(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 29 सप्टेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 व त्यांचे तिन्ही भागिदार यांनी विरुध्दपक्ष क्र.4 यांच्या मालकीचे मौजा- इसासनी येथील खसरा क्रमांक 116, प.ह.क्र. 46, सी/2007 या जमिनीविषयी करारनामा केला. सदर जमीन विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी पूर्णपणे कायदेशिररित्या विकसीत करुन प्लॉटची विक्री करण्याचे अधिकार विरुध्दपक्ष क्र.4 यांना विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी दिल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले. त्याकरीता विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांचेशी दिनांक 1.10.2008 रोजी प्लॉट क्र.2 ज्याचे क्षेञफळ 2206.62 चौ. फुट आहे व तो एकूण रुपये 9,26,780/- ला विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी विक्री करण्याचा सौदा पक्का केला.
2. त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना बयाणा रक्कम म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचा धनादेश क्रमांक 735736 दिनांक 6.10.2008 ला रुपये 2,52,939/- चा दिला असून त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास आपल्या सही शिक्यानिशी रितसर पावती दिली आहे, सदर पावती तक्रारीसोबत दस्त क्र.1 अन्वये जोडली आहे. परंतु, विरुध्दपक्ष क्र.3 यांनी करारनामा करतेवेळी हजर नसल्याने त्यावर स्वाक्षरी केली नाही. तक्रारकर्त्याने बयाणा राशीच्या स्वरुपात दिनांक 1.10.2008 रोजी रुपये 2,52,939/- दिले असल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे सदर करारनाम्यात उर्वरीत रक्कम रुपये 6,73,841/- पुढील 15 हप्त्यात रुपये 44,923/- प्रमाणे द्यावयाचे तक्रारकर्त्याने मान्य केले होते. परंतु, सदर करारनामा करतेवेळी विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याने पसंत केले व व्यवहार केलेल्या प्लॉट क्र.2 ऐवजी प्लॉट क्र.27 नमूद केला आहे. त्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास त्याबाबत विचारणा केली असता विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी प्लॉट क्र.2 यालाच नवीन प्लॉट क्र.27 देण्यात आल्याचे स्पष्ट केले व तक्रारकर्त्याने सुध्दा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून करारनाम्यावर स्वाक्षरी केली. सदर करारनामा तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत दस्त क्र.2 अन्वये जोडलेला आहे. तक्रारकर्त्याने नमूद केले की, विरुध्दपक्षाशी झालेल्या करारनाम्याप्रमाणे त्यानंतर जे-जे हप्ते भरले ते विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी स्विकारुन आपल्या सही व शिक्यानिशी रितसर पावती तक्रारकर्त्यास दिली असून त्या तक्रारीसोबत दस्त क्र.3, 4, 5, 6 व 7 नुसार जोडलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने नमूद केल्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी दिनांक 31.8.2010 रोजी दिलेल्या पावत्यावर प्लॉट क्रमांक 40 नमूद केला असून त्याबाबत तक्रारकर्त्याने त्यावेळी विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी विचारणा केली असता प्लॉट क्रमांक परत नवीन दिला असल्याचे त्यांनी तक्रारकर्त्यास सांगितले. परंतु, तक्रारकर्त्याने त्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर विरुध्दपक्षाने त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देवून तक्रारकर्त्याचे समाधान केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्लॉट क्र.2, प्लॉट क्र.27 व प्लॉट क्र.40 असे एकाच प्लॉटला स्वेच्छेने क्रमांक दिले असल्याचे तक्रारकर्त्याचे लक्षात आले. त्यामुळे विरुध्दपक्षाने आपल्या सेवेत अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. शेवटी तक्रारकर्ता असे नमूद करतो की, विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ताकडून त्यांना पसंत केलेल्या व करारनाम्यातील नमूद प्लॉट क्र.27 बाबत करारनाम्यातील अटी व शर्ती प्रमाणे प्रर्याप्त रक्कम दिली असल्याने सदर प्लॉटचे खरेदीखत कायदेशिर नोदंवून मोजणी करुन ताबा देण्याबाबत वेळोवेळी त्याचे कार्यालयात प्रत्यक्ष भेटून विनंती केली. तसेच काही रक्कम शिल्लक असल्यास नोंदणी करतेवेळी भरण्याची तयारी विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना दर्शविली होती. परंतु विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी उडवा-उडवीचे उत्तर देवून खरेदीखत नोंदवून देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे सरते शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाने दिनांक 15.4.2011 रोजी लेखी पञ दिले असून तक्रारीतील नमूद करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे प्लॉटचे खरेदीखत नोंदवून देण्याची विनंती केली. त्यावर सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी कुठलाही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिनांक 9.6.2011 रोजी विरुध्दपक्षाने पोलीस स्टेशन, नागपूर येथे रितसर तक्रार नोंदविली. सदर लेखीपञ व तक्रार दस्त क्र.8 व 9 अन्वये तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत जोडलेले आहे. यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे व सेवेत ञुटी केली आहे.
3. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीतील प्रार्थनेनुसार विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी वादातीत प्लॉटबाबत संपूर्ण मोबदला रक्कम स्विकारुन प्लॉटचे खरेदीखत तक्रारकर्त्यास दिले नसल्याने, तसेच सदर प्लॉटची कायदेशिर मोजणी करुन रितसर ताबा त्यांना देण्यात यावा. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी केलेल्या करारपञाप्रमाणे वादातील प्लॉटचे खरेदीखत कायदेशिररित्या नोदंवून कायदेशिर मोजणी करुन द्यावे व असे करण्यास विरुध्दपक्ष असमर्थ असल्यास सदर प्लॉटची आजच्या बाजार भावाप्रमाणे बाजारमुल्य तक्रारकर्त्यास द्यावे, असे आदेश करावे. तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 20,000/- मागितले आहे.
4. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.4 विरुध्द स्टेप्स घेण्यास ब-याच संधी मिळूनही कार्यवाही न केल्यामुळे विरुध्दपक्ष क्र.4 प्रकरणातून वगळण्याचा आदेश नि.क्र.1 वर दिनांक 8.8.2016 ला पारीत केला. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 ला मंचा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा पुढे चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 2.4.2012 ला पारीत केला.
5. तक्रारकर्त्याचे वकीलाचा मौखीक युक्तीवाद हर्ड. अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? : होय
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे विरुध्दपक्षास पैसे दिल्याचे दिसून येते.
अ.क्र. | प्लॉट क्रमांक | तारीख | दिलेली रक्कम | स्वरुप |
1. | 2 | 01.10.2008 | 2,52,939/- | धनादेशाव्दारे |
2. | 27 | 28.03.2009 | 60,000/- | रोख |
3. | 27 | 01.07.2009 | 2,60,000/- | डी.डी. व्दारे |
4. | 27 | 30.10.2009 | 20,000/- | रोख |
5. | 40 | 31.08.2010 | 75,000/- | रोख |
6. | 27 | 21.02.2011 | 2,36,337/- | डी.डी.व्दारे |
एकूण | 9,04,276/- | |
7. दस्त क्र.1 प्रमाणे दिनांक 1.10.2008 ला रुपये 2,52,939/-, धनादेश क्रमांक 735736. दस्त क्र.2 प्रमाणे करारनामा व नकाशची प्रत दाखल केली आहे. दस्त क्र.3 प्रमाणे रुपये 60,000/- दिनांक 28.3.2009 ला नगदी सही व शिक्यासह दिली आहो. दस्त क्र.4 प्रमाणे रुपये 2,60,000/’ दिनांक 1.7.2009 ला डी.डी.नं. 196839 प्रमाणे दिले असल्याचे नमूद आहे. दस्त क्र.5 प्रमाणे रुपये 20,000/- दिनांक 30.10.2009 ला नगदी दिलेले आहे. दस्त क्र.6 प्रमाणे रुपये 75,000/- वर प्लॉट क्र.40 नमूद करुन दिनांक 31.8.2010 ला नगदी दिलेले आहे. दस्त क्र.7 प्रमाणे रुपये 2,36,337/- डी.डी.नं.004405 दिनांक 21.2.2011 ला प्लॉट क्र.27 दिले असल्याचे नमूद आहे, असे एकूण रक्कम रुपये 9,04,276/- दिले आहे. तक्रारकर्त्यास करारनाम्याप्रमाणे रुपये 9,26,780/- भरावयाचे होते. परंतु तक्रारकर्त्याने रुपये 2,04,276/- चा भरणा केला होता व तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्ता वारंवार खरेदीखतासाठी विचारणा करुन सुध्दा विरुध्दपक्षाने आजतागायत खरेदीखत करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने त्याकरीता विरुध्दपक्षा सोबत पञव्यवहार केला व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुध्दा नोंदविली आहे. सदर दस्त क्र.8 व 9 वर दाखल आहे. यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्र.1, 2 व 3 यांनी सेवेत ञुटी केली आहे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे, त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास करारनाम्याप्रमाणे प्लॉट क्र.27 ज्याचे क्षेञफळ 2206.62 चौरस फुट चा कायदेशिररित्या खरेदीखत नोंदवून व मोजणी करुन द्यावे.
किंवा
विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 वरील आदेशाचे पालन करण्यास असमर्थ असल्यास सदर प्लॉटचे आजच्या रजिस्ट्रार नोंदणी कार्यालयातील नोंदणीकृत शासकीय मुल्यांकनाप्रमाणे बाजार मुल्य तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.4 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 29/09/2016