नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि. 31-12-2015)
1) तक्रारदार यांनी वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
(अ) तक्रारदार यांचे पती महिपती ज्ञानू भिखे हे तिसंगी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर येथील शेतकरी होते. त्यांचे नावे शेतजमीन होती. सदर जमिनीचा खाते नं. 242 असून 7/12 उता-यावर तशी नोंद आहे. तक्रारदार यांचे पतीचा “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना”, या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. कडे विमा उतरवला आहे.
(ब) कै. महिपती ज्ञानू भिखे यांचे दि. 15-05-2011 रोजी वेतवडे येथील नातवास भेटणेसाठी गेले असता, कुंभी नदीचे बंधा-यावरुन पायी चालत येत असताना, तक्रारदाराचे पतीचे अनावधानाने व अपघाताने पाय घसरुन, कुंभी नदीचे पात्रात बुडून मयत झाले. तक्रारदार यांचे पतीचे प्रेत वेतवडे गावचे नदी पात्रात मिळून आले. त्यानंतर पतीचे विच्छेदन हे ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा येथे झाले असून तक्रारदार यांचे पती हे पाण्यात बुडून मयत झालेबाबत दाखला ग्रामीण रुग्णालय गगनबावडा यांनी दिला आहे. सदर घटनेची नोंद गगनबावडा पोलिस ठाणे यांचेकडे झाली आहे.
(क) तक्रारदार यांचे पती हे पाण्यात बुडून अपघाताने मयत झालेने ग्रामीण रुणालय, गयगनबावडा यांनी प्रेताचे विच्छेदन करुन तसा दाखला दिला आहे. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रे अर्जासोबत दाखल केली आहेत.
(ड) तक्रारदार यांचे पतीचे निधन झाल्याने “ शेतकरी अपघात विमा योजने”प्रमाणे योग्य त्याकागदपत्रांसह विमा प्रस्ताव दि. 13-03-2012 रोजी वि.प. कंपनी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर व कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा. लि; यांचेकडे प्रस्ताव पाठवून तक्रारदार यांचा विमा वि.प. कंपनीस मिळालेला आहे. तरीसुध्दा वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांचे प्रस्तावाबाबत काहीही कळविलेले नाही.
(इ) तक्रारदार वि.प. ची ग्राहक असून, वि.प. यांनी तक्रारदारास तात्काळ सेवा देणे बंधनकारक असूनही सेवेत त्रुटी केली आहे.
(ई) तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने”मार्फत मिळणारी रक्कम रु. 1,00,000/-, व्याज, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाची खर्चाची मागणी केली आहे.
3) वि.प. कंपनीतर्फे दि. 16-09-2014 रोजी तक्रारीस खालीलप्रमाणे म्हणणे दाखल केले आहे.
(अ) तक्रारदाराची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून, खर्चासह नामंजूर करावी.
(ब) महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर व वि.प. विमा कंपनी यांचे दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे व शासनाचे अध्यादेशाप्रमाणे मयत व्यक्तीचे वारसांनी अगर जखमी विमाधारकाने क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी करुन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत इन्शुरन्स कंपनीकडे पाठविले जातात. सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रारदारांनी सदर पध्दत डावलून वि.प. विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल केलेचे दिसून येते. तथापि तक्रारदाराचा कोणताही क्लेम वि.प. कडे पोहचलेचे कागदपत्रांवरुन दिसून येते नाही. त्यामुळे सदर प्रस्तावाबाबत तक्रारदारांना वि.प. यांनी काहीही कळविलेले नाही. वि.प. यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही.
(क) महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हैअर व वि.प. यांचे दरम्यान कराराप्रमाणे, मयत व्यक्तीचे वारसांनी क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी होऊन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत विमा कंपनीकडे पाठविले जातात.
(ड) तक्रारदार चुकीचे पध्दतीचा अवलंब करुन क्लेम घेऊन पाहत आहे. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. वि.प. नी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
4) तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2. तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ? होय
3. काय आदेश ? तक्रार अर्ज अंशत: मंजूर.
