द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(05/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणार क्र. 1 व 2 चे विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील तक्रारदार हे मुळचे कागल, जि. कोल्हापूर यथील रहिवासी असून शेतकरी आहेत व त्यांच्या व्यवसायासाठी ते कल्याणीनगर, येरवडा येथे राहतात. तक्रारदार हे स्थापत्य शास्त्राचे पदवीधर असून बांधकाम प्रकल्प विषयक सल्लागार आहेत व सदरच्या बांधकाम प्रकल्प सल्लागार प्रयोजनासाठी मे. व्हिस्टा कोअर कन्सल्टंट्स नावाची त्यांची वैयक्तीक मालकीची संस्था येरवडा, पुणे येथे आहे. तक्रारदार यांना शेती व वरील व्यवसायासाठी नेहमी कागल-पुणे, मुंबई-बारामती, नवी मुंबई-इचलकरंजी आणि पुणे कोल्हापूर इ. ठिकाणी सल्ल्यासाठी ये-जा करावी लागते. त्यासाठी तक्रारदार यांना आरामदायी प्रवासी मोटार कारची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली VIN No. MAJ UXXMR2V9B 1889, make ‘Endeavour’ model 90FC3FAG colour Monello, ही मोटार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून दि. 26/6/2009 रोजी खरेदी केली, तिचा रजिस्ट्रेशन नं. MH 09BK 9900 असा होता. सदरची मोटार खरेदी करतेवेळीच विक्री पश्चात देखभाल व दुरुस्तीसाठी खरेदीपासूनचे 48 महिने अथवा 80,000 कि,मी चाल यासाठी दि. 26/6/2009 ते 26/6/2013 या कालावधीसाठी खात्रीकरार (Warranty contract) करण्यात आला. सदर कराराअन्वये सदर मोटार वाहनातील यांत्रिकी विद्युत आणि एअर कंडीशनर तसेच इतर सर्व प्रकारच्या भागांच्या
दर्जाबाबत आणि विक्री पश्चात मोफत/सवलतीच्या सेवेबाबत कंत्राटही केले व त्या कामीचे दुरुस्ती व देखभाल कंत्राट क्र. Co-IND – 0142989 दि. 26/6/2009 रोजी करण्यात आले. सदर करारनाम्याच्या अटी व शर्तींनुसार इतर यांत्रिकी व विद्युत भागांबरोबरच एअर कंडीशनर, कंडेंसर, कॉम्प्रेसर, इव्हॅपरेटर, एक्सपान्शन व्हॉल्ट, होजेस, सेल्स, एअर कंडीशनर गॅस चार्जिंग इ. बाबींचा समावेश आहे. तक्रारदार यांनी सदरच्या कारारातील सर्व अटी व शर्तींचे तंतोतंत पालन केलेले असून त्याची नोंद सर्व्हिस मॅन्युअलप्रमाणे जाबदेणार क्र. 2 यांच्यकडून वेळोवेळी करुन घेतली आहे. तक्रारदारांच्या कथनानुसार, सदर वाहनाचे रनिंग 3710 कि.मी झाले असता, त्यास झालेल्या अपघातामुळे तक्रारदारांनी दि. 22/12/2009 रोजी सदरचे वाहन जाबदेणार क्र. 2 यांचेकडे दुरुस्ती व देखभालीसाठी दिले. अपघातामध्ये तक्रारदार यांच्या मोटारीच्या पुढील डाव्या बाजूचे बरेचसे नुकसान झालेले होते, जाबदेणार क्र. 2 यांनी मोटारीच्या दुरुस्तीसाठी अडीच महिन्यांचा कालावधी लावला आणि दुरुस्ती व देखभालीचे रु. 3,74,751/- इतके बील आकारुन दि. 