निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय 1. सा.वाले हे तक्रारीतील खाद्य पदार्थाचे विक्रेते आहेत. तर तक्रारदारहे वस्तुचे खरेदीदार आहेत. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदाराने सा.वाले यांचे दुकानात दिनांक 15 मार्च, 2008 रोजी रात्री 9.00 वाजेच्या सुमारास गृहोपयोगी वस्तु खरेदी करण्याकामी भेट दिली व काही वस्तु खरेदी केल्या. तक्रारदारांनीत्या गृहोपयोगी वस्तुमये नेसकॅफे इन्स्टंट कॉफीचा डब्बा खरेदी केला. तक्रारदारांच्या नजरेस असे आले की, त्या इन्स्टंट कॉफीच्या डब्याची वापराची मुदत (Expiry date ) हि मार्च, 2007 मध्ये संपणारी होती व त्यावर दुकानदाराने फेब्रुवारी 2008 असा शिक्का मारला होता. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांनी सा.वाले यांच्या विक्रेत्याच्या नसरेस ही बाब आणली परंतु सा.वाले यांचे विक्रेत्यांनी तक्रारदारांच्या प्रश्नास उडवा उडवीची उत्तरे दिली. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांचेविरुध्द ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 च्या तरतुदीचा भंग केला म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केली व रु.5000/- नुकसान भरपाई मागीतली. 3. सा.वाले यांनी हजर राहून आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सा.वाला यांना नोटीस दिली नाहीह किंवा कोठलीही तक्रार केली नाही व प्रस्तुतच्या मंचाकडे तक्रार दाखल करुन सा.वाले यांचेकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न केले. सा.वाले यांनी असेही कथन केले की, त्यांची बदनामी करण्याच्या हेतुने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास काही कसुर केली या आरोपांस सा.वाले यांनी नकार दिला. 4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत मुळचे बिलाची प्रत हजर केली. तसेच कॉफीच्या डंब्याचे छायाचित्र हजर केले. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आपले शपथपत्र दाखल केले. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासन यांचेकडे देखील तक्रार पाठविल्याची पावती हजर केली. 5. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी मुळचा कॉफीचा डब्बा मंचाचे निरीक्षणार्थ हजर केला. 6. प्रस्तुतच्या तक्रारीत मंचाचे सदस्यांनी तक्रार, कैफीयत, शपथपत्र, तसेच कागदपत्र यांचे वाचन केले व त्यानुरुप तक्रार निकालीकामी पुढील प्रमाणे मुद्दे कायम करण्यात आले. .क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी इन्स्टंट नेस कॉफीचा डब्बा त्यांच्या वापराची मुदत संपल्यानंतर सा.वाले यांनी विक्री केला व खाण्यास अयोग्य वस्तु विक्री केली व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे स्पष्टपणे कथन केले आहे की, दिनांक 15 मार्च, 2008 रोजी सा.वाले दुकानात भेट दिली व त्यांच्याकडून काही गृहोपयोगी वस्तु खरेदी केल्या व त्यामध्ये नेसकॉपी इन्स्टंट कॉफीचा डब्बा खरेदी केला. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदार हे 15 मार्च, 2008 रोजी सा.वाले यांचे दुकानात आले नाही किंवा त्यांनी काही खरेदी केले नाही असे कथन केले नाही. तक्रारीसोबत तक्रारदारांनी इन्स्टंट कॉफीचा डब्बा खरेदीची पावती हजर केली आहे. त्यावर 15 मार्च, 2008 ही तारीख दिलेली आहे. त्यातील वर्णनात्मक तपशिल हा इन्स्टंट कॉफीचा डब्याच्या तपशिलाशी मिळता जुळता आहे. यावरुन तक्रारदारांनी कॉफीच्या डब्यांची हजर केलेली पावती ही वादातीत डंब्याबद्दल आहे या बद्दल शंका रहात नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये ही पावती खोटी आहे , तक्रारदारांनी हजर केलेल्या डंब्याशी संबंधित नाही असे कोठेही कथन केलेले नाही. यावरुन तक्रारदार यांनी 15 मार्च, 2008 रोजी सा.वाले यांचेकडून नेसकॅफे इन्स्टंट कॉफीचा डब्बा खरेदी केला ही बाब सा.वाले यांनी मान्य केली आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. 8. तक्रारदारांचे तक्रारीतील कथन असे आहे की, सदर कॉफीचा डब्बा हा मलेशीयामधून आयात करण्यात आलेला होता व त्यावर मार्च, 2007 ही वापर करण्याची शेवटची तारीख होती. परंतु सा.वाले यांनी त्यावर नविन चिट्टी लिहून फेब्रुवारी, 2008 ही वापराची अंतीम तारीख आहे असे दाखविले. 9. तक्रारदारांनी तक्रार सुनावणीचे दरम्यान मुळचा कॉफीचा डब्बा हजर केला. त्यावरील छापील मजकुरावरुन असे दिसून येते की, सदर कॉफीच्या डब्याचे उत्पादन नेसले प्रॉडक्ट कंपनी करीता मलेशीयामध्ये करण्यात आलेले होते. कॉफीच्या डंब्यावर 18 फेब्रुवारी ते 11 एप्रिल ,2007 ही तारीख लिहिण्यात आली होती. यावरुन त्या डंब्यातील कॉफी ही कॉफी उत्पादकांनी एप्रिल, 2007 पर्यतच वापरणे योग्य होते असे जाहीर केल्याचे दिसून येते. सदरहू कॉफीच्या डंब्यावर मागील बाजूस एक स्टिकर चिकटविण्यात आलेला होता. त्यावरुन असे दिसते की, Pegusus Import Mumbai या कंपनीने डंब्बा ऑक्टोबर, 2007 मध्ये आयात केला व त्याच स्टिकरवर वस्तु वापराची मर्यादा ही फेब्रुवारी, 2008 अशी छापण्यात आली. कॉफीच्या डंब्याच्या मध्यभागी म्हणजे पोटावर सा.वाले फुडबाजार यांचा स्टिकर असून किंमत रु.38/- असे लिहिलेली आहे. त्या टिकरवरील माहिती वरुन हे स्पष्ट दिसून येते की, ऑक्टोबर, 2007 मध्ये म्हणजेच कॉफीचा डब्बा Pegusus Import Mumbai या कंपनीने आयात केला व त्या स्टिकरवर फेब्रुवारी, 2008 ही वस्तु वापराची मर्यादा दाखविण्यात आली. मुळातच कॉफीच्या डंब्याच्या नांवाखाली 18 फेब्रुवारी, 2007 ते 11 एप्रिल, 2007 असे छापण्यात आलेले होते. यावरुन सदर कंपनीचा डंब्बा हा उत्पादकांनी 18 फेब्रुवारी, ते 11 एप्रिल, 2007 या दरम्यान वापरणेकामी विक्रीसाठी ठेवला होता. तो डंब्बा मलेशीयातून भारतात Pegusus Import Mumbai या कंपनीने आयात केल्यानंतर त्यावर वस्तु वापराची मर्यादा कधीच उलटून गेली होती. स्टिकरवर छापलेली वस्तु वापराची मर्यादा फेब्रुवारी, 08 ही उलटून गेल्यावर देखील सा.वाले फुड बाझार यांनी ही वस्तु म्हणजे कॉफीचा डब्बा विक्रीसाठी आपल्या दुकानात ठेवला व 15 मार्च, 2008 रोजी तो डंब्बा तक्रारदारांना विक्री केला. 10. प्रस्तुतच्या डंब्यामध्ये इन्स्टंट कॉफी भरण्यात आलेली आहे असे डंब्यातील माहितीवरुन व मजकूरावरुन दिसते. खाद्य पदार्थ वापराची मर्यादा संपल्यानंतर तो पदार्थ ग्राहकांनी वापरल्यास किंवा त्याचा उपभोग घेतल्यास निच्छितच त्या वापरापासुन किंवा उपभोगापासून ग्राहकांना इजा,दुखापत, आजार निर्माण होण्याची शक्यता असते. या वरुन असे दिसते की, Pegusus Import Mumbai या कंपनीने सा.वाले यांना प्रस्तुतचा कॉफीचा डंब्बा विक्री केला व त्याची वस्तु वापराची मर्यादा उलटून गेल्यावरही सा.वाले यांनी तो विक्रीकामी ठेवला व प्रत्यक्षात तक्रारदारांना विक्री केला. या सर्व बाबीवरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना खाद्य पदार्थ म्हणून वापरण्यास अयोग्य असलेल्या वस्तु दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवल्या, त्या खाण्यास व वापरास योग्य आहेत अशी चूकीची माहिती दिली, तक्रारदारांनी दिशाभूल केली व अयोग्य खाद्य पदार्थ वापरास योग्य आहेत असे दर्शवून त्यावर स्वतःचे स्टीकर छापून ग्राहकांची दिशाभूल केली हया बाबी सिध्द करतात. या वरुन सा.वाले यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2(8) मधील उप कलम (i) (ii) (iii) (vii) (x) याचा भंग केला असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. त्याचप्रमाणे सा.वाले यांनी मुदत संपल्यानंतर कॉफीच्या डंब्याची विक्री करुन 2 R (4) चा भंग केला असा निष्कर्ष काढावा लागतो. 11. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांना काही नोटीस दिली नाही किंवा सा.वाले यांचेकडे तक्रार केली केलेली नाही. ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी उपभोक्ता/ग्राहकाने वस्तु विक्रेत्यास या प्रकरची नोटीस देण्याची आवश्यकता नाही. सबब त्या मुद्यामध्ये काही तथ्य नाही असे दिसून येते. 12. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराने सा.वाले यांचेकडून 5 हजार नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सा.वाले यांनी वरील अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व पुराव्याचा अवाका लक्षात घेता सा.वाले यांनी तक्रारदारांना 5 हजार रुपये नुकसान भरपाई देणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे. 13. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी वरील अनुचित व्यापारी प्रथेचा वापर सदोष वस्तु विक्री व ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होणारे खाद्य वस्तु विक्री करणे या प्रकारच्या गंभीर चुका सा.वाले यांनी केलेल्या आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 14 (1) चे परंतुक 1 प्रमाणे जिल्हा ग्राहक मंचास दंडात्मक नुकसान भरपाई द्यावयाचे अधिकार आहेत. त्या तरतुदीचा वापर प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये करणे योग्य राहील असे मंचाचे मत झालेले आहे. प्रस्तुतच्या तक्रारदाराने जागरुकता दाखवून मंचापुढे तक्रार केली तसेच अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार केली. परंतु दरम्यान अनेक ग्राहकांचे/उपभोक्त्यांचे वापरात प्रस्तुतची कॉफी वापरण्यात आली असेल व त्याचे सेवन त्यांनी केल्यामुळे त्या ग्राहकांना/उपभोक्त्यांना शारिरीक तक्रारी किंवा आजार उदभवले असतील. तथापी त्या स्वरुपाचे उपभोक्ते किंवा ग्राहक याची मोजदाद करणे प्रस्तुतचे तक्रारीमध्ये शक्य नसल्याने कलम 14(1) bh याचा वापर करुन सा.वाले यांनी प्रस्तुतच्या मंचाकडे नुकसान भरपाईपोटी ज्यादा रक्क्म रु.25,000/- जमा करावेत, ती रक्कम सा.वाले यांनी जमा केल्यास ती ग्राहक कल्याण निधी मध्ये जमा करण्यात यावी असाही आदेश देणे योग्य राहीन असेही मंचाचे मत झाले आहे. 12. वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 173/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईदाखल रु.5000/- अदा करावेत व त्या व्यतिरिक्त तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.3000/- अदा करावेत. 3. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी दंडात्मक नुकसान भरपाईबद्दल रु.25,000/- प्रस्तुतच्या मंचाकडे जमा करावेत व सामनेवाले यांनी ती रक्कम रु.25,000/- जमा केल्यास प्रबंधक यांनी ती रक्कम ग्राहक कल्याण निधी मध्ये जमा करावी. 4. प्रबंधक यांनी वरील रक्कम वसुली होणेकामी योग्य ती कार्यवाही करावी. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |