ग्राहक तक्रार क्र. 291/2014
दाखल तारीख : 09/12/2014
निकाल तारीख : 17/10/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. रामहरी विठठलराव मोटे,
वय - 57 वर्ष, धंदा – शेती वकीली,
रा.गिरवली ता. भुम, ह.मु. विजयनगर भूम,
ता. भूम, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी संचालक,
निमकर सिड प्रा.लि., फलटन लोनद रोड
मु.पो.ता. फलटन जि. साताराप ससयससव्यवस्थापक.
2. विजय अॅग्रो करमाळा,
मु.पो. ता. करमाळा, जि. सोलापूर.
3. शेतकरी कृषी सेवा केंद्र पारगांव,
ता. वाशी जि. उस्मानाबाद,
प्रो. प्रा. महावीर डुंगरवाल. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.शालिनी अंधारे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 ते 3 तर्फे विधिज्ञ : श्री.ए. व्ही. मैंदरकर.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 निर्मीत सोयाबिनचे बियाणे वितरक विप क्र.2 व 3 मार्फत विकत घेऊन आपल्या जमिनीत पेरले असता बियाण्यात दोष असल्यामुळे पिक न येऊन नुकसान झाले म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढील प्रमाणे आहे.
1. तक व त्यांचा मुलगा यांचे नांवे गिरोली ता.भुम येथे सर्व्हे नंबर 61 मध्ये चार एकर जमिन आहे. तसेच सव्हे नबर 82 मध्ये चार एकर व सर्व्हे नबर 61 मध्ये एक एकर अशी जमिन आहे. त्यांचे एकत्र कुटूंब असून दोघेही शेतकरी आहेत. तसेच वकीलीचा व्यवसाय करतात. विप क्र.3 वाशी येथील वितरक यांचे कडून तक ने दि.11.7.2014 रोजी विप क्र.1 निर्मीत सोयाबिनचे बियाणे लॉट नंबर के-13,-1426 दोन बँगा प्रती बँग रु.2,500/- प्रमाणे घेतल्या. दि.12.7.2014 रोजी तक ने त्यांच्या व मुलाच्या नांवच्या जमिनीमध्ये तीन एकर क्षेत्रामध्ये बियाणे पेरले. जमिनीमध्ये भरपूर ओल होती व मेहनत मशागत होती. ठरलेल्या प्रकारे केलेली होती. 18 : 46 खत पेरले होते. पेरणी झाल्यावर थोडा पाऊसही पडला. दि.20.7.2014 व 31.07.2014 रोजी तक ने शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळेस बि न उगवल्याचे आढळून आले.
2. तक ने विप क्र.3 ला बियाणे उगवले नसल्याबद्दल कळविले. विप क्र.1 च्या कस्टमर केअर नंबरवर फोन करुन दि.20.7.2014 ते 22.07.2014 या काळात कळविले. परंतु त्यांनी दखल घेतली नाही. विप क्र.3 ने सांगितले की, त्यांने बियाणे विप क्र.2 कडून घेतलेले आहे. तक ने बियाणे खत व मजूरीसाठी रु.10,000/- खर्च केले. नांगरणी पाळी साठी रु.5000/- खर्च केले. प्रती एकर सोयाबिन उतारा 10 क्विंटल पडतो. एकूण रु.30 क्विंटल पिक मिळाले असते. प्रति क्विंटल रु.4000/- प्रमाणे रु.1,20,000/- चे नुकसान झाले. तसेच मानसिक, आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- विप कडून मिळणे जरुर आहे. असे एकूण रु.1,85,000/- विप कडून मिळावे व खर्च मिळावा म्हणून तक ने ही तक्रार दि.9.12.2014 रोजी दिलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत विप क्र.1 ला दिलेल्या दि.22.7.2014 च्या अर्जाची प्रत, तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या अर्जाची प्रत, त्यांचे पोहचसह, तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल दि.21.7.2014 चा बियाणे खरेदीची पावती,8-अ चा उतारा, 7/12 उतारे, कृषी अधिकारी यांना दिलेला दि.20.7.2014 चा अर्ज, तहसीलदार यांचे पत्र, उपविभागीय कृषी अधिकारी यांचे पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. विप क्र.1 ते 3 यांनी दि.13.3.2014 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. पाहणी समितीने विप यांना हजर राहण्या बाबत सुचना दिली नव्हती असे नमूद केलेले आहे. पाहणी समितीने पेरणी क्षेत्र 80 आर नमूद केलेले आहे. पेरणीनंतर जोराचा पाऊस झालेला नव्हता असे लिहीलेले आहे. त्यांतील नकाशावर पिकाची पाळी घालून मोड केली असे लिहीलेले आहे. यावरुन तक्रारीतील मजकूर चुकीचा असल्याचे दिसून येते. विप चे प्रतिनिधी श्री. नेहे यांनी स्वतः जाऊन क्षेत्राची पाहणी केली. विप ने तक्रारीची दखल घेतली नाही हे म्हणणे चुकीचे आहे. तक ला 30 क्विंटल सोयाबिन मिळाले असते व रु.1,20,000/- उत्पन्न मिळाले असते हे कबूल नाही. विप चे बियाणे उत्कृष्ट प्रतिचे होते. मात्र या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. शेतातील मातीचा गोळा करुन तो व्यवस्थित घटट झाला तरच पेरणी योग्य ओलावा असल्याचे समजते. बियाण्याला हळूच हाताळावे लागते. पेरणी शक्यतोवर 15 जुलैपर्यत संपवावी अशा सुचना दिलेल्या आहेत. प्रतिकूल हवामानामूळे तक चे नुकसान झाले त्यांला विप जबाबदार नाही. म्हणरून तक्रार रदद होणेस पात्र आहे.
5. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप ने दोषयुक्त बियाण्याचा पुरवठा केला काय ? होय.
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय, अंशतः
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2
6. त्यांने त्यांचे व मुलाचे नांवाचे जमिनीमध्ये 3 एकर क्षेत्रामध्ये दोन बॅगा सोयाबिनचे बियाणे पेरले. विप ने पंचनाम्यामध्ये 80 आर क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याचे नमूद असल्याकडे आमचे लक्ष वेधले आहे. पंचनाम्यामध्ये गट नंबर 182 मध्ये पेरणी झाली असे नमुद आहे. गट नंबर 61 तक व मुलगा यांचे नांवे असून गट नंबर 82 मुलाचे नांवे असल्याचे दिसते. पंचनाम्यामध्ये एकूण 3 प्लॉट दाखवले आहेत. मात्र गट नंबर नमूद नाही. तिस-या प्लॉट मधील पिकाची पाळी घालून मोड केली असे नमूद केलेले आहे. पिकाची मोड केली असे तक ने तक्रारीत म्हटलेले नाही.
7. पावती प्रमाणे तक ने बियाणे दि.11.7.2014 रोजी विकत घेतले होते. तक चे म्हणण्याप्रमाणे पेरणी दि.12.7.2014 रोजी केली. विप चे म्हणण्याप्रमाणे पेरणी शक्यतो 15 जुलै पर्यत संपवणे जरुरी होते. तक ने पेरणी त्यापुर्वीच केल्याचे दिसून येते.
8. तक ने तक्रारीत नमूद केले आहे की आसाराम राऊत या गडयाने पेरणीचे काम केले व त्यांला ब-याच वर्षापासून पेरणीचा चांगला अनुभव आहे. विप चे म्हणणे आहे की, त्यांनी भुम परिसरामध्ये सात शेतक-यांना पंधरा बॅग बियाणे विकले. मात्र तक ने मी वकिल असल्यामुळे तुमच्याकडून भरपाई मिळवून दाखवतो अशी धमकी दिली व त्याप्रमाणे पंचनामा तयार करुन घेतला. विप चे प्रतिनिधीने जमिनीस भेट दिली होती. मात्र बियाणे उगवले नाही हे विप ने नाकबूल केलेले नाही. उलट प्रतिकूल हवामान असल्यामुळे तक चे जमिनीत बियाणे उगवले नाही अशी विप ची तक्रार आहे.
9. क्षेत्र पाहणी अहवालाप्रमाणे पाहणी दि.31.7.2014 रोजी झाली. खताची पेरणी केली नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. पेरणी नंतर पाऊस झाला नव्हता असे नमूद आहे. कंपनी प्रतिनिधीची पण पाहणी अहवालावर सही आहे. सदोष बियाण्यामुळे 3.19 टक्के व 5.80 टक्के बियाण्याची उगवण झाली असे नमूद आहे.
10. विप चा बचाव आहे की, या परिसरात पावसाळयात योग्य तो पाऊस झाला नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, तक व इतर शेतकरी यांनी 15.07.2015 चे दरम्यान सोयाबिनचे बि पेरले होते. इकडे पावसाळा जुन महिन्यात सुरु होतो. जुन महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडतो नंतर जुलै महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो हे खरे आहे की, पावसाने ओढ देणे ही नित्याची बाब आहे. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसताना शेतकरी पेरणी करतील हे पटण्यासारखे नाही. 15 जुलैचे दरम्यान जमिनीत पुरेसा ओलावा असतो. त्यामुळेच शेतकरी पेरणी करतात. ब-याच शेतक-यांनी त्यावेळी सोयाबिन पेरले हे विप ला मान्य आहे. तक ने म्हटले आहे की, जमिनीत पुरेसा ओलावा होता व पेरणीनंतर थोडा पाऊस पडला. पेरणीनंतर जास्त पाऊस पडला असता तर बियाणे वाहून गेले असते किंवा कुजले असते. असे काहीही घडलेले नाही.
11. पावसाळयात पूढे पाऊस न झाला व पाणी देण्याची सोय नसेल तर पिकाची वाढ खुटंते. तथापि, इथे बियाणे न उगवल्याची तक्रार आहे. 5 टक्क्यापेक्षा सुध्दा कमी बियाणे उगवले. हे पंचनाम्यामधून सिध्द होत आहे. पुरेसा पाऊस पडला नव्हता. हे दाखवण्यास विप ला रेकार्ड हजर करता आले असते. विप ने तसे केलेले नाही. त्याअर्थी तक सह इतर शेतक-यांनी पुरेसा ओलावा असल्यामुळेच पेरणी केली असा निष्कर्ष काढावा लागेल.
12. शेतकरी हा पेरणी चांगले पिक येऊन चांगले उत्पन्न मिळावे या उददेशाने करतो. त्यासाठी जरुर ती मेहनत व जरुर तो खर्च करतो. बियाणे खते विकत घेतो. केवळ ग्राहक तक्रार करुन पैसे मिळवावेत असा शेतक-यांचा उददेश असणे शक्य वाटत नाही. 8 टककयापेक्षा बियाणे कमी उगवत असेल व इतर कोणताही हवामानाचा दोष दिसून येत नसेल तर त्यांचा अर्थ बियाण्यात दोष होता हाच निघू शकतो.
13. पंचनाम्याप्रमाणे 80 आर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सर्वसाधारणपणे एक पिशवी बियाणे एक एकर क्षेत्रावर पेरले जाते. त्यामुळे एकूण दोन एकर क्षेत्रावर पेरणी केली होती असे म्हणता येईल. एकरी 10 क्विंटल उत्पन्न मिळून एकूण 30 क्विंटल सोयाबिन मिळाले असते असे तक चे म्हणणे आहे. मात्र ते दाखवायला कोणताही पुरावा दिलेला नाही. आमचे मते एकरी 8 क्विंटल उत्पन्न निघते. तसेच त्यावेळेस बाजारभाव रु.3500/- प्रति क्विंटल धरता येईल. त्यामुळे एकूण नुकसान रु.56,000/- होते. तेवढे मिळण्यास तक पात्र आहे म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक्र ची तक्रार अंशतः खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 ते 3 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक यांला रु.56,000/- (रुपये छप्पन्न हजार फक्त) नुकसान भरपाई 30 दिवसाचे आंत म्हणून द्यावेत, न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
3. विप क्र.1 ते 3 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ल यांला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.