(घोषित दि. 18.09.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र. अध्यक्ष)
अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांना मार्च 2011 मध्ये देण्यात आलेल्या वाढीव वील बिला बाबत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली. परंतू त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे व फेब्रूवारी 2011 पर्यंत वीज बिलाची रक्कम भरलेली आहे. मार्च 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी त्यांना 8883 युनिट वीज वापराचे बिल आकारले. अर्जदाराने या बिलाबाबत गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 16.05.2011 रोजी तक्रार केली व मीटर तपासणी करुन सुधारीत वीज बिल देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी दिनांक 06.07.2011 रोजी दिलेल्या वीज बिलात 71,185/- रुपये क्रेडीट दिल्याचे दर्शविले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी 77,138/- रुपये कमी करावयास पाहिजे होते. मीटरची चाचणी करुन त्याचा अहवाल ही गैरअर्जदार यांनी देणे अपेक्षित होते. दिनांक 28.03.2012 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराने रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे मानसिक त्रास झाला असून अर्जदाराने सुधारीत वीज बिल व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार यांनी चुकीच्या बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करु नये यासाठी अंतरिम आदेश देण्याची विनंती अर्जदाराने मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिलाच्या प्रती, तपासणी अहवाल, वीज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
अर्जदाराने दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर दिनांक 31.03.2012 रोजी तक्रारी सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली व वीज बिलात प्रथमदर्शनी त्रुटी आढळून आल्यामुळे अर्जदाराने 5,000/- रुपये भरल्यास वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारीत केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार दिनांक 09.02.2011 रोजी अर्जदाराचे जुने मीटर बदलण्यात आले. मार्च 2011 मध्ये मीटर रिडरने फॉल्टी स्टेटस दर्शवून अर्जदारास 8883 युनिट वीज वापराचे बिल आकारले. नवीन मीटरच्या रिडींग नुसार अर्जदारस जून 2011 मध्ये 71185.65 रुपयाचे क्रेडीट देण्यात आले. अर्जदाराने त्यांना देण्यात आलेल्या नोटीसचा चुकीचा अर्थ लावला आहे. अर्जदाराने वीज बिलाचा भरणा केलेला नसून त्यांना देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 5100300650 असा आहे व मीटर क्रमांक 90103556402 असा आहे. जानेवारी 2011 पर्यंत दोन्ही पक्षात वीज बिलाबाबत वाद नव्हता. अर्जदारास फेब्रूवारी 2011 मध्ये सरासरीवर अधारीत वीज बिल देण्यात आलेले दिसून येते. या वीज बिलाचा भरणा अर्जदाराने केला असल्याचे दिसून येते. दिनांक 09.02.2011 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 03556402) बदलून त्या जागी नवीन मीटर (क्रमांक 01095607) बसविले. या मीटर बदली अहवालाची नोंद घेतली न गेल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास मार्च 2011 मध्ये फॉल्टी स्टेटस दाखवून 8883 युनिट वीज वापराचे बिल आकारले जे चुकीचे असल्याचे दिसून येते . फॉल्टी स्टेटस असताना किंवा मीटर बाबत संभ्रम असताना गैरअर्जदार यांनी सरासरीवर अधारीत बिल आकारणी करणे अपेक्षित होते. अर्जदाराने या प्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल न घेता गैरअर्जदार यांनी एप्रिल 2011, मे 2011 या कालावधीचे बिल आकारताना वीज बिल दुरुस्त करुन दिले नाही. जून 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास 71,185/- रुपयाचे क्रेडीट दिलेले दिसून येते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांनी 75623.26 रुपये वजा करणे जरुरी होते. पण अर्जदाराने मार्च 2011 नंतर वीज बिलाची रक्कम भरलेली नसल्यामुळे या कालावधीतील वीज वापराचे बिल यात समाविष्ट करण्यात आलेले दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास फेब्रूवारी 2011 ते मे 2011 या कालावधीत चुकीची व वाढीव वीज बिल आकारणी केलेली दिसून येते. अर्जदाराने याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल घेतलेली दिसून येत नाही. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीची वीज बिल आकारणी केली व तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 2,500/- तिस दिवसात द्यावे.