निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2013 तक्रार निकाल दिनांकः- 01/04/2014
कालावधी 06 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्री रावसाहेब पिता श्रीधरराव चव्हाण, अर्जदार
वय 52 वर्षे. धंदा.शेती, अॅड.एस.एस.चव्हाण.
रा.वैभव नगर, परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभिंयता, शहर विभाग, गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परभणी. अॅड.एस.एस.देशपांडे.
2 उपकार्यकारी अभियंता,शहर विभाग,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परभणी.
3 सहाय्यक अभियंता अधिकारी साहेब,
वैभव नगर, वसमत रोड, शहर विभाग,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची लाईट बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची
तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो वैभव नगर परभणी येथील रहिवाशी असून त्याने घरगुती वापरासाठी ग्राहक क्रमांक 530010512980 व मिटर क्रमांक 00413667 अन्वये गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता. व तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने जानेवारी 2013 ते जुलै 2013 पर्यंतचे गैरअर्जदाराकडे विजबिले वेळोवेळी भरलेले आहेत. विशेष म्हणजे गैरअर्जदाराने जानेवारी 2013 ते मे 2013 पर्यंत प्रत्येक महिन्यात विज वापर युनीटची संख्या प्रतिमहा 100 दाखविलेली आहे, आणि त्यानंतर जुन 2013 चे 30 युनीट व जुलै 2013 चे 567 युनीट व ऑगस्ट 2013 चे 358 युनीट दर्शविले आहे. व गैरअर्जदाराने एकदम चुकीच्या पध्दतीने दिनांक 22/08/2013 रोजी 22660/- रु. चे बिल दिले.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास जानेवारी 2013 ते जुलै 2013 पर्यंतच्या प्रत्येक महिन्याच्या बिलावर चालु रिडींगच्या रकान्यामध्ये Inaccess दर्शवुन खोटे व चुकीचे बिले दिले आहेत. सदरचे बिले गैरअर्जदाराने फोटो रिडींग न घेताच चुकीचे बिले अर्जदारास दिलेली आहेत. गैरअर्जदाराने नियमा प्रमाणे विद्युत आकारणी करुन विज बिले अर्जदारास दिलेली नाहीत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने ऑगस्ट 2013 चे रु. 22660/- चे 358 युनीटचे बिल एकदम चुकीचे दिली आहेत. कारण अर्जदाराचा त्याच्या घरात विद्युत वापर एवढा नाहीच. गैरअर्जदाराने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता ऑगस्ट 2013 चे चुकीची बिल देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे पूर्वी अर्जदाराने दिनांक 21/09/2013 रोजी गैरअर्जदाराकडे जावुन सदरचे बिल दुरुस्त करुन द्या, व मिटर बदलुन द्या, म्हणून विनंती केली, परंतु त्याचा कांहीही उपयोग झाला नाही, म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने अर्जदारास दिलेले मिटर क्रमांक 00413667 अन्वये ऑगस्ट 2013 चे 22660/- रु. चे बिल दुरुस्त करुन द्यावे, व तसेच मानसिक त्रासापोटी 5000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 3000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्राच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये ऑगस्ट 2013 चे 22,660/- रु. चे लाईट बिल, मे -2013 चे लाईट बिल, दिनांक 03/07/2013 ची लाईट बिल भरल्याची पावती, एप्रिल -2013 चे बिल, दिनांक 05/06/2013 ची लाईट बिल भरल्याची पावती, फेब्रुवारी 2013 चे लाईट बिल, दिनांक 05/03/2013 ची लाईट बिल भरल्याची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केलेमुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑगस्ट – 2013 चे
22,660/- रु. चे चुकीचे बिल देवुन अर्जदारास सेवेत
त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010512980 व मिटर क्रमांक 00413667 अन्वये घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला होता व अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या ऑगस्ट 2013 च्या लाईट बिलावरुन व तसेच इतर बिलावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने माहे ऑगस्ट 2013 मध्ये मिटर रिडींग न घेताच 22,660/- रु. चे 358 युनीटचा वापर दाखवुन चुकीचे बिल अर्जदारास दिले आहे. याबाबत नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या ऑगस्ट 2013 च्या लाईट बिलाचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरचे चालू रिडींग 4326 व मागील रिडींग 3968 असे दर्शवुन 358 युनीटचा वापर दाखवुन अर्जदारास 22,660/- रु. चे बिल दिल्याचे दिसून येते. तसेच सदर बिलामध्ये अर्जदाराचा मागील विज वापर या सदराखाली ऑक्टोबर 2012 ते जुलै 2013 पर्यंतच्या बिलाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2012 चे 416 युनीट, नोव्हेंबर 2012 चे 100 युनीट, डिसेंबर 2012 चे 100 युनीट, जानेवारी 2013 चे 100 युनीट, फेब्रुवारी 2013 चे 100 युनीट, मार्च 2013 चे 100 युनीट, एप्रिल 2013 चे 100 युनीट, मे 2013 चे 100 युनीट, जुन 2013 चे 3430 युनीट, जुलै 2013 चे 537 युनीट, ऑगस्ट 2013 चे 358 चा वापर दाखवुन लाईट बिले दिल्याचे दिसून येते.व सदर बिलामध्ये अर्जदाराने शेवटचे बिल भरल्याची तारीख दिनांक 03/07/2013 असे दर्शविली आहे. यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने वेळोवेळी बिले गैरअर्जदाराकडे भरणा केले आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या ऑगस्ट 2013 च्या बिलाचे अवलोकन केले असता हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने मिटर रिडींग न घेताच Average बिल ऑक्टोबर 2012 ते जुलै 2013 पर्यंत दिले आहेत. तसेच अर्जदाराने दाखल कलेल्या नि.क्रमांक 4/2 वरील व नि.क्रमांक 4/4 व नि.क्रमांक 4/7 वरील बिलाचे देखील अवलोकन कले असता, चालु रिडींग Inaccess दाखवुन गैरअर्जदाराने अर्जदारास लाईट बिले दिल्याचे दिसून येते.
गैरअर्जदाराने मिटरची फोटो रिडींग घेवुन अर्जदारास लाईट बिले दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, गैरअर्जदाराने ऑगस्ट 2013 चे 358 युनीटचा वापर दाखवुन मिटर रिडींग न घेताच 22,660/- रु. चे चुकीचे अर्जदारास बिल दिल्याचे मंचास वाटते. निश्चित गैरअर्जदाराने अर्जदारास ऑगस्ट 2013 चे लाईट बिल चुकीचे देवुन सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले ऑगस्ट 2013 चे रु. 22,660/- चे लाईट बिल
रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदाराच्या मिटरचे
पूढील दोन महिन्याचे फोटो रिडींग घ्यावे व आलेल्या सदर युनीट मध्ये एक
महिन्याचे Average Bill काढून अर्जदारास ऑग्स्ट 2013 चे सुधारीत लाईट
बिल दुरुस्त करुन द्यावेत.
4 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी रु.1,000/- फक्त( अक्षरी रु.एकहजार फक्त)
आदेश मुदतीत अर्जदारास द्यावेत.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.