नि का ल प त्र :- (मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या) (दि . 21-02-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. फयुचर जनेरेली इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हिचे पती शेतकरी होते व त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदार हिचे पतीचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने”अंतर्गत शासनामार्फत वि.प. यांचेकडे विमा उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा शासनामार्फत वि.प. कंपनीकडे अदा केलेला आहे. यातील तक्रारदार हिचे पती कै. परसू दौलू शिंदे हे दि. 12-12-2010 रोजी त्यांचे केर्ली गावचे हद्दीत पायी चालत असताना दिपक नाथ पाटील यांचे ताब्यातील मोटार सायकल नं. एम.एच. 09-बीएन-3154 ने रत्नागिरी-कोल्हापूर जाणा-या हायवे रस्तावर ठोकरुन जखमी केलेने त्यांना औषधोपचाराकरिता कोल्हापूर आर्थोपेडिक सेंटर, कोल्हापूर येथे दाखल केले असता औषधपचार चालू असताना दि. 13-12-2010 रोजी उपचार सुरु असताना मयत झालेले आहेत. तक्रारदारांचे पतीचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झालेले आहे. तेथील डॉक्टरांनी तक्रारदाराचे पती हे मयत झालेले असलेबाबत तसा दाखला दिलेला आहे. व सदर अपघात घटनेची नोंद करवीर पोलिस स्टेशन येथे केली आहे. तक्रारदारांचे पती मयत झालेनंतर त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघाता विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी सर्व कागदपत्रांसह क्लेम दाखल केला असता वि.प. कंपनीने दि. 23-11-2011 रोजीच्या पत्राने अपघातग्रस्ताचे वय वर्षे 10-75 या विमा योजनेच्या वयोमर्यादेत बसत नाही या कारणावरुन विमा क्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदार यांनी विमा रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटीची रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत 14 कागदपत्रे दाखल केलेली असून अ.क्र. 1 व 2 ला क्लेम फॉर्म भाग 1, 2 , अ.क्र. 3 ला गाव नमुना 8 अ चा उतारा, अ.क्र. 4 व 5 ला अनुक्रमे गट नं. 8 व गट नं. 140 चा 7/12 उतारा , अ.क्र. 6 ला गाव नमुना 6 क चा उतारा, अ.क्र. 7 ला फेरफार क्र. 2332 चा उतारा, अ. क्र. 8 ला दि. 13-12-2010 रोजीचे सीपीआर हॉस्पीटलचे Cause of Death Certificate, अ.क्र. 9 ला दि. 13-12-2010 पोलिस अहवाल, अ.क्र. 10 ला अपघाताची वर्दी, अ.क्र. 11 ला दि. 13-12-2010 रोजीचा पंचनामा, अ.क्र. 12 इन्क्वेस्ट पंचनामा, अ.क्र. 13 ला दि. 13-12-2010 रोजीची पोस्टमार्टेम रिपोर्ट, अ.क्र. 14 ला दि. 23-11-2010 रोजी वि.प. विमा कंपनी चे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दि. 18-01-2014 रोजी मयत परसु दौलू शिंदे यांचे दि. 15-11-1994 रोजीचे निवडणूक ओळखपत्र दाखल केलेले असून तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि.प. यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 08-07-2013 रोजी तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांनी आपले क्लेम सोबत दाखल केले शाळा सोडलेचा दाखल्याची दि. 28-012-2009 चे प्रतीवरुन तक्रारदारांचे मयत पती यांची जन्मतारीख दि. 10-03-1935 अशी नमूद आहे. अपघातादिवशी दि. 13-12-2010 रोजीचे वय 76 वर्षे (75 वर्षे 9 महिने) येते. महाराष्ट्र शासनाचे शेतकरी वैयक्तीक अपघात योजना ही वय 10 ते 75 वर्षापर्यंतचे शेतक-यासाठी लागु आहे. अपघातादिवशी तक्रारदारांचे पतीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असलेने विमा पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे, कराराप्रमाणे तक्रारदारांचा क्लेम देय होत नाही. सबब, वि.प. नी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला असून वि. प. ची सदरील कृती ही योग्य व कायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी असे वि.प. यांन म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प. यांनी दि. 29-01-2014 रोजी 4 कागदपत्रे दाखल केलेली असून अ.क्र. 1 ला दि. 28-01-2008 रोजीचा मयताचा शाळा सोडल्याबाबतचा दाखला, अ.क्र. 2 ला दि. 25-01-2009 रोजीचे मयताचे ओळखपत्र अ.क्र. 3 ला मयताचे रेशनकार्ड, अ.क्र. 4 ला दि. 12-08-2011 रोजी वि.प. व सरकार मधील करारपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(5) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार हे विमा पॉलिसी रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदारांचे पती कै. परसू दौलू शिंदे यांचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” त्या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. विमा कंपनी कडे विमा उतरविलेला होता. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तक्रारदारांचे पती मयत परसू दौलू शिंदे यांचा दि. 12-12-2010 रोजी पायी चालत असताना मोटरसायकलने ठोकरुन अपघात झाला. औषधोपचारासाठी कोल्हापूर आर्थोपेडिक सेंटर, कोल्हापूर येथे दाखल केले असता, औषधोपचार चालू असताना दि. 13-12-2010 रोजी मयत झाले व त्यांचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झाले.
तक्रारदारांनी शेतकरी अपघात विमा अपघात योजना अंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून वि.प. यांचेकडे क्लेम मागणी केली असता यातील वि.प. यांनी तक्रारदारांचे मयत पती यांचे मृत्यूसमयी वय वर्षे 75 पेक्षा जास्त असलेने तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे. सबब, प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचे मयत पतीचे मृत्यूसमयी वय वर्षे 75 पेक्षा जास्त आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल खालील कागदपत्रे बारकाईने अवलोकन केले असता अ.क्र. 8 कडील सीपीआर हॉस्पटलचे Cause of Death Certificate, , अ.क्र. 9 पोलिस अहवाल, अ.क्र. 10 वर्दी जबाब, ता. 21-12-2012, अ.क्र. 12 कडील इन्क्वेस्ट पंचनामा, अ.क्र. 13 कडील पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी सर्व कागदपत्रामध्ये तक्रारदारांचे मयत पतीचे अपघातावेळी मृत्यूचे समयी वय वर्षे 65 असे नमूद आहे यावरुन मयत परसु शिंदे यांचे दि. 22-12-2010 रोजी अपघातावेळी मयत झालेल्यावेळी वय वर्षे 65 होते हे स्पष्टपणे दिसून येते. तथापि यातील वि.प. यांनी प्रस्तुत कामी मयताचा शाळा सोडलेचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड दाखल केलेले आहे. सदरची कागदपत्रे पाहिली असता मयताचे शाळा सोडलेचे दाखल्यावरुन मयताची जन्मतारीख दि. 10-03-1935 नमूद आहे. सदर जन्मतारखेवरुन पाहिले असता मयताचे वय अपघाताचेवेळी मृत्यूसमयी 75 पेक्षा जास्त दिसून येते. तथापि, केवळ सदर दाखल्यावरुन मयताची जन्मतारीख निश्चितपणे 10-03-1935 अशी आहे हे शाबीत होत नाही. कारण दाखल्यावरच्या नोंदी या प्रस्तुत शाळेतील संबधित कर्मचारी यांनी त्यांना शाळेमध्ये नाव नोंदणीकरिता विद्यार्थ्यांचे पालकाकडून दिले जाण-या तोंडी माहितीवरुन घेतल्या जात असत. प्रस्तुतच्या कामातील मयत हे शाळेत प्रवेश (Admission) 1943 रोजी घेतलेले दिसून येते. सन 1943 व 1944 खेडयातील लोक अशिक्षित असलेमुळे देखील त्यांना मुलांची जन्मतारीख निश्चित किती याबाबत ज्ञात नसत. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता प्रस्तुत कामातील शाळा सोडलेचे दाखल्यावरुन जन्मतारीख ही खरी आहे हे स्पष्ट होत नाही. शाळा सोडलेचे दाखल्यावरील जन्मतारखेचे नोंदीवरुन वि.प. यांनी मयत शिंदे यांचे वय वर्षे 75 पेक्षा जास्त असे वि.प. यांचे म्हणणे हे मंच मान्य करीत नाही. त्याचप्रमाणे प्रस्तुत कामी दाखल केलेले निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड यावरुन देखील मयताचे वय अपघातावेळी , मृत्यूसमयी 75 पेक्षा जास्त होते हे शाबीत होत नाही. त्यामुळे यातील तक्रारदारांनी वर नमूद केलेले तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये मयताचे वय हे अपघाताचे वेळी मृत्यूसमयी वय वर्षे 65 हे स्पष्टपणे नमुद केले असलेचे तक्रारदाराचे पतीचे वय अपघाताचे वेळ वय वर्षे 65 होते या निष्कर्षास हे मंच येत आहे. त्यामुळे यातील वि.प. यांना तक्रारदारांचा क्लेम हा केवळ तांत्रिक बाबीचा आधार घेवून यातील विमा पॉलिसीचा मुळ हेतू विचारात न घेता नाकारला ही वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि. प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल ता. 22-04-2013 रोजी पासून सदरची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी विमा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र. 3 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 22-04-2013 रोजीपासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज द्यावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.