( आदेश पारित द्वारा मा. सदस्या, श्रीमती गीता रा. बडवाईक)
-- निकालपत्र --
( पारित दि. 26 एप्रिल 2012)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
1 तक्रारकर्ता हा फ्लोअर मिल व हॉलर चालवित असून त्याचा ग्राहक क्रं.431530003052 आहे. सदर मिलवर 15 (KW) H.R. हे सॅक्शन लोड असून डिमांड 12.00 KVA ची
आहे. सदर विद्युत कनेक्शन हे तक्रारकर्त्याची आई श्रीमती हलीमबाई मोहम्मद मेहबुब शेख यांच्या नांवे आहे.
2 तक्रारकर्ता सदर विद्युत मीटरचा वापर दि. 28/11/1974 पासून करीत असून तो नियमितपणे विद्युत बिलाची रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा करीत होता. सदर फ्लोअर मिल व हॉलर हे एका लहानशा गावात आहे. ऑगस्ट 2011 पर्यंत तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षा विषयी कोणतीही तक्रार नव्हती. त्यानंतर विद्युत मीटर संदर्भात त्यास अनियमितता आढळून आल्यामुळे त्यांनी दि. 8.8.2011 ला विरुध्द पक्षाकडे लिखित
तक्रार दिली की, विद्युत मीटर वेगाने सुरु आहे. जेव्हा की, तक्रारकर्त्याचा विद्युत वापर त्या पेक्षा कमी आहे. त्या अर्जाच्या मागे श्री. मुनेश्वर, विद्युत मदतनीस यांनी, " Cable wire of two points are melted due to fluctuation of over load." असे लिहून दिले. विरुध्द पक्षा तर्फे श्री. मुनेश्वर विद्युत मदतनीस यांनी तक्रारकर्त्याच्या मीटरचे वाचन केले व दि. 27.11.2011 ला मीटरमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे मीटर बदलवून दिले तक्रारकर्त्याची पिठाची गिरणी बंद असतांना देखील मीटर वेगाने फिरत होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने वारंवांर विरुध्द पक्षाकडे लेखी तक्रार दि. 18.11.2011, 14.12.2011, 16.12.2011 ला देऊन ही विरुध्द पक्षाने त्याच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला नोव्हेबंर 2011 ला रुपये 5,430/- चे बिल 32.700 KVA चे प्राप्त झाले. तक्रारकर्त्याचा विद्युत वापर कमी असतांना देखील त्याचे मीटर वेगाने फिरत असल्याने त्याला जास्तीचे बिल आले असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. डिसेंबर 2011 ला तक्रारकर्त्याला रुपये 6,842.48 पै. चे बिल प्राप्त झाले. तक्रारकर्त्याने नोव्हेबंर व डिसेंबर 2011 ला कमी विजेचा वापर करुन ही जास्तीचे बिल आले त्यामुळे ते दोन्ही बिल रद्द करण्याची विरुध्द पक्षाला विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल केली.
3 तक्रारकर्त्याची विनंती आहे की, नोव्हेबंर 2011 व डिसेंबर 2011 चे रुपये 12080/- चे बिल रद्द करावे. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना मीटर रिडिंगप्रमाणे योग्य बिल देण्याचे निर्देश द्यावे. शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/-ची मागणी केली आहे.
4 तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दस्ताऐवज दाखल करण्याची यादी व एकूण 15 दस्त पृष्ठ क्रं. 27 ते 42 तसेच 70 व 71 दाखल केले आहे.
5 तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13(3) (बी) अन्वये अंतरिम अर्ज दाखल केला. सदर अर्ज Miscellaneous Application No. MA/01/12 अन्वये दाखल करण्यात आला. या अर्जावर दि. 21 जानेवारी 2012 ला अंतरिम आदेश पारित करण्यात आला की, मुळ तक्रार क्रं. 02/12 चा निकाल लागेपर्यंत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित करु नये. सदर MA/01/2012 हे मुळ तक्रारी सोबतच ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुळ तक्रारी सोबतच या अर्जावर आदेश पारित करीत आहे.
6 मंचाने विरुध्द पक्षाला मुळ तक्रार व MA/01/12 मधील नोटीस पाठविली. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्द पक्ष हजर झाले. त्यांनी त्यांचे लेखी उत्तर व दस्त दाखल केले.
7 विरुध्द पक्षाचा प्राथमिक आक्षेप आहे की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही. कारण की, सदर विद्युत मीटर हे तक्रारकर्त्याची आई श्रीमती हलीमबाई मोहम्मद मेहबुब शेख यांच्या नांवे आहे. तसेच सदर तक्रार त्यांच्या नांवाने दाखल केलेली नसून
तिचा मुलगा म्हणून तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.
8 विरुध्द पक्षाचा पुढे असा ही प्राथमिक आक्षेप आहे की, सदर मीटर हे औद्योगिक विद्युत पुरवठा या संदर्भातील आहे व व्यावसायिक उपयोगासाठी दाखल केलेली तक्रार चालविण्याचा मंचाला अधिकार नाही. उपरोक्त दोन्ही आक्षेपामुळे तक्रार खारीज करण्याची विरुध्द पक्षाने विंनती केली आहे. विरुध्द पक्षाचे पुढे असे ही म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर दि. 8.8.2011 ला विद्युत सहाय्यक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या असे निदर्शनास आले की, मीटरचे वाचन योग्य प्रकारे होत आहे. तसेच मीटर मध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तक्रारकर्त्याच्या वारंवांर विनंतीवरुन विरुध्द पक्षाने दि. 27.11.11 ला तक्रारकर्त्याच्या मीटरचे अंतिम रिडिंग घेऊन मीटर बदलवून मीटर टेस्टींगकरिता गोंदिया विभागाला पाठविले. टेस्टींग रिपोर्ट अन्वये मीटर योग्यरित्या कार्य करीत आहे असा रिपोर्ट प्राप्त झाला. तक्रारकर्त्याला दिलेले मीटर बिल त्यानी नोव्हेबंर 2011 मध्ये 143 युनिटचा वापर केला त्याचे रु.5,430/- चे देण्यात आले. तक्रारकर्त्याने ब-याच वेळा जास्तीच्या युनिटचा वापर केलेला आहे. डिसेंबर 2011 ला तक्रारकर्त्याला जे बिल देण्यात आले त्यामध्ये जुन्या मीटरचे रिडिंग अधिक डिसेंबर 2011 चे रिडिंग हे दोन्हीचे बिल देण्यात आले. तक्रारकर्त्याने नोव्हेबंर 2011 चे बिल न भरल्यामुळे दोन्ही बिलाची एकत्रिम रक्कम रुपये 12,080/- चे बिल तक्रारकर्त्यास देण्यात आले. तक्रारकर्त्यास उपरोक्त देण्यात आलेले बिल त्यांनी वास्तविक वापर केलेल्या विद्युत वापरानुसार देण्यात आले आहे. यामध्ये विरुध्द पक्षाच्या सेवेत कोणतीही त्रृटी नाही. तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्षानी केली आहे.
9 विरुध्द पक्षाने दस्ताऐवज यादीप्रमाणे एकूण 3 दस्त पृष्ठ क्रं. 57 ते 59 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षाने मुळ तक्रार क्रं. सी.सी.2/2012 मध्ये दिलेले उत्तर हेच MA/01/12 चे ही उत्तर समजण्यात यावे असे लिहून दिले.
10 तक्रारकर्त्याच्या वकिलांनी दि. 18/04/2012 ला Written Notes of Arguments दाखल केले. त्यावर विरुध्द पक्षाच्या वकिलानी लेखी उत्तर व दस्ताऐवज हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दि. 19/04/2012 ला दाखल केली.
11 मंचाने तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, दस्त यांचे अवलोकन केले. तसेच विरुध्द पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावरुन मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
11 तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ?
कारणमिमांसा
12 तक्रारकर्त्याने सदर तक्रार नोव्हेबंर- डिसेंबर 2011 या महिन्याचे जास्तीचे आलेले बिल याबाबत दाखल केलेली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे जुने मीटरच्या जागी नविन मीटर लावून दिले व जुने मीटर टेस्टींगकरिता पाठविले आहे. विरुध्द पक्षाने टेस्टींगचा रिपोर्ट दाखल केला आहे त्या अन्वये मीटर व्यवस्थितरित्या सुरु आहे. ," The above Meter Calculated Error Dial Test & Accumulate pulse test found within limits OK Meter Body Company Stiker Seal Ok " असे नमूद केले आहे.
13 तक्रारकर्त्याचा वाद हा त्याने विद्युत वापर कमी केला असून त्याला विरुध्द पक्षाने जास्तीचे बिल दिले याबाबतचा आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारकर्ता हा विरोधी पक्षाचा ग्राहक नाही तसेच त्याने व्यावसायिक प्रयोजनासाठी विद्युतचा वापर केला नाही व विरोधी पक्षाच्या सेवेमध्ये त्रृटी आहे इत्यादी बाबींच्या सखोल मध्ये न जाता मंच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या CPR (2008) Page No. 191, मध्ये हरियाणा स्टेट इलेक्ट्रीक बोर्ड विरुध्द मामचंद (2006) 4 S.C.C. 649, यामध्ये नमूद केल्याप्रमाणे “In matters of Assesment of Electricity Bills the Consumer Forum should have directed the respondent to move before the competent authority under the Act". या निकालाचा आधार घेत आहे.
14 तक्रारकर्त्याची तक्रार ही नोव्हेबंर व डिसेंबर 2011 या दोन महिन्याच्या जास्तीच्या आलेल्या विद्युत बिलाच्या आकारणीबाबत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त निकालावरुन तक्रारकर्त्याची तक्रार मीटर रिडिंग Assesment बाबत आहे. विद्युत कायदा 2003 अन्वये मीटर रिडिंग Assesment बाबत तक्रारीच्या संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण स्थापित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने विद्युत कायदा 2003 द्वारे स्थापित केलेल्या प्राधिकरणाकडे विद्युत मीटरच्या Assesment बाबत तक्रार दाखल करावी असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते.
करिता आदेश
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते.
2 तक्रारकर्त्याने योग्य त्या न्यायालयासमोर दाद मागावी.
3 या तक्रारी सोबतच MA/01/12 हा अर्ज निकाली काढण्यात येते.