:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, मनोहर गो. चिलबुले, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 12/07/2013)
1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकत्याचे संक्षिप्त म्हणणे असे की, त्याने फियाट कार क्रं. एम.एच.34/एए-0561 ही दि.17/11/2009 रोजी विकत घेतली. सदर कारचा विमा गै.अ.क्रं.2 व्दारे रु.15,088 देवून चंद्रपूर येथिल कार्यालयात काढला सदर विमा पॉलिसीचा क्रं.2009 V 0500388 – FPV असून कालावधी 17/11/2009 ते 16/11/2010 असा होता. सदर पॉलिसीमध्ये वैयक्तिक अपघाताबाबत रु.100/- चा भरणा समाविष्ट असून त्याबद्दल मालक-चालकाचा अपघातात मृत्यु झाल्यास रु.2,00,000/- नुकसान भरपाई देण्याची तरतुद आहे.
3. दि.10/04/2010 रोजी अर्जदाराचा मुलगा राहुल विजयकुमार उर्फ राजकुमार चांडक वरील कार चालवित असतांना चंद्रपूर- मूल मार्गावर आपघात होवून मरण पावला. सदर अपघाताबाबत पोलिसांनी चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.
4. वरील अपघातग्रस्त कारचे मालक व राहुलचे पिता असलेल्या अर्जदाराने गै.अ.क्रं.2 कडे चंद्रपूर येथिल कार्यालयात जावून राहुलच्या मृत्युबाबत रु. 2,00,000/- अपघात नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांने गै.अ.क्रं. 1 च्या नावाने अर्ज कागदपञासह देण्यास सांगितले. त्याप्रमाणे अर्जदाराने गै.अ.क्रं 1 चे नावाने अर्ज व कागदपञ गै.अ.क्रं. 2 चे कार्यालयात सादर केले आणि त्याची पोच घेतली. गै.अ.क्रं. 2 ने मयताचे ड्रायव्हिंग लायसन्स व अर्जदाराचे आर.सी.बुक स्वतःजवळ ठेवून घेतले परंतू त्यावर कोणतीच कारवाई केली नाही.
5. दि.22/08/2011 रोजी अर्जदाराने गै.अ.क्रं. 1 व 2 ला नोटीस पाठवून नुकसान भरपाईची रक्कम रु.2,00,000/- द.सा.द.शे.12% व्याजासह मागणी केली. गै.अ.क्रं.1 ने नोटीसला उत्तर दिले नाही. गै.अ.क्रं. 2 ने खोटे व उडवाउडवीचे उततर पाठविले म्हणून वैयक्तिक विमा पॉलिसीची रककम रु.2,00,000/- द.सा.द.शे.12% व्याजासह मिळावी तसेच मानसिक ञासाबद्दल रु.20,000/- व खर्च रु.5,000/- मिळावा म्हणून तक्रार अर्जात मागणी केली आहे.
6. गै.अ.क्रं. 1 ने नि.क्रं.18 प्रमाणे लेखीजबाब दाखल करुन तक्रार अर्जास विरोध केला आहे. त्यांनी सदर उत्तरात अर्जदाराने त्याच्या मालकीच्या वर नमुद फियाट कारचा विमा रु.15,088/- भरुन काढला व त्यात रु. 100/- चा भरणा मालक - चालकाच्या अपघाती विम्याचा होता आणि सदर रकमेपोटी अर्जदाराचे नावाने वर नमुद विमा पॉलिसी दिल्याचे कबुल केले आहे. अर्जदाराचा मुलगा राहुल याचा वरील कार चालवितांना अपघात होऊन तो मरण पावला किंवा काय हे माहिती अभावी नाकबुल केले आहे. तसेच अर्जदाराने गै.अ. क्र. 2 ची भेट घेऊन त्याचे कडे नुकसान भरपाईची मागणी केल्याचे आणि त्याने कागदपञ गै.अ. क्र. 1 चे नावाने सादर करण्यास सांगितले व अर्जदाराने ते सादर केले इतर मजकुर नाकबुल केला आहे.
7. त्यांचे म्हणणे असे की, विमाकृत वाहनाचा अपघात 10/04/2010 ला झाल्यावर सदर अपघाताची माहिती अर्जदाराने ताबडतोब विमा कंपनीस दिली नाही आणि विमा पॉलिसीतील अटींचा भंग केला त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
8. अपघात चंद्रपूर जिल्हयात झाला असला तरी चंद्रपूर येथे गै.अ.क्रं. 1 चे कार्यालय नाही, ते नागपूर येथे आहे. गै.अ.क्रं. 2 विमा कंपनीचा प्रतिनिधी नाही म्हणून सदर तक्रार अर्ज चालविण्याचा चंद्रपूर येथिल ग्राहक तक्रार निवारण मंचास अधिकार नाही.
9. ज्या कारचा विमा काढला होता तिचा नोंदणीकृत मालक अर्जदार होता व त्याचा वैयक्तिक विमा काढला होता. अर्जदाराचा मुलगा राहूल अपघातग्रस्त कारचा मालक नसल्याने मालक चालकाच्या वैयक्तिक विम्याचे संरक्षण त्याला मिळू शकत नाही. अर्जदाराने चालक -मालक व पगारी चालक यांच्या शिवाय सदर वाहनातून प्रवास करणा-या 5 व्यक्तींचा विमा रु.125/- चा भरणा करुन काढला आहे व सदर तरतुदीप्रमाणे प्रावाशाचा मृत्यु झाल्यास प्रत्येकी 50,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची विमा कंपनी म्हणून क्रं. 1 ची जबाबदारी आहे. अशी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने प्रकरण आवश्यक कागदपञांसह क्रं. 1 कडे पाठविणे आवश्यक होते, परंतु ते पाठविले नाही. त्यामुळे या तक्रार अर्जातील मागणी मंजूर करता येणार नाही. अर्जदाराने विहीत नमुन्यात नुकसान भरपाईचा अर्ज केल्यास त्याची सत्यता पडताळून त्यावर गै.अ.क्रं. 1 कार्यवाही करण्यास तयार आहे. म्हणून तक्रार अर्ज खारीज होण्यास पाञ आहे.
10. पर्यायाने गै.अ.क्रं.1 चे म्हणणे असे कि, अर्जदार त्याच्या मुलाच्या अपघाती मृत्युबाबत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे असे सिध्द झाल्यास तो केवळ रु.50,000/- च्या नुकसान भरपाईस पाञ आहे.
11. गै.अ.क्रं.2 ने त्याचा लेखी जबाब निं.क्रं. 17 प्रमाणे दाखल केला आहे. अर्जदाराने त्याचे मार्फत वरील कारचा विमा गै.अ.क्रं.1 कडून काढल्याचे कबुल केले आहे. विमा पॉलिसी प्रमाणे मालक तसेच पगारी चालकांना विमा संरक्षण देण्यात आले होते, परंतू अर्जदाराचा मुलगा पगारी चालक नसल्याने त्यास मालक – चालक विमा संरक्षण मिळू शकत नाही. गै.अ.क्रं.2 हा विमा एजंट नसून ब्रोकर आहे व म्हणून अर्जदार त्याचा ग्राहक होत नाही. अर्जदाराने दिलेले कागदपञ गै.अ.क्रं.1 कडे लगेच देवून त्याने आपले कर्तव्य बजावले होते. विमा पॉलिसी प्रमाणे नुकसान भरपाईची कोणतीही जबाबदारी येत असेल तर ती केवळ गै.अ.क्रं.1 या विमा कंपनीची असून त्यांत ब्रोकरची जबाबदारी नाही, म्हणून त्याच्या विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
12. तक्रारदार व गै.अ.क्रं.1 व 2 चे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) सदर तक्रार चालविण्याचा या मंचास
अधिकार आहे काय ? आहे.
2) गै.अ.ने सेवेत न्युनता/अनुचित व्यापार
पध्दती अवलंबविली काय ? होय.
3) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे रु.2,00,000/- भरपाई
मिळण्यास पाञ आहे काय ? नाही.
किंवा इतर कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास होय.
पाञ आहे काय ? रु. 50,000/- मिळण्यास पाञ.
4) अंतिम आदेश काय ? : अर्ज अंशतः मंजूर.
12. तक्रारकर्ता विजयकुमार उर्फ राजकुमार गुलाबचंद चांडक यांनी त्यांचा पुरावा शपथपञ नि.क्रं 26 प्रमाणे दिला असून अर्जाप्रमाणेच सर्व बाबी नमुद केल्या आहेत आपल्या साक्षीच्या पृष्टार्थ नि. क्रं. 4 या दस्ताऐवजांच्या यादी सोबत खालील दस्ताऐवज दाखल केले आहेत. (यादी प्रमाणे 1 ते 15)
अ-1) राशन कार्ड.
अ-2) फियाट कार क्रं. एम.एच.34/एए-0561 चे आर.सी.बुक.
अ-3) फियाट कार क्रं. एम.एच.34/एए-0561 ची विमा पॉलिसी.
अ-4) राहूल चांडकचे ड्रायव्हिंग लायसन्स.
अ-5) पहिली खबर.
अ-6) घटनास्थळ पंचनामा.
अ-7) पि.एम.रिपोर्ट.
अ-8) फ्युचर जनरली इंडिया इन्शु.कं.ली.ने अर्जदारास पाठविलेले पञ.
अ-9) अर्जदाराने गै.अ.क्रं. 1 ला दिलेला अर्ज.
अ-10) अर्जदाराने वकीलामार्फत गै.अ.स पाठविलेला नोटीस.
अ-11) पोस्टाची रशिद.
अ-12) पोस्टाची रशिद.
अ-13) पोहचपावती.
अ-14) पोहचपावती.
अ-15) गै.अ.क्रं.2 ने पाठविलेले नोटीसचे उत्तर.
13. गै.अ.क्रं. 1 व 2 यांनी पुराव्याचे स्वतंञ शपथपञ दिले नाही, परंतू शपथेवर दिलेला लेखीजबाब हाच त्यांचा पुरावा समजण्यात यावा पुरसीस दिली आहे. तसेच गै.अ.क्रं.1 ने त्यांच्या म्हण्याच्या पृष्ठार्थ दस्ताऐवजाची यादी नि.क्रं.19 सोबत 1) विमा पॉलिसी आणि 2) तक्रारदारास पाठविलेल्या उत्तराची प्रत दाखल केली आहे.
मुद्दा क्र. 1 बाबत :-
14. या प्रकरणात गै.अ.क्रं.1 ही विमा कंपनी असून अर्जदाराचे अपघातग्रस्त कारचा विमा सदर कंपनीकडे विमा ब्रोकर असलेल्या गै.अ.क्रं.2 कडे पॉलिसीची रक्कम चंद्रपूर येथे देवून काढला होता ही बाब निर्विवाद आहे. गै.अ.क्रं.1 या विमा कंपनीचे कार्यालय जरी मुंबई आणि नागपूर येथे असले तरी सदर कंपनी आपल्या विमा विक्रीचा व्यवसाय चंद्रपूर येथे विमा ब्रोकर असलेल्या गै.अ.क्रं.2 मार्फत करते. सदर अपघातग्रस्त कारची विमा पॉलिसी गै.अ.क्रं.1 ने गै.अ.क्रं.2 व्दारे चंद्रपूर येथे विक्री केली असल्याने व गै.अ.क्रं.2 चंद्रपूर येथे त्याचा इन्शुरंस ब्रोकरचा व्यवसाय करीत असल्याने चंद्रपूर येथिल ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचास सदर तक्रार अर्ज चालविण्याचा अधिकार आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत :-
15. अर्जदाराने त्याच्या वरील विमाकृत कारचा अपघात दि.10/04/2011 रोजी झाला व त्यांत सदर कार चालवित असलेला त्याचा मुलगा राहूल मरण पावला असे शपथपञावर सांगितले आहे. राहूल हा अर्जदाराचा मुलगा होता हे दर्शविण्यासाठी यादी नि. 4 सोबत दस्त क्रं. 1 ही शिधापञिकेची प्रत दाखल केली असून त्यांत राहूल हा अर्जदाराचा मुलगा म्हणून दर्शविले आहे. त्सेच दस्त क्रं. 4 वर राहूल याचा चालक परवाना दाखल केला आहे. दस्त क्रं. 5 वर सदर अपघाताबाबत चंद्रपूर येथिल रामनगर पोलीस स्टेशन मध्ये नोंदविलेला अपराध क्रं. 102/10 दि. 14/04/2010 कलम 279, 337, 427 ची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. त्यांत राहूल चांडक एम एच - 34 /एए 0561 ही कार चालवित असतांना अपघात झाला व त्यात तो व इतर जखमी झाल्याचे म्हटले आहे. दस्त क्रं. 7 वर राहूल विजयकुमार चांडक यांचा दि. 11/04/2010 चा शव विच्छेदन अहवाल दाखल असून मृत्युचे कारण ‘’ रस्ता अपघातातील डोक्यास झालेल्या दुखापतीमुळे’’ असे दर्शविले आहे. यावरुन अर्जदाराचा मुलगा राहूल हा गै.अ.क्रं.1 कडे गै.अ.क्रं.2 व्दारा विमाकृत केलेली वरील कार चालवित असतांना झालेल्या अपघातामुळे मरण पावला हे सिध्द होते.
16. अर्जदाराचे म्हणणे असे कि, मय्यत राहूलच्या अपघातानंतर त्याने अपघाताबाबत विम्याची भरपाई रु. 2,00,000/- मिळण्यासाठी अर्ज व आवयशक सर्व दस्ताऐवज गै.अ.क्रं.1 च्या नावाने गै.अ.क्रं.2 कडे दिले, कारण सदरची विमा पॉलिसी त्याचे व्दारा काढली होती. सदर बाब दस्त क्रं. 10 या नोटीस मध्ये देखिल नमुद आहे. सदर नोटीस गै.अ.क्रं.1 व 2 ला पाठविल्याचा पावत्या दस्त क्रं. 11 व 12 वर आणि नोटीस गै.अ.ना मिळाल्याबाबत पोच पावत्या दस्त क्रं. 13 व 14 वर दाखल आहेत. तसेच गै.अ.क्रं.2 ने अर्ज व दस्ताऐवज मिळाल्याची दिलेली दि. 31/01/2011 ची पोच दस्त क्रं. 9 वर आहे गै.अ.क्रं.2 ने त्याच्या लेखीजबाबात अर्जदाराने दिलेला नुकसान भरपाईचा मागणी अर्ज व संबंधीत दस्ताऐवज तोडतोब गै.अ.क्रं.1 कडे पाठवून आपले कर्तव्य बजाविल्याचे म्हटले आहे. यावरुन अर्जदाराने कार अपघातात मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यु दाव्याची मागणी गै.अ.क्रं.2 मार्फत गै.अ.क्रं.1 कडे केली होती, परंतू ती मागणी मंजूर करण्यात आली नाही किंवा ती कोणत्या कारणाने नाकारण्यांत आली हे गै.अ.क्रं.1 ने कळविले नाही. सदर बाब ही विमाधारकाप्रती विमाकंपनीकडून सेवेतील न्युनता या सदरात मोडणारी आहे.
17. अर्जदाराचे म्हणणे असे कि, सदर विमा पॉलिसीच्या रक्कमेत रु.100/- आकार हा मालक- चालकाच्या वैयक्तिक विम्याचा होता. त्याचा मुलगा राहूल हा सदरची कार चालवित असतांना झालेल्या अपघातामुळे मरण पावला म्हणून सदर कारचा चालक म्हणून त्याच्या मृत्युबाबत रु. 2,00,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. परंतू गै.अ.ने सदरची न्याय्य नुकसान भरपाई न देता अनुचित व्यापाराची पध्दती अवलंबविली आहे. सदर मुद्दाच्या समर्थनार्थ खालील न्यायनिर्णयाचा हवाला दिला आहे.
1) TAC 2007 (1) 813 (Hon.H.C.Nag. Bench) United India Insurance
Com.Vs. Smt.Sunita Dharmane.
2) TAC 2007 (2) 567
M.P. Kunti Vs. State Of M.P.
