न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केली आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार ही सहकारी बँक असून श्री.दत्तात्रय सोपानराव शिंदे हे सदर बँकेचे वसुली अधिकारी आहेत. जाबदार कंपनी ही प्रामुख्याने ज्यूट बॅग बनविणेचा व्यवसाय करते. जाबदार कंपनीचे प्रोप्रायटर श्री.मेहूल हे आहेत. तक्रारदारांनी बँकेच्या सभासदाना भेट देणेसाठी ज्यूट बॅगांची आवश्यकता होती, त्यामुळे तक्रारदारानी त्या स्वरुपाच्या निविदा ज्यूट बॅगा तयार करणा-या कंपन्यांकडून मागविल्या. जाबदार कंपनी ज्यूट बॅग बनविणेचा व्यवसाय करते. त्यांचेतर्फे माहितगार इसम श्री.मेहूल यानी तक्रारदारांशी संपर्क साधला व तक्रारदार बँकेस त्यांची आवश्यकता व मागणीनुसार कोटेशन दिले. सदर कोटेशन तपासून त्याबाबत जाबदारांशी सल्लामसलत करुन जाबदाराने दिलेले कोटेशन काही अटी व शर्तीवर तक्रारदारानी मान्य केले व तक्रारदाराने जाबदारांना ज्यूट बॅग देणेकरिता दि.17-7-2012 रोजी पर्चेस ऑर्डर दिली. सदर ऑर्डर देतेवेळी तक्रारदार व जाबदारांमध्ये दि.17-2-2012 रोजी दिलेल्या पर्चेस ऑर्डरप्रमाणे काही अटी व शर्ती ठरलेल्या होत्या. त्यावर तक्रारदारांचा शिक्का व व्यवस्थापकांची सही आहे. सदर पर्चेस ऑर्डर जाबदारांनी स्विकारली असून सदर ऑर्डर स्विकारलेबाबत मेल जाबदारानी तक्रारदारांना केला आहे. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत. करारातील ठरलेल्या अटी व शर्तीनुसार जाबदारानी सदर ज्यूट बॅगा सर्व करांसहित (विक्रीदार,जकात) आणि लेवी फ्रेट, फॉरवर्डिंग चार्जेससह तक्रारदारांचे ऑफिसवर कोणताही जादा खर्च न करता दि.30-7-2012 पर्यंत देणेच्या होत्या. पर्चेस ऑर्डरप्रमाणे बॅगांची किंमत रक्कम रु.68,512/- (अडुसष्ठ हजार पाचशे बारा मात्र) होती. पर्चेस ऑर्डरमध्ये ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी जाबदारांचे चालू खाते क्र.8711168293 या खात्यावर दि.18-7-2012 बँक ऑफ बडौदा या बँकेमधून आर.टी.जी.एस.ने रक्कम रु.34,256/- जमा केलेले आहेत. त्यानंतर उर्वरित रक्कम रु.34,256/- दि.30-7-2012 आर.टी.जी.एस.ने जाबदाराचे चालू खात्यावर जमा केलेली आहे. करारात ठरलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदारांना सर्व रक्कम अदा केली आहे. जाबदाराने दि.30-7-2012 पूर्वी देणेच्या होत्या परंतु जाबदाराने दि.31-7-2012 रोजीच्या बील क्र.214 ने ते दि.5-8-2012 रोजी तक्रारदाराचे कार्यालयात मिळाल्या आहेत. जाबदाराने प्रस्तुत सर्व बॅगा सर्व करांसहित रक्कम रु.68,512/- एवढया रकमेस तक्रारदाराचे कार्यालयात पोहोच करावयाच्या होत्या, परंतु जाबदाराने वरील मुदतीत बॅगा पाठविल्या नाहीत, तसेच जाबदारांनी गती लि. या मालवाहतूक करणा-या कंपनीमार्फत कोल्हापूर येथे पाठवल्या. कोल्हापूर पर्यंतचे मालाचे भाडे रक्कम रु.20,100/- तसेच कोल्हापूर पासून सातारा येथे तक्रारदाराचे कार्यालयात बॅगा पोहोचवणेसाठी ट्रान्स्पोर्ट चार्जेस रु.3,351/- गती लि. या कंपनीस देणे भाग पडले. तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान झालेल्या करारानुसार सर्व खर्चाची जबाबदारी जाबदारांची होती परंतु जाबदारांनी मालाचा वाहतूक खर्च व गाडीभाडे याची रक्कम नाहकच सोसावी लागली आहे. तक्रारदाराने याबाबत ईमेलने जाबदाराकडे वाहतूक खर्चाची रक्कम रु.20,100/- व गाडीभाडे रक्कम रु.3,351/- ची मागणी केली तसेच जाबदाराला तक्रारदारानी फोन केला असता जाबदार जाणुनबुजून फोन घेत नाहीत. तक्रारदाराने जाबदाराना नोटीस पाठवली तरीही जाबदाराने सदर नोटीसीला उत्तरही दिले नाही. जाबदार हे करारात ठरलेल्या अटीप्रमाणे वागले नाहीत व तक्रारदारास देय असणा-या सेवेत जाबदारानी त्रुटी केली आहे, त्यामुळे तक्रारदाराला नाहक आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला आहे. सबब तक्रारदाराने आर्थिक नुकसान भरुन मिळणेसाठी सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून वाहतूक खर्च व गाडीभाडे याची रक्कम रु.23,451/- वसूल होऊन मिळावेत, सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्के व्याज मिळावे, जाबदाराने मुदतीत बॅगा न पाठविलेने तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत, तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत, अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केलेली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/14 कडे अनुक्रमे तक्रारदाराना अन्य कंपन्यांची आलेली कोटेशन्स, जाबदाराने तक्रारदाराला पाठवलेला कोटेशनचा मेल, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली पर्चेस ऑर्डर, पर्चेस ऑर्डरप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराला मालाची रक्कम अदा केलेल्या बँकेचे आर.टी.जी.एस.चे रेकॉर्ड, जाबदाराने तक्रारदाराना पाठवलेल्या मालाचे बील व चलन, तक्रारदाराने गती लि. याना दिलेल्या वाहतुकीचे दयावे लागलेल्या रकमेची रिसीट व बील, तक्रारदाराने दिलेल्या वाहतूक खर्चाचे बील व रिसीट, तक्रारदाराने वाहतूक खर्च परत मिळणेसाठी जाबदाराना पाठवलेले रिमाईंडर लेटर मेल, तक्रारदाराने वकीलांतर्फे जाबदाराना पाठवलेली नोटीस, तक्रार दाखल करणेचे अधिकारपत्र, नि.6/1 कडे जाबदाराला मे.मंचातर्फे पाठवलेली नोटीस रिफ्यूज्ड शे-याने परत आलेली नोटीस, नि.7 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.8 चे कागदयादीसोबत नि.8/1 कडे संचालक मंडळाचा ठराव, नि.9 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केलेली आहेत.
4. सदर कामी जाबदारानी तक्रारअर्जाची नोटीस घेणेस नकार दिल्याने नोटीस रिफ्यूज्ड शे-याने मे.मंचात परत आली आहे. सदर नोटीसीचा लखोटा नि.67 कडे दाखल आहे. सदर कामी जाबदार मे.मंचात हजर राहिले नाहीत व म्हणणेही दाखल केले नाही सबब जाबदारांविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आला आहे. जाबदाराने तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. सदर कामी तक्रारदाराने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे.मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी ज्यूट बॅगा सभासदांना वाटणेसाठी मोठया संख्येने हव्या असल्याने विविध बॅग उत्पादकांकडून निविदा मागविल्या होत्या. पैकी जाबदारांचे ज्यूट बॅगांचे दर योग्य वाटलेने तक्रारदाराने जाबदारांना पर्चेस ऑडर दिली. सदर पर्चेस ऑर्डर तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/4 कडे दाखल केली आहे. ठरलेल्या किमतीपैकी रक्कम रु.34,256/-(रु.चौतीस हजार दोनशे छप्पन्न मात्र) जाबदाराचे चालू खाते क्र.8711168293 आर.डी.जी.एस.ने जमा केले आहेत तसेच तक्रारदाराने जाबदाराला ज्यूट बॅगांची पर्चेस ऑर्डर दिली आहे. त्यामध्ये अटी नमूद आहेत तसेच तक्रारदाराने वाहतुकीचे बिल ट्रान्स्पोर्ट चार्जेस भरलेचे गती लि.ची बिले मे.मंचात दाखल आहेत. भरलेल्या रकमेची चलने दाखल आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदारांमध्ये करार झाला होता व तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत हे निर्विवादरित्या सिध्द होते. तसेच जाबदाराने वेळेत बॅगा पाठविल्या नाहीत तसेच वाहतूक खर्च व टॅक्ससहित बीले तक्रारदारास भरावी लागली. वास्तविक सर्व खर्चासहित बॅगा पोहोच करणेचे करारात नमूद असतानाही जाबदाराने बॅगा वेळेवर पोहोच केल्या नाहीत तसेच प्रस्तुत बॅगांचा ट्रान्स्पोर्ट खर्च रक्कम रु.20,100/- तसेच कोल्हापूर ते सातारा येथे बॅगा आणणेसाठी रक्कम रु.3,351/- एवढी रक्कम तक्रारदारानाच भरावी लागली त्यामुळे सदरची रक्कम रु.23,451/- जाबदाराकडून परत मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने जाबदाराकडे ईमेल करुन तसेच नोटीस पाठवून केली आहे. तरीही जाबदाराने सदर नोटिसीला उत्तर दिले नाही व तक्रारदाराला रक्कमही अदा केली नाही. तक्रारदार व जाबदारांमध्ये झालेल्या कराराप्रमाणे जाबदार वागले नाहीत व अटींची पूर्तता जाबदारानी केली नाही हे दाखल कागदपत्रांवरुन व तक्रारदाराचे पुराव्यावरुन व युक्तीवादावरुन सिध्द होते. जाबदाराने तक्रारदाराचे अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही म्हणजेच जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे ही बाब निर्विवाद सत्य आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दे व विवेचन तसेच तक्रारदाराचा पुरावा व युक्तीवाद, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरवलेचे स्पष्ट व सिध्द होते आहे. त्यामुळे जाबदारानी तक्रारदारास एकूण रक्कम रु.23,451/- व्याजासह अदा करणे, तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- अदा करणे न्यायोचित होणार आहे असे मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब आम्ही सदर कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदाराना जाबदारानी रक्कम रु.23,451/-(रु.तेवीस हजार चारशे एक्कावन्न मात्र) अदा करावेत.
सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत जाबदाराने तक्रारदारास द.सा.द.शे.9 टक्के व्याजाची रक्कम अदा करावी.
3. जाबदाराने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व अर्जाचा खर्च म्हणून रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून जाबदारानी 45 दिवसात करावयाचे आहे.
5. आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.16-4-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.