निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 08 /12/2011 कालावधी 08 महिने 24 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. चंद्रकांत पिता उत्तमराव सुर्यवाड. अर्जदार वय 39 वर्ष.धंदा.शेती. अड.एम.ई.भोसले. रा.कृष्ण नगर.परभणी.ता.जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अड.एस.एस.देशपांडे जिंतूर रोड.परभणी ता.जि.परभणी. 2 कनिष्ट अभियंता. स्वतः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. जिंतूर रोड.परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मागील 15 वर्षांपासून परभणी शहराचा रहिवाशी आहे. त्याने विद्युत जोडणी मिटर क्रमांक 7610092728 व ग्राहक क्रमांक 530010579526 अन्वये घेतली होती. अर्जदारास नेहमीची अवास्तव रक्कमेचे विद्युत देयक देण्यात येत असल्यामुळे त्याने अनेक वेळा गैरअर्जदाराकडे जाऊन तक्रार केली, परंतु त्यांनी कसलाही प्रतिसाद अर्जदारास दिला नाही.अर्जदाराने दिनांक 31/03/2009 रोजी विद्युत देयकापोटी रक्कम रु.2,220/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला, पुढे दिनांक 10/10/2010 रोजी भरारी पथक हे अर्जदाराच्या घरी आले व घरासमोरील भिंतीवर लावलेले मिटर त्यांनी कुठलिही पूर्व सुचना न देता काढून नेले.त्यावेळेस पंचनामा ही केला नाही तेव्हा अर्जदार यांनी टोकण रक्कम रु.15000/- देवुन विद्युत मीटर काढून नेऊ नये अशी विनंती गैरअर्जदाराकडे केली. गैरअर्जदार क्रमांक 2 व एक लाईनमन यांनी अर्जदाराकडून नगदी रु. 15000/- घेतले रक्कम रु.15000/- चा धनादेश क्रमांक 149913 किसान नागरी बँक परभणीचा घेतला त्यापूर्वी अर्जदारास दिनांक 26/07/2010 चे रक्कम रु. 45,990/- चे विद्युत देयक दिले होते ते विद्युत देयक दिनांक 31/05/2010 ते 30/06/2010 या कालावधीसाठीचे होते. व त्यास चालू बिल रक्कम रु.2022.06 व थकीत बील रक्कम रु.40.041.19 असे एकुण रक्कम रु.45,990/- अर्जदाराकडे येणे असल्याचे दर्शविण्यात आले होते, तदनंतर दुसरे विद्युत देयक हे दिनांक 07/09/2010 चे रककम रु. 50,410/- रु. चे होते.अर्जदाराने एकुण 30000/- रु. चा भरणा केला असताना देखील अर्जदाराचे विद्युत मिटर बसविण्यात आले नाही.त्यामुळे अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराने भरलेल्या रक्कम रु.15000/- ची पावती द्यावी व ती रक्कम मुख्य बिलाच्या रक्कमेतून वजा करण्यात यावी.तसेच विद्युत मिटरची योग्य व बरोबर असलेली विद्युत बले व टेस्टींग रिपोर्ट, तपासणी अहवाल सादर करावेत. मिटर क्रमांक 7610092728 हे तात्काळ पूर्णस्थापीत करुन अर्जदाराचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5000/- द्यावेत. अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.7/1 ते नि.7/6 व नि.17 ते नि.17/3 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, व 2 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी एकत्रीतपणे लेखी निवेदन नि.12, वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्णणे असे की, अर्जदाराने दिनांक 31/03/2009 नंतर एकही विज बिल न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली व अर्जदाराने विद्युत देयकाची रक्कम भरणा केलेली नसल्यामुळे नाईलाजास्तव अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करावा लागला व यास सर्वस्वी अर्जदारच जबाबदार आहे.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदारास प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणेच विद्युत देयक देण्यात आलेली आहे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचासमोर केली आहे. गैरअर्जदारानी लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.13 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.18 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने ग्राहक क्रमांक 5300105795269 मिटर क्रमांक 7610092728 अन्वये गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता त्यास नियमीतपणे अवास्तव रक्कमेचे विद्युत देयक देण्यात आली. दिनांक 