नि का ल प त्र :- ( व्दारा- मा. श्री. दिनेश एस. गवळी,प्र.अध्यक्ष) (दि. 06-10-2015)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
यातील तक्रारदार हिचा मयत मुलगा यांचा शेती हा व्यवसाय होता. तक्रारदाराचे नावे त्यांचे गावी शेती होती. सदर शेतीचा खाते नं. 234 असा आहे. वि.प. ही विमा व्यवसाय करणारी कंपनी आहे. तक्रारदार यांचे मुलाचा वि.प. कंपनीकडे ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना योजने’अंतर्गत वि.प. कंपनीकडे विमा उतरविलेला होता. तक्रारदार हिचा मयत मुलगा श्रीपाद गणपती पाटील याचा दि. 20-11-2012 रोजी विश्रामबाग रेल्वे स्टेशन, सांगली येथे रेल्वे अपघातात मृत्यू झालेला होता व आहे. त्यावेळी सदर रेल्वे अपघाताची वर्दी विश्रामबाग पोलिस ठाणे यांचेकडे रेल्वे स्टेशन मास्तर यांचेमार्फत झालेली असून मयत श्रीपाद यांचे प्रेताचे शवविच्देदन शासकीय सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे झालेले आहे. सदर घटनेचा संपूर्ण तपास हा विश्रामबाग पोलीस स्टेशन यांचेमार्फत झालेला आहे. तक्रारदार हिचा मुलगा अपघातात मयत झालेनंतर त्यांचा शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मिळणारा विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी मा. तहसिलदार, राधानगरी यांचे माध्यमातून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन वि.प. कंपनीकडे दि. 4-02-2013 रोजी दाखल केला असता यातील वि.प. कंपनीने मयताचे नांवे जमीन ही विमा कालावधीत झालेली नाही या कारणावरुन दि. 21-06-2013 रोजीचे पत्राने नाकारलेला आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की, तक्रारदार ही एक गरीब स्त्री असून ती राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागात राहणारी आहे. तिचे कुटुंब हे शेतीवर अवलंबुन होते. तथापि, यातील तक्रारदार हिस तिचे मुलग्याचे अपघाती व अकाली झाले मृत्यूबाबत दाखल विमा क्लेमची रक्कम तात्काळ तक्रारदार हिस न मिळालेस तिचेवर उपासमारीची वेळ येणार आहे. तक्रारदार हिस तिचे विमा क्लेमची रक्कम मुदतीत न मिळालेने तिला फार मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यायचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी ‘ शेतकरी जनता अपघात योजना विमा’ क्लेम रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठीप्रित्यर्थ कृषी पर्यवेक्षक कौलव, ता. राधानगरी यांचे पत्र, क्लेम फॉर्म भाग -1, गट नं. 485 चा 7/12 उतारा, जमिन खाते नं. 234 चा 8 अ चा उतारा, फेरफार नं. 596 ची डायरी, सहा – क उतारा, क्लेम फॉर्म भाग -2 , तक्रारदार हिचे प्रतिज्ञापत्र, विश्रामबाग पोलिस ठाणे यांचेकडे दिलेली वर्दी, घटनास्थळाचा पंचनामा, सिव्हिल सर्जन सांगली यांनी दिलेला दाखला, मयताचे पोस्टमार्टेम रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, वि.प. कंपनीने प्रस्ताव नाकारलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. तसेच दि. 07-08-2015 रोजी तक्रारदारानी शपथपत्र दाखल केले आहे.
(4) वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदाराचे तक्रारीस म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर खोटा, चुकीचा असून मान्य नाही. तक्रारदाराचे मुलाचा वि.प. कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत कोणीही विमा उतरविलेला नव्हता व नाही. यातील तक्रारदारांनी त्यांचे मुलाचे मृत्यूबाबत वि.प. कंपनीकडे दि. 4-02-2013 रोजी प्रस्ताव दाखल केलेला होता. तथापि, तक्रारदाराचे मुलाचा अपघाती मृत्यू हा दि. 20-11-2012 रोजी झाला आहे. व तक्रारदाराचे मयत मुलगा याचे नाव डायरी नं. 956 ने दि. 7-10-2012 रोजी 7/12 उता-यास दाखल झाले आहे. तथापि महाराष्ट्र शासनाचे योजनेअंतर्गत वि.प. कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विमा हा दि. 15-08-2012 ते 14-08-2013 या कालावधीकरिता असून तक्रारदाराचे अपघातग्रस्त मुलाचे नावांवर जमीन ही दि. 7-10-2013 रोजी मंजूर झालेली आहे. सदर शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या कालावधीमध्ये दि. 5-08-2012 ते 14-08-2013 चे कालावधीत तक्रारदाराचे मुलाचे नांव 7/12 पत्रकी शेतकरी म्हणून दाखल नव्हते. त्यामुळे वि.प. कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला असून वि.प. यांची सदरची कृती ही पूर्णपणे योग्य व कायदेशीर आहे. तक्रार अर्ज कलम 4 व 5 मधील मजकूर खोटा, लबाडीचा व चुकीचा असून वि.प. मान्य व कबूल नाही. वि.प. यांनी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदार कलम 5 मध्ये नमूद करतात त्या कारणासाठी सदरचा तक्रार अर्ज मंजूर करता येणार नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. जे कारण घडलेले आहे ते खोटे, चुकीचे आहे. तक्रारदारांना तक्रार अर्जात मागणी केलेल्या कोणत्याही दाद कायदेशिररित्या तक्रारदारांना देता येणार नाही. तक्रारदारांची व्याजाची व शारिरीक व मानसिक त्रासापोटी व खर्चाबाबतची मागणी खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती वि.प. कंपनी यांनी केली आहे.
(5) तक्रारदारांची तक्रार तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, तक्रार अर्जास वि.प. यांनी दाखल केलेले म्हणणे व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? नाही
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र.1:
प्रस्तुत कामी यातील तक्रारदार यांचा मयत मुलगा श्रीपाद गणपती पाटील यांचा दि. 20-11-2012 रोजी रेल्वे अपघातात विश्रामबाग रेल्वेस्टेशन, सांगली येथे मृत्यू झालेला आहे. सदर रेल्वे अपघाताची नोंद विश्रामबाग पोलिस स्टेशन यांचेकडे रेल्वे स्टेशनमास्तर मार्फत झालेली आहे. तक्रारदार यांचे सदर मयत मुलाचे नांवे शेती होती व आहे. यातील तक्रारदार यांचे मुलाचा वि.प. कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता व आहे. यातील तक्रारदार यांचे मुलगा याचे अपघाती निधन झालेनंतर विमा कंपनीकडे विमा क्लेम रक्कमेची मागणी केली असता वि.प. कंपनीने दि. 21-06-2013 रोजीचे पत्राने शेतकरी अपघाती विमा हा दि. 15-08-2012 ते 14-08-2013 या कालावधीकरिता असून तक्रारदाराचे अपघातग्रस्त मुलाचे नावांवर जमीन ही दि. 7-10-2012 रोजी मंजूर झालेली आहे. त्यामुळे, शेतकरी अपघात विमा योजनेच्या कालावधीमध्ये त्यांचे नाव 7x12 पत्रकी शेतकरी म्हणून दाखल नव्हते म्हणून विमा क्लेम नाकारला आहे.
तक्रार अर्ज व वि.प. विमा कंपनीचे म्हणणे विचारात घेता प्रस्तुत प्रकरणात तक्रार अर्जात नमूद मयत श्रीपाद गणपती पाटील यांचे नाव 7x12 पत्रकी कधी नोंद झाले ? तसेच सदरचे मयत व्यक्ती शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमेधारक होता का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
सदर मुद्दयांचे अनुषंगाने यातील तक्रारदार यांनी तसेच वि.प.यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले. सदरचे कागदपत्रांमध्ये तक्रारदाराने दाखल केलेले 6-क व 6-ड चा वारसाबाबतचा नोंदवही व फेरफार नोंदवहीचा उतारा पाहिला असता सदरचे फेरफार वर्दीवाटणीप्रमाणे खातेदार गणपती रामचंद्र पाटील यांनी वर्दी दिल्याने कब्जेदार सदरी मयत श्रीपाद गणपती पाटील यांचे नावाची नोंद केल्याचे नमूद असून फेरफार दि. 7-10-2012 रोजीचा आहे. सदरचा फेरफार नं. 596 असा आहे. सदरचे फेरफारने गट क्रमांक 485 याला मयत याचे नाव लागलेले आहे. यावरुन सदरचे मयत यांचे नाव 7x12 पत्रकी दि. 7-10-2012 रोजी शेतकरी म्हणून नोंद झाल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदाराने या कामी सन 2007 सालचे Tri-Partite Agreement dated 29-08-2007 चे दाखल केले आहे त्यामध्ये Policy terms and Conditions खाली 8(II) Eligibility - The Farmers name should be in the Land Record Registrar i.e. 7/12 or 8A extract on the date of accident नमूद असे आहे. सदरचे कॉलमनुसार प्रस्तुत कामातील मयत अपघात दिवशी शेतकरी आहे असे दिसून येते. तथापि, सदरचे कामी वि.प. यांनी प्रस्तुत कामी सन 2010 सालचे Tri-Partite Agreement dated 29-08-2010 चे दाखल केलेले असून त्यामध्ये Policy terms and conditions खाली नमूद 8(2) Eligibility - Policy terms and conditions - The Farmers name should be in the Land Record Registrar i.e. 7/12 or 8A extract on the date of the issuance of policy असे नमूद आहे. यावरुन तक्रारदाराचे मयत मुलांचे नावांची नोंद फेरफार प्रमाणे दि. 7-10-2012 रोजी झालेली असल्याने विमा पॉलिसीचा कालावधी हा दि. 15-08-2012 ते 14-08-2013 असल्याने सदर विमा पॉलिसी सुरु झाले तारखेनंतर त्याचे मुलांची नावांची नोंद 7x12 पत्रकी झालेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे मुलाचा विमा सदर पॉलिसी सुरु झालेचे तारखेदिवशी उतरविला गेला नव्हता. त्यामुळे तो वि.प. यांचे विमाधारक होत नाही कारण सदरची पॉलिसी सुरु झाल्यानंतर त्यांचे नावाची नोंद 7x12 पत्रकी झालेली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी याकामी पॉलिसी कालावधी सुरु झालेचे तारखेदिवशी मयत यांचे 7x12 पत्रकी नांव होते हे शाबीत केलेले नाही. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत केलेले करारात नमूद केलेप्रमाणे Eligibility कॉलममध्ये सदरचे मयत यांचे नाव 7x12 पत्रकी नोंद नसल्याने त्यांचा विमा वि.प. कंपनीने उतरविला नव्हता हे स्पष्ट होते व तो वि.प. यांचा विमेधारक होत नसल्याने सदरचे करारापत्राप्रमाणे तक्रारदार यांचे मुलगा यांचा Insurable Interest Create होत नाही. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. कंपनीने तक्रारदारांचा विमा नाकारुन सेवेत कोणतीही त्रुटी ठेवली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळयात यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र . 2 : सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.