निकाल
(घोषित दि. 12.05.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून गैरअर्जदार यांच्याकडून देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार ते रोहिला गल्ली, कचेरी रोड, जालना येथील रहिवासी असून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांच्यातर्फे देण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा त्यांनी नियमितपणे केलेला आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार मीटर वरील रिडींगचे वाचन न करताच गैरअर्जदार यांनी ऑगस्ट 2015 व पुढील कालावधीत त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिल दिले. अर्जदाराने या चुकीच्या व वाढीव वीज बिलाबाबतची तक्रार गैरअर्जदार यांच्याकडे केली परंतू त्याची दखल घेतली न गेल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदार यांनी त्यास उत्तर दिले नाही. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदाअंतर्गत मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांना बिल दुरुस्त करुन देण्याचे तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- देण्याचे आदेश पारीत करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिलाच्या प्रती, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, पोचपावती इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला असून त्यांच्या जवाबानुसार अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नसून त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिल आकारण्यात आले आहे हे म्हणणे चुकीचे आहे. तांत्रीक कारणामुळे ज्यावेळेस रिडींग उपलब्ध झाले नाही, त्यावेळेस सरासरीवर आधारीत वीज बिल देण्यात आले परंतू रिडींग उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियमाप्रमाणे समायोजन करण्यात आले असल्याचे गैरअर्जदार यांनी म्हटले आहे. ऑगस्ट 2015 मध्ये अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल हे 32 महिन्याचे आहे.त्यामुळे अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे जानेवारी2013 पासून पुढील कालावधीचे सीपीएल दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रंवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 510030053417 असा आहे व मीटर क्रमांक 9800583721 आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार यांनी वीज मीटरची नोंद न घेता त्यांना ऑगस्ट 2015 पासून वाढीव वीज बिलाची आकारणी केलेली आहे. सी. पी. एल. चे निरीक्षण केले असता अर्जदाराने जुलै 2015 पर्यंत 95 युनिट प्रमाणे वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येतो. पी. एल. नुसार जानेवारी 2013 ते नोव्हेंबर 2015 या 31 महिन्याच्या कालावधीत गैरअर्जदार यांनी मीटर वरील रिडींगची नोंद न घेता काही वेळेस R N A तर काही वेळेस I N A C C दर्शवून अर्जदारास सरासरीवर आधारीत 95 युनिट प्रतिमाह वीज बिलाची आकारणी केली आहे व या वीज बिलांचा भरणा अर्जदाराने केलेला आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबामध्ये या त्रुटी बाबत कोणतेही स्पष्टीकरण अथवा खुलासा केलेला नाही. सतत 31 महिने रिडींग न घेता वीज बिल आकारणी करणे हे चुकीचे असून गैरअर्जदार यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने तयार केलेल्या कृती मानके याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2015 मध्ये मीटरवरील रिडींगप्रमाणे वीज बिल देण्यात आल्यानंतर गैरअर्जदार यांनी पुढील कालावधीत देखील मीटरवरील रिडींगची नियमितपणे नोंद न घेता सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी केल्याचे दिसून येते. अर्जदाराने या बाबत पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची दखल देखील घेण्यात आलेली नाही यावरुन गैरअर्जदार यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो.
नोव्हेंबर 2015 मधील वीज बिलात मीटरवरील रिडींग 8100 असल्याचे दिसून येते. यावरुन जानेवारी 2013 ते नोव्हेंबर 2015 या कालावधीत अर्जदाराचा एकूण वीज वापर 8100 – 495 = 7705 असा असल्याचे स्पष्ट होते. यावरुन अर्जदाराचा सरासरी वीज वापर हा 7705 – 35 = 220 युनिट आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
- अर्जदाराचे वीज देयक रदद करण्यात येत असून गैरअर्जदार यांनी अर्जदारास जानेवारी 2013 ते नोव्हेंबर 2015 या कालावधीचे वीज बिल हे 220 युनिट (7705 – 35) प्रतिमाह असे सुधारीत वीज बिल द्यावे व यात व्याज व दंड लावू नये.
- महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने पारीत केलेल्या कृती मानकानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटरवरील रिडींगप्रमाणे वीज बिल आकारणी न केल्यामुळे प्रतिमाह रुपये 100/- याप्रमाणे रुपये 3500/- नुकसान भरपाई 30 दिवसात द्यावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी व मानसिक त्रासापोटी रु.5000/- व खर्चाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे.
श्री सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्रीमती नीलिमा संत
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना