जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १२७/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०८/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – २१/०७/२०१४
श्री भरत हिलाल वाघ
उ.व.६०, कामधंदा-वकीली
रा ‘तथागत’ १६, शिवाजीनगर,
पारस मंगल कार्यालया समोर,
वाडीभोकर रोड, देवपूर धुळे. - तक्रारदार
विरुध्द
- कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
मर्यादित, साक्रीरोड, धुळे.
२) कनिष्ठा अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
मर्यादित, गोंदूर कार्यालय, गोंदूर
ता.जि.धुळे - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एच.एस. वाणी)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.एस.एम. शिंपी)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
- सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केली या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. आपल्या तक्रारीत तक्रारदार यांनी म्हटले आहे की, त्यांची मौजे भोकर ता.जि.धुळे येथे ०१ एकर २८ आर एवढी शेती आहे. तिचा गट क्र.१०५ पैकी २ असा आहे. या शेतात विहीर असून त्यावर पंप बसविण्यात आला आहे. या पंपासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून विजपुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्र.०१७४७७३२९५२ असा आहे. दिनांक ०२/०६/२०११ रोजी परिसरात वादळी पाऊस झाला, त्यामुळे शेतातील विजेचा खांब वाकला व विहीरीवरील वीज तार तुटली. त्याबाबत सामनेवाले यांना कळविण्यात आले. मात्र त्यांनी वीज तार जोडून दिली नाही. परिणामी वीज तारेतील प्रवाह सुरू असल्यामुळे शेतात उभ्या असलेला चारा व वांगी पिकाचे नुकसान झाले. ही दोन्ही पिके वीज तारेतील प्रवाहामुळे जळून गेली. त्याचे सुमारे रूपये ६५,०००/- चे नुकसान झाले आहे. ही रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी, मानसिक त्रासापोटी रूपये १०,०००/- मिळावे, तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- मिळावा आणि तुटलेली वीज तार पुर्ववत जोडून देण्याचा आदेश करावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीसोबत शेताचा सातबारा उतारा, सामनेवाला यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, वीज बील, जळालेल्या पिकांचे छायाचित्र, छायाचित्रकाराचे बिल आदी कागदपत्रे दाखल केली आहे.
४. सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खरी नाही. तक्रारदार यांच्या शेतात कोणत्याही प्रकारची चा-याची पेंढी, वांगी नव्हती. जी घटना तक्रारदार यांनी नमूद केली आहे, त्याबाबत शासकीय दफ्तरी नोंद नाही. तसेच तलाठी यांच्याकडून पंचनामा केलेला नाही. शासनाने तक्रारदार यांना शासकीय मदत दिलेली नाही. तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. तक्रारदार यांचा सामनेवालेविरूध्दचा आरोप खोटा आणि नाकबूल आहे. त्यामुळे तक्रारदार यांना कोणतीही भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची नाही. वादळामुळे तुटलेली तार व वाकलेले खांब लगेच दुरूस्त करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार यांचे वीज तारांमुळे नुकसान झालेले नाही.
५. सामनेवाले यांनी खुलाशाच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रे दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तर सामनेवाले यांनी आपला खुलासा हाच युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार आणि सामनेवाला यांचा खुलासा पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
- तक्रारदार यांच्या शेतातील पिकांचे नुकसान
सामनेवाले यांच्यामुळे झाले आहे हे तक्रारदार
यांनी सिध्द केले आहे काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ – तक्रारदार यांनी आपल्या शेतातील विहीरीसाठी सामनेवाले यांचेकडून विजपुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क.०१७४७७३२९५२ असा आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे वीज बिलही दाखल केले आहे. याबाबत सामनेवाले यांचे काहीही म्हणणे नाही. या मुद्यावरून उभयपक्षांत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब ’- दिनांक ०२/०६/२०११ रोजी झालेल्या वादळामुळे शेतातील वीज खांब वाकले आणि विहीरीवरील विजपुरवठयाची वीज तार तुटली. त्याबाबत सामनेवाले यांना कळवूनही त्यांनी वीज खांब आणि वीज तार यांची दुरूस्ती केली नाही. तुटलेल्या वीज तारेमध्ये प्रवाह सुरू असल्यामुळे शेतातील चा-याचे पिक आणि वांग्याचे पिक जळाले. यासाठी सामनेवाले हेच जबाबदार आहेत, अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा आरोप फेटाळून लावला आहे. वादळामुळे कोसळलेले वीज खांब आणि तुटलेल्या वीज तारा लगेच पुर्ववत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान सामनेवाले यांच्यामुळे झालेले नाही, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी असेही म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या शेतात चा-याचे पिक किंवा वांगी हे पिक नव्हतेच. नुकसानीबाबत तक्रारदारांच्या शेताचा पंचनामा झालेला नाही किंवा शासकीय दफ्तरी नोंद झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नोंद शासकीय दफ्तरी होत असते व तलाठी यांच्यामार्फत पंचनामा होत असतो. तक्रारदार यांच्या शेताबाबत असा कोणताही पंचनामा झालेला नाही, याकडेही सामनेवाले यांनी लक्ष वेधले आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत शेताचा सातबारा उतारा दाखल केला आहे. त्यात शेताचे क्षेत्र ०१ एकर २८ आर एवढे दिसते. तेवढयाच क्षेत्रामध्ये कपाशी या पिकाची नोंदही सातबारा उता-यावर दिसते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत कपाशी पिकाचा उल्लेख केलेला नाही. केवळ चा-याची पेंढी व वांगी या पिकांचा उल्लेख केला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या उता-यावर ०१ एकर २८ आर या क्षेत्रावर कपाशी पिक, ४५ आर या क्षेत्रावर खोंडे तर ३० आर या क्षेत्रावर वांगे असे पिक दाखविण्यात आले आहे. तक्रारदार यांच्या एकूण जमिनीचे क्षेत्र ०१ एकर २८ आर एवढे आहे. त्यामुळे त्यांचे एकूण क्षेत्र आणि पिकांच्या नोंदणीचे क्षेत्र यात स्पष्टपणे तफावत दिसते असे आम्हाला वाटते. सामनेवाले यांच्या कसुरीमुळे, दुर्लक्षामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याबाबतची लेखी तक्रार सामनवाले यांच्याकडे केली होती काय? तलाठी यांच्यामार्फत पंचनामा केला होता काय? शासकीय दफ्तरी नोंद केली होती काय? याबाबतचा खुलासा किंवा स्पष्टीकरण तक्रारदार यांनी करणे आवश्यक होते. दाखल तक्रारीतील कागदपत्रे पाहता असा खुलासा किंवा स्पष्टीकरण तक्रारदार यांनी केलेले दिसत नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या शेतातील पिकांचे नुकसान सामनेवाले यांच्या कामचुकारपणामुळे, कसुरीमुळे दर्लक्षामुळे झाले आहे, हे स्पष्ट होत नाही. याच कारणामुळे तक्रारदार हे आपली तक्रार ठोसपणे सिध्द करू शकले नाही, असे आमचे मत बनले आहे. म्हणूनच मुददा क्र.‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ – तक्रारदार यांची सामनेवालेंविरूध्द जी तक्रार होती ती तक्रारदार हे ठोसपणे सिध्द करू शकलेले नाही. तक्रारदार यांच्या शेतातील पिकाचे नुकसान सामनेवाले यांच्या चुकीमुळेच झाले याबबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी समोर आणलेला नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांना भरपाई देण्यासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे आमचे मत बनले आहे. याच कारणामुळे आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. इतर कोणतेही आदेश नाही.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.