ग्राहक तक्रार क्र. 09/2013
अर्ज दाखल तारीख : 15/01/2013
अर्ज निकाल तारीख: 23/01/2015
कालावधी: 02 वर्षे 00 महिने 09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. सौदागर भगवान डोरले,
वय-23 वर्षे, धंदा-व्यापार, रा.वाशी, ता.वाशी,
जि.उस्मानाबाद. तक्रारदार
विरुध्द
1. कार्यकारी अभियंता,
ललीतकुमार दत्तात्रय ठाकुर, वय-55 वर्षे,
धंदा नोकरी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी उस्मानाबाद.
2. सहाय्यक अभियंता,
वैभव जगन्नाथ मदने, वय- 50 वर्षे,
धंदा- नौकरी- महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण
कंपनी उपविभाग वाशी, ता.वाशी, जि.उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदार यांचे तर्फे विधिज्ञ : श्री. एस. डी. माने.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री. व्ही.बी. देशमुख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी, यांचे व्दारा
1) तक्रारकर्ता (तक) तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की तक्रारकर्ता हा मौजे वाशी ता.वाशी जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 व 2 चा ग्राहक असून त्याने विप कडून कनेक्शन घेण्यासाठी दि.05/01/2011 रोजी रक्कम रु.12,850/- डिमांडचा भारणा केलेला आहे. विप यांनी तक्रारदार यांना कनेक्शन दिल्या नंतर दि.23/11/2012 पुर्वी एकही बिल दिलेले नाही. म्हणून विप यांना याबददल विचारले असता त्यांनी अॅडव्हान्स बिल भरण्यास सांगितले त्यानुसार दि.25/03/2011 ते 31/05/2012 रोजी पर्यंत रु.21,200/- भरुन घेतलेले आहे. कनेक्शन घेतल्यापासून एक वर्षाने म्हणजेच दि.05/11/2012 रोजी रक्कम रु.46750/- चे बिल दिलेले आहे. सदर बिल विप यांनी दुरुस्ती करुन दिले व रु.14,000/- चे बिल अर्जदार यांनी 23/11/2012 रोजी भरणा केलेला आहे. दि.03/12/2012 रोजी रक्कम रु.36,450/- चे बिल दिलेले आहे सदर बीलातून मागील भरलेले बिल रु.14,000/- वजा करुन मिळण्याविषयी विनंती केली असता विपने नकार दिला व सदर बिल 8 दिवसात न भरल्यास वीज जोडणी खंडीत करण्याची धमकी दिली. म्हणून विप यांनी सेवेत त्रुटी केली असून तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्यास भाग पडले. म्हणून विप यांनी सदर वीज बिल दुरुस्त करुन सुधारित वीज बिल दयावे व त्याचे कडून तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्यात यावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत डिमांड, विज बिल भरल्याबाबत एकूण 17 पावत्या, दोन विज देयके, ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांना नोटीस बजावण्यात आली असता त्यांनी दि.31/01/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
विप ने तक्रारदारास व्यापारी वापराकरीता विदयुत पुरवठा दिला असल्यामुळे सदर कोर्टास सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार पोहचत नाही. अर्जदारास अॅडव्हान्स बिल भरण्यास सांगितले हे म्हणणे खरे नसून अर्जदार यांने वापरलेल्या युनिटप्रमाणे बिल न भरता आर्थिक अडचणीमुळे बिलाची रक्कम वापरलेल्या युनिटपेक्षा कमी युनिटचे बिल भरत आलेला आहे. अर्जदार यांनी भरलेली सर्व रक्कम अर्जदाराच्या खात्यावर जमा झालेली आहे. विपने दि.04/11/2012 रोजी रक्कम रु.46,750/- चे बिल दिले हे बरोबर आहे. सदर बिल ऑगस्ट 2012 महीन्यात भरलेली रक्कम वजा करुन बिल दुरुस्त करुन दिलेले आहे. तक्रारदार यांनी रु.14,000/- ही संपूर्ण रक्कम भरलेली नाही. दि.03/12/2012 चे रु.36,450/- चे दिलेले बिल वापरलेल्या युनिटप्रमाणे व अर्जदाराने भरलेली रक्कम अर्जदाराच्या बिलातुन कमी करुन योग्य असे बिल दिलेले असल्यामुळे तक्रारदाराने ते भरणे आवश्यक आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार चूकीची असून खर्चासह रदद व्हावी असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार यांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे उत्तरे
1) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) अर्जदार अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
तक ने डिमांड रक्कम भरलेची रु.12,820/- ची दि.15/01/2011 ची पावती हजर केली आहे. विप ने त्याप्रमाणे वीज पुरवठा दिला हे विप ला कबूल आहे. दि.25/03/2011 ते 31/05/2012 पर्यंत तक ने बिल रु.21,200/- भरले असे त्याचे म्हणणे आहे. तक ने पुढीलप्रमाणे पावत्या हजर केल्या आहेत. दि.25/03/2011 रु.1200/- दि.30/04/2011 रु.1200, 14/06/2011 ला रु.1200/-, दि.01/08/2011 रु.1200/-, 30/08/2011 रु.1,800/- 30/09/2011 रु.1,800/-, 03/11/2011 रु.1,800/-, 02/12/2011 रु.1,200/- 27/01/2012 रु.1,800/-, 29/02/2012 रु.1,800/- दि.31/03/2012 रु.1800/- त्याची बेरीज रु.16,800/- येते. त्या नंतरच्या पावत्याप्रमाणे दि.30/04/2012 रु.1,200/- दि.10/05/2012 रु.1200/-, 31/05/2012 रु.1,200/- 31/07/2012 रु.2,000/- भरण्यात आले होते म्हणजेच तिथपर्यंत बिलात रु.23,400/- भरले होते.
5) त्यानंतरचे बिल दि.05/11/2012 चे रु.46,590/- चे विप ने तक ला दिल्याचे दिसते ते दुरुस्त करुन रु.14,000/- केल्याचे दिसते. विप चे म्हणणे आहे की सवलत म्हणून रु.14,000/- चे बिल दिले होते. विप ने PLA हजर केले असून ते जुलै 2012 पासूनचे आहे. त्यावेळी मागील रीडिंग 500 व चालू रीडिंग 600 दाखवले आहे. तक चे म्हणणे की पुर्वी विप ने एकही बिल दिले नाही व दि.05/11/2012 रोजी रु.46,750/- चे बिल दिले यात तथ्य वाटते. दि.05/11/2012 चे बिलात मागील रीडिंग 9730 व चालू 10039 दाखवले आहे. वापर 309 युनिट होता त्यापुर्वीचा वापर सप्टेंबर 834 युनिट ऑगस्ट 8296 युनिट, जुलै 100 युनिट, जुन 0 युनिट, मे 300 युनिट, एप्रिल 199 युनिट वापर दाखवला आहे. त्यापुर्वीचा वापर दाखवलेला नाही त्याचे कारण स्पष्ट केलेले नाही.
6) याचा अर्थ उघड आहे की विप चे म्हणणे प्रमाणे ऑगस्ट 2012 मध्ये तक ने रु.8,296/’ युनिट वीज वापरली. विप चे म्हणणे आहे की तक ने वापरलेल्या युनिटपेक्षा कमी युनिटचे बिल भरले म्हणजेच जानेवारी ते जुलै 12 पर्यंत तक ने कमी युनिटचे बिल भरले त्याबददलचे PLA दाखल करणेची तसदी विप ने घेतलेली नाही उलट जुलै 2012 मध्ये मागील रीडिंग 500 व चालू 600 दाखवले आहे. ज्या पुर्वीच्या तीन महीन्याचा वापर दाखवला त्याची महीना सरासरी 200 युनिट येते. PLA प्रमाणे सप्टेंबर 2012 मध्ये 834 युनिट, ऑक्टोबर 2012 मध्ये 309 युनिट वापर होता. ते मिसळून 5 महीन्यांचा महीना सरासरी वापर 350 युनिट येतो सर्व घोटाळा विप व त्यांचे कर्मचा-यांनी केल्याचे उघड होते.
7) फेब्रुवारी 2011 ते ऑक्टेाबर 2012 पर्यंतच महीन्यात सरासरी 350 युनिट वापराप्रमाणे 7350 युनिट वापर झाला असावा. ऑक्टोबर 2012 पर्यंत तक ने रु.37,400/- बिल भरल्याचे दिसते. या मंचाचे अंतरिम आदेशाप्रमाणे आणखी रु.14,665/- बिल तक ने भरले आहे म्हणजेच एकूण रु.47,065/- बिल भरल्याचे दिसते व तेच योग्य बिल दिसते. विप चे म्हणणे की दि.03/12/2012 चे रु.36,450/- चे बिल योग्य आहे हे मान्य करता येणार नाही. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) तक ने नोव्हेंबर 2012 पर्यंतचे बिलापोटी वरीलप्रमाणे रु.47,065/- बिल भरणे ते
योग्य असल्यामुळे दि.03/12/2012 ची रु.36,450/- ची मागणी अयोग्य ठरवण्यात येते.
3) त्यापुढील बिले विप ने तक ला प्रत्यक्ष वापराप्रमाणे दयावी.
4) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज
दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.