का र ण मि मां सा –
5) तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत एकूण अठरा कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दि. 13-03-2012 रोजी वि.प. ना दाखल केलेला अर्ज, क्लेम फॉर्म नं.1 व 2 , क्लेम फॉर्म नं. 1 चे सहपत्र, महिपती ज्ञानू भिखे यांचे गट नं. 242 शेतजमिनीचा 7/12 चा उतारा, वासरा डायरी सहा-क, जमिनीचा खाते उतारा, खाते नं. 301 चा 8 अ चा उतारा, क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र दि. 29-12-2011 चंद्रकांत श्रीपती भिखे यांचा वर्दी जबाब, घटनेचा प्राथमिक अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यूचा दाखला, विमा प्रस्ताव वि.प. कंपनी, कबाल जनरल इन्शुरन्स, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविलेला प्रस्ताव पोहच पावती इत्यादी कागदपत्रे आपले तक्रारीच्या पुराव्यासाठी दाखल केलेले आहेत.
6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांचे वतीने अॅड. आर.जी. शेळके व वि.प. तर्फे अॅड.पी.आर. कोळेकर, यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंच्या वतीने लेखी युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. तक्रारदाराचे पती दि. 15-05-2011 रोजी वेतवडे येथील नातवास भेटणेस गेले असता, कुंभी नदीचे बंधा-यावरुन पायी चालत येत असताना, तक्रारदाराचे पती अनावधानाने व अपघाताने पाय घसरुन, कुंभी नदीचे पात्रात बुडून मयत झाले. तक्रारदार यांचे पतीचे प्रेत वेतवडे गावचे नदी पात्रात मिळून आले. त्यानंतर पतीचे विच्छेदन हे ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा येथे झाले असून तक्रारदार यांचे पती हे पाण्यात बुडून मयत झालेबाबत दाखला ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा यांनी दिला आहे. सदर घटनेची नोंद गगनबावडा पोलिस ठाणे यांचेकडे झाली आहे. तक्रारदार हिचे पती महिपती ज्ञानू भिखे हे यांचे वारस असल्याचे प्रमाणपत्रावरुन सिध्द होते व मयत महिपती ज्ञानू भिखे यांचे अपघातानी मृत्यू झाला हे सिध्द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करता, त्यांनी तक्रारीतील मजकूर पुराव्यानिशी सिध्द केला आहे असे स्पष्ट दिसून येते.
7) वि.प. यांचे अॅडव्होकेट यांनी आपल्या लेखी व तोंडी युक्तीवादामध्ये तक्रारदार यांनी क्लेम दाखल करतांना करारानुसार जे बंधन घातले आहे त्याचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर व वि.प. विमा कंपनी यांचे दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे व शासनाचे अध्यादेशाप्रमाणे मयत व्यक्तीचे वारसांनी अगर जखमी विमाधारकाने क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी करुन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत इन्शुरन्स कंपनीकडे पाठविले जातात. सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रारदारांनी सदर पध्दत डावलून वि.प. विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल केलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार यांचा अर्ज त्या कारणावरुन नाकारणे संयुक्तिक नाही.
8) तक्रारदार यांनी दि. 13-03-2012 रोजी क्लेम फॉर्म सर्व कागदपत्रासोबत व वि.प. कडे दाखल केला आहे. सदर विमा क्लेम सबंधी वि.प. कंपनीने तत्परतेने निर्णय घेणे न्यायाचे होते. वि.प. विमा कंपनीने योग्य मुदतीत निर्णय न घेणे ही सेवेतील त्रुटी आहे.
9) तक्रारदार यांचे पतीचे निधन दि. 15-05-2011 रोजी झाले, तदनंतर अर्ज दि. 13-03-2012 रोजी दाखल केला, पण वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराच्या क्लेम-फॉर्मचा विचार केला नसल्याचे दिसून येते. वि.प. यांनी दि. 13-05-2012 रोजीपर्यंत अर्जाच्या क्लेम फॉर्मच्यासंबंधी निर्णय घेणे उचित होते. वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते.
10) मंचाचे मते, तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील मजकूर पुराव्यानिशी सिध्द केला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख ) देणे बंधनकारक आहे. तक्रारदार यांना विम्याच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 % प्रमाणे दि. 13-05-2012 रोजीपासून व्याज मिळणे आवश्यक आहे. तसेच वि.प. विमा यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि, यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द.सा.द.शे. 6 % व्याजाने दि. 13-05-2012 रोजीपासून द्यावेत.
3) वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.