मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 12/05/2011) 1. तक्रारकर्त्यांनी ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 1 हे मोबाईल निर्माता, गैरअर्जदार क्र. 2 हे दुरुस्ती केंद्र व गैरअर्जदार क्र. 3 हे विक्रेते असून, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार क्र. 3 कडून फ्लाय मोबाईल मॉडेल क्र.DS440, रु.8,400/- रोख देऊन दि.27.10.2010 ला भ्रमणध्वनी विकत घेतला. या भ्रमणध्वनीची सहा महिन्यांची हमी देण्यात आली होती. परंतू हमी कालावधीत त्यात दोष निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने निवारण करण्याकरीता गैरअर्जदार क्र. 3 कडे गेला असता त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठवले व त्यांनी दुरुस्तीकरीता सदर भ्रमणध्वनी ठेवून घेतला. दुरुस्तीनंतर भ्रमणध्वनी परत दिला. परंतू परत त्यामध्ये दोष निर्माण झाल्याने सदर भ्रमणध्वनी व सिम कार्ड गैरअर्जदार क्र. 2 च्या कर्मचा-याने दि.30.06.2010 रोजी ठेवून घेतला आणि शेवटी तो परत केला नाही. विचारणा केली असता चेन्नई येथे दुरुस्तीकरीता पाठविला असल्याचे सांगितले. भ्रमणध्वनीची मागणी करुनही तो न दिल्याने कायदेशीर नोटीस देण्यात आली. परंतू त्यांचेतर्फे उत्तर देण्यात आले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करुन, तीद्वारे नविन भ्रमणध्वनी मिळावा किंवा त्यांची किंमत मिळावी, नुकसानीबाबत रु.50,000/- मिळावे व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीदाखल एकूण 7 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना देण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर हजरही झाले नाही, म्हणून मंचाने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. गैरअर्जदारांनी हजर होऊन आपले म्हणणे मांडले नाही व कोणत्याही प्रकारे बाजू मांडली नाही. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख व दाखल दस्तऐवज यावरुन त्यांनी तक्रार सिध्द केलेली आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्यांचा भ्रमणध्वनी दुरुस्तीकरीता ठेवून घेऊन तो त्यांनी शेवटपर्यंत दुरुस्त करुन दिलेला नाही आणि परतही केलेला नाही. हीच गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला भ्रमणध्वनी किंमत रु.8,400/- आणि ती वर दि.30.06.2010 पासून अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी, न पेक्षा द.सा.द.शे.12 व्याज द्यावे लागेल. 3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत संयुक्तपणे किंवा एकलपणे करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |