न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार क्र. 1 कंपनीची फियाट पुंटो या मॉडेलची कार (Fiat Punto Emotion PK) ही दि.1/12/2011 रोजी सातारा येथील कंपनीचे अधिकृत विक्रेते जाबदार क्र. 2 हेम मोटर्स यांचेकडून खरेदी केली. प्रस्तुत कार खरेदी केलेनंतर त्यामध्ये वारंवार बिघाड निर्माण होत असलेने प्रस्तुत वाहन जाबदार क्र. 2 यांचेकडे वारंवार दुरुस्तीसाठी दाखल केली होती. परंतु प्रस्तुत कार ही वारंवार जाबदार क्र. 2 यांचेकडून दुरुस्त करुन घेऊनही प्रस्तुत कारमधील बिघाड/दोष पूर्णपणे निघाला नाही, वाहन पूर्ण दुरुस्त झाले नसलेने तक्रारदाराने जाबदार यांना फोनवरुन व ई-मेल करुन कळविले होते परंतू जाबदाराने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार यांचे वाहनात असलेले दोष हे दुरुस्त न होणारे दोष असून ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत व सदरचे झालेले बिघाड हे दुरुस्त करुन देण्यास जाबदार क्र. 2 ने असमर्थता दाखवली आहे. प्रस्तुत वाहनातील बिघाड हे निर्मीती/उत्पादन दोष (Manufacturing Defect) आहेत. त्यामुळे प्रस्तुत सदोष वाहन जाबदारांनी तक्रारदाराला विक्री केलेले अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब जाबदार यांनी केला आहे व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून सदरचे सदोष वाहन बदलून दुसरे नवीन वाहन प्रत्यक्ष बदलून तक्रारदाराला मिळेपर्यंत दरमहा रक्कम रु.15,000/- प्रमाणे आजअखेरची रक्कम रु.1,65,000/- नुकसानभरपाई मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,50,000/- जाबदाराकडून मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.25,000/- जाबदारकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/5 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे गाडीचे डिलीव्हरी चलन, गाडी खरेदीची पावती, तक्रारदाराच्या गाडीच्या टॅक्स भरलेल्या पावत्या, राठोड मोटर्स यांनी दिलेला गाडी तपासणीचा अहवाल, तक्रारदाराने जाबदार यांना पाठवलेली नोटीस व पोष्टाच्या पावत्या, पोहोचपावत्या, नि.20 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 22 कडे वाहनाची तपासणी करणारे तज्ञ यांचे अँफीडेव्हीट, नि.28 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 यांना नोटीस लागू होऊनही ते मे. मंचात हजर राहीले नाहीत. तसेच तक्रार अर्जास कोणतेही म्हणणे जाबदार क्र. 1 यांनी दाखल केलेले नाही. सबब जाबदार क्र. 1 विरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारित झालेला आहे. तसेच जाबदार क्र. 2 यांनी त्यांचेविरुध्द झालेला ‘म्हणणे नाही’ आदेश रद्द करुन घेवून नि. 16 कडे त्यांचे म्हणणे/कैफीयत दाखल केली आहे. तसेच नि.17 कडे अँफीडेव्हीट दाखल केले आहे. त्याचप्रमाणे जाबदार क्र. 2 ने नि. 18 चे कागदयादीसोबत नि. 18/1 ते नि.18/8 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडे रक्कम जमा केलेल्या पावत्या, टॅक्स इनव्हाईस, सर्व्हीस हिस्ट्री, टिपण नि. 21 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 24 कडे शपथपत्र, नि. 25 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 26 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि. 27 कडे पुराव्याचे शपथपत्र, म्हणणे, कागदपत्रे हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसिस, नि.29 कडे जाबदार क्र. 2 हे सध्या जाबदार क्र. 1 चे अधिकृत विक्रेते म्हणून काम पाहत नाही. दि. 1/4/2013 पासून जाबदार क्र.1 ची अधिकृत विक्रेते म्हणून केलेली जाबदार क्र. 2 ची नेमणूक रद्द केली आहे अशी पुरसिस वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 2 ने याकामी दाखल केले आहेत.
जाबदार क्र. 2 ने त्यांचे म्हणणे/कैफीयतमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढील आक्षेप नोंदविलेले आहेत.
i तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडून जाबदार क्र. 1 कंपनीची “फियाट पुंटो” ही कार दि.1/12/2011 रोजी खरेदी केली हा मजकूर बरोबर आहे. इतर सर्व मजकूर खोटा व लबाडीचा आहे तो मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने जाबदाराला नाहक त्रास देणेसाठी व जाबदाराचे पैसे बुडविण्याच्या हेतूने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
ii तक्रारदाराने अर्जात नमूद केलेल्या तक्रारी या तथाकथीत आहेत त्या जाबदाराला मान्य नाहीत.
iii प्रस्तुत जाबदार यांचेकडे तक्रारदाराचे वाहन ज्या-ज्या वेळी दुरुस्तीसाठी व सर्व्हीसिंगसाठी आले त्या-त्या वेळी सदर जाबदाराने वाहनाचे व्यवस्थीत सर्व्हीसींग करुन दिले आहे. तक्रारदाराने खात्री करुनच प्रत्येकवेळी वाहन ताब्यात घेतले आहे. आजमितीस प्रस्तुत तक्रारदाराचे वाहन चालू स्थितीत आहे व प्रस्तुत वाहनाचा उपभोग तक्रारदार व्यवस्थीतरित्या घेत आहेत. जाबदाराने प्रस्तुत वाहनाबाबत कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब केलेला नाही. तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळणेस पात्र नव्हते व नाहीत. तक्रारदाराने प्रस्तुत कार ही कंपनीने दिले मॅन्यूअलप्रमाणे वापरलेली नाही व दिले तारखांना वेळचेवेळी सर्व्हीसींग करुन घेतलेले नाही. यावरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा दिसून येतो. तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळेच काही पार्टस बदलावे लागणार होते ही कल्पना जाबदाराने तक्रारदाराला दिली होती. परंतू तक्रारदारालाच सदर पार्टसची रक्कम भरावी लागणार होती. प्रस्तुत रक्कम जाबदाराने तक्रारदाराकडे मागणी केलेमुळे तक्रारदारने सदर तक्रार दाखल केली आहे.
iv तक्रारदाराने याकामी तज्ञांचा अहवाल दाखल केला नाही. ज्या व्यक्तीचे अँफीडेव्हीट तज्ञ म्हणून दाखल केले आहे ती व्यक्ती त्याबाबतीत तज्ञ असलेचा कोणताही पुरावा मे मंचात दाखल नाही. त्यामुळे प्रस्तुत तज्ञांचे अँफीडेव्हीट पुराव्यात वाचणे योग्य होणार नाही.
प्रस्तुत जाबदार क्र. 2 ने कोणतीही सेवात्रुटी तक्रारदाराला दिलेली नाही. तसेच वादाकरीता सदर वाहनात काही दोष आहेत असे मानलेस प्रस्तुत वाहन बदलून देणेची जबाबदारी ही जाबदार क्र. 2 ची नाही व नव्हती. त्यामुळे जाबदार क्र. 2 विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती जाबदार क्र. 2 ने केली आहे असे म्हणणे जाबदार क्र. 2 ने दाखल केले आहे.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 हे नोटीस लागू होवूनही मे मंचात गैरहजर राहीले असलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झाला आहे. जाबदार क्र. 1 ने तक्रार अर्जास म्हणणे दिलेले नाही व तक्रार अर्जातील तक्रारदाराचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही त्यामुळे जाबदार क्र. 1 विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविणेत आले.
5. प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार क्र.2 यांनी दाखल केले म्हणणे, सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदार यांचे आहेत काय?- होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?- होय.
3. तक्रारदार हे जाबदार क्र. 1 यांचेकडून नवीन वाहन व
नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय? अंशतः होय
4. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहेत कारण- तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 कंपनीची फियाट पुंटो या मॉडेलची कार (Fiat Punto Emotion PK) ही दि. 1/12/2011 रोजी जाबदार क्र. 1 चे अधिकृत विक्रेते जाबदार क्र. 2 हेम मोटर्स यांचेकडून खरेदी केली आहे ही बाब जाबदार क्र. 2 ने मान्य व कबूल केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द होते. सबब आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कंपनीची फियाद पुंटो ही कार जाबदार क्र. 2 यांचेकडून दि.1/12/2011 रोजी खरेदी केली. परंतू खरेदी केलेनंतर थोडयाच दिवसात प्रस्तुत कारमध्ये बिघाड निर्माण होऊ लागले. बिघाड झालेनंतर तक्रारदाराने वारंवार प्रस्तुत कार जाबदार क्र. 2 यांचेकडे दुरुस्तीसाठी व सर्व्हीसिंगसाठी दाखल केली. प्रस्तुत सर्व्हीसींग व दुरुस्ती वारंवार करुनदेखील सदर कार मधील पूर्णतः दोष निघालेला नाही ती सदोषच आहे. तसेच प्रस्तुत कारमध्ये खालीलप्रमाणे दोष आढळून आले आहेत.
1. Airbag failure
2. Horn not working
3. A.C.Pipe Leakage
4. A weird sound when the A.C. is turned on
5. Lack of pickup when the A.C. is turned on
6. ABC/EBD failure &this message beeps frequently on the Digital
Tachometer
प्रस्तुत दोष सदर कारमध्ये असून सदरचे दोष हे निर्मीती दोष (Manufacturing defects) आहेत. याबाबत तक्रारदाराने त्यांची कार श्री. स्वप्नील बजरंग कदम या ऑटोमोबाईल इंजिनियर (मोटार मेकॅनिक) कडून तपासणी करुन घेतली असून प्रस्तुत वाहनात सदरचे दोष आढळून आले असून ते मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असलेचे प्रस्तुत स्वप्नील बजरंग कदम यांनी त्यांचे अँफीडेव्हीट नि. 22 कडे दाखल केले आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे. प्रस्तुत तज्ञ हा डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे हे त्यांनी दाखल केले फायनल इयरचे मार्कशिटवरुन स्पष्ट होते. प्रस्तुत अँफीडेव्हीटला किंवा तक्रारदाराचे तक्रार अर्जावर जाबदार क्र. 1 ने कोणतेही प्रतिअँफीडेव्हीट दिलेले नाही. तसेच जाबदार क्र. 1 यांनी तक्रार अर्जातील कोणताही मजकूर खोडून काढलेला नाही. तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांचेकडून कोणतीही मागणी केलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचे कंपनीची फियाट पुंटो ही कार खरेदी केली होती त्यामध्ये उत्पादन दोष Manufacturing Defects आहे असे म्हणावे लागेल व तक्रारदाराने केलेली कथने बरोबर आहेत असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला उत्पादन दोष असलेली सदरची कार विक्री करुन सदोष सेवा दिली आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. प्रस्तुत बाबतीत जाबदार क्र. 2 यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली असे म्हणता येणार नाही. मात्र जाबदार क्र. 1 यांना सदोष वाहनाची निर्मीती करुन व प्रस्तुत वाहनाची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे स्पष्ट होत आहे हे स्पष्ट होत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
8. वरील सर्व कारणमिमांसा विचारात घेता तक्रारदाराने प्रस्तुत फियाट पुंटो कार खरेदी करुन ती दोषपूर्ण असलेने व सदरचे दोष हे उत्पादन दोष Manufacturing defects असलेने दुरुस्ती होणेसारखे नाहीत, वारंवार दुरुस्तीस देऊनही प्रस्तुत कारमधील दोष बिघाड निघालेले नाहीत. सबब तक्रारदार हे त्यांचे प्रस्तुत सोष कारचे बदल्यात जाबदार क्र.1 यांचेकडून त्याच मॉडेलची नवीन कार मिळणेस पात्र आहेत. तसेच योग्य ती नुकसानभरपाई मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराचे ताब्यातील कार फियाट पुंटो याचा चेसी
नं.MCA 118ASE07035681 LMZ, तर इंजिन नं. 0190161 या कारचे
बदल्यात त्याच मॉडेलची नवीन कार तक्रारदार यांना अदा करावी/बदलून
द्यावी.
3. तक्रारदाराने त्याचे ताब्यात असलेली फियाट पुंटो ही वर कलम 2 मधील
वर्णनाची सदोष कारचा ताबा जाबदार क्र. 1 यांना द्यावा.
4. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 यांनी नुकसानभरपाई म्हणून रक्कम
रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) अदा करावेत.
5. तक्रारदारांना झाले मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी म्हणून
जाबदार क्र.1 यांनी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) तक्रारदाराला
अदा करावेत.
6. वरील जबाबदारीतून जाबदार क्र. 2 यांना वगळणेत येते.
7. वर नमूद सर्व आदेशाची पूर्तता जाबदार क्र. 1 यांनी आदेश पारीत
तारखेपासून 60 दिवसात करावी.
8. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार यांना जाबदार क्र. 1
विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची
प्रक्रिया करणेची मुभा राहील.
9. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
10. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 08-01-2016.
सौ.सुरेखा हजारे, श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.