निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 07/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 26/04/2011 कालावधी 03 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सौ.ज्योती भ्र.जीवनअप्पा तरवाडगे. अर्जदार वय 40. धंदा. घरकाम. अड.आर.एस.मेतकेवार. रा.महाराणी लक्ष्मीबाई रोड.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार महाराष्ट्र विज वितरण कंपनी परभणी विभाग. अड.एस.एस.देशपांडे. जिंतूररोड.परभणी. 2 उप कार्यकारी अभियंता. महाराष्ट्र विज वितरण कंपनी शहरी उप विभाग.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा. सौ.सुजाता जोशी सदस्या .) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने हि तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ही महाराणी लक्ष्मीबाई रोड येथे स्वतःच्या घरात रहाते.तिने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010522438 अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला आहे.जुन 2010 मध्ये अर्जदाराचे मीटर जळाले म्हणून नवीन मीटर बसवण्यात आले.अर्जदार ही सुरुवाती पासूनच नियमित विद्युत देयके भरत होती.डिसेंबर 2010 मध्ये गैरअर्जदाराच्या वतीने काही व्यक्तींनी अर्जदाराचे मीटर काढून नेले नेताना ते सील केले नव्हते गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 31/12/2010 रोजी मीटर तपासणीसाठी बोलावले व वायर वगैरे तुटलेले आहे असे अर्जदाराच्या मुलास चुकीचे सांगीतले नंतर गैरअर्जदाराच्या वतीने त्याच्या प्रतिनिधीने अर्जदाराच्या घरी येवुन लाईट बील न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे सांगीतले. अर्जदाराचा मुलगा चौकशीसाठी गेला असता रु.25,724/- चे थेप्ट असेसमेंटचे बील त्याला दिले व हे बील भरल्यानंतर रु.16000/- चे कंपाऊंडींग चार्जेसचे बील देण्यात येईल असे सांगण्यात आले. अर्जदाराने कोणतीही वीज चोरी केली नसताना खोटे बील देवुन अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व रु.25,724/- चे विद्युत देयक रद्द करुन त्या देयकाच्या अनुषंगाने अर्जदाराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येवू नये व मानसिक त्रासाबद्दल रु.5000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2500/- मिळावेत अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत तिचे शपथपत्र, विद्युत देयके, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार, स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने वीज चोरी केली व त्याच वीज चोरीचे त्यांना योग्य तेच विद्युत देयक देण्यात आले आहे व त्यात गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून अर्जदाराची ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. दिनांक 31/12/2010 रोजी गैरअर्जदाराचे फिरते पथक अर्जदाराचे विद्युत मीटर तपासासाठी गेले असता मीटर मंद गतीने चालत असल्याचे आढळून आले.तसेच मीटर बॉडी सील तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.सदरील मीटर अक्युचेक या मशीनने तपासले असता ते 52.81 % इतक्या मंदगतीने चालत असल्याचे लक्षात आले.व अर्जदाराचा संलग्न भार तपासला असता तो 3.313 के.डब्ल्यु असा होता व मंजुरभार केवळ 0.81 के.डब्ल्यु आहे.त्यानंतर स्पॉट इन्स्पेक्शन करण्यात आले व मीटर काढून त्यावर सील लावले व सीलवर अर्जदाराची सही घेतली व ते जप्त केले.व त्याच दिवशी सखोल तपासणी गैरअर्जदाराच्या मीटर चाचणी कक्षात झाली त्यावेळी अर्जदाराचा मुलगा तिथे उपस्थित होता व त्यावेळी उप कार्यकारी अभियंतांनी संयुक्त तपासणी अहवाल तयार केला व त्यातून अर्जदाराने वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले व त्यानंतर अर्जदारास असेसमेंट बील देण्यात आले त्याने ते न भरल्यामुळे अर्जदारा विरुध्द पोलीस स्टेशनला गु.र.नं.20/11 नोंदवण्यात आला आहे.व अर्जदाराविरुध्द वीज चोरीचे प्रकरण प्रलंबीत आहे. अर्जदारा विरुध्द भारतीय वीज कायदा 2003 च्या कलम 135 प्रमाणे प्रकरण प्रलंबित आहे.त्यामुळे मा.ग्राहक मंचास ही तक्रार चालवण्याचे अधिकार क्षेत्र नाही अर्जदाराला वीज चोरीचे योग्यच वीज बील दिलेले आहे.व कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार रु.1000/- इतक्या खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. गैरअर्जदाराने तक्रार सोबत त्याचे शपथपत्र ,एफ.आय.आर, स्पॉट इन्स्पेक्शन रीपोर्ट, संयुक्त तपासणी अहवाल,मीटर जप्ती पंचनामा, मीटर टेस्ट रिपोर्ट, असेसमेंट शीट इ. कागदपत्र दाखल केले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराने मंजूर भारापेक्षा जास्त प्रमाणात अनाधिकृत विजेचा वापर अथवा वीज चोरी केल्याचे गैरअर्जदाराकडून शाबीत झाले आहे काय ? होय. 2 दिनांक 03/01/2011 चे वादग्रस्त बील रु.25,724/- देवुन गैरअर्जदाराकडून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा सेवात्रुटी झाली आहे काय ? नाही. 3 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे अर्जदारास घरगुती वापराचे ग्राहक क्रमांक 530010522438 चे विद्युत कनेक्शन दिल्याचे सर्वमान्य आहे. दिनांक 31/12/2010 रोजी गैरअर्जदाराचे फिरते पथक अर्जदाराचे विद्युत मीटर तपासणीसाठी गेले असता मीटर मंद गतीने चालू असल्याचे आढळून आले तसेच मीटर बॉडी सील तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.तसेच संलग्न भार तपासला असता तो 3.313 के.डब्ल्यु असा दिसला व मंजूर भार केवळ 0.80 के.डब्ल्यु.आहे गैरअर्जदाराने यासाठी पुराव्यात स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट ( नि.16/2) मीटर जप्ती पंचनामा( नि.16/3) संयुक्त तपासणी अहवाल ( नि.16/4) टेस्ट रिझल्ट ( नि.16/5) पोलीस स्टेशनला दाखल केलेली फिर्याद ( नि.16/1) हे कागदपत्र दाखल केले आहेत. अर्जदाराच्या विद्युत देयकावर मंजूर भार 0.80 KW आहे तर स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये संलग्न भार 3.313 KW दिसून येतो.या पंचनाम्यावर अर्जदाराची ही सही आहे तक्रार अर्जात ही बाब लपवुन ठेवुन अर्जदाराने समजून उमजून तक्रारीवर सही केलेली आहे. तसेच नि.16/4 वरील संयुक्त तपासणी अहवालात ही मीटरच्या अंतर्गत भागाची तांत्रिक तपासणी केली असता मीटरची इनकमिंग फेजची निळया रंगाची वायर जी.पी.सी.बी.कडे जाते ती कट करुन ठेवलेली दिसून आली. यामुळे मीटरची गती कमी झाली होती हे सिध्द होते.असा स्पष्ट उल्लेख आहे.यावर अर्जदाराच्या मुलाची इतर साक्षीदारांसह सही आहे. दिनांक 31/12/2010 च्या संयुक्त तपासणी अहवाला नंतर अर्जदाराला दिनांक 03/01/2011 रोजी थेफ्ट असेसमेंट बील रु. 25,724/- ( नि.6/8) देण्यात आले. अर्जदाराने ह्या बीलाची रक्कम गैरअर्जदाराकडे भरली नाही म्हणून गैरअर्जदाराने दिनांक 29/01/2011 रोजी पोलीस स्टेशन मस्तगड जालना येथे अर्जदाराविरुध्द वीज चोरीची फिर्याद नोंदवली ( नि.16/1) ती गु.रं.नं. 20/11 खाली पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. यासर्व बाबी दडवुन ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन अर्जदाराने या न्यायमंचाची दिशाभुल केलेली आहे.असे खेदाने म्हणावे लागेल. अर्जदाराने अनाधिकृत जादा वीज वापर करुन बेकायदेशिर कृत्य केले असल्याचे पुराव्यात निर्विवाद सिध्द झाले आहे.त्यामुळे पुराव्यात दाखल केलेल्या नि.16/6 वरील असेसमेंट शीटनुसार अर्जदाराला दिलेले नि.6/8 वरील वीज अधिनियम ग्राहकचे कलम 135 चे तरतुदी नुसार केलेली आकारणी रु.25,724/- गैरअर्जदाराकडे जमा करण्याची अर्जदाराची कायदेशिर जबाबदारी आहे.आणि या बाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारची सेवात्रुटी अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब झालेला नाही. म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1) अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2) अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 3) दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |