निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 05.05.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 14.05.2010 तक्रार निकाल दिनांकः- 11.08.2010 कालावधी 2 महिने 27दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मनोहर पिता संजीपराव कदम अर्जदार वय 45 वर्षे धंदा शेती रा.देऊलगांव गात, ( अड एस.आर.घाटगे ) ता.सेलू जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, ( अड अतुल पालीमकर ) परभणी जि. परभणी. 2 कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, सेलू ता.सेलू. जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा देउळगांव गात येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे. अर्जदार हा एकत्रीत हिंदू कुटूंबाचा घटक असून तो आणि त्याचे कुटूंबीय गट क्रमांक 558 जमिनीचे मालक आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 28.12.2005 रोजी विद्युत पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदारानी गट क्रमांक 558 च्या जमिनीत विद्युत खांब उभारला व अर्जदार व इतर ग्राहकाना वीज पुरवठा दिला. दिनांक 16.07.2009 रोजी दुपारी 12.00 वाजता अर्जदाराचा मुलगा गट क्रमांक 558 मध्ये बैलांच्या मदतीने नागरणी करीत असताना विद्युत खांबाच्या स्टे वायरमध्ये वीज उतरुन त्याचा एक बैलाला शॉक बसला व तो बैल मृत्यूमुखी पडला. अर्जदाराने सदरील बैल दिनांक 10.05.2010 रोजी रुपये 30,000/- ला खरेदी केला होता . अर्जदाराच्या मुलाने त्याच दिवशी ही घटना पोलीस स्टेशन सेलू येथे कळविली. त्यानी ही घटना स्टेशन डायरी क्रमांक 32/2009 खाली नोंदवली व घटनास्थळ पंचनामा केला. व बैलाचे पोष्टमार्टेम करवले पशु वैद्यकीय अधिका-याने मृत्यूचे कारण इलेक्ट्रीक शॉक असे नमूद केले. गैरअर्जदारानी ग्राहकाला अर्जदाराला दिलेल्या त्रूटीच्या सेवेमुळे त्याचा तरुण बैल मृत्यूमुखी पडला व त्याचे खुप मोठे नुकसान झाले. बैलाची किंमत त्याच्या मृत्यूसमयी रुपये 40,000/- शेतीच्या कामाच्या काळात बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे अर्जदाराचे रुपये 45000/- चे नुकसान झाले व शारीरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रुपये 10,000/- ही सर्व रक्कम द.सा.द.शे 18 % व्याजाने मिळावी अशी अर्जदाराने मागणी केली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे या रकमेची वेळोवेळी मागणी केली परंतू गैरअर्जदाराने त्याला ही रक्कम दिली नाही म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र, सात बाराचे उतारे. कोटेशन, बैलाची खरेदीची पावती, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट गैरअर्जदाराला दिलेली नोटीस, वारसाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदार हा त्याचा ग्राहकच नाही म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदाराने तक्रारीत तो गट क्रमांक 558 चा मालक आहे असे म्हटले आहे पण तो गट क्रमांक 558 चा मालक नाही व बैलाचा मृत्यू हा अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे म्हणून गैरअर्जदार हे नुकसान भरपाई देवू शकत नाहीत तसेच अर्जदाराने तक्रारीत जे कोटेशन दाखल केले आहे ते माणिक राजाभाऊ कदम यांच्या नावे आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहकच नसल्यामुळे तो या न्यायमंचापुढे सदरील तक्रार दाखल करु शकत नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रे व युक्तिवादानंतर तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराच्या बैलाचा मृत्यूस कारणीभूत असुन सुध्दा त्याला नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदार हा देऊळगांव गाथ ता. सेलू जि. परभणी येथील रहिवासी असून शेतकरी आहे तो व त्याचे कुटूंबीय संयुक्त हिंदू परिवाराचे सदस्य आहेत व गट क्रमांक 558 त्यांच्या कुटूंबाच्या मालकीची आहे. शेतीच्या पाणी पुरवठयासाठी त्यानी गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला आहे व त्याची विद्युत जोडणी अर्जदाराच्या पुतण्याच्या नावावर आहे ( नि.5/3 ए व 5/3 बी ) वीज पुरवठयासाठी गैरअर्जदारानी अर्जदाराच्या पत्नीच्या व पुतण्याच्या मालकीच्या गट क्रमाक 558 मध्ये खांब रोवलेले आहेत दिनांक 16.07.2009 रोजी शेतातील कामे करत असताना अर्जदाराचा बैल विद्युत पोल जवळ आला त्यावेळी पोलला ताण दिलेल्या लोखंडी वायरमध्ये वीज उतरल्याने बैलास शॉक लागून अर्जदाराच्या बैलाचा मृत्यू झाला. अर्जदाराने हा बैल दिनांक 10.05.2009 रोजी शे. इब्राहीम शे. उस्मान यांच्याकडून रुपये 30,000/5 ला खरेदी केल्याचे ( नि.5/4) वरील जनावराचे विक्री व परिवर्तन दाखाल्यावरुन सिध्द होते. अर्जदाराच्या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर अर्जदाराने वरील घटना पोलीस स्टेशन सेलू येथे कळवली त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला ( नि.5/5) ज्यात त्यानी पोलच्या ताण वायरच्या तिथे बैल मरण पावलेला आहे असे म्हटले आहे. नि. 5/7 वर बैलाचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आहे. त्यामध्ये बैलाचा मृत्यू इलेक्ट्रीक शॉक ने झाल्याचे म्हटले आहे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टवरुन बैलाचा मृत्यू वीजेच्या धक्याने झाल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदार हा त्याचा ग्राहक नाही त्यामुळे तो ही तक्रार दाखलच करु शकत नाही असे म्हटले आहे. अर्जदाराने नि. 5/11 वर सरपंच ग्रामपंचायत देऊळगाव गात यांचे वारसाचे प्रमाणपत्र व नि. 16/3 वर सरपंच ग्रामपंचायत देऊळगांव गात यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे त्यावरुन अर्जदार व त्याच्या भावांचे एकत्र कुटूंब आहे हे सिध्द होते व कोटेशन ज्याच्या नावावर आह तो माणिक राजाभाऊ कदम हा अर्जदाराचा पुतण्या आहे व गट क्रमांक 558 ही अर्जदाराची पत्नी व अज्रदाराचा पुतण्या माणिक व अर्जदाराची भावजय कमल यांच्या नावावर आहे हे नि. 5/11 व नि. 16/3 वरील प्रमाणपत्रावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराच्या पत्नीचे नि. 16/1 व पुतण्याचे नि. 16/2 वरील शपथपत्रावरुन गट क्रमांक 558 ही अर्जदाराच्या एकत्र कुटूंबाची जमीन आहे हे त्या दोघानी सांगितले आहे म्हणजेच अर्जदाराच्या पत्नीच्या व पुतण्याच्या नावावर असलेल्या शेतात अर्जदाराच्या बैलाचा मृत्यू झाला व अर्जदाराच्या पुतण्याने शेतीसाठी विज पुरवठा घेतलेला आहे व अर्जदार आणि त्याचा पुतण्या एकत्र कुटूंबाचे घटक आहेत व एकत्रीतपणे शेती करतात म्हणून अर्जदार हा उपभोक्ता या नात्याने ही तक्रार दाखल करु शकतो. गैरअर्जदाराच्या कार्यालयाने ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी सर्कल ऑफीसर लाइनमन यांच्या नेमणुका केलेल्या आहेत . गैरअर्जदारानी वीजेच्या धक्का बसू नये म्हणून इन्सुलेटरस पुरवायला हवी होती तीही गैरअर्जदाराने दिली नाहीत. अर्जदाराच्या बैलाचा मृत्यू वीजेच्या धक्कयाने झाल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते व बैलाला वीजेचा धक्का स्टे वायरमध्ये उतरलेल्या वीजेमुळे बसला जो गैरअर्जदाराच्या त्रूटीच्या सेवेमुळे बसला अर्जदाराने बैलाच्या मृत्यूमुळे झालेल्या नुकसाचा कोणताही ठोस पुरवा दाखल केलेला नाही म्हणून अर्जदारास त्या नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येणार नाही असे आम्हास असे वाटते म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये 30,000/- निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत दिनांक 16.07.2009 पासून द.सा.द.शे 9 % व्याजाने दयावेत. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 4000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |