निकालपत्र (दि.31.03.2016) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे वि.प. यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. तर्फे वकीलांचा तोंडी /लेखी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3 तक्रारदाराची तक्रार थोडक्यात तक्रार-
तक्रारदार हे करंजफेण, ता.राधानगरी गावचे कायमचे रहिवाशी असून मजकूर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदारांचे पती यांचे नांवे शेतजमीन असून त्यांचे शेतजमीनीचे खाते नं.246 असा आहे. तक्रारदारांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. वि.प.विमा कंपनी असून वेगवेगळया प्रकारचा विमा व्यवसाय करते. तक्रारदारांचे पतीचा वि.प.विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना, या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता व आहे. सदर पॉलीसीचा विमा हप्ता शासनामार्फत अदा केलेला होता व आहे. तक्रारदारांचे पती दि.12.11.2010 रोजी कै.राऊ भाऊ कांबळे हे त्यांचे नाळवा या नावाने ओळखणा-या शेतात तणनाशक फवारणी करीता गेले असता, तक्रारदारांचे पतीचा अपघाताने व अनावधानाने सदर औषधाचा अंश तक्रारदारांचे तोंडात गेलेने, त्यांना अस्वस्थ वाटू लागलेने, त्यांना औषधापोचाराकरीता, सरस्वती हॉस्पीटल, कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता, त्यांचेवरती औषधोपचार करीत असताना दि.14.11.2010 रोजी ते मयत झाले. सदर घटनेची नोंद सरस्वती हॉस्पीटल यांचेमार्फत लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे यांचेकडे झालेली असून सदरची वर्दी झेरो नंबरने राधानगरी पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग झालेली होती. सदर घटनेचा तपास पोलीसांनी केला. तक्रारदारांचे पती अपघाताने व अनावधानाने झालेल्या विषबाधेमुळे मयत झालेने तक्रारदारांनी योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन, तालुका कृषी अधिकारी, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर यांचे माध्यमातून वि.प.कंपनीकडे दि.30.07.2011 रोजी विमा क्लेम रक्कमेची मागणी विमा कंपनीकडे केलेली होती व आहे. दि.29.07.2011 रोजी वि.प.कंपनीला विमा प्रस्तावाबाबत सदरची प्रत मिळालेली असूनही सदर वि.प.यांनी तक्रारदारांचे विमा प्रस्तावाबाबत तक्रारदारांना काहीही कळविलेले नाही. तक्रारदार हे वि.प.विमा कंपनीचे ग्राहक असून वि.प. यांनी तक्रारदार यांना विना विलंब, सुलभ व तात्काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी कंपनीवर असतानासुध्दा त्यामध्ये प्रचंड त्रुटी व हयगय निर्माण केलेली आहे, म्हणून सदरची तक्रार सदरहू कोर्टासमोर दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार ही अशिक्षीत विधवा व अबला नारी असून ती निराधार आहे. तिचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तक्रारदारांना विमा रक्कम मिळणेकरीता सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर होऊन वि.प. विमा कंपनीकडून रक्कम रु.1,00,000/- सदर रक्कमेवर कलेम दाखल तारखेपासून द.सा.द.शे.18% व्याजासहित मिळावेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 16 कागदपत्रें दाखल केलेली आहेत. अनुक्रमे-वि.प.कंपनीला प्रस्तावासोबत दिलेले पत्र, विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग-1, गट नं.265 चा 7/12 उतारा, खाते नं.246 चा 8-अ उतारा, गाव नमुना सहा-ड उतारा, गाव नमुना सहा-क उतारा, विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग-2, सरस्वती हॉस्पीटल यांनी दिलेली वर्दी, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे यांनी राधानगरी पोलीस ठाणे यांना दिलेले पत्र, घटनास्थळ पंचनामा, सिताराम रावबा कांबळे यांचा जबाब, राऊ भाऊ कांबळे यांचा जबाब, तक्रारदार हिचे प्रतिज्ञापत्र, वि.प.कंपनीस प्रस्ताव पोहच झालेची पोहच, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना प्रस्ताव पोहच झालेली पावती, कबाल जनरल इन्शुरन्स कंपनीला प्रस्ताव पोहच झालेली पावती, दि.15.02.2016 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5 वि.प. यांनी दि.07.04.2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. हे त्यांचे म्हणण्यात पुढे नमुद करतात की, तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनीकडे कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारदार कथन करतात तसा कोणताही क्लेम वि.प.कंपनीकडे तालुका कृषी अधिकारी, ता.राधानगरी यांचेमार्फत अगर वि.प.कंपनीस पोस्टाने प्राप्त झालेला नव्हता व नाही. तक्रारदाराचा कोणताही प्रस्ताव वि.प.कंपनीस प्राप्त झालेलाच नसलेने त्याबाबत वि.प.कंपनीने तक्रारदारास कळविणेचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदारांच्या तक्रारीतील मजकुर खोटा, लबाबडीचा व चुकीचा असून तो वि.प.या कोणत्याही प्रकारे मान्य व कबुल नाही. तक्रारदारांचा क्लेम कायदेशीरपणे देय होत नाही. तक्रारदारांने त्यांचे पतीचे मृत्युचा क्लेम हा वि.प.कंपनीकडे दाखल केला नसलेने त्याबाबत वि.प.कंपनीस कोणतीही कारवाईच करता आली नाही. तक्रारदार कथन करतात तसे कोणतेही कारण सदर अर्जास घडलेले नाही. जे कारण घडले असे तक्रारदार कथन करतात ते साफ खोटे, लबाडीचे व चुकीचे आहे. तक्रारदार मागतात तशी कोणतीही दाद मागणेचा अधिकार नाही अगर तशी कोणतीही दाद कायदेशीररित्या तक्रारदारांना देताच येणार नाही. तक्रारदारांनी व्याजाची व मानसिक त्रासापोटी व खर्चाबाबत मागणी खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे. वि.प.विमा कंपनीने सदरहू मंचास विनंती केली आहे की, तक्रारदाराचां तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर व्हावा, तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च तक्रारदारांकडून वि.प.यांना देवविणेत यावा अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
6 तक्रारदारांचा तक्रार अर्ज, वि.प. यांची कैफियत/म्हणणे व उभय पक्षकारांनी दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकीलांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- प्रस्तुत कामी तक्रारदारांचे पती-राऊ भाऊ कांबळे यांचा वि.प.विमा कंपनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. दि.12.11.2010 रोजी ते तणनाशक फवारणी करत असताना अनावधानाने व अपघाताने सदर अंश तक्रारदार यांचे पतीचे नाका तोंडात गेलेने दि.14.11.2010 रोजी मयत झाले. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत दि.30.07.2011 रोजी विमा क्लेमची मागणी केली असता, सदरचे प्रस्तावाबाबत वि.प.विमा कंपनीने तक्रारदारांना आजतागायत काहीही न कळवून तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने, या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.8 वरील सरस्वती हॉस्पीटलने दिलेली वर्दी, दि.16.11.2010 रोजीचा पंचनामा, दि.13.11.2010 रोजीचे तक्रारदारांचा मुलगा सिताराम रायबा कांबळे यांचा जबाब, इत्यादी कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पतीचा मृत्यु हा ऊस पीकांमध्ये तणनाशक फवारणी करीत असताना विषबाधा झालेचे दिसुन येते. त्या कारणाने, तक्रारदारांचे पतीचा मृत्यु हा नैसर्गिक नसलेचे स्पष्टपणे दिसून येते.
वि.प.यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये वि.प.विमा कंपनी, कोणताही क्लेम तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत अगर वि.प.कंपनीस पोस्टाने प्राप्त झालेला नाही. त्याकारणाने, वि.प.कंपनीने तक्रारदारास कळविणेचा प्रश्नच उदभवत नाही असे कथन केले आहे. त्या अनुषंगाने, या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.14 ला तक्रारदाराने दि.29.07.2011 रोजीची वि.प.विमा कंपनीला प्रस्ताव पाठविलेची पोहच दाखल असून अ.क्र.15 व 16 ला अनुक्रमे दि.23.07.2011 व दि.25.07.2011 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी व कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना सदरचा प्रस्ताव मिळालेची रजिस्टर पोहच दाखल आहे. तसेच अ.क्र.1 ला सदरचा प्रस्ताव वि.प.यांचेकडे दि.30.07.2011 रोजी दाखल केलेला असून सदरचे प्रस्तावावर तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांची पोहच मिळाल्याची सही व शिक्का आहे. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीकडे सदरचा क्लेम व त्यासोबतचे कागदपत्रे कृषी अधिकारी, राधानगरी व कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांचेमार्फत पाठविलेले होते व सदरची कागदपत्रे कृषि अधिकारी व कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना प्राप्त झालेचे / मिळालेचे दिसून येते.
तथापि, वि.प.यांनी त्यांचे लेखी युक्तीवाद तक्रारदारांचा सदरचा प्रस्ताव कृषि पर्यवेक्षक यांनी स्विकारणेस नकार दिलेनंतर, जिल्हा कृषीअधिकारी यांचेकडे तक्रार करुन त्यांचेमार्फत व कबाल इन्शुरन्स, सर्व्हेअर यांचेमार्फत वि.प.कंपनीने दाखल करणे जरुर होते असे कथन केले आहे. वि.प., महाराष्ट्र शासन व कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांचेमध्ये त्रिपक्षीय करार (Tri-party Agreement) झालेला असून सदरचे करारातील अटी या मॅन्डेटरी (Mandatory) नसून डीरेक्टरी (Directory) स्वरुपाच्या आहेत. सदर करारामध्ये विमाधारकाने विमा प्रस्ताव मागणीबाबत त्यांचा प्रस्ताव वर नमुद त्रिपक्षीयांपैकी एका पक्षाकडे दाखल केल्यास तो नामंजूर करण्यात येईल अशा पध्दतीची कोणतीही अट सदर त्रिपक्षीय करारामध्ये नाही. विमा प्रस्ताव हे व त्यासोबतचे सर्व कागद हे वि.प.कंपनीस ब्रोकर व कंन्सल्टंट यांचेमार्फत फक्त तक्रारदारांना विनाविलंब आर्थिक सहाय प्राप्त व्हावे या उद्देशानेच व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा प्रस्तावाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी या उद्देशानेच केलेला आहे. प्रोसीसिंग करता ब्रोकर व कंन्सल्टंट यांची मदत घेतली जाते. एखाद्या विमा धारकाने मुदतीत इंटिमेशन दिली नाही, म्हणून त्यांना विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कमेच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमीअम स्विकारुन जोखीम स्विकारलेली आहे. केवळ कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस हे मध्यस्थ सल्लागार व शासनास विनामोबदला सहाय्य करतात.
वरील सर्व कागदपत्रांवरुन, तक्रारदाराने सदरचा विमा प्रस्ताव वि.प.यांचेकडे दाखल केलेला होता. वि.प.विमा कंपनीने त्यांचेकडे प्रस्ताव दाखल झालेनंतर 7 दिवसांचे आत विमाधारक सदरचे कागदपत्रे अपूर्ण असले कारणाने अथवा त्रुटी बद्दलचे लेखी पत्र तक्रारदारांना देणे बंधनकारक असताना देखील तसे काहीही कळविलेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही.
सबब, तक्रारदारांचे पतीचा मृत्यु हा नैसर्गिक नाही. वि.प.विमा मुळ मार्गदर्शक सुचनामध्ये वादग्रस्त प्रकरणी विमा कंपनी शासनाबरोबर समन्वय साधून चर्चेद्वारे वेळोवेळी निराकरण करते व संबंधितांना विम्याचा लाभ मिळवून देते. तथापि सदर कामी तक्रारदाराने सदरचा प्रस्ताव वि.प.विमा कंपनीकडे पाठविलेला असून सदरचा प्रस्ताव वि.प.विमा कंपनीस दि.29.07.2011 रोजी प्राप्त झालेला असून देखील विमा पॉलीसीचा मूळ हेतु विचारात न घेता विमा कंपनीने तक्रारदारांना आजतागायत काहीही न कळवून तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता, विमा रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत तारखेपासून दि.05.09.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3:- प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना विमा रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत तारखेपासून दि.05.09.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज प्रमाणे व्याज अदा करावे.
3. वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.