द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 20 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 फ्रेंड्स लायब्ररी – जाबदेणार क्र.1 यांचे फ्रेंचायसी यांच्याद्वारे एक महत्वाचा अर्ज रत्नागिरी येथे पाठविण्यासाठी दिनांक 16/4/2010 रोजी दिला. दिनांक 17/4/2010 पर्यन्त अर्ज पोहोचेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले होते. परंतू कुरिअर द्वारा अर्ज वेळेत न पोहोचल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्याकडे वारंवार चौकशी करुनही, पत्रे पाठवूनही उपयोग झाला नाही. राजीव गांधी रुरल डिस्ट्रीब्युटर शिप अंतर्गत तक्रारदारांना एल.पी.जी ची डिस्ट्रीब्युटरशिप मिळू शकली नाही. तक्रारदारांचे रुपये 15000/- ते 20,000/- चे नुकसान झाले. तक्रारदार अपंग असल्यामुळे धावपळ करणे त्यांना शक्य होत नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार क्र.2 फ्रेंड्स लायब्ररी यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 15000/- ते 20,000/-ची मागणी करतात, तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये रुपये 15000/- ते 20,000/-ची मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.2 यांनी प्राथमिक मुद्याचा अर्ज दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 16/4/2010 च्या पावतीचे अवलोकन केले असता सदरहू पावती जाबदेणार क्र.2 यांनी दिलेली नसून रॅपिड एक्सप्रेस यांनी दिलेली आहे. जाबदेणार क्र.2 यांनी सदरहू कुरिअर बुक केलेले नव्हते. या व्यवहारात त्यांचा संबंध नाही. म्हणून जाबदेणार क्र.2 यांना प्रस्तूत तक्रारीतून वगळण्यात यावे अशी मागणी जाबदेणार क्र.2 करतात.
3. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांनी दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दाखल केले. तक्रारदार काही महत्वाची कागदपत्रे पाठविण्यासाठी जाबदेणार क्र.2 यांच्याकडे केले होते. जाबदेणार क्र.2 यांनी पावती दिलेली होती. त्यामुळे पावती जाबदेणार क्र.2 यांची नसून ती रॅपिड एक्सप्रेस यांची होती हे जाबदेणार क्र.2 यांचे म्हणणे तक्रारदारांना अमान्य आहे. म्हणून जाबदेणार क्र.2 यांचा त्यांना तक्रारीतून वगळण्यात यावा हा अर्ज नामंजुर करावा अशी मागणी तक्रारदार करतात.
4. जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी दिनांक 16/4/2010 रोजी बुक केलेली कन्साईनमेंट वेळेवर पोहोचविण्यात आलेली होती. कन्साईनमेंट दिनांक 17/4/2010 रोजी पोहोचेल असे तक्रारदारांना सांगण्यात आलेले नव्हते. तक्रारदारांनी जनरल सर्व्हिस अंतर्गत कन्साईनमेंट बुक केलेली होती, डी टी डी सी प्लस सर्व्हिस अंतर्गत ती बुक करण्यात आलेली नव्हती. डिलीव्हरी रिपोर्ट कंपनीच्या वेब साईटवर दर्शविण्यात येतो. जाबदेणार यांनी कन्साईनमेंट पोहचविलेली होती, त्यात जरी विलंब झालेला असला तरी ती हरवलेली नव्हती, जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात. तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही. जाबदेणार क्र.1 यांची मर्यादित जबाबदारी फक्त रुपये 100/- पर्यन्तच आहे. म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात. जाबदेणार क्र.1 यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5. तक्रारदारांनी रिजॉईंडर व लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 16/4/2010 च्या पावतीचे मंचाने अवलोकन केले असता सदरहू पावतीवर जाबदेणार क्र.1 यांचे नाव असून, बुकिंग ब्रान्च पुणे पी अॅन्ड क्यू, शिपर्सचे नाव रॅपिड एक्सप्रेस, बर्गे, पुणे असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यासाठी रुपये 45/- ची आकारणी करण्यात आल्याचे दिसून येते. कन्साईनमेंट डिलीव्हरी रिपोर्ट कंपनीच्या वेब साईटवर असतो असे जरी जाबदेणार क्र.1 यांनी जबाबात नमूद केलेले असले तरी कन्साईनमेंट वेळेवर म्हणजे नेमकी कधी डिलीव्हर करण्यात आली होती यासंदर्भातील पुरावा जाबदेणार क्र.1 यांनी दाखल केलेला नाही. तसेच कन्साईनमेंट ही जनरल सर्व्हिस अंतर्गत बुक करण्यात आलेली होती व ती स्पेशल सर्व्हिस अंतर्गत नव्हती यासंदर्भातही पुरावा जाबदेणार क्र.1 यांनी दाखल केलेला नाही. जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाबात नमूद केल्याप्रमाणे कन्साईनमेंट सरफेस मोडने पाठविण्यात आलेली असल्यामुळे त्यात विलंब होऊ शकतो, परंतू कन्साईनमेंट पोहोचलीच नाही अथवा हरवली अशी तक्रारदारांची तक्रार नाही असे नमूद केलेले आहे. म्हणजेच तक्रारदारांनी पाठविलेली कन्साईनमेंट जाबदेणार यांनी विलंबाने पोहचवली हे जाबदेणार क्र.1 अप्रत्यक्षरित्या मान्य करतात. जाबदेणार यांची मर्यादित जबाबदारी रुपये 100/- पर्यन्तच असली तरी याबाबत तक्रारदारांना अवगत करुन देण्यात आले होते, तसेच जाबदेणार यांनी त्यांच्या अटी व शर्ती तक्रारदारांना अवगत करुन दिलेल्या होत्या यासंदर्भातील पुरावा जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही, पावतीचे अवलोकन केले असता सदर पावतीवर अटी व शर्ती पाठीमागील बाजूस आहेत, त्या तक्रारदारांना अवगत करुन देण्यात आल्या होत्या यासंदर्भात तक्रारदारांची सही नाही. यासर्वावरुन तक्रारदारांनी पाठविलेली कन्साईनमेंट पोहचवितांना जाबदेणार क्र.1 यांनी विलंब केला ही बाब स्पष्ट होते. यावरुन जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते. तक्रारदारांनी त्यांना एल पी जी डिस्ट्रीब्युटरशिप मिळू शकलेली नाही त्यामुळे रुपये 15000/- ते 20000/- चे नुकसान झालेले असे असे जरी तक्रारीत नमूद केलेले असले तरी त्यासंदर्भातील पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करते. परंतू जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार जेष्ठ नागरिक, अपंग आहेत. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 3,000/- जाबदेणार क्र.1 यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: जाबदेणार क्र.1 यांच्याविरुध्द मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी
रक्कम रुपये 3,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.