जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांकः 07/10/2009 आदेश पारित दिनांकः 04/10/2010 तक्रार क्र. - 643/2009 तक्रारकर्ता : अशोक के. कावळे, वय : 43 वर्षे, रा. प्लॉट नं.91, सन्मार्ग नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर-440034. //- विरुध्द -// गैरअर्जदार : 1) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, द्वारा संचालक सुरेश उमाकांत घनात, कार्यालयाचा पत्ता – बी/323, सिटी मॉल आय.सी.एल.शाळेसमोर, सेक्टर 19, वाशी, नवी मुंबई – 400705. 2) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, द्वारा संचालक अनिल श्रीराम टंडन, कार्यालयाचा पत्ता - बी/323, सिटी मॉल आय.सी.एल.शाळेसमोर, सेक्टर 19, वाशी, नवी मुंबई – 400705. 3) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, एन.के.वाय.टावर्स, शॉप नं.जी/5, तळमजला, अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर. 4) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, 4)द्वारा व्यवस्थापक पराग ऐचवार, 4)रा.401, चौथा माळा, उत्कर्ष रजनी अपार्टमेंटस, 4)अजीत बेकरीच्या मागे, धरमपेठ, नागपूर-10. 5) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, 5)द्वारा व्यवस्थापक श्रीपाल खजांची, 5)रा.401, चौथा माळा, उत्कर्ष रजनी अपार्टमेंटस, 5)अजीत बेकरीच्या मागे, धरमपेठ, नागपूर-10. 6) आय लिंक मोटर प्रा. लिमिटेड, 6)द्वारा व्यवस्थापक निलेश बापना, 6)रा.401, चौथा माळा, उत्कर्ष रजनी अपार्टमेंटस, 6)अजीत बेकरीच्या मागे, धरमपेठ, नागपूर-10. तक्रारकर्त्यांतर्फे : ऍड. सौ. अनुराधा देशपांडे. गैरअर्जदार क्र. 1 ते 6 तर्फे : एकतर्फी कारवाई. गणपूर्तीः 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष. 2. श्री. मिलींद केदार - सदस्य. मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 04/10/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 2 ते 6 यांनी वर्तमानपत्रात ठराविक प्राप्तीसोबतच कारचे मालक होण्याचे स्वप्न दाखविणा-या जाहिरात वाचली व स्वयंरोजगाराकरीता गैरअर्जदारांशी संपर्क साधला. गैरअर्जदार क्र. 2 ते 6 यांनी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन विविध गाडयांसाठी तक्रारकर्त्याला भरावी लागणारी कमीत कमी रक्कम व उर्वरित रकमेची परतफेड यांचे स्वरुप सांगितले. सदर योजना पाच वर्षाची असून त्यानुसार तक्रारकर्त्याला दरमहा रु.6,000/- उत्पन्न मिळणार होते व तक्रारकर्त्याने घेतलेली कार ही त्याच्या मालकीची होणार होती. योजनेनुसार तक्रारकर्त्याने रु.1,80,000/- डाऊन पेमेंट दि.18.03.2008 पर्यंत जमा केले. 18 मार्च 2008 रोजी झालेल्या करारनाम्यानुसार गैरअर्जदार 24 टक्के व्याज दर देणार होता. रक्कम भरल्यानंतरही गाडी तक्रारकर्त्याला देण्यात आली नाही, म्हणून गैरअर्जदार तक्रारकर्त्याला रु.14,000/- प्रती महिना देणार होता. परंतू सदर आश्वासनानुसार तक्रारकर्त्याला रक्कमही मिळाली नाही व गाडी मिळाली नसल्याने त्याने गैरअर्जदारांकडे भेट दिली असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. अधिक चौकशीअंती गैरअर्जदार क्र. 2 ते 6 यांचा शोध घेऊन रकमेची व वाहनाची मागणी केली असता गैरअर्जदार क्र. 2 ते 6 ते देण्यास अपयशी ठरले आणि त्यांनी तक्रारकर्त्याला प्रलोभने दाखवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांविरुध्द तक्रार नोंदविली. परंतू त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन रु.1,80,000/- ही रक्कम 24 टक्के व्याजासह परत करावी, मानसिक त्रासाबाबत रु.3,00,000/- व प्रकरणाचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांच्यावर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांना नोटीस तामिल न झाल्याने दैनिक वर्तमापनपत्रात प्रकाशित करण्यात आला. यावरही गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले नाही किंवा त्यांनी तक्रारीस लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.03.09.2010 रोजी पारित केला. 3. मंचासमोर सदर प्रकरण दि.27.09.2010 रोजी युक्तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार अनुपस्थित. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवजांची व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. सदर प्रकरणी मंचाने कागदपत्रांचे अवलोकन केले असता योजनेच्या जाहिरातीप्रमाणे, तक्रारकर्त्यासोबत गैरअर्जदारांनी संपर्क साधून वाहन देण्याचे अमीष देऊन त्याकरीता रक्कम घेतलेली आहे. तसेच पृष्ठ क्र. 19 वरील करारनामा व पृष्ठ क्र. 18 वरील रकमेच्या पावत्यांवरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. 5. तक्रारकर्त्यासोबत दि.18 मार्च 2008 रोजी गैरअर्जदारांनी करार करुन “Company owned car” असे वाहनाच्या वर्णनाऐवजी नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला कुठल्या प्रकारचे वाहन मिळणार होते हे स्पष्ट होत नाही. तसेच सदर कराराच्या शेवटच्या पृष्ठावर रु.1,80,000/- दि.18.03.2008 रोजी अदा केल्याचेही नमूद आहे. यावरुन तक्रारकर्त्याने तक्रारीत गैरअर्जदारांना रु.1,80,000/- दिल्याचे स्पष्ट होते. तसेच कराराचा अवधी हा करारनाम्यानुसार 30 महिन्यांचा व रु.13,711/- प्रतीमाहप्रमाणे रक्कम अदा करण्याबाबत नमूद करुन याबाबत जर चुक झाली तर गैरअर्जदार 24 टक्के व्याज अदा करणार असेही नमूद केलेले आहे. सदर कराराचे मंचाने सखोल वाचन केले असता करारानुसार गैरअर्जदारांनी कोणतीही कृती केल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ते 6 हे गैरहजर असल्याने व सदर तक्रारीबाबत आपले म्हणणे किंवा लेखी उत्तर सादर न केल्याने, सदर करारातील अटी व शर्तीनुसार त्यांनी तक्रारकर्त्याला वाहन का दिले नाही याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे मंचाचे मते गैरअर्जदार क्र. 1 ते 6 हे संयुक्तपणे सदर सेवेतील त्रुटीकरीता जबाबदार आहेत. परंतू आकर्षक आश्वासने व प्रलोभन देऊन त्याची पूर्तता न करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदारांच्या मागणीप्रमाणे तक्रारकर्त्याने कागदपत्रे व रक्कम अदा करुनही त्याला योजनेनुसार वाहनाचा मालकी हक्क व प्रतीमाह ठराविक रक्कम न देऊन गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 6. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून वाहनाबाबत डाऊन पेमेंटबद्दल रु.1,80,000/- घेतलेले आहेत व मागणी केल्यानंतर वाहन किंवा रक्कम व त्यावरील करारात नमूद व्याजही परत केलेले नाही किंवा रास्त कारणही त्याबाबत सांगितलेले नाही. मंचाचे मते गैरअर्जदारांच्या या सेवेतील त्रुटीमुळे न्यायोचितदृष्टया व कायदेशीरदृष्टया तक्रारकर्ता रु.1,80,000/- ही रक्कम दि.18.03.2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. 7. तक्रारकर्त्याने आर्थिक व मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.3,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू आर्थिक नुकसान काय व किती प्रमाणात झाले ही बाब कागदपत्रांसह सिध्द केलेली नाही. तथापि, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची रक्कम घेऊनही वाहनाचा मालकी हक्क किंवा ते देण्यात अपयशी ठरले तर रकमेवर व्याज देण्याचे करारात नमूद केलेले आहे. परंतू गैरअर्जदारांनी यावर अंमल केलेला नाही, त्यामुळे मंचाचे मते तक्रारकर्त्याला मानसिक त्रास होणे शक्य आहे, म्हणून मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून तक्रारकर्ता रु.15,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदारांच्या सदर वर्तणुकीमुळे तक्रारकर्त्याला सदर वाद मंचासमोर मांडावा लागला, म्हणून तक्रारकर्ता तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांनी तक्रारकर्त्याला वाहनाचा मालकी हक्क किंवा ते देण्यात अपयशी ठरले तर रकमेवर व्याज न देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. 3) गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.1,80,000/- ही रक्कम दि.18.03.2008 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 4) गैरअर्जदार क्र. 1 ते 6 ने मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून तक्रारकर्त्याला रु.15,000/- द्यावे. 5) गैरअर्जदार क्र. 1 ते 6 ने तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 6) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 6 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे. 7) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |