निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः-07/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 16/09/2013
कालावधी 02वर्ष. 02महिने. 09दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रभाकर राधाकिशन चव्हाण. अर्जदार
वय 42 वर्षे. धंदा.स्वंयरोजगार व्यवसाय. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.भाग्यलक्ष्मी सर्व्हिस सेंटर,
जालना रोड,जिंतूर ता.जितूर जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा. राज्य विज वितरण कं.मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
परभणी विभाग, जिंतूर रोड,परभणी.
2 सहाय्यक अभियंता,
महा. राज्य विज वितरण कं.मर्या.
उपविभाग जिंतूर, ता.जिंतूर जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास मिटर रिडींग न घेताच चुकीची बिले देवुन दिलेल्या त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिल्या बाबतची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा जिंतूर ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून तो व्यावसायिक आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून इ.स. 2005 मध्ये त्याच्या “ भाग्य लक्ष्मी सर्व्हीस सेंटर ” च्या दुकानात विद्युत कनेक्शन घेतले हाते.ज्याचा ग्राहक क्रमांक 540010464972 व मिटर क्रमांक 61/00977777 असा आहे. सदरील विद्युत पुरवठा अर्जदाराने दिनांक 07/04/2005 रोजी घेतले होते.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील विद्युत पुरवठा घेतल्यावर अर्जदारास “ Normal R.N.A. Faulty ” असे रिमार्क देवुन लाईट बिले येत होती, परंतु दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा रिडींग प्रमाणे देयके आल्यावर मागील सरासरीची रक्कम जमा करुन, वजा करुन देयके येत होती, अशा प्रकारे जवळपास 2009 पर्यंत कोणताही वाद नव्हता.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, एप्रिल -2009 मध्ये 189 युनीटचे बिल आले होते. मे -2009 मध्ये आर.एन.ए. रिमार्क देवुन 243 युनीटचे बिल दिले त्यानंतर जून -2009 मध्ये मात्र एकदम 2261 युनीटचे बिल ( रु. 12,765/- चे) देण्यात आले व येथूनच वाद सुरु झाला.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2009 या तीन महिन्यात आर.एन.ए. रिमार्क देवुन 6628 हिच रिडींग दाखवून 543 युनीट दरमहा दाखवून लाईट बिले दिले. त्यामुळे अर्जदारास अवाजवी देयके भरताच आले नाहीत. व त्यामुळे दिनांक 24/06/2009 रोजी भरलेले 2130/- नंतर रक्कम भरता आली नाही, व त्यामुळे सप्टेंबर 2009 चे बील रु. 28,008= 46 एवढे झाले. अचानक ऑक्टोबर 2009 मध्ये रिडींग 6628 ते 5952 अशी उलटी दाखवून पुन्हा 2172 युनीटचे बिल दिले व त्यानंतर नोव्हेंबर 2009, डिसेंबर 2009, जानेवारी 2010, फेब्रुवारी 2010, मार्च 2010 ते एप्रिल 2010 पर्यंत सतत फॉल्टी रिमार्क देवुन कायम रिडींग 5952 हिच रिडींग दाखवून दरमहा 543 युनीटचे देयके दिले व शेवटी अर्जदाराने नाईलाजाने दिनांक 23/12/2009 रोजी 8600/- रुपये भरले. तरी देखील एप्रिल 2010 रोजी रु.20,655=96 एवढी रक्कम देणे राहिली.त्यानंतर अचानक मे 2010 मध्ये नॉर्मल रिमार्क देवुन
(रिडींग 5952 ते 7685) 1733 युनीटचे बिल दिले व पूर्वीची अॅडजस्टमेंट बरोबर न करता 33010=55 चे देयके दिले.
अर्जदाराचे या पुढे असे म्हणणे आहे की, जून, जुलै 2010 मध्ये नॉर्मल दाखवून पुन्हा ऑगस्ट 2010 मध्ये आर.एन.ए. व नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर 2010 मध्ये नॉर्मल दाखवून रिडींग प्रमाणे देयके दिली, परंतु पूर्वी जास्त युनीटचे देयके व्यवस्थित अॅडजस्ट न केल्याने नोव्हेंबर 2010 अखेर 8305 ते 8563 रिडींग दाखवून एकुण 36449=38 चे लाईट बीले दिली.
अर्जदाराने दिनांक 24/07/2010 रोजी 5,000/- भरुनही वजा करुनही एवढी मोठी रक्कम अर्जदाराकडे बाकी दाखविली गेली हाच क्रम पुढे चालू राहिला व डिसेंबर 2010, जानेवारी 2011, फेब्रुवारी 2011, व मार्च 2011 या 4 महिन्यात आर.एन.ए. दाखवून कायम रिडींग 8563 दाखवून सरासरी 146 युनीटचा वापर दाखवून लाईट बिले दिले. तरी देखील अर्जदाराने दिनांक 26/02/2011 रोजी 5,000/- भरले. त्यानंतरही मार्च 2011 मध्ये 146 युनीटचा वापर दाखवून 37,340/- रुपयाचे बील दिले व ते न भरल्याने गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही नोटीस न देता जुन 2011 मध्ये विज पुरवठा तोडला.
अर्जदाराने गैरअर्जदारास लाईट बील दुरुस्त करुन देण्याबाबत अनेक वेळा विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने दाद दिली नाही, म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन जून 2009 पासून 30/06/2011 पर्यंतचे सर्व बिले रद्द करण्यात यावे (शेवटची रिडींग 8776 पर्यंत सुधारीत देयके) व गैरअर्जदारास असा आदेश करावा की, त्याने या कालावधीची मिटर रिडींग प्रमाणे स्लॅब बेनिफीट देवुन कोणतेही व्याज आकारणी न करता अर्जदाराने या कालावधीत भरलेले सर्व रक्कम वजा करुन सुधारीत बिल अर्जदारास द्यावीत. व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या कामांत झालेल्या नुकसानी पोटी दररोज 500/- रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश करावे. व तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व खर्चापोटी रु.2,500/- देण्याचे आदेश व्हावे.
अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये डिसेंबर 2008 ते मार्च 2011 पर्यंतचे सी.पी.एल., 5000/- रुपये भरल्याची पावती, मार्च 2011 चे बील ई. चा समावेश आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत हजर, होवुन नि.क्रमांक 16 वर आपले लेखी जबाब दाखल केले. त्यांचे थोडक्यात म्हणणे असे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व योग्य ते बिल दिलेले आहे. तसेच अर्जदाराचे विज कनेक्शन हे कमर्शियल असल्यामुळे तो ग्राहक या संज्ञेत येत नाही, म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा भाग्य लक्ष्मी सर्व्हीस सेंटरव्दारे व्यपारात मोठया प्रमाणे नफा कमावतो व अर्जदाराने स्वतः सदरच्या व्यवसाया पासून दररोज 500/- रुपये नफा कमावतो असे मान्य केलेले आहे. व म्हणून तो ग्राहक या संज्ञेत बसत नाही. गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, कांही कारणास्तव मिटर रिडींग नाही मिळाल्यास विज कंपनी नियमा प्रमाणे चालू रिडींग आर.एन.ए. असे दाखवून सरासरी विज वापरा नुसार विज बील दिले जाते व रिडींग मिळाल्यानंतर अंदाजे लावलेले युनीट वजा करुन प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे बील दिले जाते. गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांने माहे1/2010 मध्ये अर्जदाराचे बील दुरुस्त करुन 8731 चे व मार्च 2010 मध्ये 14260/- रुपये वजा करुन अर्जदारास योग्यच बील दिले आहेत व तसेच अर्जदाराने 24/07/2010 रोजी 5000/- रुपये 26/02/2011 रोजी 5000/- रुपये बील भरले व त्यामुळे अर्जदाराकडे बिलापोटी थकबाकी राहिली म्हणून जून 2011 मध्ये अर्जदाराचे बिल दुरुस्त करुन 17,816/- रुपये वजा केले व अर्जदारास योग्य बिल दिले, म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास जुन 2009 पासून ते मार्च 2011
पर्यंत रिडींग न घेता चुकीचे बील देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 6 वर दाखल केलेल्या लाईट बिलावरुन व सी.पी.एल. वरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास जुन 2009 पासून ते मार्च 2011 पर्यंत रिडींग न घेताच कधी आर.एन.ए. दाखवून, कधी फॉल्टी दाखवून, कधी नॉर्मल दाखवून अॅव्हरेज बिले दिली ही बाब नि.क्रमांक 6 वर दाखल केलेल्या सी.पी.एल. कागदपत्रावरुन व लाईट बिलावरुन सिध्द होते. या वरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास जुन 2009 पासून ते मार्च 2011 पर्यंत मिटरचे रिडींग न घेताच अॅव्हरेज बिले देवुन निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास मिटर रिडींग प्रमाणे बिले दिली होती, या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास जुन 2009 पासून ते मार्च 2011 पर्यंत दिलेली सर्व
देयके रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत पूढील 2 महिन्याचे
अर्जदारा समक्ष फोटोसह अर्जदाराच्या मिटरचे रिडींग घ्यावे व त्याची प्रतिमहा
सरासरी काढून वरील 2 वर्षाचे कालावधीचे बिल सदरील सरासरी प्रमाणे विना दंड
अथवा व्याज आकारता Calculate करावे व अर्जदारास जुन 2009 पासून ते मार्च
2011 पर्यंतचे सुधारीत बिल द्यावे.
4 अर्जदाराने जुन 2009 पासून ते मार्च 2011 पर्यंतच्या बिला बाबत भरलेली सर्व
रक्कम वरील सुधारीत बिलातून वजा करण्यात यावी.
5 गैरअर्जदारांनी अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत तक्रार खर्च
म्हणून रु.1,500/- फक्त (अक्षरी रु.एकहजार पाचशे फक्त ) द्यावे.
6 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.