(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या) 1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे. 2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः- तक्रारदार हे अशोकनगर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचा स्टोन क्रशरचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना जेसीबी खरेदी करावाचा होता. त्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कर्ज प्रकरण केले होते. सदरहू जेसीबी नं.एम.एच-17/एए-382 असा आहे. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दिनांक 25.02.2010 रोजी करारनामा करण्यात आला. तक्रारदाराने 8,00,000/- रक्कम रुपयाचे कर्ज प्रकरण सामनेवाला यांचेकडे केले. सामनेवाला यांनी रक्कम रु.70,656/- चा धनादेश नं.131656 दि.25.05.2010 तक्रारदाराला दिला. तक्रारदाराने 8,00,000/- रक्कम रुपयाची सामनेवाला यांचेकडे मागणी केली होती. परंतू सामनेवालाने पुर्ण रक्कम न देता केवळ रु.70,656/- एवढीच रक्कम तक्रारदाराला दिली. तक्रारदाराने संपुर्ण कर्ज रक्कम मिळावी म्हणून सामनेवाला यांचेकडे श्रीरामपूर तसेच पुणे येथील ऑफिसमध्ये वेळोवेळी जाऊन चौकशी केली. परंतु सामनेवाला यांनी कर्जाची संपुर्ण रक्कम तक्रारदाराला दिली नाही व तक्रारदारास असे सांगितले की, करारनामाप्रमाणे परत फेड मुदतीत केली नाही. तसेच तक्रारदार हे सामनेवाला यांचेमध्ये जो दि.25.05.2010 रोजी जो करार केला त्या करारातील अटी व शर्ती तक्रारदारास कळविलेले नाहीत. व को-या फॉर्मवरती 50 ते 60 सह्या घेतल्या. अशा प्रकारे सामनेवाला यांनी संपुर्ण कर्जाची रक्कम तक्रारदाराला दिली नाही. त्यांनी त्यांचे सेवेत त्रुटी केली आहे. उलट तक्रारदारास दिनांक 09.08.2011 रोजी 32,500/- रुपयाचे रक्कम सामनेवाला यांचे कार्यालयात जाऊन भरली. ती रक्कम सामनेवालास प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना पावती क्र.7549881 अन्वये दिलेले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारास कर्जाची रक्कम न दिल्यामुळे त्यांना दिनांक 27.02.2012 रोजी त्यांना नोटीस पाठवून उर्वरीत रकमेची मागणी केली. परंतु तक्रारदारास सामनेवाला यांनी कर्जाची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.10 प्रमाणे मागणी केली आहे. 3. सामनेवाला यांनी त्यांची लेखी कैफियत प्रकरणात दाखल केली. त्यामध्ये त्यांनी कथन केले की, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे कर्ज प्रकरण केले होते. सदरहू सामनेवालाचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे आहे. तक्रारदार हे स्टोन क्रशरचा व्यवसाय करतात व त्यांनी जेसीबी खरेदीसाठी 8,00,000/- रुपयाचे कर्जाची मागणी केली होती. त्यातील तक्रारदार यांना त्याचेकडे सामनेवालाचे पुणे शाखेचे कर्ज प्रकरण क्रमांक टी.एस.एल. पुणे 0000074 ची वाहन क्र.एम.एच.14 अेएस-8724 ची थकबाकी असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराने श्रीरामपूर शाखेतून मिळाणारे कर्ज रकमेतून पुणे येथील कर्ज प्रकरणातील थकबाकीची रक्कम भरण्यात यावी व सामनेवाला कंपनीचे कर्ज प्रकरणाकरता लागणा-या आवश्यक कागदपत्राची व इतर खर्चाची रक्कम व व्याज वजा जाता उर्वरीत रक्कम तक्रारदाराला देण्यात यावी या बाबतचे शपथपत्र के.जी.रोकडे, नोटरी श्रीरामपूर यांचेकडे दिनांक 28.12.2009 रोजी करुन तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे दिले आहे. त्यानंतर सामनेवालाने तक्रारदार यांना दिल्याने संपुर्ण कागदपत्राची पडताळणी करुन तक्रारदारास रक्कम रु.8,00,000/- एवढे कर्ज दिनांक 25.05.2010 रोजी मंजुर केले. तसेच हायपोथीकेशनचा करारनामा केला व त्यापैकी रक्कम रु.7,00,000/- एवढी रक्कम तक्रारदाराचे पुणे येथील कर्ज खाते टी.एस.एल. पुणे. 0000074 मध्ये जमा केली. उर्वरित रक्कम रुपये 1,00,000/- पैकी करारनामा, विमा रक्कम व इतर कागदपत्राकरीता लागणारी रक्कम रु.29,344/- वजा करुन उर्वरित रक्कम रु.70,564/- चा धनादेश तक्रारदारास दिला आहे हे तक्रारदाराला मान्य आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडून श्रीरामपूर शाखेतून घेतलेले कर्जाची परतफेड म्हणून एकूण 36 हप्त्यामध्ये करावयाची होती. त्यापैकी पहिला हप्ता रु.38360/- व दुसरा ते पस्तीसाव्या हप्त्यापर्यंत प्रत्येकी रु.32,222/- व शेवटच्या छत्तीसावा हप्ता रु.32,230/- या प्रमाणे दिनांक 05.07.2010 ते 05.06.2013 पर्यंत करावयाची होती व आहे. परंतू तक्रारदाराने आजतागायत वाहन कर्ज घेतल्यापासून केवळ रु.32,500/- चा भरणा दिनांक 09.08.2011 रोजी केलेला असून सामनेवालेकडून घेतलेले कर्ज थकविलेले आहे. त्यानंतर सामनेवालाने तक्रारदारास वेळोवेळी कर्जाचे थकबाकी भरण्याबाबत कळविले. दिनांक 27.02.2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून कर्जाचे थकबाकीचे रक्कम भरण्याबाबत मागणी केली. परंतू तक्रारदाराने कोणतीही रक्कम भरलेली नाही. यामध्ये सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. उलट तक्रारदार हेच थकबाकीदार आहेत. सदरहू तक्रार रद्द करण्यात यावी अशी विनंती मंचाला केली आहे. 4. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.ज-हाड यांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.जाधव यांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. | मुद्दे | उत्तर | 1. | सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत त्रुटी केली आहे काय.? | ... नाही. | 2. | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय. ? | ... नाही | 3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा 5. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हे श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्यांचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना खडी, दगड पुरवठा व बांधकामासाठी लागणारे मटेरियल पुरविण्यासाठी जेसीबी खरेदी केला. त्याचा नं.एमएच-17-एए-382 असा आहे. सदरहू जेसीबीसाठी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडून कर्ज मिळावे म्हणून दिनांक 25.05.2010 रोजी 8,00,000/- रुपयाचे कर्ज प्रकरण केले ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सदरहू कर्ज प्रकरणापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.70,656/- चा धनादेश क्र.131656 दिनांक 25.05.2010 रोजी दिला, ही बाब तक्रारदार व सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदाराने पुढे असे कथन केले आहे की, त्यांना 8,00,000/- रुपयाचे कर्ज प्रकरण सामनेवाला यांचेकडे केले होते. परंतू सामनेवालाने केवळ 70,656/- एवढयाच रकमेचा चेक दिला व उर्वरीत रक्कम अद्याप दिली नाही. यासाठी त्यांनी श्रीरामपूर व पुणे येथील सामनेवाला यांचे शाखा कार्यालयात जाऊन चौकशी केली. परंतू तक्रारदारास कर्जाची उर्वरीत रक्कम सामनेवाला यांचेकडून प्राप्त झाली नाही. तक्रारदाराने केलेले कथन सामनेवाला यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये असा बचाव घेतला की, तक्रारदाराने कर्ज प्रकरण केल्यानंतर सामनेवाला यांनी शपथपत्र करुन दिले आहे. तक्रारदाराचे पुणे शाखेत असलेले कर्ज प्रकरण टी.एस.एल.पुणे.0000074 जे वाहन क्र.एम.एच.14/एएस-8724 वर जी थकबाकी आहे, त्या थकबाकीपोटी कर्जावरील रक्कम पुणे येथील कर्ज प्रकरणामध्ये भरण्यात आलेली आहे. तसेच कागदपत्रे व इतर खर्चाची रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम तक्रारदारास देण्यात आली आहे. सदरहू शपथपत्र दिनांक 25.12.2009 रोजी नोटरी करुन तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे दिलेले आहे, ही बाब स्पष्ट करण्यासाठी सामनेवालाने दाखल केलेले कागदपत्रामध्ये तक्रारदाराने केलेले शपथपत्राचे मंचाने अवलोकन केले. या संपुर्ण बाबी तक्रारदाराने दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमुद आहेत. तसेच नि.35/2 वर तक्रारदाराचे सामनेवालास दिलेले पत्र दाखल आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास कर्ज प्रकरणाची संपुर्ण रक्कम रु.8,00,000/- दिलेली आहे. कारण 7,00,000/- रक्कम रुपये ही कर्ज प्रकरणात वळती करण्यात यावी व 70,656/- रुपये चेकने देण्यात आले आहेत. या पैकी 29,344/- ही रक्कम कर्ज प्रकरणात लागणा-या कागदपत्रांचे खर्चापोटी वळती करणेत आले. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदास संपुर्ण रक्कम दिलेली आहे यासाठी सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने श्रीरामपूर शाखेमध्ये जेसीबीसाठी घेतलेले कर्ज प्रकरणाचे हप्त्याची रक्कम भरलेली नाही. केवळ पहिला हप्ता रक्कम रु.32,500/- दिनांक 09.08.2011 रोजी भरलेली आहे. व तशी पावती तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेली आहे, ही बाब सामनेवाला यांना सुध्दा मान्य आहे. उर्वरीत कर्जाची हप्त्याची रक्कम तक्रारदाराना मिळालेली नाही. उलट तक्रारदार हे त्यांचे थकबाकीदार आहेत. सबब संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन करता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे जेसीबी साठी 8,00,000/- मंजूर केली आहे व पुढे संपुर्ण रक्कम तक्रारदाराचे विनंतीप्रमाणे त्यांचे पुणे येथील कर्ज प्रकरणामध्ये वळती करण्यात यावे व उर्वरीत रक्कम तक्रारदाराला चेकव्दारे देण्यात यावी. यामध्ये सामनेवालाने त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब प्रस्तूत तक्रार खारीज करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देणेत येत आहे. 6. मुद्दा क्र.2ः- मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन खालील अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे. - आ दे श - 1) तक्रारदारची तक्रार खारीज करण्यात येत आहे. 2) उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. 3) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. 4) या प्रकरणाची “ब” व “क” फाईल तक्रारदार यांना परत करावी. |