नि का ल प त्र
(द्वारा- (मा. सदस्य, श्री. दिनेश एस. गवळी) (दि .26-11-2013)
(1) प्रस्तुतची तक्रार सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसानभरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केल आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
सामनेवाले ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या शेतकरी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी ही तक्रारदारांचे पतीचे नावे उतरविली होती. सदर पॉलिसीच्या कालावधीतच तक्रारदाराचे पती श्री. संदीप श्रीपती डोईफोडे यांचेवर अचानक झालेल्या शसस्त्र खुनी हल्ल्यामध्ये ते जाग्यावरच गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले, त्यांना सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन वि.प. कडे न्याय योग्य क्लेमची मागणी केली असता वि.प. यांनी दि. 07-01-2012 रोजी लेखी पत्राव्दारे कागदपत्रांची मागणी केली त्यानंतर वि.प. यांनी दि. 07-01-2012 रोजी मागणी केलेले कागदपत्रे तक्रारदार यांनी दि. 17-12-2011 रोजीच रीतसरपणे तालुका कृषी अधिकारी, हातकणंगले यांचेकडे जमा केलेले आहेत असे कळविले. व सदरची कागदपत्रे सदर ऑफीसमार्फत दि. 25-01-2012 रोजी वि.प. यांना दिलेली आहेत. अशाप्रकारे आवश्यक कागदपत्रांची पूतता वि.प. यांचेकडे पाठवूनही वि.प. यांनी ता. 30-01-2012 रोजी “ अपूर्ण कागदपत्रे न मिळाल्याने नाईलाजास्तव दावा बंद करणेत येत आहे ” असे उत्तर देऊन तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे;
(3) तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठीप्रित्यर्थ एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये अ.क्र. 1 कडे वि.प. यांचे दि. 30-01-2012 रोजीचे क्लेम नाकारल्याचे पत्र, अ.क्र. 2 कडे वि.प. यांना तक्रारदारांनी दि. 25-01-2012 रोजीचे पाठविलेले पत्र, अ.क्र. 3 कडे वि.प. चे कागदपत्र मागणी पत्रासोबतचा लिफाफा, अ.क्र. 4 कडे वि.प. यांचे दि. 07-01-2012 रोजीचे कागदपत्र मागणीचे पत्र, अ.क्र. 5 कडे दि. 17-12-2011 रोजीचे मंडल कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, अ.क्र. 6 कडे 7-01-2012 रोजीचे मंडळ कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, अ.क्र. 7 कडे दि. 6-07-2011 चा घटनास्थळाचा पंचनामा, अ.क्र. 8 कडे दि. 5-07-2011 रोजीचा इन्क्वेस्ट पंचनामा, अ.क्र. 9 कडे पोस्टमार्टेम रिपोर्ट ता. 5-07-2011.
(4) तक्रारदारांनी वि. प. यांचेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असता देखील वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांचा कोणतेही सबळ कारण न दाखविता क्लेम नाकारला व सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल करुन रक्कम रु. 1,00,000/-, दि. 5-10-2011 पासून ते संपूर्ण रक्कम वसुली होऊन मिळोपावेतो द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याजासह देववावी तसेच मानसिक त्रासापोठी रक्कम रु. 50,000/- नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 3,000/- सामनेवाले यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे.
(5) वि. प. विमा कंपनीने दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार, तक्रारदारांची तक्रार ही साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून ती कायदेशिररित्या चालण्यास पात्र नाही. तक्रारदाराचे पतीचे मृत्यूबाबत कोणताही क्लेम अगर कागदपत्र वि.प. कंपनीकडे मुदतीत दाखल झालेली नाहीत. वि.प. कंपनीने तक्रारदारांना वेळोवेळी व शेवटी दि. 7-01-2012 रोजी लेखी पत्रानुसार मागणी करुन कागदपत्रांची मागणी केली. तथापि, तक्रारदारांन वि.प. कडे दि. 10-04-2012 रोजीपर्यंत आवश्यक कागदपत्र दाखल केली नसल्याने तक्रारदाराचा दावा बंद करण्यात आला. सबब, वि.प. ची सदरची कृती ही पूर्णपणे योग्य व कायदेशीर आहे. त्यामुळे वि.प. नी सेवेत त्रुटी ठेवणेचा प्रश्न उद्दभवत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी असे म्हणणे दाखल केलेले आहे.
(6) तक्रार अर्ज, वि.प. कंपनीने दाखल केलेले तक्रार अर्जास म्हणणे, तक्रारदारांनी दाखल केलेले कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच तोंडी युक्तीवाद ऐकला असता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र.1:
तक्रारदारांचे पती संदीप श्रीपती डोईफोडे यांचा शेतकरी अपघात विमा योनेअंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविला आहे. सामनेवाला विमा कंपनीने दि. 30-01-2012 रोजी तक्रारदारांचा विमा क्लेम तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे फाईल बंद करण्यात येत आहे हे कारण देऊन क्लेम नाकारला आहे. सदर मुद्यांचा विचार करता, या मंचाने सदर कामी तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता, तक्रारदारांनी यादीसोबत दाखल कागदपत्रांमध्ये अ.क्र. 2 कडील कागदपत्र पाहिला असता सदरचे पत्र मा. व्यवस्थापक, फयुचर जनरली इन्शुरन्स् कंपनी लि., म्हणजे वि. प. विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजना प्रस्तावातील त्रुटी पूर्तता केल्याबाबत सोबत मुळ कागदपत्र पाठविलेबाबत असून ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दि. 25-01-202012 रोजीचे आहे. सबब, सदरचे पत्र पाहिले असता सदरचे पत्रावरती जा. क्र. तंत्र/सांख्यिंकी/राजेअवियो/561/2012 असा जावक क्रमांक नमूद असून दि. 25-01-2012 अशी नमूद आहे. त्यामुळे वि.प. यांचेकडे आवश्यक ते कागदपत्र पाठविलेचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही हे वि.प. यांचे म्हणणे हे मंच मान्य करीत नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम सबळ कारणांशिवाय नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 व 3:-
मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता तसेच शेतकरी जनता अपघात विमा हा महाराष्ट्र शासनाने शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक कारणामुळे होणारे अपघात उदा. रस्ता अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू होतात. घरातील कत्या व्यक्तीस आलेल्या अशा प्रकारच्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणींची परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतक-यांसाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्वीत केलेली आहे व त्या अनुषंगाने विमा कंपनीकडे शासनाने विमा हप्ता रक्कम भरलेली असते. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराचे पती शेतकरी असल्याने व त्यांचा अपघाताने मृत्यू झालेने तक्रारदार पॉलिसीप्रमाणे विमा रक्कम रु. 1,00,000/- तसेच त्यावर क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दि. 30-01-2012 रोजीपासून द.सा.द. शे. 6 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम मिळोपावेतो व्याज मिळणेस पात्र आहेत.
तसेच सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे ते मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 1,000/- व तक्रार अर्जाचा रक्कम रु. 500/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. सामनेवाले वि. पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 30/01/2012 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द. शे. 6 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3. सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.