तक्रारदार : वकील श्री. संजय पांडे हजर.
सामनेवाले क्र.1 करीता : वकील श्री. शिर्के हजर.
सामनेवाले क्र. 2 : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे फोर्स मोटर्स या नांवाने चारचाकी वाहनाचे उत्पादन करीत असून त्यांचे कार्यालय आकुर्डी, पुणे येथे आहे. सा.वाले क्र.2 हे सदर चारचाकी वाहनांचे वितरक असून त्यांचे कार्यालय पवई , मुंबई येथे आहे.
2. तक्रारदार या पवई, मुंबई येथे राहातात. सा.वाले क्र. 2 यांचे कडून तक्रारदार यांनी फोर्स 1 हे चारचाकी वाहन ज्याचा क्रमांक MH-46-V-8181 हे रु.11,98,146/- येवढया किंमतीस फेब्रुवारी, 2012 मध्ये विकत घेतले. वरील चारचाकी वाहनाचा ताबा तक्रारदार यांनी पवई, मुंबई येथे घेतला. तक्रारदारांचे असे कथन आहे की, सदर चारचाकी वाहन विकत घेतल्यापासून पुढील महिन्यापासूनच वाहनाच्या कार्यक्षमतेमध्ये तक्रारी निर्माण झाल्या. सदर वाहनाची वातानुकुलीत व्यवस्था दरवाज्याची ठेवण, व दरवाज्याचे कुलूप यामध्ये वारंवार बिघाड जाणवू लागला. तक्रारदारांनी सदरची बाब सा.वाले क्र.2 यांच्या नजरेस आणून त्या बाबतची दुरुस्ती करुन देण्याबाबतची विनंती केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांच्या विनंतीला दुर्लक्ष केले. त्यानंतर तक्रारदार यांनी सा.वाले यांना ई-मेलव्दारे पत्र व्यवहार करुन वारंवार वाहनामध्ये दुरुस्ती करुन देण्याबाबत विनंती केली असता, दुरुस्तीच्या नांवाखाली सा.वाले यांनी तक्रारदार यांचे वाहन दोन दोन ते तीन तीन दिवसाच्या कालावधी पर्यत कार्यशाळेत अडकवून ठेवले. परंतु वाहनातील दुरुस्ती नंतर देखील सदर वाहनाच्या तक्रारीमध्ये फरक पडला नाही व वाहनात असलेल्या मुलभूत स्वरुपाच्या तक्रारीत कोणताही बदल झाला नाही. सा.वाले यांचे वरिष्ठ अधिकारी यांना देखील तक्रारदारांनी वाहनातील बिघाडाबद्दल वारंवार विनंती करुन वरिष्ठ अधिका-यांनी देखील केवळ आश्वासने देण्यापलीकडे तक्रारदारांना कोणतीही मदत दिली नाही व त्यामुळे वरील चारचाकी वाहनात होणा-या वारंवार बिघाडामध्ये अधिकच भर पडली. वाहनाचा हॉर्न न वाजणे, वाहनामध्ये अचानक पाणी येणे, वाहनात गळतीचा त्रास होणे, वगैरे त्रास तक्रारदारांना जाणवू लागले. तक्रारदारांचे असे कथन आहे की, सुमारे एक ते दिड वर्षाच्या कालावधीत तक्रारदारांना आपले चारचाकी वाहन 14 ते 15 वेळा दुरुस्तीसाठी सा.वाले क्र.2 यांचेकडे द्यावे लागले. त्यामुळे वरील चारचाकी वाहनातील वारंवार निर्माण होणा-या बिघाडांमुळे कंटाळून तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे वाहनाची रक्कम परत मिळण्यासाठी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी वरील विनंती फेटाळून लावली. सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येत असल्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचे विरुध्द सदरचे वाहनाची किंमत 18 टक्के व्याजासह नुकसान भरपाईसह मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
3. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदार यांचे म्हणणे व मागणे नाकारले. सा.वाले क्र.2 यांना तक्रारीची नोटीस मिळून देखील ते मंचासमोर गैरहजर राहील्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचे म्हणणे व मागणे नाकारताना असे कथन केले आहे की, तक्रारीतील म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले क्र.1 यांना बदनाम करण्यासाठी व त्यांचे कडून पैसा मिळविण्यासाठी तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सा.वाले क्र.1 हे आकुर्डी येथे राहात असल्यामुळे व सा.वाले क्र.1 यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारदार यांनी मंचाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे तक्रारीस ग्राहक तक्रार कायदा कलम 11(2) प्रमाणे बाधा येते. असे सा.वाले क्र.1 यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचे कडून वरील वर्णनाचे चारचाकी वाहन विकत घेतले होते ही बाब सा.वाले क्र.1 नाकारत नाही. परंतु सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र. 1 यांचे प्रतिनिधी आहेत ही बाब सा.वाले क्र. 1 नाकारतात. सा.वाले क्र. 1 यांचे म्हणण्याप्रमाणे वरील वर्णनाचे चारचाकी वाहन सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र. 2 यांना विकले होते. त्यामुळे सा.वाले क्र. 1 व 2 यांच्यात प्रिन्सीपल ते प्रिन्सीपल असे नाते आहे व त्यामुळे सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र. 1 यांचे प्रतिनिधी या व्याख्येत येत नाहीत.
4. सा.वाले क्र. 1 यांचे असे म्हणणे आहे की, वरील चारचाकी वाहनाचे उत्पादन सा.वाले क्र. 1 यांनी केले असल्यामुळे सदर वाहनाचे बिघाडा बाबत दुरुस्ती करुन देणे, त्यातील सुटे भाग बदलून देणे, वगैरे कामे विना मोबदला न घेता हमीच्या कालावधीत करुन देण्याची जबाबदारी ही सा.वाले क्र.1 यांची असते. पंरतु वरील जबाबदारी ही ग्राहकाने सा.वाले क्र.1 यांच्या कडून वादातीत वाहन घेतले असल्यासच निर्माण होते. प्रस्तुतच्या तक्रारीत सा.वाले क्र.2 हे स्वतंत्र विक्रेता असल्यामुळे सा.वाले क्र.1 यांची सदर वाहनाचे दुरुस्ती बाबत कोणतीही जबाबदारी नाही. सा.वाले क्र. 1 यांचे असे देखील म्हणणे आहे की, सा.वाले क्र. 2 यांना विकण्यात आलेले वाहन हे विकण्यापूर्वी त्याची सर्वती आवश्यक ती तपासणी करुन घेतल्यानंतरच सदरचे वाहन सा.वाले क्र. 2 यांना विकण्यात आले. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून वाहन विकत घेण्याअगोदर वाहनाची तपासणी ग्राहकाचे समाधान होईपर्यत केलेली असल्यामुळे तक्रारदारांच्या कथनात कोणतेही तथ्य नाही. तक्रारदार म्हणतात त्या प्रमाणे वाहनात आढळून आलले दोष हे मुलभूत स्वरुपाचे दोष होते ही बाब सा.वाले क्र. 1 साफ नाकारतात. या उलट सा.वाले क्र. 1 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांचे वाहन 14 ते 15 वेळा कार्यशाळेत दुरुस्तीकामी नेले होते ही बाब क्षणभर मान्य केली तरी सदरहू वाहनाची दुरुस्ती तक्रारदारांचे समाधान होईपर्यत केलेली आहे. तसेच वाहनातील दुरुस्ती बाबत तक्रारदारांना कोणतीही रक्कम आकारलेली नाही. तसेच तक्रारदार यांना विकण्यात आलेले वाहन एक वर्षाचे कालावधीत 15000 किलोमिटर पेक्षा जास्त वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनाचा वापर 15000 मिलोमिटर पेक्षा जास्त तक्रारदार यांनी केला ही बाबच असे स्पष्ट दाखविते की, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सबब तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती सा.वाले क्र. 1 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत आपले पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, वरील चारचाकी वाहन विकत घेतल्या बद्दलची सा.वाले क्र. 2 यांनी दिलेली पावती, वरील चारचाकी वाहन दुरुस्तीला देण्यात आल्याबद्दल वाहना संबंधी तंयार करण्यात आलेले जॉबसिटच्या प्रती, वाहनाचे दुरुस्ती बाबत तक्रारदार यांनी सा.वाले यांचे सोबत केलेला ई-मेलच्या पत्र व्यवहाराच्या प्रती, सा.वाले क्र. 1 व 2 यांना वकीलामार्फत दिलेल्या नोटीसची प्रत दाखल केलेली आहे.
6. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद, दाखल केलेला आहे.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदार व सा.वाले यांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. त्यानुसार उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना विकलेल्या फोर्स या चारचाकी वाहनाच्या विक्री बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. अशतः |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः- तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून फोर्स या कंपनीचे चारचाकी वाहन रु.11,98,146/- येवढया किंमतीस विकत घेतले ही बाब सा.वाले नाकारत नाहीत. तक्रारदारांनी विकत घेतलेले चारचाकी वाहन सा.वाले क्र. 2 यांचे कडे एक वर्षाचे कालावधीत 14 ते 15 वेळा दुरुस्तीसाठी न्यावे लागले ही बाब सा.वाले नाकारत नाहीत. वरील चारचाकी वाहनाचा वर्षभराच्या वापराच्या कालावधीत 15363 किलोमिटर येवढा प्रवास झाला ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत.
8. सा.वाले क्र. 1 व 2 यांचेतर्फे तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या चारचाकी वाहनाचे व्यवहारा बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाव्दारे असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला की, सा.वाले क्र.2 यांचे कडून फेब्रृवारी,2012 मध्ये विकत घेतलेले फोर्स कंपनीचे चारचाकी वाहन वारंवार दुरुस्तीस द्यावे लागले व वाहन विकत घेतल्याचे तारखेपासून दुस-याच महिन्यापासून वाहनामध्ये तक्रारी आढळून आल्या. तक्रारदार यांनी आपले वाहन दिनांक 20.3.2012 पासून दिनांक 19.2.2013 या कालावधीत 12 ते 13 वेळात सदर वाहन दुरुस्तीसाठी सा.वाले यांचेकडे दिले व वाहनाच्या कार्यक्षमतेबाबत तसेच वारंवार होणा-या बिघाडा बाबत सा.वाले क्र. 1 व 2 यांचेशी ई-मेलव्दारे पत्र व्यवहार करुन ज्यावेळेस तक्रारदार यांना वाहनाच्या बिघाडाबाबत समाधानकारक दुरुस्ती करुन मिळेनाशी झाली त्यावेळेस कंटाळून तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे वाहनाची रक्कम परत मागीतली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या ई-मेल पत्र व्यवहाराव्दारे व सदर वाहन वर्षाचे कालावधीत 12 ते 13 वेळा दुरुस्तीसाठी दिले यावर जास्त भर देऊन वाहनामध्ये होणारा बिघाड हा कायम स्वरुपाचा होता व त्यात दुरुस्ती करुनसुध्दा त्यावर कायमची दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे वाहनात होणारे बिघाड हे मुलभूत स्वरुपाचे बिघाड असल्याने सा.वाले क्र. 1 व 2 यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. आपल्या युक्तीवादाचे समर्थनार्थ तक्रारदारांतर्फे मा. राष्ट्रीय आयोगाचे, हुंडाई मोटर्स विरुध्द अॅफीलेटेड इस्ट वेस्ट प्रेस I (2008 ) CPJ Page 19 व सेस मोटर्स विरुध्द अनंत हरीदास चौधरी III (2013) CPJ Page 520 व अशोक लेलँड विरुध्द गोपाळ शर्मा II (2013) CPJ Page 394 तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या कृष्णराव विरुध्द निखील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल सिव्हील अपील क्र.2641/2010 निकाल दिनांक 8.3.2010 या न्यायनिर्णयांचा हवाला देण्यात आला.
9. या उलट सा.वाले क्र. 1 व 2 यांचेतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सा.वाले क्र. 1 व 2 यांच्यातील परस्पर नाते हे प्रिन्सीपल ते प्रिन्सीपल असे असल्यामुळे तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून विकत घेतलेल्या वाहना संबंधी सा.वाले यांची जबाबदारी नाही. त्यामुळे सा.वाले क्र. 1 यांनी जरी सदरचे वाहन उत्पादित केले असले तरी सा.वाले क्र. 1 यांनी सदरचे वाहन सा.वाले क्र. 2 यांना विकले असल्यामुळे वाहनाच्या बिघाडा बाबत सा.वाले क्र. 1 यांची जबाबदारी नाही. तसेच सा.वाले क्र. 1 यांचेतर्फे असा देखील युक्तीवाद करण्यात आला की, वाहनात निर्माण झालेले दोष हे किरकोळ स्वरुपाचे होते व सदर दोष हे हमीच्या कालावधीत निर्माण झाल्यामुळे तक्रारदार यांचेकडून कोणताही मोबदला न घेता सदरचे दोष दुरुस्त करुन देण्यात आले. सा.वाले क्र. 1 हे जरी चारचाकी वाहनाचे उत्पादक असले तरी सा.वाले क्र. 2 हे सा.वाले क्र. 1 यांचे प्रतिनिधी हे नाते तक्रारदार स्पष्ट करु न शकल्यामुळे सदर चारचाकी वाहनाची हमीच्या कालावधीतील दुरुस्ती करण्यास देखील सा.वाले क्र. 1 यांची जबाबदारी नाही. सदर चारचाकी वाहनाचा प्रवास वर्षाचे कालावधीत 15300 किलोमिटर पेक्षा जास्त झाला आहे यावर मंचाचे लक्ष केंद्रीत करुन असे सांगण्यात आले की, वाहनात दिसून येणा-या दुरुस्तीमुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर कोणताही परीणाम आढळून येत नाही. त्यामुळे वाहनात आढळून आलेले किरकोळ स्वरुपाचे दोष हे वाहनातील मुलभूत स्वरुपाचे दोष असू शकत नाहीत. त्यामुळे सा.वाले क्र. 1 व 2 यारंचेतर्फे कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ही बाब सिध्द होऊ शकत नाही.
10. उभय पक्षकारांतर्फे करण्यात आलेले युक्तीवाद व अभिलेखातील कागदपत्र यांचे अवलोकन केल्यानंतर असे दिसून येते की, तक्रारदार यांनी वाहन विकत घेतल्यापासून वर्षाचे कालावधीत सुमारे 10 ते 12 वेळा सदर वाहन दुरुस्तीसाठी द्यावे लागले. वाहनात वारंवार आढळून येणारे दोश म्हणजे फ्युअल मिटर मधील बिघाड, वाहनाच्या दरवाज्याच्या कुलुपातील बिघाड, तसेच वाहनातील वातानुकुलीत व्यवस्था यावर वारंवार बिघाड होत होते व सदर बिघाड दुरुस्त करुन देखील दुरुस्ती कायम स्वरुपाची होत नव्हती. तसेच वाहनाचे स्टेरिंग व्हील घट्ट होणे, वाहनामध्ये गळतीचा त्रास होणे वगैरे त्रास देखील वारंवार आढळून येत होते. सा.वाले यांचेतर्फे जरी हमीच्या कालावधीतील वरील उत्पन्न झालेले दोष विनामुल्य दुरुस्त करुन देण्यात आले तरी वरील दोषामध्ये दुरुस्ती करुन देखील सदर दोषास कायम स्वरुपाचे उत्तर सा.वाले देऊ शकत नव्हते. वर्षाच्या कालावधीत वाहनाचा प्रवास 15300 किलोमिटरपेक्षा जास्त झाला होता ही बाब क्षणभर स्विकारुनसुध्दा मा. राष्ट्रीय आयोगाच्या अशोक लेलँड विरुध्द गोपाळ शर्मा या खटल्याच्या संदर्भात मा.राष्ट्रीय आयोगाने या गोष्टीचा विचार करुन वाहनाचा जास्त झालेला प्रवास हा वाहनातील बिघाडावर उत्तर ठरु शकत नाही असे मत प्रतिपादन केले आहे. याउलट वरील खटल्यात तसेच सेस मोटर विरुध्द अनंत चौधरी, हुंडाई मोटर्स विरुध्द अॅफीलेटेड इस्ट वेस्ट व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या कृष्णराव विरुध्द निळकंठ सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल या न्यायनिर्णयात वाहनात वारंवार स्वरुपाचे बिघाड यांचा विचार करुन उत्पादकांचे विरुध्द Res ipsa locuter या कायदेशीर तत्वाचा अवलंब करुन वारंवार होणारे बिघाड हे वाहनातील मुलभूत स्वरुपाचे दोष दर्शवितात असा निष्कर्ष वरील न्यायालयांनी काढलेला आहे.
11. सा.वाले क्र.1 यांनी जरी सा.वाले क्र. 1 व सा.वाले क्र. 2 यांच्यातील नांते प्रिन्सीपल ते प्रिन्सीपल असे असल्यामुळे वाहनातील दोषा बाबत सा.वाले क्र. 1 यांची जबाबदारी नाही असा युक्तीवाद जरी केला असला तरी सदर वादातीत वाहन सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 यांना विकल्याबाबत कोणतही कागदोपत्री पुरावा सा.वाले क्र. 1 यांनी दाखल केलेला नाही. या उलट सा.वाले क्र. 1 हे सदर वाहनाचे उत्पादक आहेत. सदर वाहनाची दुरुस्ती सा.वाले क्र. 2 यांनी विनामुल्य करुन दिलेली आहे. सा.वाले क्र. 1 यांनी वरील प्रमाणे कोणताही कागदोपत्री पुरावा न दिल्याने सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे प्रतिनिधी आहेत व त्यामुळे सा.वाले क्र.1 हे जबाबदारी टाळू शकत नाही असे मंचाचे मत झाले आहे. वाहनात वर्षाचे कालावधीत वारंवार आढळून येणारे दोष हे वाहनातील मुलभूत स्वरुपाचे दोष आढळतात असे देखील मंचाचे मत आहे.
12. वाहनात आढळून येणारे दोष हे मुलभूत स्वरुपाचे दोष आहेत असा निष्कर्ष काढल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी जरी सदर वाहनाची संपूर्ण रक्कम परत मागीतली असली तरी तक्रारदार यांनी सदरचे वाहन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरलेले असून वाहनाचा प्रवास 15300 किलोमिटरपेक्षा जास्त झालेला आहे ही गोष्ट विसरुन चालणार नाही. त्यामुळे तक्रारदारांना वाहनाची संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याबाबत आदेश योग्य होणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. वरील गोष्टीचा विचार करुन मुद्दा क्र. 1 व 2 होकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 73/2013 ही अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना विकलेल्या फोर्स या
चारचाकी वाहनाच्या विक्री बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली
असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या सदर
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत सदर वाहनाचे
किंमतीपोटी रु.7,00,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून सदर
रक्कम वसुल होईपावेतो 10 टक्के प्रमाणे होणारे व्याज अदा करावे
असा आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या सदर
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत तक्रारदारांना
झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.25,000/- नुकसान भरपाई व
तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत असाही आदेश मंच
पारीत करीत आहे.
5. सा.वाले यांनी सदर आदेशाची पुर्तता/नापुर्तता करणेबाबत शपथपत्र
दाखल करणेकामी नेमण्यात येते दिनांक 09.04.2015
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 24/02/2015