11/3/2010 रोजी वाहन संपूर्ण दुरुस्त झाले असे सांगून परत दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार क्र. 2 यांनी बसविलेल्या एअर कंडीशनरची दुरुस्ती व देखभाल व्यवस्थितपणे झालेली नव्हती, त्यामुळे तक्रारदार यांना सदरचे वाहन जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे वारंवार नेणे भाग पडले. परंतु वारंवार वाहन जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे देऊन, त्यांनी वाहनाची, विशेषत: एअर कंडीशनरची दुरुस्ती समाधानकारक केली नाही, त्यामुळे तक्रारदार यांना सदरची मोटार हुबळी येथील जाबदेणार क्र. 1 यांचे दुसरे वितरक मे. मेट्रो फोर्ड यांचेकडे दुरुस्ती व देखभालीसाठी दि. 29/9/2010 रोजी देणे भाग पडले, त्यावेळी सदर मोटारीचे रनिंग फक्त 46960 कि.मी. झाले होते, त्याकामी
तक्रारदार यांना मे. मेट्रो फोर्ड, हुबळी यांना दुरुस्ती व देखभालीच्या बीलकामी रक्कम रु. 32,486/- द्यावे लागले व मोटार घेऊन जाण्याचा व आणण्याचा खर्च वेगळा करावा लागला. तक्रारदार यांनी सदरच्या मोटारीस झालेल्या अपघातामुळे दुरुस्ती व देखभालीचे बील रक्कम रु. 3,74,751/- दि. 18/3/2010 रोजी जाबदेणार क्र. 2 यांना अदा केले, तरीहा त्यांना तक्रारदारांच्या मोटारीतील एअर कंडीशनर दुरुस्त करुन दिला नाही किंवा बदलून दिला नाही, तसेच मोटार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी वारंवार न्यावी लागली व दि. 18/3/2010 ते 14/10/2010 या 7 महिन्यांच्या कालावधीसाठी तक्रारदार यांची मोटार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे पडून राहीली, त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक, वित्त्त्तीय व शारीरिक त्रास सहन करावा लागला व त्यांच्या धंद्याचे नुकसान झाले. वर नमुद केलेल्या 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये तक्रारदार यांना सदरच्या मोटारीचा रक्कम रु. 24,300/- (E.M.I.) भरावा लागला व त्या कालावधीमध्ये सदरच्या मोटारीसाठी रक्कम रु. 1,70,100/- भरुनही सदरच्या उणिवा व दोषांमुळे तक्रारदारांना पर्यायी वाहनांची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार क्र. 1 व 2 यांच्याकडून वैयक्तीक, मानसिक व शारीरिक त्रास त्याचप्रमाणे व्यवसायाचे नुकसान, असे एकुण रक्कम रु. 3,40,500/- ची मागणी करतात. तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 1 व 2 यांना दि. 27/9/2010 रोजी रजि. पोस्टाने नोटीस पाठविली असता त्यांनी तक्रारदारांच्या वकीलांना दि. 18/10/2010 नोटीशीचे उत्तर दिले व तक्रारदारांच्या मागण्या पूर्णपणे नाकारल्या. म्हणून सदरील तक्रार तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. यातील तक्रारदार, जाबदेणार यांच्याकडून तक्रारदारांच्या मोटारीतील एअर कंडीशनर योग्य नसल्या कारणाने बदलून द्यावे अथवा मोटारीतील दुरुस्ती व देखभाल, सेवेतील दोष, त्रुटी आणि उणिवा याकामी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 3,40,200/- द.सा.द.शे. 18% व्याजाने व इतर दिलासा मागतात.
तक्रारदार यांनी या तक्रारीच्या कामी त्यांचे शपथपत्र, मोटार खरेदीबाबत दि. 26/6/2009 रोजीच्या इंव्हॉईसची प्रत, मोटार कारची कर भरल्याची पावती, दि. 26/6/2009 रोजीच्या देखभाल कराराची प्रत, जाबदेणार क्र. 2 यांचेकडील देखभाल बीलांच्या प्रती, मेट्रो फोर्ड, हुबळी यांचे देखभाल दुरुस्तीचे चेकशीट, त्यांचे बील, कॅश मेमो इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2] सदर प्रकरणी यातील दोन्ही जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये वकीलामार्फत उपस्थित राहिले व त्यांची लेखी कैफियत सादर केली. जाबदेणार क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार ‘ग्राहक’ नाहीत, त्यांनी सदरची मोटार ही व्यावसायिक कारणासाठी खरेदी केली होती. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 1 व 2 यांचे संबंध हे ‘प्रिंसिपल टू प्रिंसिपल’ वर आधारीत आहे आणि जाबदेणार क्र. 2 यांच्या कुठल्याही कृतीला ते जबाबदार नाहीत. तक्रारदार यांच्या मोटारीस झालेल्या अपघातामुळे झालेले नुकसान हे वॉरंटीच्या अटी व शर्तींमध्ये बसत नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, ओनर्स मॅन्युअलमधील वॉरंटी करारामध्ये, रोड ट्रॅफिक अपघातामुळे झालेले नुकसान हे वॉरंटीच्या कराराअंतर्गत येते नाही, असे नमुद केलेले आहे. तक्रारदार यांनी मे.मेट्रो फोर्ड, हुबळी यांना पक्षकार केलेले नाही असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक, वित्तीय व शारीरिक त्रासासाठी जाबदेणार जबाबदार नाहीत, म्हणून तक्रारदारांची तक्रार खर्चासहित फेटाळावी अशी मागणी जाबदेणार क्र. 1 करतात.
जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ श्री. दुष्यंत जयाकुमार यांचे शपथपत्र दाखल केले.
3] जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांची लेखी कैफियत दाखल केली व तक्रारदारांच्या तक्रारीतील सर्व कथने खोडून काढली. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये, पहिल्या तीन सर्व्हिसिंगबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही. दि. 29/3/2010 रोजी जेव्हा तक्रारदार यांनी मोटारीच्या कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर यांची तपासणी करावयास सांगितली, तेव्हा सदरचे कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर हे वॉरंटी कालावधीमध्ये असल्यामुळे, जाबदेणार क्र. 2 यांनी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे विनंती करुन बदलला. त्यानंतर 13/4/2010 रोजी कोल्हापूर येथील शोरुममध्ये दि. 5/5/2010 रोजी सदरचे कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर पूर्णपणे बदलले. जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदार यांच्या मोटारीतील कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर तीन वेळा बदललेले आहे, असे जाबदेणार क्र. 2 यांचे कथन आहे. तक्रारदार त्यांच्या मोटारीकडे अतिशय दुर्लक्ष करतात, तसेच निकृष्ट दर्जाच्या मेकॅनिकमुळे तक्रारदारांच्या मोटारीचे नुकसान झालेले आहे, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे मोटारीतील कुठल्याच पार्ट नादुरुस्त नाही, परंतु जर त्यामध्ये काही उत्पादकिय दोष असेल, तर तो दूर करण्याची जबाबदारी त्यांची नाही. या व इतर कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार क्र. 2 करतात.
जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ श्री. राजू गव्हाणे यांचे शपथपत्र दाखल केले.
4] तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबास त्यांचे प्रतिम्हणणे दाखल केले व जाबदेणार यांची कथने नाकारली. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सदरची मोटार त्यांच्या वैयक्तीक वापरासाठी खरेदी केलेली होती. मोटार खरेदीचा इन्व्हाईस तक्रारदार यांच्या वैयक्तीक नावावर व कागल येथील शेतजमीनीच्या वैयक्तीक पत्त्यावर आहे. त्याचप्रमाणे मोटार खरेदीची सर्व कागदपत्रे त्यांच्या नावावर आहेत आणि देखभाल दुरुस्तीचा करारही त्यांच्या वैयक्तीक नावावर आहे, त्यामुळे त्यांनी सदरची मोटार ही वैयक्तीक स्वयंरोजगारासाठी खरेदी केलेली आहे व व्यापारी प्रयोजनासाठी नाही. त्यामुळे त्यांची तक्रार मंजूर करावी अशी मागणी तक्रारदार करतात. परंतु यातील तक्रारदारांनी दि. 26/3/2013 रोजी पुरशिस दाखल केली व त्याअन्वये सदर मोटारकारचा खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षम वापराचा कालावधी (Period of cost efficient use of the motor vehicle) संपुष्टात आलेला असल्याने मोटारीस बसविलेल्या वातानुकुलीत यंत्रासह बदलून मिळण्यामध्ये कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही त्यामुळे तक्रारदार त्यांच्या तक्रारीतील मागणी क्र. 13(अ) सोडून देत आहेत, असे कळविले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांची तक्रार नुकसान भरपाई मिळणेकरीता मर्यादीत केली आहे.
