(घोषित दि. 18.09.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र. अध्यक्ष)
अर्जदार हे गैरअर्जदार यांच्या वीज वितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी वीज मीटरचे रिडींग न घेता वाढीव वीज बिल आकारणी केली. अर्जदाराने याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांनी जून 2011 पर्यंत नियमितपणे वीज बिलाचा भरणा केला आहे. जुलै 2011 नंतर वीज मीटरचे रिडींग न घेता त्यांना अंदाजे वीज बिल आकारण्यात आल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली ज्याची दखल घेण्यात आली नाही. गैरअर्जदार यांनी चुकीची वीज बिल आकारणी करुन ते न भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला. 5,000/- रुपये भरल्यानंतर वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्यात आला. गैरअर्जदार हे सतत वाढीव वीज बिल आकरणी करीत असून वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देत आहेत. गैरअर्जदार यांनी मीटर प्रमाणे वीज बिल आकारणी करावी व सेवेतील त्रुटीपोटी नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश देण्याची विनंती अर्जदाराने मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, गैरअर्जदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती दाखल केल्या आहेत.
अर्जदाराने वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारीत करण्या-या अर्जावर दिनांक 23.01.2012 रोजी सुनावणी घेण्यात आली. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यावर प्रथमदर्शनी गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीची वीज बिले दिलेली असल्याचे दिसून आले. अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल 5990/- रुपया पैकी 1500/- रुपयाचा भरणा केल्यास वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश मंचाने पारित केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने वाढीव वीज बिलाबाबत दाखल केलेली तक्रार त्यांना मान्य नाही. मीटर रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी अर्जदारास सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी केली. डिसेंबर 2011 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यावर त्यांनी अर्जदारास वीज बिल दुरुस्त करुन दिले व त्यांच्या वीज बिलामध्ये 4073.48 रुपयाचे क्रेडीट दिले आहे. अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नसून वीज बिल भरणे टाळण्याच्या उद्देशाने त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 524010085138 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या घरी बसविलेल्या मीटरचा क्रमांक 11591821 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल.चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास जून 2011 पर्यंत मीटर रिडींग प्रमाणे वीज बिल आकारणी केली आहे. अर्जदाराने देखील त्याचा भरणा केलेला दिसून येतो. जुलै 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 1934 व चालू रिडींग 2708 दर्शवून 774 युनिटचे वीज आकारले. हे वीज बिल जास्त असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली. ऑगस्ट 2011 ते नोव्हेंबर 2011 या महिन्यात गैरअर्जदाराने मीटर रिडींग न घेता अर्जदारास मागील व चालू रिडींग 2708 दर्शवून सरासरीवर आधारीत 226 युनिट वीज वापराचे बिल आकारले. डिसेंबर 2011 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यानंतर वरील चार महिन्याचे 4073.48 रुपयाचे क्रेडीट दिले. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास वीज बिल आकारले असल्याचे स्पष्ट होते. जानेवारी 2012 नंतर गैरअर्जदार यांनी मीटरवरील रिडींग प्रमाणे वीज बिले आकारल्याचे दिसून येते. जुलै 2011 मध्ये अर्जदारास जरी 774 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आलेले असले तरी ते मीटरवरील रिडींग प्रमाणे असल्याचे दिसून येते. अर्जदारास जानेवारी 2012 नंतर देण्यात आलेली वीज बिले 1157182 याच मीटर क्रमांकाची आहेत. यावरुन हे मीटर वीज वापराची योग्य नोंद घेत असल्याचे स्पष्ट होते. ऑगस्ट 2011 ते नोव्हेंबर 2011 या काळात गैरअर्जदार यांनी मीटर रिडींग न घेता वीज बिल आकारणी केली असून ती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास जुलै 2011 ते सप्टेंबर 2012 पर्यंत आकारलेल्या वीज बिलातून व्याज व दंडाची रक्कम वजा करुन सुधारीत वीज बिल 30 दिवसात द्यावे.
- मीटर रिडींग न घेता बिल आकारणी केली म्हणून सेवेतील त्रुटी बद्दल व मानसिक त्रास व खर्चापोटी गैरअर्जदार यांनी अर्जदारास 1,000/- रुपये 30 दिवसात द्यावे.