18. वरील दोन्ही प्रकरणात मोटारवाहन मालक वाहन चालवित असतांना अपघात होवून मरण पावला म्हणून तो मोटार वाहन अपघात अधिनियमाप्रमाणे नुकसान भरपाईस पाञ नाही, माञ मालक-चालक या सदरात वैयक्तिक विम्याची रक्कम स्विकारली असल्याने त्या सदराखाली विम्याची रक्कम रु. 1,00,000/- मिळण्यास पाञ ठरविण्यात आले आहे.
3) M.h.L.J. 2009 (4) 73 (Supreme Court)
New India Assurance Co.Vs.Sadanand Mulklei
सदर प्रकरणात असे म्हटले आहे कि, विमा Spatectory आणि Contractual अशा दोन स्वरुपाचा असतो. वडीलाच्या नावाने असलेली मोटार सायकल चालविणा-या मुलाच्या अपघाताबाबत मोटार वाहन कायद्याप्रमाणे कायदेशिर विम्याच्या दायित्वात नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदारास अपाञ आहे आणि Contractual (वैयक्तिक) विम्यामध्ये मागणी असल्यास त्यावर निवाडा देण्याची अधिकार कक्षा ग्राहक तक्रार निवारण मंचाची आहे.
19. वरील न्यायनिर्णयांचा आधार घेवून तक्रारदाराचे अधिवक्त्यांनी असा युक्तीवाद केला की, अर्जदार हा मुलाच्या अपघाती मृत्युबाबत मालक-चालक या सदरात पॉलिसी (दस्त क्रं. 3) प्रमाणे रु.2,00,000/- नुकसान भरपाई व त्यावरील व्याज मिळण्यास पाञ आहे.
20. याउलट गै.अ.क्रं. 1 चे अधि. यांनी युक्तीवादात सांगितले कि, अर्जदाराने दस्त क्रं. 3 प्रमाणे दाखल केलेली विमा पॉलिसी अपूर्ण आहे. पूर्ण अटी व विमा पॉलिसी गै.अ.क्रं.1 ने यादी नि.क्रं. 19 सोबत दस्त क्रं.1 वर दाखल केली आहे. पॉलिसीच्या पहिल्या पानावर प्रिमियम शेडयूल मध्ये B-Liability कॉलम आहे. त्यात कोणत्या उत्तरदायित्वासाठी किती प्रमियम घेतले ते खालील प्रमाणे लिहीले आहे.
Rs.
Basic premium including premium for TPPD - 800
Compulsory P.A. to Owner Driver – Rs.2 Lacks - 100
P.A. to persons other than owner / driver - 125
No. of persons 5, Limit Rs. 50000/- per person
गै.अ. क्र. 1 ने स्टॅंडर्ड फॉर्म फॉर प्रायव्हेट कार पॅकेज (पॉलिसीच्या अटी) दाखल केला असुन त्यांत वरील विमा संरक्षण कोणास उपलब्ध आहे ते दर्शविले आहे. पान क्रमांक 3 वर Section III Personal Accident Cover for owner Driver या शिर्षकाखाली सदर लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी खालिल प्रमाणे दिल्या आहेत.
अ) मालक-चालक हा विमाकृत वाहनाचा नोंदणीकृत मालक असावा.
ब) मालक-चालकाचे नाव विमाकृत व्यक्ती म्हणुन विमा पॉलिसी मध्ये दर्शविले
असावे.
क) मालक-चालकाकडे वैध वाहन परवाना असावा.
या प्रकरणात अर्जदाराचा मयत मुलगा राहुल विजयकुमार चांडक हा विमाकृत वाहनाचा मालक नाही व विमा पॉलिसीवर त्याचे नाव ही नाही म्हणुन अर्जदाराने 100/- रुपये भरुन मालक-चालकासाठी जो विमा घेतला आहे त्याचा लाभ सदर वाहनाचा मालक नसलेल्या व अपघाताचे वेळी वाहन चालविणा-या मुलाचा मृत्युबाबत नुकसान मिळण्यासाठी घेता येणार नाही.
21. अर्जदाराने रुपये 125/- चा भरणा करुन मालक किंवा चालक यांचेशिवाय विमाकृत वाहनातुन प्रवास करणा-या 5 व्यक्तिसाठी अपघात विमा घेतला असुन सदर वाहनाच्या अपघातात मृत्यु झाल्यास 5 व्यक्तींसाठी प्रत्येकी रुपये 50,000/- पर्यंत विमा लाभ मिळण्याची तरतुद आहे. त्यामुळे यदाकदाचित सदर अपघातात मृत्यु पावलेल्या अर्जदाराच्या मुलाबाबत अर्जदारास विमा लाभ देण्याचे न्यायालयाचे मत ठरले तर सदर तरतुदीप्रमाणे रुपये 50,000/- मंजुर करता येतील.
22. गै.अ. क्रमांक 1 चे अधिवक्ता यांनी पुढे असा युक्तीवाद केला की, अर्जदाराने आजपर्यंत गै.अ. कडे विमा रक्कम मागणीसाठी कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याने गै.अ. कडुन विमा कंपनी या नात्याने असलेल्या कोणत्याही दयित्वाचे उल्लंघन झाले नाही म्हणुन सदर तक्रार अर्ज खारीज करावा.
23. गै.अ. क्र.2 चे अधिवक्ता यांनी त्यांच्या युक्तीवादात सांगितले की, ब्रोकर म्हणुन त्यांनी सदर विमा पॉलिसीचे पैसे स्विकारले व ते गै.अ. क्र. 1 ला पाठविले आणि त्यांनी पॉलिसी दिली. तसेच अर्जदाराने दिलेला नुकसान भरपाई मागणीचा अर्ज व संबंधीत दस्तऐवज वेळीच गै.अ. क्र. 2 कडे पाठवुन आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. गै.अ.क्र 1 ने प्रिमियम स्विकारुन पॉलिसी दिली असल्याने सदर पॉलिसी प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी त्यांची एकटयाची आहे त्यामुळे गै.अ.क्र.2 ला सदर तक्रारीतून मुक्त करावे.
24. वरील प्रमाणे अर्जदार व गैरअर्जदारांचा युक्तीवाद आणि त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचा विचार केल्यावर मंच अशा निष्कर्षाप्रत आले की, अर्जदाराचा मयत मुलगा राहुल हा विमाकृत वाहनाचा नोंदणीकृत मालक नसल्याने व त्याचे नाव विमा पॉलिसीत नसल्याने मालक-चालक या सदरात त्याच्या मृत्युबद्दल रुपये 200000/- नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ नाही.
25. माञ अर्जदाराने गाडीतुन प्रवास करणा-या 5 अनामिक प्रवाश्यांसाठी रुपये 125/- चा भरणा करुन जे विमा संरक्षण घेतले होते त्या सदरात अर्जदाराचा मुलगा राहुल यांच्या मृत्युबाबत रुपये 50000/- चा विमा लाभ अर्जदारास मंजूर करता येईल.
26. गैरअर्जदार क्र. 1 ला दस्त क्रमांक 10 ही दिनांक 20.08.2011 ची नोटीस मिळूनही त्यांनी अर्जदारास असा लाभ देण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणुन गै.अ. क्र. 1 व 2 यांनी सेवेत न्युनता येईल असे वर्णन केले असुन सदर बाब ही अनुचित व्यापारी पध्दती आहे. वरील कारणांमुळे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
तक्रारदाराचा अर्ज खालिल प्रमाणे अंशतः मंजुर
1) गै.अ.क्र.1 ने अर्जदाराचा मुलगा राहुल विजयकुमार ऊर्फ राजकुमार चांडक यांचे मृत्युबाबत अपघात विम्याची रक्कम रुपये 50,000/- तक्रार अर्जाचे तारखेपासुन द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह 1 महिन्याचे आत अर्जदारास द्यावी.
2) सदर प्रकरणाच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास रुपये 2,000/- एक महिण्याचे आत द्यावेत.
3) वरील प्रमाणे आदेशाची पुर्तता करण्यात कसूर केल्यास गैरअर्जदार क्र.1, ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे कलम 25 खालिल कारवाईस पाञ राहील.
4) गैरअर्जदार क्र. 2 हा विमा रक्कम देण्यास वैयक्तीक जबाबदार नसल्याने त्यास विमा रक्कम व खर्च देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येते.
5) संबंधीत पक्षांना या आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 12 /07/2013