5] तक्रारदार व जाबदेणार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील व कैफियतीमधील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार क्र. 1 व यांनी तक्रारदार यांना :
सदोष सेवा दिलेली आहे का ? : होय
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई देण्यास जबाबदार आहेत का ? :
[ड] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
6] तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून, जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली VIN No. MAJ UXXMR2V9B 1889, make ‘Endeavour’ model 90FC3FAG colour Monello, ही मोटार दि. 26/6/2009 रोजी खरेदी केली व त्यावेळीच विक्री पश्चात देखभाल व दुरुस्तीसाठी खरेदीपासूनचे 48 महिने अथवा 80,000 कि,मी चाल यासाठी दि. 26/6/2009 ते 26/6/2013 या कालावधीसाठी खात्रीकरार करण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मोटारीच्या पुढील बाजूचे अपघातामुळे बरेच मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांनी सदरची मोटार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दि. 22/12/2009 रोजी दुरुस्तीसाठी दिली, त्यावेळी जाबदेणार क्र. 2 यांनी सदरची मोटार त्यांच्याकडे अडीच महिने ठेवून घेतली व रक्कम रु. 3,74,751/- इतके बील करुन गाडी पूर्णपणे दुरुस्त झालेले आहे, असे सांगून दि. 11/3/2010 रोजी परत दिली. तरीही जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारांच्या मोटारीतील एअर कंडीशनरची दुरुस्ती योग्य रितीने करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदरची मोटार दि. 18/3/2010 ते 14/10/2010 या कालावधीमध्ये वारंवार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी न्यावी लागली, तरीही सदरची मोटार जाबदेणार क्र. 2 यांनी योग्यरितीने दुरुस्त करुन दिली नाही, त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारदार यांना सदरची मोटार जाबदेणार क्र. 1 यांचे हुबळी येथील वितरक मेट्रो फोर्ड यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवावी लागली, तेथेही त्यांना रक्कम रु. 32,486/- खर्च करावे लागले, त्याशिवाय मोटार नेण्या-आणण्याचाही खर्च करावा लागला. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तक्रारदार यांच्या मोटारीतील कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर तीन वेळा पूर्णपणे बदलून दिलेले आहे, तक्रारदार यांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे आणि सदरची मोटार फोर्डच्या मॅकॅनिकला दुरुस्तीकरीता न देता दुसर्या मॅकॅनिककडे दुरुस्ती करुन घेतल्यामुळे तक्रारदारांच्या वाहनाचे नुकसान झालेले आहे. जाबदेणार क्र. 2 यांनी, तक्रारदार यांना मोटारीचे पार्ट्स, बदलून दिल्याबाबत किंवा त्यांना वर किलेल्या विधानांच्या पुष्ठ्यर्थ कोणताही स्वतंत्र पुरावा जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही. जर एखादा पार्ट वारंवार बदलून द्यावा लागत असेल व बदललाच नसेल, तर त्यामध्ये काहीतरी उत्पादकिय दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये जाबदेणार क्र. यांच्याच म्हणण्यानुसार, त्यांनी तीन वेळा तक्रारदार याना मोटारीचा कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर बदलून दिला, तरीही तक्रारदारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे जाबदेणार क्र. 2 यांनी योग्य रितीने किंवा योग्य दर्जाचे कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर न बसवून तक्रारदार यांना सदोष व दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, जाबदेणार क्र. 1 व 2 हे तक्रारदारांच्या मोटारीस उत्कृष्ट दर्जाचे कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर बसविण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे. परंतु, तक्रारदार यांनी दि. 26/3/2013 रोजी पुरशिस दाखल केली व त्याअन्वये सदर मोटारकारचा खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षम वापराचा कालावधी (Period of cost efficient use of the motor vehicle) संपुष्टात आलेला असल्याने मोटारीस बसविलेल्या वातानुकुलीत यंत्रासह बदलून मिळण्यामध्ये कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही त्यामुळे तक्रारदार त्यांच्या तक्रारीतील मागणी क्र. 13(अ) सोडून देत आहेत व इतर मागण्या मान्य कराव्यात असे कळविले आहे.
7] जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारदार यांनी सदरची मोटार ही व्यावसायिक कारनासाठी खरेदी केलेली आहे असे नमुद केले आहे. जाबदेणारांनी त्यांच्या या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, तक्रारदार त्यांनी नमुद केलेला स्वयंरोजगार हा त्याच्या उपजिविकेसाठी करतात व तक्रारदार सदरची मोटार त्यांच्या वैयक्तीक कारणासाठीही वापरतात, त्यामुळे जाबदेणार यांच्या याबाबतचे कथनामध्ये मंचास कुठलेही तथ्य आढळत नाही.
8] तक्रारदार यांनी प्रस्तुतच्या तक्रारीअन्वये, जाबदेणार यांनी दिलेल्या सदोष व दोषपूर्ण सेवेसाठी तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानापोटी रक्कम रु. 3,40,200/- इतकी नुकसान भरपाई मागितलेली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, त्यांच्या मोटारीचा अपघात हा डिसे. 2009 मध्ये झाला त्यानंतर ऑक्टो.2010 पर्यंत त्यांची मोटार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडेच दुरुस्तीसाठी पडून होती. त्यामुळे तक्रारदार यांना त्यांच्या मोटारीचा वापर करता आला नाही, त्याशिवाय जाबदेणार यांनी त्यांच्याकडून दुरुस्तीपोटी भली मोठी रक्कम घेऊनही मोटार, विशेषत: कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर दुरुस्त करुन दिले नाही, त्यामुळे त्यांना सदरची मोटार हुबळी येथे नेऊन दुरुस्त करावी लागली व त्यासाठी गाडी नेण्या-आणण्याव्यतितिक्त दुरुस्तीसाठी रक्कम रु. 32,000/- पेक्षा जास्त खर्च करावे लागले. जाबदेणार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा लागला, त्याशिवाय त्यांना वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली, प्रस्तुतची तक्रार मंचामध्ये दाखल करीवी लागली व त्या अनुषंगे वेळ व पैसे खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास हक्कदार आहेत. तक्रारदार यांनी प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 3,40,200/- ची मागणी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी, त्यांना व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मागितलेली आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांच्या व्यावसायिक नुकसानाबद्दल कोणताही पुरावा मंचामध्ये दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी रक्कम रु. 3,40,200/- चे मुल्यांकन कसे केले आहे, याचेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मंचाच्या मते सदरची रक्कम ही अवास्तव आहे, त्यामुळे तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,00,000/- मिळण्यास तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
4] त्यामुळे वरील सर्व वस्तुस्थितींचा, उभय पक्षाकडून दाखल झालेल्या कागदपत्रांचा, शपथपत्रे कैफियत व सादर पुरावे यांचा विचार करता, तक्रारदार यांना कार खरेदी केल्यापासून झालेला त्रास पाहून ते रक्कम रु. 1,00,000/- इतकी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत, असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार यांनी कंटाळून त्यांच्या अर्जातील कलम 13(अ) ची सोडून दिलेली आहे, त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
2] असे जाहिर करण्यात येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार
यांच्या मोटारीस योग्य दर्जाचे कॉम्प्रेसर व एअर कंडीशनर
न बसवून सदोष सेवा दिलेली आहे.
3] जाबदेणार क्र. 1 व 2 यांना असे आदेश देण्यात येतात
की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना रक्कम
रु. 1,00,000/- (रु. एक लाख मात्र) नुकसान भरपाई व
रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) तक्रारीच्या खर्चापोटी
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावी.
4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.