निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 13/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 13/03/2012 कालावधी 10 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. बाबाराव मारोतराव शिंदे. अर्जदार वय 44 वर्ष.धंदा.शेती. अड.एम.एस.आर.बेग. रा.हा.मु.वांगी,पो.असोला.ता.जि.परभणी. विरुध्द 1 अधिक्षक अभियंता. गैरअर्जदार. म.रा.वि.वि.कं.परभणी. अड.एस.एस.देशपांडे. 2 कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं.परभणी. 3 सहाय्यक अभियंता. म.रा.वि.वि.कं.परभणी ग्रामीण उपविभांग,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) विद्युत कनेक्शन देण्यास अक्षम्य दिरंगाई केल्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत अशी की, अर्जदार मौजे वांगी पो.ता.परभणी येथील रहिवासी आहे.त्याने त्याच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 155 मध्ये कृषी पंपाचे विज कनेक्शन मिळणेसाठी तारीख 05/12/2000 रोजी रितसर अर्ज व कोटेशनची रक्कम भरुन विज जोडणीची मागणी केली होती.कोटेशन भरल्यावर विज जोडणीसाठी लागणा-या खांब, तार, मिटर वगैरे साहित्याची कंपनीच्या अधिका-यांनी परस्पर विल्हेवाट लावुन व विज जोडणी झाल्याचे रेकॉर्डला खोटी नोंद दाखवुन विज बिले देण्यास सुरवात केली आणि तसेच तारीख 03/05/2004 तारखेचे रु.848.85 ग्राहक क्रमांक 530312810840 वरील बेकायदेशिर बिल दिले. विज कनेक्शन नसतांना बिल कसे काय दिले ते रद्द व्हावे म्हणून त्याने गैरअर्जदारांकडे विनंती केली असता चालढकल करुन त्या नंतरही तशीच बिले देण्यास सुरवात केली.त्याबाबत वरिष्ठांकडें तक्रार केली असता त्यांनी दोषी अधिका-यां विरुध्द कार्यवाही केली जाईल असे तोंडी आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात काहीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांना व पुणे, मुंबई, नांदेड येथील वरिष्ठांकडे लेखी निवेदन पाठवुन उपोषणास बसण्या बाबत कळविले. त्यावर प्रतिवादी 3 ने उत्तर पाठवुन 03/12/2009 पर्यंत विज पुरवठा देण्याची हमी दिली मात्र प्रत्यक्षात उपोषण मागे घेतल्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.शेवटी त्याला तारीख 10/12/2009 रोजी 09 वर्षाच्या प्रतिक्षे नंतर विज जोडणी दिली. विज कनेक्शन देतांना शेता पर्यंत रोवलेले इलेक्ट्रीक पोल भक्कम नसल्याने ते खाली पडले त्याबाबतीतही गैरअर्जदारांकडे तक्रार केली असता त्याचीही दखल घेतली गेली नाही. अशा रितीने अर्जदारास विनाकारण मनःस्ताप दिल्यामुळे नाईलाजाने 28/12/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कार्यालया समोर अर्जदारास सहकुटूंब उपोषणास बसावे लागले.ते मागे घेण्यासाठी गैरअर्जदारांनी त्याची बिले रद्द करतो, दोषी अधिका-यांवर कार्यवाही करतो.असे लेखी आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्यास विनंती केली त्यानंतरही अर्जदारास तारीख 08/02/2010 चे रु. 22,700/- बिल दिले अशा प्रकारे गैरअर्जदारांनी अर्जदारास मानसिकत्रास देवुन चुकीचे बिल दिले असलयाने त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन इलेक्ट्रीक कनेक्शनचे कोटेशन भरल्यापासून 09 वर्षे विलंबाने विज कनेक्शन दिले असल्याने शेतातील उत्पन्नाची नुकसान भरपाई रु.19,80,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह मिळावी.याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.1500/- मिळावे अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि. 2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 19 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्याठी गैरअर्जदारांना नोटीसा पाठविल्यावर तारीख 12/01/2011 रोजी त्यानी एकत्रित लेखी जबाब (नि.17) दाखल केलेला आहे.अर्जदाराने तारीख 05/12/2000 रोजी कृषी पंपाचे विज कनेक्शन मिळणेसाठी 2720 रु. कोटेशनची रक्कम भरुन विज कनेक्शनसाठी अर्ज दिला होता हे त्यांनी नाकारलेले नाही कोटेशन भरल्यानंतर सर्वांना एकाच वेळी जोडणी देणे शक्य होत नाही त्यामुळे अशा ग्राहकांची यादी करुन नंबर प्रमाणे विद्युत जोडणी दिली जाते व उत्पादक कंपनीकडून विद्युत जोडणीसाठी लागणारे साहित्य जसजसे उपलब्ध होईल तसतसे विद्युत जोडणी चे काम केले जाते त्यामुळे वादीने कोटेशन भरल्यानंतर विद्युत कनेक्शन जोडणी देण्याच्या बाबतीत वरील कारणामुळे विलंब झालेला आहे. नंबर लागल्यावर त्याबाबत त्याला विज जोडणी दिलेली आहे.त्यामुळे त्याबाबत त्यांच्याकडून सेवात्रुटी झालेली नाही.अर्जदाराने तक्रार अर्जातून 09 वर्षे विलंबाने विद्युत पुरवठा केल्याबद्दलची तक्रार अर्जातून मागणी केलेली नुसान भरपाई त्यांच्यावर लादता येणार नाही असे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे.तक्रार अर्जातील बाकीची सर्व त्यांच्या विरुध्द केलेली विधाने साफ नाकारुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार सहाय्यक अभियंता यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. प्रकारणाच्या अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. बेग आणि गैरअर्जदार तर्फे अड देशपांडे यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराने तारीख 05/12/2000 रोजी कृषी पंपासाठी विज जोडणीसाठी गैरअर्जदारांकडे अर्ज व कोटेशन भरलेनंतर तब्बल 09 वर्षे उशिराने विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतीत अक्षम्य दिरंगाई व सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने तारीख 05/12/2000 रोजी त्याच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 155 मध्ये कृषी पंपाचे विज कनेक्श्शन मिळणेसाठी अर्ज व कोटेशन रक्कम भरलेला होती हे पुराव्यातील नि.4/1 व 4/2 वरील कागदपत्रातून दिसते कोटेशन भरल्यानंतर प्रत्यक्षात विज कनेक्शन तारीख 10/12/2009 रोजी 09 वर्षे उशिराने दिले होते ही अडमिटेड फॅक्ट आहे,परंतु त्यापूर्वी जोडणी दिली नसतांनाही गैरअर्जदारांनी अर्जदारास तारीख 03/05/2004 चे ग्राहक क्रमांक 530310281084 अन्वये अर्जदारास 848.85 चे बिल दिल्याचे छायाप्रतीही पुराव्यात दाखल केलेली आहे.ज्याअर्थी सदरचे बिल दिले गेले होते. त्या अर्थी अर्जदाराला विज जोडणी दिलेली होती असे खोटे रेकॉर्ड गैरअर्जदार यांनी त्यांच्या कार्यालयात तयार केले असले पाहिजे याबाबत कोणतीही शंका उरत नाही त्यामुळे अर्जदाराने तक्रार अर्ज परिच्छेद क्रमांक 3 मध्ये म्हंटले प्रमाणे त्याने कोटेशन भरल्यानंतर त्याच्या शेतात विज जोडणीसाठी लागणारे खांब, तार, मिटर इत्यादी साहित्यांची कंपनीच्या अधिका-यांनी परस्पर विल्हेवाट लावुन वादीस विज जोडणी झाल्याचे कंपनीच्या रेकॉर्डला दाखवुन बिले देण्यास सुरवात केली या म्हणण्यात निश्चितपणे तथ्य वाटते.विज कनेक्शन नसतांनाही दिलेले बिल रद्द व्हावे म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारांना समक्ष भेटून तक्रार केल्यानंतर वास्तविक ते रद्द करण्याची त्याची जबाबदारी होती,परंतु आपले काळेकृत्य उजेडात येवुनये म्हणून पोकळ आश्वासन देवुन जाणुन बुजून चालढकल केली असली पाहिजे तारीख 03/05/2004 चे बिल दिल्यानंतरही अर्जदारास पुन्हा 28 जुलै 2009 चे रु. 20,500/- चे त्यानंतर पुन्हा दिनांक 08/02/2010 चे रु.22,700/- ची देयके देवुन गैरअर्जदारांनी कहरच केल्याचे पुराव्यात दाखल केलेल्या बिलावरुन दिसून येते. विज जोडणी दिली नसतांना भरमसाठ रक्कमेची फेब्रुवारी 2010 पर्यंतची बिले दिल्यावर अर्जदारास निश्चित मानसिकत्रास होणे स्वाभाविक आहे. बिले रद्द करावीत म्हणून तो गैरअर्जदारांना भेटला असता काहीच कार्यवाही न करता प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवुन त्याला परत पाठविल्यामुळे अर्जदाराने दिनांक 08/10/2009 रोजी वरिष्ठ अधिका-यांकडे लेखी तक्रार केलेली होती त्या अर्जाची स्थळप्रतही पुराव्यात (नि.4/5) दाखल केलेली आहे.संबंधीत लेखी तक्रारीचे अर्ज गैरअर्जदारास हस्तपोच देवुन देखील त्यांनी कार्यवाही केली नाही.म्हणून अर्जदाराने 16/11/2009 चे गैरअर्जदार क्रमांक 2 ला आमरण उपोषणाची नोटीस दिली होती तीही पुराव्यात ( नि.4/6) दाखल केलेली आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्यावर 20 नोव्हेंबर 09 चे उत्तर पाठवुन अर्जदाराने उपोषण रद्द करावे त्याने दिलेल्या तक्रारीची चौकशी करुन व संबंधीतांवर नियमानुसार कार्यवाही करु असे कळविले होते. त्या पत्राची छायाप्रत देखील पुराव्यात नि.4/7 वर दाखल केलेली आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी उत्तरातून अर्जदारास आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्याची काय दखल घेवून दोषी अधिका-यावर कार्यवाही केली होती ? आणि अर्जदारास दिलेली चुकीची बिले रद्द केली होती या संबंधीचा कोणताही ठोस पुरावा गैरअर्जदारातर्फे प्रकरणात दाखल केलेला नसल्याने अर्जदाराला पोकळ आश्वासने देवुन त्याच्यावर अन्याय करुन त्याला नाहक झुलवत ठेवले होते.असेच यातून अनुमाने निघते. त्यामुळेच अर्जदारास पुन्हा उपोषणाची गैरअर्जदारांना 26/11/2009 रोजी नोटीस देण्यास भाग पडले असले पाहिजे हे पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/9 वरील स्थळप्रतीवरुन लक्षात येते त्यानंतरही अर्जदाराने पुन्हा 17/12/2009 रोजीचे गैरअर्जदारास पत्र पाठवुन दोषी अधिका-यांवर कार्यवाही करणे बाबत कळविले होते त्याचीही दखल न घेता गैरअर्जदारांनी दुर्लक्ष केले असल्याचे वस्तुस्थिती वरुन लक्षात येते. अर्जदाराला कृषी पंपाचे विज कनेक्शन देण्यासाठी 10/12/2009 रोजी त्याचे शेतात इलेक्ट्रीक पोल उभे केले होते तेही भक्कम रोवलेले नसल्यामुळे खाली पडले होते या बाबतीत अर्जदाराने 23/12/2009 रोजी गैरअर्जदारांना लेखी तक्रार हस्तपोच दिलेली होती त्या पत्राची स्थळप्रत पुराव्यात नि.4/13 वर दाखल केलेली आहे.यावरुन देखील गैरर्जदारांच्या कर्मचा-यांकडून झालेला निष्काळजीपणा व कर्तव्यातील बेजबाबदारपणा लक्षात येतो दोषी अधिका-यावर कार्यवाही करण्यासाठी अर्जदाराने त्या पूर्वी दिलेले लेखी अर्ज व उपोषणाच्या नोटीसी नंतर गैरअर्जदारांनी अर्जदारास फक्त पोकळ आश्वासने दिली मात्र प्रत्यक्षात काहीच कार्यवाही न केल्यामुळे अर्जदाराने पुन्हा तारीख 28/12/2009 रोजी सहकुटूंब उपोषणाची नोटीस जिल्हाअधिकारी, पोलिस अधिकारी व इतर वरिष्ठ अधिका-यांना व गैरअर्जदारास हस्तपोच दिलेली होती.अर्जाच्या स्थळप्रती पुराव्यात दाखल केलेल्या आहेत.शिवाय गैरअर्जदारांच्या बेजबाबदारपणेच्या वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांची कात्रणे देखील अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेली आहेत.यासर्व बाबी वरुन अर्थात गैरअर्जदारांनी अर्जदारावर अन्याय करुन त्याच्या कोणत्याही तक्रारींची दखल न घेता खोटी आश्वासने देवुन सन 2000 साली कृषी पंपासाठी मागणी केलेली विज जोडणी तब्बल 09 वर्षांनंतर उशिरा देवुन निश्चितपणे सेवात्रुटी केलेली आहे याबद्दल कोणतीही शंका उरत नाही.महाराष्ट्रात विज वितरण कंपनीची एकमेव मक्तेदारी असल्यामुळे व त्यांना इतर कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे ग्राहकांना वेठीस धरुन मनमानी पध्दतीने बिले दिली जातात बिले दुरुस्ती संबंधी ग्राहकाच्या कुठल्याही तक्रारीची दाखल न घेता ती बिले भरण्यास भाग पाडले जाते अन्यथा विज जोडणी खंडीत करण्याची धमकी देवुन त्यांना नाहक त्रास दिला जातो असे मंचापुढे आलेल्या अनेक तक्रारी मधून अनुभवास आलेले आहे प्रस्तुत प्रकरणाच्या बाबतीत देखील गैरअजदाराकडून अक्षम्य कृत्य केले गेलेले आहे.असे खेदाने म्हणावे लागेल. अर्जदाराच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबात असा बचाव घेतलेला आहे की, शेतकरी ग्राहकांचे कृषी पंपासाठी विज जोडणी मागणीचे अर्ज आल्यानंतर एकाच वेळी जोडणी देणे शक्य होत नाही त्याची यादी करुन नंबर प्रमाणे उत्पादका कडून जसजसे साहित्य उपलब्ध होईल तसतशी ग्राहकांना विज जोडणी देण्यात येते.व यामुळे त्याला विज जोडणी देण्यास विलंब झाला. परंतु या संबंधीत कोणताही सबळ व ठोस पुरावा प्रकरणात दाखल केलेला नसल्यामुळे सदरचा बचाव पोकळ स्वरुपाचाच केलेला असल्याचे यातून निष्कर्ष निघतो.अर्जदाराला तब्बल 09 वर्षे उशिराने कृषी पंपाची विद्युत जोडणी दिलेली असल्याने मधल्या कालावधीत त्याला योग्यवेळी विज जोडणी न मिळाल्यामुळे शेतातील उत्पन्नाचे नुकसान भरपाई म्हणून तक्रार अर्जातून एकूण 19,80,000/- ची नुकसान भरपाई मागीतलेली आहे, परंतु त्यासंबंधी अर्जदाराने मंचाला पटण्या इतपत कोणताही सबळ व ठोस पुरावा दिलेला नसल्यामुळे ती मागणी मान्य करता येणार नाही,तरी परंतु अक्षम्य दिरंगाईची योग्यती नुकसान भरपाई मिळणेस अर्जदार पात्र असल्याने ती विचारात घेणे न्यायोचित होईल.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत विज कनेक्शन देण्याच्या बाबतीत अक्षम्य दिरंगाई करुन सेवात्रुटी केल्याबद्दलची आणि शेती उत्पन्नाची झालेली नुकसान भरपाई रु.30,000/- द्यावेत.याखेरीज मानसिकत्रासा पोटी रु.7,500/- व अर्जाचा खर्च रु.1500/- आदेश मुदतीत द्यावेत. 3 आदेश क्रमांक 1 व 2 वरील मधील नुकसान भरपाई आदेश मुदतीत न दिल्यास सदरची रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के दराने अर्ज दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळे पर्यंत वसुल करण्याचा अर्जदारास हक्क राहिल. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |