नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि.18-05-2016)
1) वि. प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार हिचे पती मयत होणेपुर्वी शेती हाच व्यवसाय करीत होते. तक्रारदार हिचे पतीचे नावे शेती जमीन असून खाते नं. 185 असा आहे. तक्रारदार हिचे पतीचा शेतकरी अपघात व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. यांचेकडे विमा उतरविला होता. पॉलिसीचा हप्ता शासनामार्फत वि. प. कडे जमा केलेला आहे.
3) तक्रारदार हिचे पती कै. बळवंत भाऊ सावर्डे दि. 1-07-2011 रोजी त्यांचे गट नं. 480 मधील ऊस पिकावर तणनाशक औषध फवारणी करीत असताना विषारी औषधाचा अंश तक्रारदार हिचे पतीचे नाकातोंडात गेलेने त्यांना अस्वस्थ वाटून ते बेशुध्द झाले. औषधोपचाराकरिता त्यांना आधार हॉस्पीटल कोल्हापूर येथे दाखल केले.
4) सदरचा औषधोपचार चालू असताना तक्रारदार हिचे पती दि. 2-07-2011 रोजी मयत झाले. सदर घटनेची वर्दी हॉस्पीटलमार्फत पोलिस स्टेशन यांना दिली. तसेच प्रेताचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झाले. सदर घटनेचा संपूर्ण तपास करवीर पोलिस स्टेशन यांचेमार्फत झालेला आहे. तक्रारदाराचे पती हे विषबाधेने मयत झालेबाबतचा दाखला सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दिला.
5) तक्रारदार हीस विमा योजनेची माहिती समजलेनंतर तालुका कृषि अधिकारी, करवीर यांचे माध्यमातून प्रस्ताव वि.प. कंपनी व कबाल जनरल इन्शुरन्स, पुणे तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांना दि. 13-02-2012 रोजी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह पाठविला. सदरचा प्रस्ताव वि.प. कंपनीस मिळूनही तक्रारदारास अद्याप काहीही कळविलेले नाही.
6) सबब, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 15 % व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
7) तक्रारदारांनी तक्रारीसोबत वि.प. कंपनीला प्रस्तावासोबत दिलेले पत्र, विमा क्लेम फॉर्म- 1, सोबत सहपत्र, गट नं. 193 चा सात-बारा उतारा, जमीन खाते नं. 195 चा 8 अ उतारा, जुनी डायरी नं. 272 चा उतारा, 6-क उतारा, विमा क्लेम फॉर्म भाग-2, तक्रारदार हिचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदार हिचे मयत पतीचे ओळखपत्र, तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू दाखला, आधार हॉस्पीटल मार्फत दिलेली वर्दी, घटना स्थळाचा पंचनामा, सी.पी.आर. यांनी दिलेला मृत्यू दाखला, पी.एम. रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, वि.प. कंपनीस प्रस्ताव पाठवलेबाबत पोहच पावती, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना प्रस्ताव पाठविलेबाबतची पोष्टाची पावती, जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक, कोल्हापूर यांना प्रस्ताव पाठविलेबाबत पोष्टाची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे. तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. तसेच दि. 3-12-2015 रोजी शपथपत्र दाखल केले आहे.
8) वि.प. यांनी तक्रारीस म्हणणे दाखल करुन तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स व वि.प. विमा कंपनी यांचे दरम्यान झाले कराराप्रमाणे शासनाचे अध्यादेशाप्रमाणे मयत व्यक्तीचे वारसांनी अगर जखमी विमाधारकाने क्लेम फार्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी करुन कबाल सर्व्हेअर यांचेमार्फत विमा कंपनीकडे पाठविले जातात.
9) शासनाने शेतक-यांचे क्लेम मिळणेस विलंब होऊ नये म्हणून विशिष्ट पध्दतीप्रमाणे दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रारदारांनी सदर विशिष्ट पध्दत डावलून वि.प. विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. विशिष्ट पध्दतीने क्लेम फॉर्म व कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक आहे. वि.प. यांनी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवली नाही. तक्रार अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा.
10) तक्रारदाराची तक्रार, दोन्ही बाजूंचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच उभय बाजूंचा युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे
सेवेत त्रुटी आहे काय ? होय.
2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1:
11) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांचे विधिज्ञ श्री. आर. जी. शेळके व वि.प. चे विधिज्ञ श्री. पी. आर. कोळेकर यांनी युक्तीवाद केला. वि.प. यांनी नमूद केले की, विमा कंपनी व महाराष्ट्र सरकार यांचेमधील कराराप्रमाणे विमा क्लेम तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत पाठविणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी प्रस्ताव वि.प. कडे केला आहे.
12) तक्रारदार यांनी आपल्या मुळ अर्जासोबत दाखल केलेले एकूण अठरा कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन करता असे स्पष्ट दिसून येते की, तक्रारदार हे शेतकरी असून, विमा कराराच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांचे पती बळवंत भाऊ सावर्डे हे दि. 2-07-2011 रोजी आधार हॉस्पीटल, कोल्हापूर येथे मयत झाले.
13) तक्रारदार यांनी सी.पी.आर. हॉस्पीटलचे कॉज ऑफ डेथ सर्टीफिकेट, शवविच्छेदन रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन करता, तक्रारदार यांचे पती बळवंत भाऊ सावर्डे हे अपघाताने मयत झाले असल्याचे स्पष्ट होते.
14) तक्रारदार यांनी मुळ अर्जासोबत अ.क्र. 2 वर दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते की, त्यांनी तालुका कृषी अधिकारी, ता. करवीर मार्फत विमा क्लेम दि. 13-03-2012 रोजी पाठविला आहे. विमा कंपनीकडे पण तक्रारदारांचा क्लेम दाखल केल्याचे मान्य केले आहे. वि.प. यांनी तक्रारदारांच्या प्रस्तावावर योग्य मुदतीत निर्णय घेणे न्यायाचे होते.
15) तक्रारदार हया विधवा व अशिक्षित असून केवळ विमा प्रस्ताव पाठविण्यामध्ये कांही त्रुटी असतील या कारणावरुन क्लेम नाकारता येणार नाही. महाराष्ट्र शासनाने विमाधारकांना योग्य मुदतीत विमा रक्कम मिळावी या उद्देशाने प्रस्तावासंबंधी मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत, सबब, तक्रारदार यांचा न्यायोचित क्लेम मंजूर करणे आवश्यक आहे.
16) तक्रारदार यांनी वि.प. कडे दि. 13-03-2012 रोजी क्लेमची मागणी केली. सदर अर्जासंबंधी दोन महिन्यात निर्णय घेणे अपेक्षित असताना वि.प. यांनी तक्रारदार यांचा क्लेमबाबत निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट होते.
17) वि.प. यांनी तक्रारदार यांचा क्लेम कराराच्या अटीप्रमाणे योग्य मुदतीत मंजूर करणे आवश्यक असताना तो न केल्याने वि.प. ने सेवेत त्रुटी केलेचे दिसून येते. तक्रारदार हे कराराप्रमाणे विम्याची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 9 % व्याजासह मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर व्याज हे प्रस्तुत तक्रार दाखल दि. 24-02-2015 रोजीपासून मिळणे आवश्यक आहे.
18 ) मंच न्यायाचे दृष्टीने पुढील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) तक्रार दाखल दि. 24-02-2015 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याजासह संपूर्ण रक्कम देईपर्यंत द्यावेत.
2) खर्चासबंधी आदेश नाही.
3) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
4) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.