8 अ चा उतारा, दि. 2-08-2012, अ.क्र. 5 कडे 6 ड चा उतारा दि. 2-08-2012, अ.क्र. 6 कडे 6 क चा उतारा दि. 17-12-2012, अ.क्र. 7 कडे विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग-2, दि. 1-12-12012, अ.क्र. 8 कडे वर्दी जबाब शामराव धोंडी चौगले यांचा दि. 20-07-2012, अ.क्र. 9 कडे घटना स्थळाचा पंचनामा दि. 20-07-2012, अ.क्र. 10 कडे मयताचे अॅडव्हान्स सर्टीफकेट दि. 20-07-2012, अ.क्र. 11 मयताचे पी.एम. रिपोर्ट, दि. 20-07-2012, अ.क्र. 12 कडे मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा दि. 20-07-2012, अ.क्र. 13 कडे राधानगरी पोलिस ठाणे यांनी ‘अ’ समरीसाठी केलेला अर्ज दि. 5-08-2012, अ.क्र. 14 वि.प. कंपनीने प्रस्ताव नाकारलेचे पत्र दि. 31-05-2013 इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार तर्फे शपथपत्र दाखल केले आहे.
(4) प्रस्तुत कामी वि.प. विमा कंपनी यांनी तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. यांना तक्रारीतील कथनाबाबत काहीही माहिती नाही. व तक्रारदारांनी सदरील बाब पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचे मुलाचा दि. 20-07-2012 रोजी अपघाती मृत्यू झाला हे बरोबर आहे. तक्रारादाराचा मुलगा हा इलेक्ट्रीक शॉक लागू मयत झाला हे खोटे व चुकीचे आहे. तक्रारदारांनी पुराव्यानिशी शाबीत करणे जरुरी आहे. तक्रारदारांनी वि.प. कपंनीकडे त्याचा मुलाचे मृत्यूबाबत विमा क्लेम दाखल केलेला होता हे बरोबर आहे. तक्रारदाराचा मुलगा सागर सखाराम मिटके हा दि. 20-07-2012 रोजी मयत झाला आहे. तथापि, पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे 90 दिवसाचे मुदतीत क्लेम दाखल करणे जरुरी होते. तक्रारदारांनी प्रस्तुत विमा क्लेम 90 दिवसानंतर दि. 31-12-2012 रोजी दाखल केला तो पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे, शासनाचे अध्यादेशाप्रमाणे देय होत नाही. त्यामुळे वि.प. ना तक्रारदाराचा क्लेम नाकारणे भाग पडले. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
(5) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
4. आदेश काय ? अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदार यांचा मुलगा सागर सखाराम मिटके हा दि. 20-07-2012 रोजी सकाळी 8 वाजणेचे सुमारास जनावरांना वैरण आणणेकरिता बीबीचा माळ या नावाने ओळखणा-या शेताकडे गेला असता तो वैरणीचा भारा घेऊन येत असताना मारुती भाऊ चौगुले यांचे शेतजमिनीत तुटून पडलेल्या इलेक्ट्रीक तारेचा शॉक लागून मयत झाला. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनमध्ये झाली तदनंतर तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेकरिता दि. 31-12-2012 रोजी कागदपत्रांसह मा. कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे विमा क्लेमची मागणी केली असता वि.प. कंपनीने दि. 31-05-2013 रोजी सदरचा प्रस्ताव वेळेत दाखल केला नाही या कारणावरुन विमा क्लेम नाकारला आहे. त्याचप्रमाणे वि.प. कंपनीने आपले म्हणणेमध्ये तक्रारदार यांचा मुलगा दि. 20-07-2012 रोजी अपघातात मयत झाला हे मान्य केले आहे परंतु तक्रारदार यांचा मुलगा हा इलेक्ट्रीक शॉक लागून मयत झाला आहे हे नाकारले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी त्यांचा क्लेम वेळेत दाखल केला काय ? तसेच तक्रारदार यांचा मुलगा हा इलेक्ट्रीक शॉक लागून मयत झाला आहे काय ? हे वादाचे मुद्दे निघतात सदर मुद्दयांचे अनुषंगाने यातील तक्रारदाराने दाखल केलेले सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदार यांनी अ.क्र. 8 ते 11 कडील दि. 20-07-2012 चा वर्दी जबाब, पंचनामा, अॅडव्हान्स पी.एम. सर्टिफीकेट, पी.एम. रिपोर्ट पाहिले असता सदर कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे मुलग्याचा मृत्यू हा मारुती चौगुले यांचे शेतामध्ये तुटून पडलेल्या वायरचा शॉक लागून झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारदाराने दाखल केलेल्या अ.क्र. 1 कडील क्लेम फॉर्मवरुन सदरचा प्रस्ताव कृषी अधिकारी यांचेकडे दि. 31-12-2012 रोजी दाखल केला असलेचे नमूद आहे. तक्रारदाराचे मुलाचा अपघात जरी दि. 20-07-2012 रोजी झाला असला तरी महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक- शेअवि/ 2013 प्र.क्र. 118/11 अे. दि. 31 ऑक्टोंबर 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम 8 प्रमाणे विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह योजनेच्या कालावधीमध्ये कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनांच्या अखेरच्या दिवसांत झालेल्या अपघातासाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत तालुका कृषि अधिका-याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील शिवाय समर्थनिय कारणांसह 90 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. प्रस्ताव विहीत मुदतीत सादर केले नाहीत असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांनी विमा क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे वि.प.यांचे म्हणणे हे मंच मान्य करीत नाही. सबब, तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र . 2 व 3 :-
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल दि. 11-03-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहे. प्रस्तुतची तक्रार ही वि.प. क्र.1 विमा कंपनी यांनी विमा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. प. विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 11-03-2013 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज द्यावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.