निकाल
(घोषित दि. 07.03.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. 05 डिसेंबर 2015 ते 05 जानेवारी 2016 पर्यंत प्रत्येक महिन्यास 200 युनिट वीज वापर याप्रमाणे 13 महिन्याचे वीज बिल तक्रारदार यास रु.23,020/- देण्यात आले. तक्रारदार याने सदर रकमेचा भरणा दि.24.02.2016 रोजी केला. त्यानंतर तक्रारदार यास मार्च 2016 मध्ये एक महिन्याचे वीजेचे बिल रु.23,610/- देण्यात आले. तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे सदर वीज बिल चुकीचे आहे. त्याचे घरामध्ये 7 वॅटचे 3 एलईडी बल्ब, एक टी.व्ही., व एक पाण्याची मोटार याप्रमाणे वापर आहे. वरील कारणास्तव तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, त्याला मार्च व एप्रिल 2016मध्ये दिलेले वीजेचे बिल 1) रु.23,610/- व 2) रु.25,920/- रदद करण्यात यावे. तसेच तक्रारदार यास पुर्वी दिलेल्या बिलामध्ये अतिरिक्त लावलेले 2400 युनिट कमी करण्यात यावे. बिलावर लावलेले व्याज कमी करण्यात यावे तसेच त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.9,000/- देण्यात यावे.
तक्रारदार यानी तक्रार अर्जासोबत संबंधित वीज बिले व एका बिलाची रक्कम भरल्याची पावती दाखल केली आहे.
गैरअर्जदार यांचे वकील हजर झाले. त्यांनी त्यांचा लेखी जबाब सादर केला. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हा वीज मंडळाच्या ग्राहक या संज्ञेत बसत नाही. त्यामुळे त्याला ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत या मंचासमोर तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तसेच तक्रारदाराची तक्रार चालविण्याचा ग्राहक मंचास अधिकार नाही. तक्रारदार यास एप्रिल 2016 पर्यंत सरासरीने देयक देण्यात आले. मार्च 2016 मध्ये तक्रारदार याचे मीटर रिडींग उपलब्ध झाले. तक्रारदार याने स्वतःच्या वापरासाठी 5221 युनिटचा वापर केला होता. मार्च 2016 मध्ये सुरुवातीची रिडींग 5222 होती. तक्रारदार याने भरलेल्या सरासरी देयकाची रक्कम मागील थकीत रकमेतून कमी करण्यात आली. तसेच त्याला नियमाप्रमाणे सर्व फायदे देण्यात आलेले आहेत. तक्रारदार याचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. तसेच त्याला कोणताही मानसिक त्रास झालेला नाही. तक्रारदार यास लॉक क्रेडीट व्दारा रु.28511.16 पैसे कमी करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारदार याचे वीज मीटरचा सी.पी.एल.चा उतारा जानेवारी 2015 ते ऑगस्ट 2016 या कालावधीकरता दाखल केला आहे.
आम्ही तक्रारदार याचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार यांचा लेखी जबाब काळजीपूर्वक वाचला. दोन्ही बाजुंच्या वतीने दाखल करण्यात आलेला कागदोपत्री पुरावा पाहिला. तक्रारदार यांनी स्वतः युक्तीवाद केला. गैरअर्जदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांनी गैरसमजुतीने ही तक्रार दाखल केली आहे. सी.पी.एल.च्या उता-याचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, मार्च 2015 च्या नोंदीमध्ये दि.27.03.2015 ही पुर्वीचे बिल दिल्याची तारीख दर्शविली आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2016 पर्यंत तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडे वीज वापराबददल एक पैसाही बिल भरलेले नाही. त्यामुळे तक्रारदार याचे नावे एकंदरीत थकीत रक्कम रु.32,321.44 पैसे झाली. फेब्रुवारी 2015 ते जानेवारी 2016 या कालावधीत CPL मध्ये मीटरची परिस्थिती या रकान्यात RNA (रिडींग नॉट अव्हेलेबल) असा शेरा आहे व फेब्रुवारी 2016 या महिन्याकरता Inacc (मीटरपर्यंत जाता आले नाही) अशी नोंद आहे. त्यानंतर मात्र मार्च 2016 पासून ऑगस्ट 2016 पर्यंत तक्रारदार याचे मीटरचे स्टेटस नॉर्मल दर्शविण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याचे वीज वापराच्या युनिटचा आकडा स्वतंत्रपणे लिहून दाखविण्यात आला आहे. तसेच मार्च 2016 मधील लॉक क्रेडीट च्या रकान्यामध्ये रु.28511.16 पैसे या रकमेची वजावट केल्याचे दिसून येते. तरीही तक्रारदार याचे नावे थकीत रक्कम रु.37092.32 पैसे अधिक नियमाप्रमाणे देय असलेला इतर आकार असल्यामुळे लॉक क्रेडीटची रक्कम जाऊनही व तक्रारदार याने जमा केलेले रु.23,020/- वळते करुनही तक्रारदार याचे नावे थकबाकीची रक्कम शिल्लक राहीलेली दिसून येते. त्यानुसार एप्रिल 2016 या महिन्यात थकबाकीची रक्कम रु.22,775. 09 पैसे आहे व त्या नंतरच्या प्रत्येक महिन्यात सदर रक्कम वाढत वाढत जाऊन एप्रिल 2016 या महिन्यात सदर रक्कम रु.32,321/- झाल्याचे दिसून येते.
तक्रारदार याने फार मोठया कालावधीकरता वीजेचा वापर करुन प्रत्यक्ष वापराप्रमाणे वीज बिल दिलेले नाही. त्यामुळे नैसर्गिकरितीने त्याच्या थकबाकीची रक्कम वाढत गेली. सदर थकबाकीची रक्कम फक्त रु.200/- युनिट प्रतिमाह याप्रमाणे होते असे डोळे झाकून गृहीत धरणे योग्य नाही. जेव्हा मीटरमध्ये कोणताही दोष नसतो त्यावेळी ग्राहकाचा सरासरी वापर ठराविक युनिट आहे असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. तक्रारदार याने काही रक्कम थकबाकीपोटी भरली व काही रक्कम लॉक क्रेडीटचे खात्यामधून वीज बिलापोटी वळती करण्यात आली तरीही त्याचे नावे बरीचशी थकबाकीची रक्कम शिल्लक राहिलेली दिसून येते. त्यामुळे सदर थकीत रक्कम मान्य नाही असे आता तक्रारदार म्हणू शकत नाही.
तक्रारदार यांनी त्याचे मीटर तपासून घेण्याकरता अर्ज दिलेला नाही. सदर मीटरमध्ये दोष आहे असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. तक्रारदार याने मोठया कालावधीकरता वीज बिल न भरुन चुक केली आहे. तो स्वेच्छेने डिफॉल्टर या संज्ञेत गेला. अशा परिस्थितीत स्वतःच्या चुकीचा फायदा घेण्याकरता तो गैरअर्जदार यांचेवर अवास्तव रकमेचे बिल दिले असा आरोप करु शकत नाही. किंबहुना असा आरोप अशा परिस्थितीत सत्य आहे असे गृहीत धरणे योग्य होणार नाही. वरील सर्व परिस्थितीत आमच्या मताने तक्रारदार याच्या तक्रारीमध्ये तथ्य
नाही. ती मंजूर करण्यास ठोस पुरावा नाही. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना