निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 22/06/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 25/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 09/03/2011 कालावधी 08 महिने 12 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. उध्दव पिता ज्ञानोबा नाईक. अर्जदार वय 46 वर्षे.धंदा.नोकरी. अड.ए.ए.गिते. रा.कृषी सारथी कॉलनी,बसमतरोड. परभणी.ता.जि.परभणी. विरुध्द एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. गैरअर्जदार. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. अड.एस.एस.देशपांडे. परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) विज बिला बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदार सरकारी नोकर असून कृषी सारथी कॉलनी परभणी येथे स्वतःच्या मालकीच्या घरात त्याने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010315629 नंबरचे विज कनेक्शन घेतलेले आहे.मार्च 2009 मध्ये मिटरचे 1954 युनिट असताना बंद पडले त्यानंतर दरमहाचे रिडींग घेणा-या गैरअर्जदाराचे कर्मचारी प्रत्येक महिन्याला रिडींग घेण्यासाठी फेब्रुवारी 2010 पर्यंत येत होते मात्र बंद पडलेले मिटर बदलून न देता सरासरी 26 युनिटच्या आकारणीची बिले त्या काळात दिली. एवढेच नव्हेतर माहे मार्च 2010 चे बिल अचानक 1108 युनिटचे रु.7,920/- रक्कमेचे दिले. अर्जदाराचे म्हणणे असे की, सदरचे बिल अवास्तव व भरमसाठ रक्कमेचे असून त्यावर काल्पनिक मागिल व चालू रिडींगची नोंद केलेली आहे.त्यानंतरचे माहे मे 2010 चे बिलही अशा प्रकारचेच भरमसाठ रक्कमेचे व काल्पनिक रिडींगचे दिली आहे.ते कायदेशिरदृष्ट्या रद्द होणे गरजेचे आहे.गैरअर्जदाराने तारीख 25/05/2010 रोजी बंद पडलेले मिटर बदलून दिले परंतु मागिल वादग्रस्त बिलात आजपर्यंत दुरुस्ती करुन दिलेली नाही.म्हणून त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने दिलेले माहे एप्रिल 2010 व मे 2010 चे वादग्रस्त बिल बेकायदेशिर ठरवुन रद्द व्हावे,मानसिक त्रासापोटी रु. 15000/- व अर्जाचा खर्च रु. 2500/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.6 लगत वादग्रस्त बिलाच्या छायाप्रती, चुकीची बिले दुरुस्त करुन मिळणेसाठी गैरअर्जदाराकडे तारीख 17/04/2010 रोजी दिलेल्या अर्जाची स्थळप्रत, मिटर बदली अहवाल अशी 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.शिवाय युक्तिवादाच्यावेळी नि.14 लगत वरील कागदपत्रांच्या मुळप्रतीही दाखल केलेल्या आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर तारीख 01/10/2010 रोजी लेखी जबाब सादर केला गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबात ( नि.11) तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारली आहेत.अर्जदाराला दिलेली बिले ही रिडींग प्रमाणे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.ज्या काळात गैरअर्जदाराचे कर्मचारी रिडींग घेण्यासाठी अर्जदाराच्या घरी गेले होते,परंतु घर बंद असल्यामुळे रिडींग मिळाले नव्हते एप्रिल 2009 ते मार्च 2010 दिलेली आहेत.मार्च 2010 प्रत्यक्ष रिडींग 3062 मिळाले त्यातून पूर्वीचे रिडींग 1954 वजा करुन 1908 युनिट विज वापराचे बिल एप्रिल मध्ये दिलेले आहे ते योग्य व बरोबर आहे.अर्जदाराने 17/04/2010 रोजी वादग्रस्त बिलाबाबत तक्रार केली होती हे त्यांनी नाकारलेले नाही. दिलेली बिले योग्य व बरोबर असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही. सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.12) दाखल केलेले आहे. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारा तर्फे अड.गिते यांनी युक्तिवाद केला.गैरअर्जदारा तर्फे मंचापुढे कोणीही हजर झालेले नसल्यामुळे उपलब्ध पुराव्याच्या आधारे प्रकरणाचा मेरीटवर निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदार याने अर्जदारास देयक तारीख 09/04/2010 आणि देयक तारीख 06/05/2010 ची दोन बिले अवास्तव रक्कमेची चुकीची व बेकायदेशिर देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 वादग्रस्त बिले रद्द होण्यास पात्र आहे काय ? होय. 3 निर्णय ? अंतिम आदेशा पमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 ते 3 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010315629 नंबरचे घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतलेले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे.गैरअर्जदाराकडून मार्च 2009 पर्यंतची आलेल्या बिलाबद्दल अर्जदाराचा काहीही वाद नव्हता. मार्च 2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक मिटरवर 1954 युनिट असतांना ते अचानक बंद पडले ही पुराव्यात नि.14/1 वर दाखल केलेल्या मुळ बिलातील मागिल रिडींग तपशिला खाली दिलेल्या आकड्यावरुन लक्षात येते अर्जदाराचे म्हणणे असे की,त्यानंतर फेब्रुवारी 2010 पर्यंत गैरअर्जदाराने बंद पडलेले मिटर न बदलता सरासरी 26 युनिट प्रमाणे बिले दिली ही बाब देखील नि.14/1 वरील एप्रिल 2010 च्या बिलातील “ मागिल विज वापर ” या शिर्षका खालील युनिटच्या आकड्या वरुन स्पष्ट दिसते.सदर बिलात मागिल रिडींग 1054 व चालू रिडींग 3062 अशी नोंद करुन एकुण 1108 युनिटची आकारणी रु.7926.54 ( राऊंड फिगर 7920/- ) दिलेले आहे.परंतु चालू रिडींग 3062 कशाच्या आधारे घेतले. या संबंधीचा कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.एप्रिल 2009 ते मार्च 2010 या काळात डोअरलॉकमुळे रिडींग घेता आले नव्हते त्यामुळे सरासरी 26 युनिटची बिले दिली आहेत असा बचाव गैरअर्जदाराने लेखी जबाबात घेतलेला आहे परंतु अर्जदाराने पुराव्यात नि.14/2 वर दाखल केलेल्या घरातील दर्शनी भागातील मुख्य दरवाजाच्या फोटोमध्ये विज कनेक्शनचा मिटर हा दरवाजाच्या बाहेर जोडलेला असल्याचे स्पष्ट दिसते त्यामुळे गैरअर्जदाराने यासंबंधी केलेली विधाने खोटे असल्याचेच उघड झालेले आहे.अर्जदाराने वादग्रस्त बिले दुरुस्त करुन मिळावे म्हणून गैरअर्जदाराकडे तारीख 17/04/2010 रोजी लेखी तक्रार अर्ज दिला होता त्या अर्जाची स्थळप्रत ( नि.6/2) दाखल केलेली आहे.वास्तविक त्या अर्जाची दखल घेवुन चुकीचे बिल दुरुस्त करुन देण्याची कारवाई करण्याची गैरअर्जदाराची जबाबदारी होती एप्रिल 2010 च्या बिलात चालू रिडींग 3062 होते हे पटवुन देण्याची देखील गैरअर्जदाराची जबाबदारी होती तक्रारी प्रमाणे त्याचे निरसन केले असते तर अर्जदाराला कायदेशिर दाद मागण्याची वेळच आली नसती त्यामुळे एप्रिल 2010 व मे 2010 ची दोन्ही वादग्रस्त बिले प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे केलेले कथन कोणत्याही सबळ व ठोस पुराव्या शिवाय ग्राह्य धरता येणार नाहीत व मान्यही करता येणार नाहीत गैरअर्जदाराने याबाबतीत निश्चितपणे सेवात्रुटी केलेली आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे वरील दोन्ही बिले रद्द होण्यास पात्र ठरतात. अर्जदाराने पुराव्यात नि.14/3 वर दाखल केलेल्या माहे मार्च 2009 च्या बिलात मागिल विज वापराच्या कॉलम मध्ये अर्जदाराच्या घरी साधारण किमान 31 ते कमाल 111 विज वापर असल्यामुळे सरासरी 65 युनिट अर्जदाराच्या घरी विज वापर होता असे लक्षात येते त्यामुळे वरील दोन्हीही बिले रद्द करुन त्या महिन्यात अर्जदाराने 65 युनिटचा विज वापर केला असे ग्रहीत धरुन नविन दुरुस्त बिल मिळणे न्यायोचित होईल.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले देयक तारीख 09/04/2010 व देयक तारीख 06/05/2010 रद्द करण्यात येत आहे.त्या ऐवजी वरील दोन्ही दिलेल्या बिलाच्या काळातील विज वापर सरासरी 65 युनिट विज वापर केला होता असे ग्रहीत धरुन अर्जदारास दुरुस्त बिल द्यावे.बिलापोटी याबाबत जर काही रक्कम वसुल केली असेल तर ती अर्जदारास परत करावी.अथवा पुढिल बिलात समायोजित करावी. 3 याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.500/- व अर्जाचा खर्च रु.500/- आदेश मुदतीत द्यावे, अगर पुढिल बिलात ती रक्कम समायोजित करावी. 4 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |