ग्राहक तक्रार क्र. 86/2013
अर्ज दाखल तारीख : 10/06/2013
अर्ज निकाल तारीख: 05/11/2014
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) लक्ष्मण बुवासाहेब देशमुख,
वय-35 वर्षे, धंदा – शेती,
रा.घोडकी, ता. वाशी, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) श्री. दत्तात्रय ललित ठाकुर,
मा. अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या,
विभागीय कार्यालय, उस्मानाबाद.
2) बी.व्ही. मेटे,
सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी वाशी, ता. जि.उस्मानाबाद.
3) वैभव जे. मदने,
कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी वाशी, ता. जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
२) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.सी.आर.देशमुख.
विरुध्द पक्षकारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमुख.
निकालपत्र
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार मौजे घोडकी ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी असून अर्जदारास मौजे घोडकी येथे जमीन गट नं.180 व 181 मध्ये शेत जमीन आहे. तसेच विप कडून डिमांड भरुन विदयूत पुरवठा घेतलेला आहे. अर्जदाराने सन 2011-2012 या सालात त्याच्या मालकीच्या जमीन गट नं.180 व 181 मध्ये एकुण 3 एकर क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड कलेली आहे. सदर लागवडी करिता अर्जदाराने एकरी 30 ते 35 हजार खर्च केलेला आहे. तसेच मेहनत मशागत करुन ऊस जोमदार आणलेला होता. सदर ऊस गाळपास योग्य झाला होता. विप यांचे विदयुत पोल व तारा सदर शेतातुन गेलेल्या आहेत. सदर पोल मधील अंतर जास्त असल्यामुळे व पोलावरील लाईनला गाडींग नसल्याने तारा जवळ जवळ आल्याने त्यामध्ये झोळ पडलेला आहे. त्यामुळे तारेमध्ये सतत घर्षण होवून ठिणग्या पडत असल्यामुळे तक्रारदार यांनी विपस वारंवार सांगितले आहे. मात्र विपने सदरच्या तारेची दुरुस्ती केलेली नव्हती. दि.12/12/2011 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास सदरील तारांमध्ये स्पार्किंग होवून ठिणग्या पडल्याने अर्जदाराचा ऊस पेटला व त्यामध्ये जवळपास 10 गुंठे ऊस जळुन खाक झाला. सदर ऊस जळाल्यामुळे 20 टन वजन कमी आल्यामुळे अर्जदाराचे रक्कम रु.50,000/- चे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने सदर घटनेनंतर पो.स्टे. वाशी येथे रितसर तक्रारी अर्ज दिला असुन त्याबाबत संबंधीत पोलीसांनी अ.ज.नं.12/12 अशी नोंद केलेली आहे व पंचनामा केलेला आहे. तसेच तक्रारदाराने विप यांना घटनेची माहीती देवूनही ते जायमोकयावर आले नाहीत. तक्रारदाराने विपस दि.13/12/2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून ऊस जळालेचे नुकसान भरपाई रक्कम रु.70,000/- व्याजासह देण्याची मागणी केली परंतु रक्कम देण्यात आली नाही म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यात आली. म्हणून विप कडून तक्रारदारास जळीत ऊसाच्या नुकसान भरपाईपोटी रु.60,000/- व मानसिक आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व दाव्याच्या दाव्याच्या खर्चापोटी विप कडून रु.2,000/- देण्याचा हुकुम व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत विद्युत मंडळाचे बील, जिल्हाधिकारीस दिलेले पत्र, घटनास्थळ पंचनामा, कार्यकारी अभियंत्यास दिलेल पत्र, सहाय्यक अभियंत्यास दिलेले पत्र, तहसिलदारास दिलेले पत्र, पंचनामा, 7/12, विदयुत निरीक्षकाचे पत्र इत्यादी कागदपत्रांच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर दाखल केली आहे.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.09/10/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
तक्रारदाराने सादर केलेला विदयुत पुरवठा अर्जदाराच्या वडिलांच्या नावे दिला असल्यामुळे अर्जदार यास ग्राहक म्हणुन सदरची तक्रार करण्याचा अधिकार पोहचत नाही. अर्जदाराने सन 2011-2012 या सालात त्याच्या मालकीची जमीन गट नं.180 व 181 मध्ये एकुण 3 एकर क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड कलेली आहे व सदर लागवडी करिता अर्जदाराने एकरी 30 ते 35 हजार खर्च केलेला आहे हे मान्य नाही. विप यांची विदयुत लाईन गेलेली आहे व सदर पोल मधील अंतर जास्त असल्यामुळे व पोलावरील लाईनला गाडींग नसल्याने तारा जवळ जवळ आल्याने तारेमध्ये सतत घर्षण होवून ठिणग्या पडत असल्याबाबत तक्रारदार यांनी विपस वारंवार सांगितले होते. मात्र विपने सदरच्या तारेची दुरुस्ती केलेली नव्हती हे संपूर्णपणे खोटे आहे. सदरची लाईन ही व्यवस्थीत असल्यामुळे दुरुस्ती करण्याचा पश्नच उदभवत नाही. सदरची लाईन ही 11 के.व्ही.ची असल्यामुळे स्पार्किंग होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. दि.12/12/2011 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास सदरील तारांमध्ये स्पार्किंग होवून ठिणग्या पडल्याने अर्जदाराचा ऊस पेटला व त्यामध्ये जवळपास 10 गुंठे ऊस जळुन खाक झाला. सदर ऊस जळाल्यामुळे 20 टन वजन कमी आल्यामुळे अर्जदाराचे रक्कम रु.10,000/- चे नुकसान झालेले आहे हे कबूल नाही. तक्रादाराने सदर पंचनामा विपस नकळवता तलाठी पोलीस हे विदयुत तज्ञ नसतांना व घटना पाहिली नसतांना परस्परच केला आहे. तक्रारदार यांनी सदर घटनेबाबतची माहीती विपस तीन आठवडयाने दिली. सदरची घटना ही विप यांच्या निष्काळजीपणामुळे घडलेली नाही. तक्रारदाराने त्यांच्या उत्पन्नाबाबत पुरावा दिलेला नाही. विदयुत निरीक्षकाचा अहवाल घटना घडल्यानंतर एक वर्ष दोन महिन्यानंतर दिलेला आहे. सदर अहवालात विदयुत निरीक्षकाने पाहणीची तारीख तसेच घटनेचे निश्चित कारण दिलेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खोटी व खोडसाळपणावर आधारीत असुन खारीज होणे योग्य आहे. असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक आहे काय ? नाही.
2) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
3) तक्रारदार रु.70,000/- रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
4) मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर:
तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये म्हंटलेले आहे की, त्यांनी आपल्या शेतजमिन मौजे घोडकी येथे गट क्र.180 व 181 मध्ये विपकडून विदयुत पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदाराने गट क्र.181 चा सातबारा ऊतारा हजर केलेला असून त्यामध्ये तक्रारदार 60 आर. चा मालक दिसुन येतो. संपुर्ण 1 हेक्टर 97 आर. जमिनीपैकी 80 आर. ऊसाच्या पीकाची सन 2011-12 मध्ये तशी नोंद दिसुन येते. तक्रारदाराने तक्रारीत म्हंटले आहे की त्यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये उसाची लागवड केली होती. परंतु शेतातुन गेलेल्या विदयुत तारेमुळे त्यापैकी त्यांचा 10 गुंठे ऊस जळाला. ही घटना दि.12/12/2011 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाली. ज्याचा पंचनामा संबंधीत तलाठी यांनी दि.13/12/2011 रोजी केला. त्यामध्ये गट क्र.181 पैकी 10 गुंठे क्षेत्रातील ऊस जळाल्याची नोंद आहे. पोलीसांनी पंचनामा दि.13/12/2011 रोजी केला त्यामध्येसुध्दा गट क्र.181 पैकी 10 गुंठे ऊस जळाल्याचे नमूद आहे. तक्रारदाराने ज्या वीज बिलाची पावती हजर केलेली आहे. त्याप्रमाणे दि.17/03/2010 रोजी बुवासाहेब देशमुख यांनी रु.1,000/- बिल भरल्याचे दिसते. विप यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे वीज पुरवठा दिला आहे असल्यामुळे. तक्रारदार विपचे ग्राहक होत नाही असे म्हंटलेले आहे. जेव्हा जमीन तक्रारदाराच्या नावे आहे तेव्हा विदयुत पुरवठा त्यांच्या वडीलांच्या नावे का आहे या बददलचा खुलासा तक्रारदाराने करणे जरुरी होते. तक्रारदाराचे वडील हयात आहे काय ? व त्यांनी आपल्या मुलांच्या हक्कात वाटप केले आहे काय ? याबददल तक्रारदाराने पूर्ण मौन बाळगले आहे. यदाकदाचित विहीर एकत्रित कुटुंबाच्या मालकीची असली तर तक्रारदार हा बेनीफिशीअरी होऊ शकतो. परंतु तसा स्पष्ट खुलासा तक्रारदाराने तक्रारीमध्ये करणे जरुरी होते. विप यांनी म्हणणे पॅरा 8 मध्ये म्हंटलेले आहे की, जी विदयुत वाहीनी तक्रारदाराच्या शेतामधून गेली ती उच्च दाबाची 11 के.व्ही. वाहीनी होती. त्यामुळे या मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार पोहचत नाही. तसेच तक्रारदार हा विप यांचा ग्राहक नाही.
5) नंतर तक्रारदाराने गट क्र.180 चा सातबारा उतारा हजर केला आहे. तक्रारदाराची 90 आर. सामायीक क्षेत्राचा मालक म्हणुन नोंद झाली असुन 30 आर. क्षेत्राचा स्वतंत्र मालक म्हणून नोंद झाली आहे. तक्रारदाराची एक स्वतंत्र बोअरवेल असल्याची नोंद दिसुन येते. कदाचीत या बोरवेलच्या पाण्यावर गट क्र.181 मध्ये ऊस जोपासला गेला असू शकतो. तथापि गट क्र.181 ला विप तर्फे विदयुत पुरवठा केला होता असे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. या उलट विदयुत निरीक्षक यांचे दि.03/01/2013 च्या अहवालाप्रमाणे गट क्र.181 मध्ये ऊसावरुन वीज कंपनीची 11 केव्हीची तार मांडवा फिडरकडे गेली आहे व तेथील कट पॉईंट आहे. सदर फिडर अनधीकृत व्यक्तिने गावठाण फिडरव्दारे चालू केला व चालु फिडरच्या कटपॉंईंटचा जंमपर वादळ वा-यामुळे तुटून दुस-या जंमपरवर पडले असावे व स्पाकिंग झाल्यामुळे ऊसास आग लागली असावी.
6) विपचे विधीज्ञ श्री.व्हि.बी.देशमुख यांनी मा.राष्ट्रीय आयोगाचा निर्णय हरीयाणा स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड विरुध्द मोहनलाल 1986-99 दाखल केला आहे. पान क्र.3695 मधील निकालावर भर दिलेला आहे. त्यात म्हंटले आहे की जर हायटेन्शन वायर शेतावरुन गेली असेल व ठिणगी पडून शेतातील पीक जळाले असेल तर असा शेतकरी वीज कंपनीचा ग्राहक होवू शकत नाही. कारण अशा विज वाहीनीवरुन शेतक-यांना विहीरीकडे विज पुरवठा दिला नसता. मा.महाराष्ट्र राज्य आयोग यांनी अपील क्र.2238/2005 मध्ये आदेश दि.02/08/2006 मध्येसुध्दा तत्व मांडलेले आहे की वीज टॉवर उभा करतांना तेथील पिकांचे नुकसान झाले तर असा शेतकरी वीज कंपनीचा ग्राहक होत नाही. मा. महाराष्ट्र राज्य आयोग ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी आपले ए/01/1369 निकाल तारीख 22/06/2011 मध्येसुध्दा हेच तत्थ्य मांडलेले आहे की ट्रान्समिशन लाईनमध्ये जर ठिकाणी ठिणगी पडली व शेतक-याचे नुकसान झाले तर असा शेतकरी हा विज कंपनीचा ग्राहक होवू शकत नाही. वरील सर्व चर्चेवरुन हे स्पष्ट होते की तक्रारदार हा विपचा ग्राहक होवू शकत नाही म्हणुन आम्ही मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देतो. तसेच तक्रारदार हा विपचा ग्राहक होवू शकत नसल्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही व त्यामुळे विपने सेवेते त्रुटी केली आहे असे शाबीत होत नाही. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही ओदश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.