निकालपत्र (दि.14.07.2015) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3 तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :-
तक्रारदार हे शेतकरी आहेत व मजकूर गावची रहिवाशी आहे. तसेच मजकूर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदारांचे पतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शासनामार्फत विमा उतरविला होता व आहे. सामनेवाले विमा कंपनी आहे. तक्रारदारांचे हिचे पती कै.श्रीपती रामू कोंडे हे दि.28.06.2013 रोजी त्यांचे स्वत:चे जिगा नावाचे शेतात रोप लावणीचे काम गुठ्ठयाच्या सहाय्याने करत असताना दुपारनंतर अचानकपणे व अनावधानाने तक्रारदार हिचे पतीचा डावा पाय गुठ्ठयात अडकून फ्रॅक्चर झालेने त्यांना औषधोपचाराकरीता कोल्हापूर येथील साई सिध्दी ऑर्थोपेडीक हॉस्पीटल येथे त्याच दिवशी दाखल केलेले होते. सदर हॉस्पीटलमध्ये तक्रारदार हिचे पतीवर बराच औषधोपचार करुनदेखील दि.03.07.2013 रोजी मयत झालेले आहेत. सदरबाबत साईसिध्दी हॉस्पीटल कोल्हापूर यांनी दाखला दिलेला आहे. यातील तक्रारदार हिचे मयत पती हे दि.28.06.2013 ते दि.03.07.2013 पर्यंत साईसिध्दी हॉस्पीटल, कोल्हापूर येथे अॅडमिट होते. यातील तक्रारदार हिचे पती शेतात काम करत असताना अपघाताने व अनावधाने गुठ्ठयात पाय अडकून झाले जखमांमुळे मयत झालेबाबतचा दाखला गाव कामगार पोलीस पाटील धामोड, ता.राधानगरी यांनी दिलेला असून सदर घटनेचा पंचनामाही गाव कामगार पोलीस पाटील, धामोड यांनी केलेला आहे. दि.08.10.2013 रोजी क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह सामनेवाले विमा कंपनीकडे दिला असता, सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदार हिचेकडे दि.21.01.2014 व दि.03.03.2014 रोजीचे पत्राने मरणोत्तर पंचनामा, पी.एम. व डेथ समरी या कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारदार हिचे पतीचे शवविच्छेदन तसेच मरणोत्तर पंचनामा पोलीसांचेमार्फत केलेला नाही. परंतु तक्रारदार हिने तिचे प्रस्तावासोबत पोलीस पाटलांचा पंचनामा व पोलीस पाटील दाखला तसेच औषधोपचाराची कागदपत्रे सामनेवाले कंपनीकडे दिलेली होती व आहेत. त्यामुळे तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव मंजूरीस पात्र आहे. पंरतु सामनेवाले विमा कंपनीने दि.14.03.1014 रोजीचे पत्राने आवश्यक कागदपत्रे न मिळालेमुळे तक्रारदार हिचा प्रस्ताव दावा बंद करणेत येत आहे या कारणास्तव नाकारला आहे. तक्रारदार ही मौजे धामोड, ता.राधानगरी, या दुर्गम भागात राहणारी अशिक्षित निराधार विधवा असून तिला कायदयाचे योग्य ते ज्ञान नाही. तक्रारदार हिचा उधरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. तक्रारदार हिस प्रस्तुत क्लेमची रक्कम तात्काळ व विना विलंब मिळणे न्यायाचे व जरुरीचे आहे. सबब, सामनेवाले विमा कंपनीकडून तक्रारदार हिचे पतीचा अपघाताने व अनावधानाने झाले मृत्युबाबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-, द.सा.द.शे.15टक्के व्याज दराने वसुल होऊन मिळावी तसेच तक्रारदार हिस झाले शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- सामनेवाले विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती सदरहू मंचास केलेली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीसोबत अनुक्रमे एकूण 23 कागदपत्रे दाखल केलेली आहेत, ती पुढीलप्रमाणे- तालुका कृषि पर्यवेक्षक कंपनी दिले पत्र व दिली कागदयादी, विमा क्लेम फॉर्म भाग-1 सहपत्रांसह, गट नं.153 चा 7/12 उतारा, जमीन खाते नं.3 चा 8अ उतारा, जुनी डायरी, 6 क उतारा, विमा क्लेम फॉर्म भाग-2, तक्रारदार हिचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदार हिचे पतीचे ओळखपत्र व मृत्यु दाखला, गांव कामगार पोलीस पाटील यांनी केलेला पंचनामा व दाखला, साई सिध्दी हॉस्पीटल यांनी दिलेला मृत्यु दाखला व कार्ड व केस पेपर, भुलतज्ञ यांचे पत्र, मयताचे रक्ताचा व युरीन रिपोर्ट, तक्रारदार हिचे पतीचा इलेक्ट्रो–कार्डीओग्राम रिपोर्ट, सामनेवाले विमा कंपनीची तीन पत्रे तसेच दि.22.04.2015 रोजीचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5 सामनेवाले यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदारांची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही, सबब तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी. सामनेवाले हे तक्रारीतील कलम-2 मधील विधानांचा स्पष्टपणे इन्कार करतात. सदर कलमातील दि.03.07.2013 रोजी तक्रारदारांचे पती मयत झाले एवढाच मजकुर खरा व बरोबर आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दाखल केलेली कागदपत्रांमध्ये मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट व डेथ समरी जोडलेले नव्हते. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे दि.21.01.2014 व दि.03.03.2014 चे पत्राने मयताचे मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व डेथ समरी या कागदपत्रांची मागणी केली. तथापि तक्रारदारांनी अदयापपर्यंत सामनेवाले यांचेकडे सदरील कागदपत्र दाखल केलेली नाहीत अगर त्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी दाखल केले कागदपत्रांवरुन मयत श्री.श्रीपती कोंडे यांचा मृत्यु हा अपघाती नसुन नैसर्गिक असलेचे दिसुन येते व शेतकरी वैयक्तिक अपघात योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यु हा समाविष्ठ होत नाही. सबब, मयत श्री.श्रीपती कोंडे यांचा मृत्यु हा अपघाती नसून नैसर्गिक असलेने तो शेतकरी वैयक्तिक अपघात पॉलीसीचे अटी व नियमाप्रमाणे देय होत नाही. सबब, सामनेवाले कंपनीकडे तक्रारदारांनी मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन रिपोर्ट व डेथ समरी हे कागदपत्र दाखल करणे जरुर होते व सदरी कागदपत्र हे सदर क्लेम मंजूर करणेसाठी आवश्यक होते. तक्रारदारांनी मागणी करुनही सदर रिपोर्ट दाखल न केलेने सामनेवाले यांना तक्रारदारांचा क्लेम नाकारणे भाग पडले. तसेच तक्रारदार कथन करतात तसे सदर तक्रारीस केव्हांही कोणतेही कारण घडलेले नाही जे कारण घडले असे तक्रारदार कथन करतात ते साफ खोटे, लबाडीचे व चुकीचे आहे. तथापि तक्रारदार मागतात तशी कोणतीही दाद मागणेचा त्यांना कायदेशीर अधिकार नाही अगर तशी कोणतीही दाद तक्रारदारांना कायदेशीररित्या देताच येणार नाही. तक्रारदारांची व्याजाची व मानसिक त्रासापोटी व खर्चाबाबत मागणी खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे, म्हणून तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी सदरहू मंचास विनंती केली आहे.
6 तक्रारदारांचे पतीचा सामनेवाले यांचेकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. विमा रक्कम व पॉलीसीबाबत वाद नाही. सदर पॉलीसीचा हप्ता शासनामार्फत सामनेवाले कंपनीकडे अदा केलेला होता. दि.28.06.2013 रोजी तक्रारदारांचे पती जिगा नावाचे शेतात रोप लावणीचे काम गुठ्ठयाच्या सहाय्याने करत असताना तक्रारदारांचे पतीचा डावा पाय गुठ्ठयात अडकून फ्रॅक्चर झाले. दि.03.07.2013 रोजी तक्रारदारांचे पतीवर औषधोपचार केले असता, उपचार चालू असताना मृत्यु झाला. तदनंतर, तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म भरुन योग्य त्या कागदपत्रांसह विमा क्लेमची मागणी केली असता, दि.14.03.2014 रोजी आवश्यक कागदपत्रे न मिळालेमुळे तक्रारदार हिचा दावा बंद करणेत आला. त्यामुळे सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केल्याने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. प्रस्तुत कामी, सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदारांनी दाखल कागदपत्रावरुन मयत श्रीपती कोंडे यांचा मृत्यु अपघाती नसून नैसर्गिक असलेचे दिसून येते. त्याकारणाने शेतकरी वैयक्तिक अपघात पॉलीसीचे अटी व नियमाप्रमाणे सदरचा क्लेम देय नाही. त्याअनुषंगाने, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले. अ.क्र.13 ला गावकामगार पोलीस पाटील मौजे धामोड, ता.राधानगरी यांनी केलेला पंचनामा असून सदर पंचनाम्यामध्ये दुपारी 3.30 वाजता ओटयात चिखल काढताना गुठ्ठयात पाय अडकून दुखापत होऊन व्हिवळत बेशुध्द पडले. पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी ताबडतोब नेले असे नमुद असून त्यावर पंचाच्या व गांव कामगार पोलीस पाटील, मौ.धामोड, ता.राधानगरी यांची सही आहे. अ.क्र.13 ला कोल्हापूर येथील साई सिध्दी हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले. उपचार करुनसुध्दा ते दि.03.07.2013 रोजी दवाखान्यात मयत झाले असा गांवकामगार पोलीस पाटील यांचा दाखला आहे. अ.