(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :25/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 28.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही फायनांस कंपनी असुन गैरअर्जदार क्र.2 हे त्यांचे सेलिंग एजंट आहेत. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यास कर्ज घेण्याकरता तगादा लावला व त्यामुळे त्याने गैरअर्जदारांकडून कर्ज घेतले. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्याला कार्यालयात बोलावले व को-या दस्तावेजांवर सह्या घेतल्या. तक्रारकर्त्याने असेही नमुद केले आहे की, दि.30.10.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 ने रु.3,50,000/- चे कर्ज मंजूरीचे पत्र दिले. सदर कर्ज ‘हुंडई ऐसेंट’ गाडी क्र.एम.एच. 31/सी.एन.2299 विकत घेण्याकरता देण्यांत आले होते. सदर वाहन राजधानी ऑटो डील, टेलिफोन एक्सचेंज चौक, सी.ए.रोड, नागपूर.(किशोरभाई) या ऑटो डीलरमार्फत घेण्याचे ठरविले होते व वाहनाची किंमत रु.3,90,000/- ठेवली होती. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने रु.11,000/- राजधानी ऑटो डील यांचेकडे जमा केले व गैरअर्जदारांकडून रु.3,50,000/- कर्ज मिळाल्यानंतर गाडी खरेदी करण्यांचे ठरविले होते. परंतु सदर वाहनाचे खरेदीमधे वेळेची बाब अत्यंत महत्वाची असते व विलंब झाल्यामुळे डील रद्द होऊ शकते व तीच बाब तक्रारकर्त्यासोबत घडली. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ने रु.3,45,300/- एवढी रक्कम गैरअर्जदार क्र.2 ला हस्तांतरीत केली, परंतु गैरअर्जदार क्र.2 ने सदर रक्कम 20 दिवस स्वतःजवळ बाळगून 20 दिवसानंतर दि.20.11.2009 रोजी रु.3,40,000/- चा धनादेश तक्रारकर्त्याला दिला. परंतु त्या दिवसापर्यंत ऑटो डील जवळपास रद्द झाले होते. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांचे विलंबामुळे त्याचे रु.11,000/- बुडाले व ऑटो डील रद्द झाले. तरीपण गैरअर्जदारांनी तगादा लावल्यामुळे रु.3,40,000/- ची रक्कम व्यक्तिगत कर्ज म्हणून वापरावी लागली, तसेच सदर कर्ज सुरु ठेवण्यांत तक्रारकर्त्यास मुळीच रस नव्हता. म्हणून त्याने गैरअर्जदारांना फोरक्लोझर रु.3,89,206.91 या रकमेवर करावयाचे ठरविले व याकरीता तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांच्या नावे धनादेश दिला. परंतु गैरअर्जदारांनी पोलिसात तक्रार नोंदविण्याची धमकी दिली व फोरक्लोझर रद्द कण्याबाबत दबाव आणला व फोरक्लोझर रद्द झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश गैरअर्जदारांकडे ठेवण्यांत काहीही स्वारस्य नव्हते, म्हणून तो परत मागितला. पण गैरअर्जदारांनी तो दिला नाही म्हणून दि.22.01.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली परंतु धनादेश न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली व त्याव्दारे राजधानी ऑटो डीलला दिलेले रु.11,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- तसेच गैरअर्जदारांना दिलेले धनादेश परत करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्यानेच कर्ज मिळण्याकरीता अर्ज केला होता, असे नमुद केले आहे व त्यानुसार त्याला रु.3,50,000/- चे कर्ज मंजूर केल्या गेले. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, फोरक्लोझर करण्याची तयारी तक्रारकर्त्याने दर्शविली व रु.3,89,206/- गैरअर्जदार क्र.1 ला देण्याचे ठरविले होते. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केली आहे. 5. गैरअर्जदार क्र.2 यांनी सुध्दा आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचे सर्व विपरीत विधाने अमान्य केली असुन तक्रारकर्त्याने सर्व दस्तावेज वाचून सही केली व त्याला सर्व बाबींची कल्पना होती, असे नमुद केले आहे. तसेच सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 6. सदर तक्रार मंचासमक्ष दि.17.02.2011 रोजी युक्तिवादाकरीता आली असता युक्तिवादाचे वेळेस तक्रारकर्ता स्वतः हजर होता, गैरअर्जदारांचे वकीलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असुन प्रकरण गुणवत्तेवरील निकालासाठी ठेवण्यांत आले. तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 कडून गैरअर्जदार क्र.2 मार्फत कर्ज घेतले होते, ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन व दस्तावेजांवरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्ता युक्तिवादाचे वेळेस स्वतः हजर होता, मंचाने त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की, त्याला गैरअर्जदार क्र.2 कडून आर्थीक व्यवहारापोटी रु.5,50,000/- घेणे होते व तेवढी रक्कम त्याने गैरअर्जदार क्र.2 ला दिली होती, त्यामुळे त्याला कोणतीही रक्कम देणे लागत नाही. मंचाने सदर बाब तक्रारीत का लिहीली नाही अशी विचारणा केली असता, माझ्या वकीलाने काय लिहीले आहे हे मला माहित नाही, असे सांगितले. तक्रारकर्त्याने निशाणी क्र.28 मंचासमक्ष दाखल केले आहे, त्यामधे त्याने नमुद केले आहे की, त्याने त्याची केस वकीलाकडून परत घेतलेली आहे. कारण त्याचे वकीलाने त्याला रु.50,000/- ची मागणी केली होती. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने मंचासमोर दिलेल्या माहिती वरुन असे लक्षात येते की, तक्रारकर्त्यास तक्रारीतील बहुतांश मुद्दे जे त्याला कथन करावयाचे होते ते केल्या गेले नाही. याकरीता मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्यास तक्रारीमधे आवश्यक सर्व बाबींनिशी तक्रार करण्याची संधी मिळावी या दृष्टीने नैसर्गीक न्याय तत्वाचा अवलंब करता सदर तक्रार निकाली काढण्यांत येते व तक्रारकर्त्यास पुन्हःश्च तक्रार मंचासमक्ष दाखल करण्याची मुभा देण्यांत येते. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते. 2. तक्रारकर्त्यास पुन्हःश्च तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यांत येते. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |