न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे वि.प. कंपनीकडून दि. 29/5/2011 रोजी रक्कम रु. 36,000/- इतके कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा क्र. 021625300000080 असा होता. सदरचे कर्जाचे हप्ते तक्रारदाराने वेळेवर भरले असून दि. 25/5/2012 रोजी कर्जखाते बंद केले आहे. तदनंतर तक्रारदाराने वि.प. यांचेकडे कर्जखाते उता-याची मागणी केली असता तक्रारदारांना जो कर्ज खाते उतारा वि.प. यांनी दिला, त्यावर कर्जखाते नंबर तक्रारदाराचे कर्जाचा होता, परंतु नांव मात्र श्री आप्पासो आकाराम बीडकर असे होते. सदरची बाब तक्रारदाराने वि.प. यांचे निदर्शनास आणून देखील त्यांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच वि.प. यांनी तक्रारदारांना नो डयूज प्रमाणपत्र देखील दिलेले नाही. तदनंतर तक्रारदार यांनी दि. 30/8/2012 रोजी रक्कम रु.50,000/- कर्ज घेतले. सदरचे कर्जखातेही वेळोवेळी हप्ते भरुन दि. 22/12/2015 रोजी बंद केले. परंतु तक्रारदाराच्या सिबील रिपोर्टवरतील रक्कम रु.29,764/- इतकी रक्कम शिल्लक कर्ज दाखवित आहे. तदनंतर तक्रारदारांनी पुन्हा वि.प. यांचेकडून कर्जखाते उतारा मागितला असता तो आप्पासो बीडकर यांचे नावचा मिळाला. अशा प्रकारे वि.प. यांनी एकाच कर्जखाते नंबरवर दोन वेगवेगळया व्यक्तींना कर्ज दिलेले आहे. तक्रारदाराने कर्ज फेडल्यानंतरही तक्रारदाराचे सिबील रिपोर्टवर आप्पासो बिडकर यांचे कर्जाची माहिती वि.प. यांनी दाखविली आहे. तक्रारदार यांना सिबील रिपोर्ट खराब झालेने तक्रारदारांना दुसरीकडे कुठेही कर्ज मिळाले नाही, त्यामुळे तक्रारदारांना घर बांधणेसाठी नातेवाईक व मित्रांकडून उसनी रक्कम घ्यावी लागली. तक्रारदारांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे तक्रारदारांची बदनामी झाली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी झालेल्या नुकसानीची रक्कम रु.10,00,000/-, तक्रारदारांनी नातेवाईक व मित्रांकडून घेतलेली उसनी रक्कम रु.5,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.50,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 3 कडे अनुक्रमे तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे अदा केलेल्या रकमेचा तपशील, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, तक्रारदार यांनी वि.प. यांना कलम 11(2)(ब) प्रमाणे दिलेला अर्ज इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने अॅक्सीस बँकेने तक्रारदार यांना दिलेले पत्र, इंडिया बुल्स यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र, सिबील कंपनीचा मेल इ.कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व पुरावा शपथपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदारांनी कायद्यानुसार दोन वर्षाचे आत तक्रार दाखल केलेली नाही. सबब, तक्रारअर्ज मुदतीत नाही.
iii) तक्रारदार यांचा कर्ज खाते क्र. 021625300000080 आहे व अप्पासो बिडकर यांचा कर्ज खाते क्र. 021625300000090 असा आहे. तक्रारदारांनी घेतलेली दोन्ही कर्जे त्यांनी भागविली आहेत.
iv) वि.प. यांचेकडील कॉम्प्युटरवरील फिडींग करताना नकळत झालेल्या चुकीचे भांडवल करुन वि.प. यांचेकडून भरमसाठ पैसे उकळणेकरिता तक्रारदार यांनी चुकीची व खोटी कथने केली आहे. तक्रारदार यांचेकडील खाते उतारे, कर्ज बंद केलेचे दाखले दाखविलेनंतर तसेच आयकर रिटर्न दाखविलेस कोणत्याही बँकेकडून कर्ज घेणेस तक्रारदारास अडचण नव्हती.
v) वि.प. यांनी तक्रारदार यांची सिबील मधील दुरुस्ती करुन दिली आहे. त्यामुळे तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे. अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न -
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून दोन कर्जै घेतली होती व त्यांची परतफेड तक्रारदाराने केली आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीत, त्यांनी वि.प. यांचेकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड केली असतानाही तक्रारदाराच्या सिबील रिपोर्टवरतील रक्कम रु.29,764/- इतकी रक्कम शिल्लक कर्ज दाखवित आहे. तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून कर्जखाते उतारा मागितला असता तो आप्पासो बीडकर यांचे नावचा मिळाला. अशा प्रकारे वि.प. यांनी एकाच कर्जखाते नंबरवर दोन वेगवेगळया व्यक्तींना कर्ज दिलेले आहे. तक्रारदाराने कर्ज फेडल्यानंतरही तक्रारदाराचे सिबील रिपोर्टवर आप्पासो बिडकर यांचे कर्जाची माहिती वि.प. यांनी दाखविली आहे. तक्रारदार यांना सिबील रिपोर्ट खराब झालेने तक्रारदारांना दुसरीकडे कुठेही कर्ज मिळाले नाही व त्यामुळे तक्रारदारांचे नुकसान झाले आहे असे कथन केले आहे. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये वि.प. यांचेकडील कॉम्प्युटरवरील फिडींगवर नकळत झालेली चुक मान्य केली आहे. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांची सिबील मधील दुरुस्ती करुन दिली आहे असे कथन केले आहे. वि.प. यांच्या कॉम्प्युटरमधील/सिस्टीममधील दोषांमुळे जर तक्रारदाराचे सिबिल खराब झाले असेल तर त्यामध्ये तक्रारदाराचा कोणताही दोष दिसून येत नाही. सदरची चूक ही वि.प. यांची आहे व त्यामुळे तक्रारदारास नाहक त्रास सहन करावा लागला आहे. वि.प. यांनी विनाकारण तक्रारदाराचे सिबील खराब केल्यामुळे तक्रारदारास कर्ज मिळणेस अडचण आली व त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले ही बाब नाकारता येणार नाही. तक्रारदाराने घर बांधणीसाठी मित्रमंडळी व नातेवाईकांकडून रक्कम हातउसणी घेतलेचे तक्रारअर्जात नमूद केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही ठोस पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तरीसुध्दा वि.प. यांच्या चुकीमुळे तक्रारदाराचे सिबील खराब झाले व त्यांना इतर बँकांचे कर्ज घेण्यात अडचणी निर्माण झाल्या व त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले ही बाब स्वाभाविक वाटते. त्यामुळे तक्रारदाराचे नमूद कथन काही अंशी ग्राहय धरणे या आयोगास न्यायोचित वाटते. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांनी सेवात्रुटी दिली असून त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते. सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रककम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. परंतु तक्रारदार यांनी सिबील खराब असलेने त्यांना अन्य बँकेकडून गृहकर्ज मिळणे अडचणीचे झाले, त्यांना प्रॉव्हिडंड फंडातील संपूर्ण रक्कम काढून इतरांची देणी भागवावी लागली, याबाबत तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तथापि तक्रारदार यांचे सन 2018 पासून 2022 पर्यंत सिबील खराब असलेमुळे तक्रारदार यांचे निश्चितच नुकसान झाले असावे ही बाब स्वाभाविक वाटते. सबब, नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता तक्रारदार हे वि.प यांचेकडून रक्कम रु.3,00,000/- इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळण्यास पात्र आहेत तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 3,00,000/- करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.