क्र.14 ला साई सिध्दी हॉस्पीटलचे दि.03.08.2013 रोजीचे प्रमाणपत्र असून त्यामध्ये तक्रारदारांचे पतीचे नाव नमुद आहे. He expired on 03.07.2013 at 9.40 p.m., Cause of Death- Acute Mycardial Infarctors due to fat embolism due to fracture shaft fumer (Lt) असे नमुद असून त्यावर डॉ.अतुल पाटील, M.B.D.Ortho (Mumbai), Kolhapur यांची सही आहे. त्या अनुषंगाने अ.क्र.15 व 16 ला साई सिध्दी हॉस्पीटल यांचेकडील कार्ड व केसपेपर दाखल आहेत. सदर कागदपत्रावर तक्रारदारांचे पतीचे नाव नमुद आहे. D.O.A.-28.06.2013, D.O.S.-03.07.2013, D.O.D.-03.07.2013. P.Adviced –Pt. dead on 03.07.2013, Cause of Death- Acute Mycardial Infarctors due to fat embolism due to fracture shaft fumer (Lt) असे नमुद असून त्यावर डॉ.अतुल पाटील, M.B.D.Ortho (Mumbai), Kolhapur यांची सही आहे. सदरचे केसपेपर्स व दाखला सामनेवाले यांनी नाकारलेले नाहीत. त्याकारणाने वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पतीचा अनावधानाने गुठ्ठयात पाय अडकून झालेल्या जखमामुळे साई सिध्दी हॉस्पीटल, यांचे उपचार केलेनंतर, दि.03.07.2013 रोजी अपघाती मृत्यु झाला आहे हे शाबीत होते.
7 सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणे, तक्रारदारांनी मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन रिपोर्ट व डेथ समरी हे कागदपत्र दाखल करणे जरुर होते व सदरी कागदपत्र हे सदर क्लेम मंजूर करणेसाठी आवश्यक होते. तक्रारदारांनी मागणी करुनही सदर रिपोर्ट दाखल न केलेने सामनेवाले यांना तक्रारदारांचा क्लेम नाकारणे भाग पडले. सदर मुद्दयाच्या अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी अ.क्र.21 व अ.क्र.22 ला दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सामनेवाले यांनी दि.21.01.2014 रोजी व दि.03.03.2014 रोजी तक्रारदारांना मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट व डेथ समरी या कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येते. तथापि तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये तक्रारदारांनी त्यांचे पतीचे शवविच्छेदन, मरणोत्तर पंचनामा, पोलीसामार्फत केलेला नाही असे कथन केलेले आहे. परंतु, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पती शेतकरी होते व शेतामध्ये काम करत असताना अपघाताने व अनावधानाने गुठ्ठयात पाय अडकून झाले जखमांमुळे साईसिध्दी हॉस्पीटलमध्ये दि.03.07.2013 रोजी मयत झालेचे शाबीत होते. त्याकारणाने तक्रारदारांचे पतीचा मृत्यु हा नैसर्गिक नसून अपघाती मृत्यु झालेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते आहे. तक्रारदार या अशिक्षित, निराधार व विधवा असून त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह त्यांचे पतीवरच अवलंबून आहे. शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली कल्याणकारी योजना असून शेती व्यवसाय करताना अपघाती मृत्यु आल्यास अपघातामुळे उत्पन्नाचे साधन बंद होऊन शेतक-याच्या कुटूंबास अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने सदरची योजना कार्यन्वित केली आहे. या बाबींचा विचार करता, शेतक-यांचे वारसांना मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम कागदपत्रांची पुर्तता न केल्याने नाकारुन त्यांचा कायदेशीर हक्क डावलने न्यायोचित होणार नाही असे या मंचाचे मत आहे. त्याकारणाने, शेतकरी अपघात विमा योजनेचा मुळ हेतु विचारात घेता, तक्रारदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- मिळणेस पात्र आहेत. परंतु, सामनेवाले यांनी तक्रारदारांना स्मरणपत्रे पाठवून सदरची कागदपत्रे तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेली नाहीत. त्याकारणाने तक्रारदार हे सदर रक्कमेवरती व्याज मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2 सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.1,00,000/- (रक्कम रुपये एक लाख फक्त) ही आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत अदा करावी.
3 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.