10/10/2010 रोजी भरारी पथकाने अर्जदाराचे मिटर पूर्व सुचना न देता व पंचनामा न करता काढून नेले अर्जदाराने रक्कम रु.30,000/- देवुन ही अर्जदाराचा विज पुरवठा सुरळीत केला नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. त्यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, त्याने दिनांक 31/03/2009 नंतर विद्युत देयकाचा भरणा केलेला नसल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत गेली निणर्यासाठी महत्वाचा मुद्दा असा की, अर्जदारस देण्यात आलेली विद्युत देयक त्याच्या विज वापरानुसार देण्यात आलेली आहेत काय ? मंचासमोर दाखल केलेल्या विद्युत देयकाची पडताळणी केली असता ( नि.7/1 व नि.7/2) व CPL (नि.18) चे अवलोकन केले असता त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल.अर्जदारास कधीही मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक देण्यात आलेली नाही हेच निदर्शनास येते.मार्च 2009 ला 48 युनीटस, एप्रिल 2009 ला 720 युनिटस्, मे 2009 ला 2274 युनिटस्, जानेवारी 2010 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत 324 युनिटस् प्रतिमहा या प्रमाणे विद्युत देयक दिलेली आहेत. तसेच अर्जदाराच्या घरचे मीटर कुठलीही पूर्व सुचना न देता, पंचनामा न करता काढून घेवुन जाणे हया बाबी नक्कीच गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याचे दर्शविण्यास पुरेशा आहेत.पुढे अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याने गैरअर्जदारास रोख रक्कम 15000/- व धनादेशाव्दारे 15000/- दिले आहेत,परंतु त्या संदर्भात ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नसल्यामुळे अर्जदाराचे उपरोक्त म्हणणे मान्य करता येणार नाही. अर्जदाराने वास्तविक पाहता ह्या रक्कम रितसर गैरअर्जदाराच्या कार्यालयात जमा करुन पावती घ्यावयास हवी होती.तसेच गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या CPL ची पाहणी केली असता सदरील रक्कम अर्जदाराच्या नावे जमा झालेल्या दिसत नाही त्यामुळे अर्जदाराची उपरोक्त मागणी नामंजूर करण्यात येत आहे.तसेच अर्जदाराने दिनांक 31/03/2009 रोजी रक्कम रु.2220/- चा भरणा केल्यानंतर विद्युत देयकापोटी कोणतीही रक्कम भरल्याचे दिसत नाही. परंतु अर्जदाराने अंतरिम आदेशा पोटी गैरअर्जदाराकडे रक्कम रु. 13000/- भरल्याचे दिसते ( नि.17/1) त्यामुळे गैरअर्जदाराने दिलेले एप्रिल 09 ते मीटर बसवुन देईपर्यंतच्या कालावधीचे विद्युत देयक रद्द करण्यात येत आहे.मिटर बसविल्यानंतर योग्य विद्युत देयक येत असल्याचे अर्जदाराने युक्तीवादा दरम्यान मान्य केले आहे त्यामुळे त्या मीटरची 3 महिन्यासाठी रिडींग घेवुन त्यानुसार अर्जदाराचा सरासरी प्रतिमहा विज वापर काढावा व अर्जदारास उपरोक्त कालावधीसाठी त्यानुसार विज बिल देण्यात यावी असा आदेश देणे न्यायोचित होईल.म्हणून आम्ही सर्व बाबींचा सारासार विचार करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश कळाल्यापासून 90 दिवसां पर्यंत अर्जदाराच्या मीटरची रिडींग घ्यावी व त्या प्रमाणे प्रतिमहा अर्जदाराचा विज वापर काढावा व त्याप्रमाणे अर्जदारास एप्रिल 2009 ते मिटर बसवुन देई पर्यंतच्या कालावधीसाठीचे विद्युत देयक द्यावीत.त्यावर कोणतेही दंडव्याज आकारु नये. व अर्जदारास स्लॅब बेनिफीटही द्यावा.ही पूर्ण कार्यवाही गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 120 दिवसांत करावी. 3 गैरअर्जदाराने उपरोक्त कालावधीसाठी दिलेल्या विद्युत देयकाच्या रक्कमेतून अर्जदाराने भरलेली रक्कम समायोजित करावी व उर्वरित रक्कम 3 समान हप्त्या मध्ये अर्जदाराकडून वसुल करावी. अर्जदाराने ठरावीक वेळेत हप्त्याची रक्कम जमा न केल्यास गैरअर्जदारास 9 टक्के व्याजदराने ती रक्कम वसुल करता येईल. 4 गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1000/- अर्जदारास निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावी किंवा अर्जदाराकडून येणे असलेल्या रक्कमेतून समायोजित करावी. 5 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |