निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 23/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 13/03/2012 कालावधी 11 महिने. 04 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सिकंदर खान पिता छोटू खान पठान. अर्जदार वय 30 वर्ष.धंदा.- व्यवसाय. अड.एस.ए.घुगे. रा.येलदरी कॅम्प ता.जिंतूर जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत कं.जिंतूर रोड.परभणी. अड.एस.एस.देशपांडे. 2 सहायक अभियंता. महाराष्ट्र राज्य विद्युत कं.जिंतूर ता.जिंतूर.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराला गैरअर्जदाराने मिटर रिडींग प्रमाणे बील न देवुन दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा येलदरी कँप इथे रहातो व तो कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणी चालवतो व त्यासाठी त्याने गैरअर्जदाराकडून विद्युत कनेक्शन घेतलेले असून त्याचा ग्राहक क्रमांक 542210565041 आहे. अर्जदाराने दिनांक 05/03/2008 पर्यंत नियमितपणे देयके भरली होती दिनांक 05/05/2008 रोजी अर्जदाराच्या नावे रु.11,444/- चे विद्युत देयक आले तेही अर्जदाराने भरले त्यानंतर दिनांक 27/07/2008 रोजी रु.30,620/- चे बील अर्जदारास दिले.अर्जदार बिल दुरुस्तीसाठी गैरअर्जदाराच्या कार्यालयात गेला असता तुम्ही बील जर भरणार नसाल तर आम्ही तुमचे कनेक्शन तोडून टाकू अशी धमकी देण्यात आली व दिनांक 11/08/2010 रोजी रु. 31,740/- चे बील देण्यात आले व बील भरले नाही तर विज कनेकशन तोडून टाकण्याची धमकी दिली,म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे बील मीटर रिडींग प्रमाणे देण्यात यावे व मानसिक त्रासापोटी रु.5000/- व दाव्याचा खर्च रु.3000/- देण्यात यावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, विद्युत देयके, पावत्या व CPL दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व अर्जदार हा ग्राहक या संज्ञेतच बसत नाही त्यामुळे त्याची तक्रार न्यायमंचात चालू शकणार नाही व अर्जदार हा नियमित वीजबिले भरत नसल्यामुळे त्याची थकबाकी वाढते व सदरील बील हे थकबाकीसह व मीटररिडींग प्रमाणेच आहे. तसेच दिनांक 31/05/2011 रोजी अर्जदारास वीज चोरीचे रु.108,062/- व रु.59,133/- थकबाकीचे बील देण्यात आले आहे व ते न भरल्यामुळे गु.रं.नं.124/11 दिनांक 31/05/2011 रोजी विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अन्वये वीज चोरीची तक्रार दाखल केलेली आहे तक्रारदाराला दिलेले बील हे विजचोरी संबंधात असल्यामुळे मा.मंचास प्रस्तुतची तक्रार चालवण्याचे अधिकारक्षेत्र नाही.अर्जदाराने ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे,म्हणून प्रस्तुतची तक्रार रु.6000/- खर्च लावुन फेटाळण्याची विनंती केलेली आहे. लेखी जबाबासोबत गैरअर्जदाराने त्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 542210565041 अन्वये विज पुरवठा घेतलेला आहे. ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या दिनांक 27/07/2010 च्या अर्जावरुन ( नि.71/1) वर त्याने दिनांक 05/03/2008 रोजी विज जोडणी घेतली, परंतु 12 महिने त्याला गैरअर्जदाराने वीज बीले दिले नाही व दिनांक 05/05/2009 रोजी त्याला रु.11,500/- चे बील दिले व त्यानंतर बील वाढतच गेले. अर्जदाराने गैरअर्जदाराने त्याला वर्षभर विद्युत देयक मिळाले नसल्यामुळे विद्युत देयक देण्याची मागणी केली असल्याचा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या नि.7/41 वरील CPL वरुन अर्जदाराने एप्रिल 2009 च्या विद्युत देयकानंतर दिनांक 29/07/2009 रोजी रु.4000/- व दिनांक 04/09/2009 रोजी रु.2500/- गैरअर्जदाराकडे भरलेले दिसतात CPL बघता अर्जदाराने विद्युत देयकाचा भरणा न केल्यामुळे अर्जदाराची थकबाकी वाढत गेलेली आहे.अर्जदाराचे विद्युत देयक मीटर रिडींग प्रमाणेच असल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही,असे आम्हांस वाटते म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |