न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प. कंपनीचे कार्यालय बेंगलोर येथे असून त्यांचा ऑनलाईन वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. दि. 17/3/18 रोजी तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून ऑर्डर नं. ओडी 21115799443975000 ने ऑनलाईन जेएम 20 x 50 पॉवरफुल प्रिझम, 60 एम एम ब्लॅक ही दुर्बिण खरेदी केलेली आहे. सदर दुर्बिणीची किंमत रु. 1,866/- इतकी दिली. परंतु सदरची दुर्बिण तक्रारदारास अयोग्य वाटलेने त्यांनी वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दुर्बिण बदलून देतो असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात दुर्बिण बदलून दिलेली नाही. सदर वस्तूच्या उपभोगापासून तक्रारदाराला दि. 22/3/18 पासून वंचित रहावे लागले आहे. मागणीप्रमाणे वस्तू विक्री न करता हलक्या प्रतीची व आरोग्यास अपायकारक वस्तूंची विक्री करुन वि.प. हे स्वतःचा फायदा करुन घेत आहेत. म्हणून तक्रारदारने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, वि.प. यांचेकडून दुर्बिणीची रक्कम रु. 1,866/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, आर्थिक नुकसानीपोटी रु. 5,000/-, वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहिल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी रु. 20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 2,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट व कागदयादी तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेला मेल, वि.प. यांचे बिल, वि.प.कंपनीने वेबसाईटवर पाठविलेल्या वस्तूंची किंमत, वि.प.कंपनीने तक्रारदारास पाठविलेला मेल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. यांनी दि.20/8/18 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेनिहाय नाकारली आहे. वि.प.क्र.1 हे www.flipkart.com या वेबसाईटमार्फत व्यवसाय करतात. वि.प.क.1 हे कलम 2(1)() वे Information Technology Act 2000 प्रमाणे intermediary आहेत Sec. 79 Information Technology Act 2000 प्रमाणे वि.प.क्र.1 हे जबाबदार रहात नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचे ग्राहक नाहीत. वि.प.क्र.1 हे ऑनलाईन market place/intermediary असून वि.प.क्र.1 यांचेकडे सदरच्या वस्तू विक्रेते देतात. सदरचे विक्रेत्यांच्या ऑफर नुसार सदरची विक्री केली जाते. त्यामध्ये वि.प.क्र.1 यांचा कोणताही सहभाग नसतो. त्याकारणाने तक्रारदार यांनी सदरची खोटी, चुकीची तक्रार वि.प.क्र.1 यांचेविरुध्द दाखल केलेली असलेने सदरचे तक्रारीस misjoinder of necessary party या तत्वाची बाधा येत असलेने ती नामंजूर करणेत यावी. वि.प.क्र.1 व तक्रारदार यांचेमध्ये privity of contract नसल्याने सदरची तक्रार चालण्यास अपात्र आहे. तक्रारदाराचे तक्रारीचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सदरचे दुर्बिणीचा वापर केल्यानंतर सदरचे दुर्बिणीत दोष असलेचे कथन केले आहे. सदरची बाब सदरची दुर्बिण विक्री झालेनंतर घडलेली असलेने सदरच्या दुर्बिणीत असलेल्या उत्पादित दोषांची जबाबदारी उत्पादकावर (manufacturer) आणि ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरवर आहे. त्यातील दोषासाठी वि.प. हे जबाबदार नाहीत. तक्रारदार यांनी सदरचे दुर्बिणीत कशा प्रकारे दोष आहेत हे स्पष्ट केलेले नाही. तक्रारदाराने Helpline नंबरला कॉलचे अनुषंगाने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वि.प.क्र.1 ही उत्पादित कंपनी नसलेमुळे सदरचे दुर्बिणमध्ये दोष किंवा उत्पादित दोष होता याचे वि.प. यांना ज्ञान (knowledge) नाही. सबब, वि.प.क्र.1 हे तक्रारदार यांना कोणतीही नुकसान भरपाईची रक्कम देणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत यावी असे वि.प. यांनी कथन केले आहे.
4. वि.प. यांनी याकामी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
विवेचन –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी वि.प. यांचा ऑनलाईन विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. सदर वि.प. कंपनी वस्तूंची ऑनलाईन इंटरनेटद्वारे विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तक्रारदार यांनी ता. 22/3/18 रोजी वि.प. कंपनी यांचेकडून दुर्बिण खरेदी केलेली आहे. तथापि वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये वि.प.क्र.1 हे www.flipkart.com या वेबसाईट मार्फत व्यवसाय करतात. वि.प. हे intermediary असून सदरच्या वस्तू विक्रेते वि.प. यांचेकडे देतात. सदरचे विक्रेत्यामार्फत वि.प. हे सदरच्या वस्तू विकतात. त्यामध्ये वि.प. यांचा कोणताही सहभाग नसतो. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता ता. 17/3/18 रोजी वि.प. कंपनीचे वेबसाईटवरुन तक्रारदार यांना पाठविलेल्या वस्तूची किंमत दाखल आहे. त्यानुसार तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी दि. 17/3/18 रोजी वि.प. यांचेकडून ओडी 21115799443975000 या ऑर्डरने ऑनलाईन जेएम 20 x 50 पॉवरफुल प्रिझम, 60 एम एम ब्लॅक ही दुर्बिण मागविलेली होती असे कथन केले आहे. सदरची बाब वि.प यांनी नाकारलेली नाही. अ.क्र.2 ला वि.प.कंपनी यांनी तक्रारदार यांना ता. 22/3/18 रोजीचे बिल दिलेची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे बिलाचे अवलोकन करता वि.प. कंपनी यांनी तक्रारदार यांचे ईमेल आयडीवर ता. 22/3/18 रोजीचे सदरचे दुर्बिणीचे बिल पाठविले आहे. सदरे पावतीवर रक्कम रु.1,866/- नमूद आहे. तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता, तक्रारदार यांना ता. 22/3/18 रोजी एकार्ट प्रा.लि. या कुरिअर कंपनीकडून तक्रारदारांचे घरी वि.प. कंपनीने पाठविलेली दुर्बिण सदर दुर्बिणीची एकूण किंमत र.1,866/- एकार्ट कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधीला रोख स्वरुपात सदरची रक्कम दिली. सदरची रक्कम वि.प. कंपनीने स्वीकारलेचे वि.प. यांनी नाकारलेले नाही. सदरचे पुराव्याचे शपथपत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, सदर बाबीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून सदरची दुर्बिण खरेदी केली. तथापि ती पडताळून पाहिली असता ती अयोग्य वाटली व त्याबाबत वि.प. कंपनी यांचे Customer care फोन 18002089898 ला फोन करुन तक्रार सांगितली असता, वि.प. कंपनीचे प्रतिनिधीने सदरची दुर्बिण बदलून देतो असे सांगितले पण प्रत्यक्षात बदलून दिली नाही. सबब, वि.प. कंपनी यांनी तक्रारदार यांना अयोग्य दुर्बिण देवून तसेच अद्याप सदरची सदोष दुर्बिण बदलून न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे व पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता वि.प. कंपनी यांनी पाठविलेल्या बॉक्समध्ये तक्रारदार यांनी ऑर्डर केलेली जेएम 20 x 50 पॉवरफुल प्रिझम, 60 एम एम ब्लॅक ही दुर्बिण नसून त्याठिकाणी वेगळयाच म्हणजेच एक्सपिडीशन एक्सपर्टस या कंपनीची खराब अवस्थेत असलेली दुर्बिण तक्रारदार यांना मिळालेचे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. तसेच सदरची दुर्बिण कमी रेंजची दोन्ही डोळयामध्ये असमानता दाखविणारी अशी असलेने तक्रारदार याने सदरची दुर्बिण बदलून मिळावी याकरिता वि.प. कंपनीस त्यांचे मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे विनंती केली. त्यानुसार ता. 27/3/18 रोजी तक्रारदार यांची सदर विनंती मान्य केलेचा ई-मेल वि.प. कंपनीकडून तक्रारदार यांना मिळालेला आहे. तसेच वरील सर्व बाबी पडताळून पाहिल्यावर तक्रारदार यांनी वि.प. कंपनीस ई-मेलद्वारे CSC flipkart.com चा ईमेल आयडी ता. 20/4/18 रोजी मेल पाठविला. त्यानुसार वि.प. कंपनी यांनी We assure you that we will resolve your problem असा ई-मेल तक्रारदार यांना पाठविलेला आहे. सदरचे ईमेलचे झेरॉक्सप्रती तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या आहेत. सदरचे ई-मेल वि.प. कंपनी यांनी नाकारलेले नाहीत.
8. वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये सदरच्या दुर्बिणला असलेल्या उत्पादित दोषांची जबाबदारी उत्पादकांवर आणि ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरवर आहे. त्यातील दोषांसाठी वि.प. हे जबाबदार नाहीत असे वि.प. यांनी कथन केले आहे. तथापि सदरचे तक्रारीचे अवलोकन करता तक्रारदार यांनी मागणी केलेल्या कंपनीची सदरची दुर्बिण नसून ती वेगळयाच म्हणजेच एक्सपिडीशन एक्सपर्टस या कंपनीची खराब अवस्थेतील दुर्बिण तक्रारदार यांना वि.प. कंपनीकडून मिळालेली आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी ऑनलाईनद्वारे सदर वि.प. कंपनीकडे ज्या कंपनीची दुर्बिणची मागणी केलेली होती, त्याच कंपनीची दुर्बिण सुस्थितीत तक्रारदार यांना देणे वि.प. कंपनी यांचेवर बंधनकारक होते. तक्रारदार याने ता. 23/4/18 रोजी रजि. ए.डी.ने वि.प. कंपनीस स्मरणपत्र पाठविले आहे. सदरचे स्मरणपत्र वि.प. कंपनी यांनी स्वीकारलेले नसलेमुळे परत आले. सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन वि.प. कंपनी यांनी तक्रारदार यांचेकडून सदर दुर्बिणीचा मोबदला स्वीकारुन देखील तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे केलेल्या कंपनीची दुर्बिण न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरची सदोष दुर्बिण वि.प. यांना परत करुन दुर्बिणची रक्कम रु. 1,866/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 08/06/18 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे दुर्बिण न देवून वि.प. यांनी सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून सदोष जेएम 20 x 50 पॉवरफुल प्रिझम, 60 एम एम ब्लॅक ही दुर्बिण स्वीकारुन तक्रारदार यांना सदर सदोष दुर्बिणीची खरेदीची रक्कम रु.1,866/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 08/06/2018 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|