निकालपत्र (दि.16/04/2014)व्दाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी,
1) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा अपघात विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार यांची महाराष्ट्र शासनामार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे ‘ शेतकरी अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेली आहे. सदर पॉलिसीच्या कालावधीतच दि.02/02/2011 रोजी तक्रारदार स्वत:च्या शेतामध्ये काम करीत असताना शेतातील बांधावर चढताना पाय घसरुन पडताना त्यांचे उजव्या डोळयात अत्यंत जोरात काठी घुसल्याने त्यांचा उजवा डोळा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे त्यांना त्वरीत जयतिर्थ यमुनाई हॉस्पिटल, म्हासुर्ली ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथे आवश्यक प्रथमोचार करुन तेथील डॉक्टरांचे सल्ल्याने डॉ.पी.जी.पाटील, नेत्र रुग्णालय, राजारामपूरी 9 वी गल्ली, कोल्हापूर या दवाखान्यात दाखल केले असता सदर डॉक्टरांनी तक्रारदाराचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला असलेचे सांगितले.तद्नंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला यांचेकडे शेतकरी अपघात विमा क्लेम दावा क्र.A0008759अन्वये विमा रक्क्मेची मागणी केली असता सामनेवाला यांनी ‘ अपघातग्रस्ताचे नांव जमिनीच्या 7/12 नमुन्यात नाही’ असे चुकीचे कारण देऊन क्लेम नाकारत असलेचे दि.27/11/2011 रोजीच्या पत्राने तक्रारदारास कळविले.तक्रारदार या एकत्र कुटूंब पध्दतीत राहणा-या असून त्यांचे कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे शेती हेच एकमेव प्रमुख साधन आहे. सदर तक्रारदार या पूर्णत:शेतकरी आहेत व निव्वळ एकत्र कुटूंब पध्दतीमुळे वडिलोपार्जीत जमिनीचा त्यांच्या नांवे स्वतंत्र 7/12 होऊ शकत नाही. परंतु तक्रारदार या सोसायटीत शेतकरी या नात्याने सभासद होत्या व आहेत.सामनेवाला यांनी अत्यंत चुकीच्या तांत्रिक कारण देऊन तक्रारदाराचा विमा दावा नाकारल्याने सदरची तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे.सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर होऊन सामनेवाला विमा कंपनीकडून अपघात विमा दाव्याची रक्कम रु.50,000/-दि.02/05/11पासून द.सा.द.शे.18%व्याजासहित मिळावेत.तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
3) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्र यादीमधील अनु.क्र.1 वर दि.27/11/11 चे सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र, अ.क्र.2 ला के.डी.सी.सी. बँकेचे पासबुक, अ.क्र.3 वर रहिवाशी दाखला, अ.क्र.4 वर पंचनामा, अ.क्र.5 वर अपंगत्वाचा दाखला, अ.क्र.6 वर डॉ.पांडूरंग कुंभार यांचे सर्टीफिकेट, अ.क्र.7 वर डॉ.पी.जी.पाटील, नेत्र रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड, अ.क्र.8 वर 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि.11/02/2014 रोजीचे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दि.28/03/12 रोजी तक्रारदार यांनी कागदपत्र यादी अ.क्र.1वर ज्योतिर्लींग वि.का.स.सेवा संस्थेचा तक्रारदार शेतकरी सभासद असलेचा दाखला.अ.क्र.2वर ग्रामसेवक,ग्रामपंचायत म्हासुर्ली ता.राधानगरी यांचा दाखला दाखल केलेला आहे. तसेच दि.25/06/13 रोजी तक्रारदाराने कागदपत्र यादीसोबत अ.क्र.1 वर शेतकरी अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1, अ.क्र.2वर शेतकरी अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-2, अ.क्र.3 वर शेतकरी अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-3(तालुका कृषी अधिका-याचे पत्र), अ.क्र.4 वर ग्रामसेवक,ग्रामपंचायत म्हासुर्ली ता.राधानगरी यांचा दाखला अ.क्र.5वर ज्योतिर्लींग वि.का.स. सेवा संस्थेचा तक्रारदार शेतकरी सभासद असलेचा दाखला. दाखल केलेला आहे.
4) सामनेवाला यांनी दि.14/02/12 रोजी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये पुढे कथन करतात की,शासनाची शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांसाठी असून सदर विमा धारकाचे नांव शेतकरी म्हणून 7/12 पत्रकी नमुद असणे जरुर आहे. तक्रारदार या विमा पॉलीसीचे अटी व नियमाप्रमाणे शेतकरी नाहीत अगर त्यांचे नांव 7/12 पत्रकी नमुद नसलेने त्यांचा क्लेम हा शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा विमा क्लेम सामनेवाला यांनी नाकारलेला आहे व ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी नाही.सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
5) सामनेवाला यांनी दि.24/03/14 रोजी अॅग्रीमेंटची प्रत दाखल केलेली आहे.
6) तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्हणणे, तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा लेखी व तोंडी युक्तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | नाही |
2 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार नामंजूर |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1 - प्रस्तुत कामी यातील तक्रारदार यांचा शासनामार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेली आहे. तक्रारदार सदर पॉलिसीचे कालावधीमध्ये दि.02/02/2011 रोजी स्वत:चे शेतामध्ये कामाकरिता गेले असताना बांधावरुन पाय घसरुन पडताना त्यांचे डोळयात अत्यंत जोरात काठी घुसलेने त्यांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला असलेने त्यांनी सर्व कागदपत्रांसहित सामनेवाला यांचेकडे विमा क्लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.27/11/2011 रोजीचे पत्राने ‘’ अपघातग्रस्ताचे नांव जमिनीचे 7/12 पत्रकी नमुद नाही.’’असे कारण देऊन क्लेम नाकारला. सबब प्रस्तुत कामी तक्रारदारांचे नांव 7/12 पत्रकी नमुद नसलेने तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे का ?हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.तसेच तक्रारदाराचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता का?हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.त्याअनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेले अ.क्र.8 कडील 7/12 उतारा पाहिला असता सदर 7/12 पत्रकी तक्रारदारांचे नावाची नोंद दिसून येत नाही. तथापि, तक्रारदार यांनी तक्रारदारांचे पती हयात असलेने त्यांचे नावाची नोंद एकत्र कुटूंब प्रमुख (ए.कु.प्र.) म्हणून 7/12 पत्रकी आहे. त्यामुळे त्यांचे नावचा स्वतंत्र 7/12 होऊ शकत नाही. परंतु तक्रारदार या सोसायटीत शेतकरी या नात्याने सभासद होत्या व आहेत असे कथन केले आहे.त्याअनुषंगाने दि.25/07/13रोजी ग्रामसेवक म्हासुर्ले यांचा दि.27/03/12रोजीचा दाखला तसेच श्री ज्योतीर्लिंग विकास सेवा सोसायटी यांचा तक्रारदार या शेतकरी असून त्या आमच्या संस्थेच्या सभासद आहेत असा दाखला दाखल केला आहे. सदरचे कागदपत्रावरुन तक्रारदार शेतकरी असलेचे दिसून येते. परंतु त्यांचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला आहे असा कोणताही कागदोपत्री पुरावा याकामी तक्रारदारांनी दाखल केलेला नाही.
प्रसतुत कामी सामनेवाला यांनी लेखी युक्तीवादासोबत दि.24/03/14 रोजी महाराष्ट्र शासन व सामनेवाला विमा कंपनी यांचेमध्ये झालेला दि.12/08/2010 रोजीचे करारपत्र दाखल केले आहे. सदर करारपत्रामधील अट क्र.2 Eligibility :- The farmers name should be in the Land Record Register i.e. 7/12 on the date of the issuance of policy अशी अट नमुद आहे. त्याचप्रमाणे Condition(V)- documents common to all claims – (ii) 7/12 Extract असे नमुद आहे. सदर करारपत्रातील अटींचे बारकाईने अवलोकन केले असता सदर करारपत्रामध्ये ज्या व्यक्तीचे नांव 7/12पत्रकी नोंद आहे त्यास करारपत्रातील Defination मधील कलम (c) Farmer: Person registered as farmers in Maharashtra as evidenced by 7/12 extract. अशी अट नमुद आहे. त्यामुळे तक्रारदार या जरी शेतकरी असतील.परंतु त्यांचे नांव 7/12 पत्रकी नसलेने त्या करारपत्रातीलDefination मधील कलम (c) प्रमाणे शेतकरी होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे तक्रारदारांचा विमा हा सामनेवाला यांचेकडे उतरविला होता याबाबत त्यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासनाने शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात,रस्त्यावरील अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.त्यामुळे घरातील कर्ता व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबातील उत्पनाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतक-यास व त्याचे कुटूंबास आर्थिक लाभ देणेकरिता कोणतीही स्वतंत्र योजना नसलेने शासनाने शासन निर्णयान्वये शेतकरी अपघात योजना कार्यान्वयीत केली आहे. सदर योजनेचा मूळ हेतू हा शेतक-यांचे घरातील कुटूंबप्रमुख/ कर्ता व्यक्तीकरताच सदरची विमा पॉलिसी असलेचे स्पष्ट दिसून येते.सदर विमा पॉलिसीचे करारपत्राप्रमाणे सदर प्रत्येक शेतक-यांचा विमा हप्ता म्हणून रक्कम रु.14/-विमा कंपनीकडे दिला जातो. यासर्व बाबींचा विचार करता सदरची विमा योजना ही शेतक-यांचे कुटूंबातील सर्व व्यक्तीकरिता नसून ज्या व्यक्तीचे नांव 7/12पत्रकी नमुद आहे. त्यांचेकरिता आहे हे स्पष्ट होते.तक्रारदार यांचे विमा पॉलिसीतील करारपत्राप्रमाणे त्यांचे नावाची नोंद 7/12पत्रकी नसलेने सामनेवाला यांनी त्यांचा विमा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 - सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेशच् पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.