निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 06/01/2014
कालावधी 11 महिने. 07 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मनोहर पिता रामचंद्र चावला (दासवानी) अर्जदार
वय 56 वर्षे,धंदा.व्यापार. अॅड.ए.डी.खापरे.
रा.नानलपेठ,परभणी.
विरुध्द
1 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी,लि. गैरअर्जदार.
मुख्य अभियंता,( वाणीज्य ) अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूररोड, परभणी.
2 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी लि.
उप कार्यकारी अभियंता,शहरी उपविभाग,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा नानलपेठ परभणी येथील रहिवाशी असून अर्जदाराचे म्हणणे की, घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून चेलीराम तुकाराम यांनी ग्राहक क्रमांक 530010058651 ब मिटर क्रमांक 7610111821 अन्वये विद्युत पुरवठा घेतला होता व चेलीराम तुकाराम हे खुप वर्षापूर्वी मयत झालेले आहेत. अर्जदार हे एकत्र कुटूंबातील असलेमुळे अर्जदार हा मयत चेलीराम तुकाराम यांचा पुतण्या आहे. मयत चेलीराम तुकाराम हा आपत्याहीन वारला मयताच्या पश्चात अर्जदार सदर विज मिटरचा उपभोक्ता आहे. अर्जदाराच्या नावे मिळकतीची नोंद भुमापन कार्यालय व तत्सम ठिकाणी नोंदविण्यात आलेली आहे. या अनुषंगाने अर्जदार उपभोग घेत असल्याने गैरअर्जदाराचा ग्राहक होतो.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार अर्जदारास Light Bill चुकीच्या पध्दतीने देत आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास मे 2012 च्या बिला मध्ये एप्रील 2012 महिन्यात विज वापर 15100 दाखवुन चुकीचे बिल दिले व तसेच गैरअर्जदाराने नोव्हेंबर 2012 चे लाईट बील 94,452/- रु. चे जुलै 2012 चे 1,49,410/- रु. चे बिल दिले ते चुकीचे आहेत. त्यामुळे अर्जदारास मानसिकत्रास झाला. व गैरअर्जदार हे अर्जदाराने लाईट बिल न भरलेमुळे लाईट बंद करण्याची शक्यता आहे. म्हणून सदर तक्रार दाखल करण्यास भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व ग्राहक क्रमांक 530010058651 चे लाईट बिल जुलै 2012 ते नोव्हेंबर 2012 चे रद्द ठरवावे व तसेच गैरअर्जदारांना आदेश करावा की, लाईट वापर प्रमाणे लाईट बिल देण्याचा आदेश करावा. तसेच एप्रिल 2012 चे निर्देशित एकूण विज वापर बेकायदेशिर घोषीत करावे. व गैरअर्जदाराने मानसिकत्रासापोटी 5000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 2000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश करावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 6 वर 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये
फेब्रुवारी 2012 पर्यंतचे लाईट बिलाची भरलेली पावती प्रत, मे 2012 चे लाईट बिल, देयक क्रमांक 271 , देयक क्रमांक 271 ओळखपत्र व सी.पी.एल. दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारांना लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केलेमुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने त्याच्या तक्रारी मध्ये स्वतः म्हंटले आहे की, ग्राहक क्रमांक 530010058651 व मिटर क्रमांक 7610111821 अन्वये हे मयत चेलीराम तुकाराम यांचे नावे गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला आहे व अर्जदार स्वतः म्हणतो की, चेलीराम तुकाराम हे फार वर्षां पूर्वी मयत झालेले आहेत. अर्जदाराने मयताच्या नावे सतत जाणीव पूर्वक विद्युत पुरवठा वापर करणे कायद्यान्वये योग्य नाही, असे मंचाचे ठाम मत आहे व तो अर्जदाराचा निष्काळजीपणा आहे व तो स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही, तसेच अर्जदाराने तक्रारी मध्ये म्हंटले आहे की, अर्जदार हा मयताचा पुतण्या आहे या बद्दल अर्जदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही व तसेच वादग्रस्त विज मिटर हे कोणत्या घर मिळकत क्रमांक मध्ये आहे, हे देखील अर्जदाराने स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही, म्हणून अर्जदाराच्या नावे सदर मिटर नसलेमुळे तो गैरअर्जदाराचा ग्राहक होवु शकत नाही व सदरची तक्रार दाखल करण्याचा अधिकार Consumer Protection Act प्रमाणे अर्जदारास होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.