(घोषित दि. 24.08.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली असुन, सदर वीज जोडणी बाबत वीज वितरण कंपनीकडुन वेळोवेळी प्राप्त झालेली देयके नियमित भरलेली आहेत. जुलै 2008 पासून त्यास वीज वितरण कंपनीने जास्त रक्कमेची व चुकीचे नांव व चुकीचा पत्ता नमुद करुन देयके दिली. म्हणून ती देयके योग्य दुरुस्तीसह मिळावेत यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज देण्यात आला. परंतू वारंवार अर्ज देऊनही वीज वितरण कंपनीने योग्य रिडींगसह देयके दिली नाहीत. वीज वितरण कंपनीने त्यानंतर ऑगष्ट 2009 मध्ये त्यास 9,632 युनिट वीज वापराचे अवाजवी देयक दिले आणि जानेवारी 2010 मध्ये त्याचा वीज पुरवठा कोणतीही पुर्व सुचना देता खंडीत केला. वीज वितरण कंपनीने ऑगष्ट 2009 मध्ये दिलेले चुकीचे देयक दुरुस्त करुन द्यावे अशी मागणी त्याने वीज वितरण कंपनीकडे केली. परंतू वीज वितरण कंपनीने त्यास देयक दुरुस्त करुन दिले नाही आणि पुढील देयकामध्ये थकबाकी दर्शवून त्यास वारंवार चुकीचे देयके दिली. तसेच त्याने दिनांक 25.06.2010 रोजी रुपये 25,000/- भरलेले असतांनाही ती रक्कम त्याच्या देयकामध्ये समायोजित केली नाही आणि दिनांक 03.03.2011 रोजी रुपये 40,748/- चुकीचे देयक दिले. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने वारंवार चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, वीज वितरण कंपनीने त्यास योग्य रिडींगनुसार देयके द्यावीत आणि त्याचा वीज पुरवठा विनाकारण खंडीत करु नये असा वीज वितरण कंपनीला आदेश द्यावा. तसेच दिनांक 29.08.2009 व 03.03.2011 रोजी वीज वितरण कंपनीने त्यास दिलेली देयके रद्द करावीत व त्यास नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदारास कधीही चुकीची किंवा अवाजवी देयके दिलेली नाहीत. तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात आलेली देयके प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसारच देण्यात आलेली असुन तक्रारदाराकडे थकबाकी असुन सदर थकबाकी भरावी लागू नये म्हणून तक्रारदाराने काल्पनिक कारणासह ही तक्रार दाखल केलेली आहे व सदर तक्रार खोटी व चुकीची असल्यामुळे फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दिनांक 29.08.2009 आणि दि. 03.03.2011 रोजी दिलेली देयके चुकीची आहेत काय ? नाही 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.विपूल देशपांडे आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 29.08.2009 रोजी दिलेले देयक नि.3/2 आणि दिनांक 03.03.2011 रोजी दिलेले देयक नि.3/1 तसेच वीज वितरण कंपनीने दाखल केलेले सी.पी.एल. नि.15/1 ची एकत्रित पाहणी केली असता वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिलेली उपरोल्लेखीत देयके चुकीची असल्याचे दिसुन येत नाही. वीज वितरण कंपनीने दिनांक 29.08.2009 रोजी तक्रारदारास 9,632 युनिट वीज वापराचे देयक दिले होते. सदर देयक चुकीचे असल्याचे दिसुन येत नाही. कारण ऑक्टोबर 2008 मध्ये तक्रारदाराच्या मीटर मधील रिडींग 4,809 होती. परंतू त्यानंतर ऑगष्ट 2009 पर्यंत वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या मीटर मधील रिडींग उपलब्ध नसल्याच्या कारणांवरुन नोंदविली नाही आणि या कालावधीमध्ये त्यास दरमहा 217 युनिट सरासरी नुसार देयके दिली. त्यानंतर ऑगष्ट 2009 मध्ये तक्रारदाराच्या मीटर मधील रिडींग 14,441 अशी नोंदविण्यात आली. म्हणून ऑक्टोबर 2008 मधील सुरुवातीची रिडींग 4,809 आणि ऑगष्ट 2009 मधील रिडींग 14,441 या मधील फरक 9,632 युनिटचे देयक तक्रारदारास दिनांक 29.08.2009 रोजी देण्यात आले आणि तक्रारदाराला ऑक्टोबर 2008 ते ऑगष्ट 2009 या कालावधीमध्ये दिलेल्या देयकांची रक्कम सदर देयकामध्ये समायोजित करण्यात आली. त्यामुळे सदर देयक चुकीचे असल्याचे दिसुन येत नाही. तक्रारदाराला दिनांक 29.08.2009 रोजी देण्यात आलेले देयक रक्कम रुपये 64,544/- तक्रारदाराने न भरता दिनांक 13.01.2010 रोजी रुपये 1,000/- व त्यानंतर 22.06.2010 रोजी रुपये 25,000/- भरले आणि दिनांक 31.03.2011 रोजी रुपये 10,000/- आणि तक्रारदाराने भरलेल्या रक्कमांची त्याच्या देयकामध्ये नोंद घेण्यात आल्याचे सी.पी.एल. नि.15/1 वरुन दिसुन येते. त्यामुळे दिनांक 03.03.2011 रोजीचे देयक देखील चुकीचे असल्याचे दिसुन येत नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 29.08.2009 आणि दिनांक 03.03.2011 रोजी दिलेली देयके चुकीची नसली तरी वीज वितरण कंपनीने तक्रारदारास ऑक्टोबर 2008 ते जुलै 2009 या कालावधीमध्ये सतत रिडींग उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवून सरासरी नुसार देयके दिली, ही बाब निश्चितपणे चुकीची असुन वीज वितरण कंपनीला अशा प्रकारे वारंवार सरासरी नुसार देयके देता येत नसुन जर ग्राहकाच्या मीटर मधील रिडींग उपलब्ध होत नसेल तर वीज वितरण कंपनीने ग्राहकाला ताबडतोब सुचना देऊन रिडींग घेण्यासाठी विशिष्ठ वेळ ठरवून मीटर मधील रिडींग नोंदवूनच देयके देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीने जानेवारी 2010 मध्ये तक्रारदाराचा वीज पुरवठा कोणतीही सुचना न देता खंडीत केला ही बाब देखील चुकीची होती. सदर बाब वीज वितरण कंपनीने अमान्य केलेली आहे. परंतू तक्रारदाराने खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी दिनांक 13.01.2010 रोजी भरलेली रक्कम रुपये 25/- ची पावती नि. 3/6 वरुन वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत केल्याची बाब सिध्द् होते. परंतू तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत करण्यापुर्वी वीज वितरण कंपनीने त्यास कलम 56 विद्युत कायदा 2003 नुसार पुर्व सुचना दिल्याबाबत वीज वितरण कंपनीने कोणताही पुरावा दिलेला नाही. वीज वितरण कंपनीला ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यापुर्वी कलम 56 विद्युत कायदा 2003 नुसार पुर्व सुचना देणे बंधनकारक आहे. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा कोणतीही पुर्व सुचना न देता खंडीत करुन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केलेले असुन, सदर बाब वीज वितरण कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास त्रुटीच्या सेवेबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- (रुपये तिन हजार फक्त), मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- असे एकूण रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा सदर रक्कम त्याच्या देयकामध्ये समायोजित करावी.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |